अरविंद गजानन जोशी

देशभरात झालेली दोन आंदोलने आणि एक भलीमोठी यात्रा यांना माहितीपटाचा विषय करण्याचा एक प्रयत्न झाला. २०० तासांच्या वर असलेले, आठ वेगवेगळ्या कॅमेऱ्याने शूट झालेले, तब्बल आठ टेराबाइटचे अगडबंब फुटेज संकलन करून आणि त्याला निवेदनाची जोड दिली गेली. ‘रेझिस्टन्स’ या १९५ मिनिटांच्या चार भागांच्या डॉक्युमालिकेची निर्मिती यातून झाली, त्याविषयी…

article about social and political polarization facing by american media
वृत्तवाळवंट सुफलाम करण्यासाठी…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Donald Trump
Donald Trump : ‘हश मनी’ प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा! सर्व आरोपातून झाली बिनशर्त सुटका
Action taken against bullet driver who makes loud noise
नागपूर : फटाके फोडणाऱ्या बुलेटमुळे त्रस्त! पोलिसांनी शेकडो सायलेन्सर…
spread of bogus research papers The proposed regulations mention the UGC Care List pune news
बोगस संशोधनपत्रिकांचे पुन्हा पेव? प्रस्तावित नियमावलीत ‘यूजीसी केअर लिस्ट’चा अनुल्लेख
Donald Trump
Donald Trump : आम्हीच अमेरिकेतली काही राज्ये विकत घेतो! कॅनडाच्या नेत्यानं डोनाल्ड ट्रम्प यांनाच दिली ऑफर
Information from District Collector Kumar Ashirwad that efforts are being made to start Solapur air service
सोलापूर विमानसेवेला लवकरच मुहूर्त; प्रशासनाकडून आवश्यक बाबींची पूर्तता
devendra fadnavis on pune
Devendra Fadnavis Video: “पुणे बुद्धिमान लोकांचं शहर आणि बुद्धिमान लोकांना…”, देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमध्ये केलेलं विधान चर्चेत!

माझी स्वत:ची डॉक्युमेण्ट्री माध्यमाशी ओळख ही खूप उशिराने झाली. माझ्या शिक्षणाला इंजिनीअरिंगची पार्श्वभूमी असली, तरी निव्वळ आवड आणि प्रेम म्हणून या क्षेत्रात मी उडी घेतली. माझे या माध्यमातील औपचारिक शिक्षण नाही, पण त्याची दृश्यभाषा अवलोकनातून अवगत केली. आनंद पटवर्धन, मायकल मूर, एरॉल मॉरिस यांच्या डॉक्युमेण्ट्रीज पाहिल्यानंतर खरे तर या माध्यमाची ताकद लक्षात आली. सामाजिक-राजकीय विषय कुठलीही बाजू न घेता मांडणं, मेलोड्रामा टाळून प्रेक्षकांच्या नैतिक आवाक्याला आवाहन करणं अशी या थोर फिल्ममेकर्सच्या कामाची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यातून खूप शिकायला मिळालं. आता शौनक सेन आणि पायल कपाडिया या तरुण भारतीय दिग्दर्शकांच्या डॉक्युमेण्ट्रीजना आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळतोय हे पाहून खूप आनंद होतो. डॉक्युमेण्ट्री हे माध्यम भारतात हळूहळू आशयाने आणि यशानेही विस्तारत जाईल, अशी आता खात्री वाटते.

साधारण १० वर्षांपासून वेगवेगळ्या फिल्म्स आणि डॉक्युमेण्ट्रीजच्या निर्मितीमध्ये कधी दिग्दर्शक म्हणून तर कधी सिनेमे पाहूनपाहून या माध्यमाच्या अंतरंगाला स्पर्श करता आला. गोष्ट सांगण्याचे एक माध्यम म्हणून सिनेमाकडे पाहत गेलो, पण डॉक्युमेण्ट्रीजकडे पाहताना सत्य शोधण्याचे एक सर्वोत्तम साधन म्हणून पाहायला लागलो. तीच एक महत्त्वाची प्रेरणा डॉक्युमेण्ट्री माध्यमाला गांभीर्याने घेणाऱ्या प्रत्येकाची असते/ असावी. डॉक्युमेण्ट्री सिनेमापेक्षा कमी खर्चीक असल्याने पैसे उभे करणे तुलनेने सोपे जाते. तरीही सगळ्यात मोठे आव्हान हेच राहते. त्यावर मात करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे हाच उपाय असतो.

