मकरंद जोशी

सर्वसाधारणपणे आपल्या सार्वजनिक जीवनात सर्वात बदनाम झालेला शब्द कुठला असेल तर तो म्हणजे ‘राजकारण’. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की ‘साहित्य क्षेत्रात राजकारण नको ’ किंवा ‘क्रीडा क्षेत्रात राजकारण करू नये.’ पण बारकाईने पाहिलं तर अगदी स्वयंपाकघरापासून ते मंदिरांच्या व्यवस्थापनापर्यंत सगळ्याच ठिकाणी राजकारण होत असतं, कारण राजकारण हे मानवी स्वभावांच्या कंगोऱ्यांमधून आणि मानवी मनाच्या विविध पैलूंमुळे आकाराला येत असतं. पदांची किंवा नात्यांची उतरंड म्हटली की वर्चस्वाची भावना आली, उच्च पदाची आकांक्षा आली, एकमेकांवर कुरघोडी करण्याची वृत्ती आली आणि अर्थातच स्वत:चा हेतू साधण्यासाठी डावपेच आले. हे सगळं फक्त महापालिका किंवा विधानसभा किंवा लोकसभेतच होतं असं नाही तर समाजाच्या वेगवेगळ्या थरांमध्ये ते वेगवेगळ्या पद्धतीने घडतच असतं. फक्त त्याचे निरीक्षण करून त्याचा अनुभव घेऊन तो शब्दबद्ध करणारे लोक अभावानेच आढळतात. त्यामुळेच मग माधव सावरगांवकर लिखित ‘सारीपाट’ या कादंबरीला विशेष महत्त्व प्राप्त होतं, कारण या कादंबरीत एका कंपनीतील राजकारणाचा सारीपाट माधव सावरगांवकर यांनी प्रभावीपणे रेखाटला आहे. मराठीत मुळात राजकीय कादंबऱ्यांची संख्या फारशी नाही. त्यात कॉर्पोरेट सेक्टरमधील अंतर्गत चित्र रेखाटणाऱ्या कादंबऱ्या-कथा म्हटल्यावर तर अच्युत बर्वे, ह. मो. मराठे, संजीव लाटकर अशी मोजकी नावेच आठवतात. या नावांच्या जोडीला आता माधव सावरगांवकर हे नाव याच कारणासाठी नक्की घेता येईल.

Loksatta lokrang A disturbing story in the medical field
वैद्याकीय क्षेत्रातली अस्वस्थ करणारी कहाणी
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
ratan tata
द कम्प्लीट मॅन…
Ratan Tata
‘टाटा’असणं हीच जबाबदारीची जाणीव
Haryana and jammu Kashmir assembly election
अग्रलेख: अ-पक्षांचा जयो झाला…
loksatta editorial on ratan tata
अग्रलेख: जीवन त्यांना कळले हो…
israeli attacks targeting hamas and hezbollah fighters
अग्रलेख : अधर्मयुद्धाचा अंत?
Loksatta editorial Loksatta editorial on Israel Hamas war akshay shinde Encounter
अग्रलेख: बुल्स इन चायना शॉप्स!

‘सारीपाट’ ही कादंबरी ‘कलर्स अॅन्ड केमिकल्स लिमिटेड’ या कंपनीतील अंतर्गत घडामोडी, घटना आणि व्यक्तिरेखांच्या माध्यमातून कॉर्पोरेट क्षेत्रातील राजकारणाचं इत्थंभूत चित्र वाचकांसमोर उभं करते. फ्लोअरवरचे कामगार, कामगार संघटनेचे नेते, एचआर, अकाउंट्सपासून ते सिक्युरिटीपर्यंत वेगवेगळी डिपार्टमेंट्स आणि त्यात काम करणारे लोक आणि या सगळ्यांच्या वर असलेले उच्चपदस्थ यांच्यातील नात्याची गुंतागुंत सावरगांवकरांनी वेधकपणे मांडली आहे. एम. डी. पदावरील ‘बॉस’ आणि त्याच्या हाताखालच्या अनेक डिपार्टमेंटमधली माणसं यांच्यात एक अंतर जरी असलं तरी बॉसने घेतलेल्या निर्णयांचा परिणाम जसा खालच्या माणसांवर होत असतो; तसाच खालच्या थरातील कर्मचाऱ्यांचे आपापसातील हेवेदावे, स्पर्धा आणि शह-काटशह याचाही परिणाम उच्च पदस्थांच्या निर्णयावर कसा होतो आणि त्यात काही वेळा प्रामाणिक अधिकारी कसे भरडले जाऊ शकतात याचं प्रत्ययकारी चित्रण या कादंबरीत पाहायला मिळतं. हा सगळा पट साकारण्यासाठी सावरगांवकर यांनी व्यक्तिरेखांवर भर दिला आहे. नव्याने एम.डी.पदावर नियुक्त झालेला रुस्तुम दप्तरी, एचआर.चा यशवंत तथा वाय. के., महाड प्लांटचे वैद्या, अकाउंट्सचा तरंग प्रधान, नव्याने एचआरचा प्रमुख बनलेला अजित शिराळी या प्रमुख व्यक्तिरेखांच्या रंगांनी आणि स्वभावातील रसायनांनी ‘कलर्स आणि केमिकल्स’मधील राजकारण लेखकाने रंगवले आहे. यातल्या प्रत्येकाचा स्वभाव, वृत्ती, मानसिकता वेगळी तर आहेच, पण त्यातील कंगोऱ्यांमुळे कादंबरीत नाट्यात्मकता निर्माण झाली आहे. उदाहरण म्हणून तरंग प्रधान आणि अजित शिराळी या दोन व्यक्तिरेखांचा उल्लेख करता येईल. तरंग प्रधानचा कुजकट, खुनशी स्वभाव ठळक करण्यासाठी त्याच्या लहानपणातील घटना, कॉलेजातील प्रसंग यांचा वापर लेखकाने केला आहे तर अजित शिराळीचा कावेबाजपणा, कारस्थानी वृत्ती दाखवतानाच त्याला होणारा त्वचाविकाराचा त्रास जणू त्याच्या मानसिकतेमधील नीचपणा अधोरेखित करण्यासाठी लेखकाने वापरला आहे.

कंपनीच्या महाड युनिटमधला कामगारांचा संप हाताळताना यशवंत तथा वाय.कें.नी दाखवलेला धोरणीपणा, बोनससाठी युनियन लीडर साहेबांबरोबरची मीटिंग, तरंगने युनियन लीडरचा विश्वास संपादन करून स्वत:चं उखळ पांढरं करून घेणं, अजितने हेंकेलच्या मर्जरचा बागुलबुवा उभा करून रुस्तमची दिशाभूल करणं अशा घटना-प्रसंगांमधील तपशिलांमुळे कादंबरीला भरीवता प्राप्त झाली आहे. लेखक सावरगांवकर स्वत: औद्याोगिक वातावरणात अनेक वर्षे कार्यरत असल्याने, वास्तवात घडलेल्या अनेक घटनांचा त्यांनी या कादंबरीत चलाखीने वापर केला असणार यात शंका नाही, त्यामुळेच कादंबरीला एक अधिकृतता आली आहे. व्यक्तिरेखांच्या माध्यमातून कथानकाचा पट उलगडला असल्याने लेखकाने सगळ्या प्रमुख व्यक्तिरेखा तर ठळक, ठसठशीत आणि त्रिमितीय रेखाटल्या आहेतच, पण त्याचबरोबर कॅप्टन कूलर, मारुती भोईर, शेरील, सुवर्णा शिराळी, दिलीप घाणेकर अशा अवतीभवतीच्या व्यक्तिरेखाही मोजक्या स्ट्रोक्समधून उठावदार होतील याची काळजी लेखकाने घेतलेली आहे. मात्र या सगळ्या रेखाटनांमध्ये अजित शिराळी किंवा तरंग प्रधान किंवा वाय. के. या व्यक्तिरेखा जितक्या सशक्त आणि बहुआयामी झाल्या आहेत, तशी ‘रुस्तम दप्तरी’ ही मात्र झाली नाहीये. एम.डी.पदावर काम करणारा रुस्तम त्याच्या हाताखाली घडणाऱ्या अनेक घडामोडींपासून अगदीच अनभिज्ञ कसा आहे? घाणेकरांचा सल्ला आणि मदत यावर तो जरा जास्तच अवलंबून आहे असं वाटतं, जे त्याच्या पदावरच्या व्यक्तीला शोभत नाही. एम.डी. पदावरच्या माणसाचे कंपनीतील घडामोडी गुप्तपणे जाणून घेण्याचे स्वत:चे मार्ग असतात, तशी माणसं त्यांनी पेरलेली असतात आणि म्हणूनच ते अंतर्गत राजकारणात योग्य वेळी योग्य चाल खेळू शकतात, पण इथे लेखकाला रुस्तम हा एक ‘स्ट्रेट फॉरवर्ड ब्रिटिशर’ पद्धतीचा माणूस म्हणून रंगवायचा असल्याने, त्याचं व्यक्तिमत्त्व जरा अधिकच सौम्य झालं आहे.

माधव सावरगांवकर लिखित ‘सारीपाट’ या कादंबरीला केशवराव कोठावळे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कादंबरी लेखन स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले आहे. त्या स्पर्धेसाठी नव्वदपेक्षा अधिक कादंबऱ्या सादर झाल्या होत्या. साहजिकच गुणवत्तेच्या बाबतीत ‘सारीपाट’ सरसच आहे. पुस्तकाच्या ब्लर्बवर वंदना बोकील यांनी म्हटल्याप्रमाणे अनुभवाधिष्ठित आशय, लेखनतंत्राची चांगली जाण, उत्तम भाषा यामुळे ही कादंबरी अत्यंत वाचनीय झाली आहे. मराठीत अभावानेच आढळणारं कॉर्पोरेट-उद्याोग जगतातील वातावरण जिवंत करणारी ही कादंबरी वाचकांच्या अनुभवविश्वात नक्कीच मोलाची भर घालणारी ठरेल.

‘सारीपाट’, – माधव सावरगांवकर, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, पाने-१५२, किंमत- २५० रुपये.