जळगावमधील हतनूर धरण आणि पाणलोट क्षेत्रामध्ये दर वर्षी देश-विदेशातून हजारो पक्षी स्थलांतर करतात. त्या समृद्धीची माहिती देणारी ‘हतनूरचे वारकरी’ ही माझी डॉक्युमेण्ट्री बऱ्यापैकी प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. अमरावतीमध्ये शतकापूर्वी गणपती महाराज या संतकवीने समाजातील जातीकलह नष्ट करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्यावर आधारलेली ‘अजात’ ही डॉक्युमेण्ट्री मी केली. पुणे परिसरातील निसर्ग समृद्धीने नटलेला टेकडी परिसर विकासाच्या नावाखाली बळी घालण्याचा घाट दोन दशकांपूर्वी घातला गेला. त्याविरोधात सुजाण नागरिकांनी कठोर पवित्रा घेत लढा दिला. त्याची गोष्ट सांगणारी ‘हिलिंग्ज हील’ ही डॉक्युमेण्ट्रीदेखील मी केली आहे.

डिसेंबर २०१९ ते मार्च २०२० मध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) याविरोधातील आंदोलनातून डॉक्युमेण्ट्रीचा विषय आमच्या डोक्यात घोळायला लागला. खरे तर यानंतर नोव्हेंबर २०२० ते डिसेंबर २०२१मध्ये दिल्लीच्या सीमांवर झालेले किसान आंदोलन आणि २०२२ च्या नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात आलेली भारत जोडो यात्रा या तीन अपूर्व चळवळींमुळे विषयाला चालना मिळाली. आमच्या वकुबाप्रमाणे या तीन चळवळींची आणि त्यातून ठळक उठून येणाऱ्या जाणिवांची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न मी आणि माझ्या चमूने केला. त्यातून ‘रेझिस्टन्स’या चार भागांच्या आणि एकूण १९५ मिनिटांच्या डॉक्युमेण्ट्री मालिकेचा जन्म झाला.

२०१९च्या डिसेंबर महिन्यात केंद्रातल्या भाजप सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणला आणि देशभरात आंदोलनं सुरू झाली. दिल्लीतल्या मुस्लीम महिलांच्या शाहीनबाग आंदोलनाने एका मोठ्या लढ्याची नांदी झाली. हे शाहीनबाग एक स्थानिक आंदोलन न राहता आपला प्रतिकार नोंदवण्यासाठीचे एक सार्वत्रिक प्रतीक बनले. असे प्रतीकात्मक शाहीनबाग २०१९ डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसच्या समोर बसायला लागले. शाहीनबाग आंदोलनाचे स्वरूप हे अखंडित धरणे आंदोलनाचे होते. सीएए-एनआरसी यांना विरोध असणाऱ्या वेगवेगळ्या संघटनांचा, नागरिकांचा आणि विशेष करून महिलांचा या धरणे आंदोलनात समावेश होता. सीएए म्हणजे धर्माच्या आधारावर भारताचे नागरिकत्व ठरवले जाणे हा संविधानाच्या आत्म्याला मारलेला जबर तडाखा होता. शाहीनबाग आंदोलन त्याचा बुलंद प्रतिकार म्हणून उभे राहिले.

शेतकरी आंदोलनाचेही तसेच. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात हे आंदोलन दिल्लीच्या सीमांवर उभे राहिले. त्याचे स्वरूपही अखंडित धरणे आंदोलनाचे होते. त्यात प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेशचे शेतकरी सहभागी होते. या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे हा प्रतिकार संघटित होता. शेतकरी संघटनांच्या एकजुटीने आंदोलनाची एक काळजीवाहू यंत्रणा बसवली गेली होती आणि त्यामुळे वर्षभर हे आंदोलन दिल्लीच्या तख्ताला वेढा देऊ शकले. या आंदोलनाच्या मागची कारणं मात्र आर्थिक होती. साधनसंपत्तीच्या मालकीसाठी, उत्पादन व्यवहाराच्या नियंत्रणासाठी केवळ आर्थिक प्रश्नांना घेऊन स्वातंत्र्योत्तर भारतात झालेले सर्वात मोठे आंदोलन असे या शेतकरी आंदोलनाला म्हणता येईल

या दोन्ही आंदोलनांमध्ये माणसाच्या स्वातंत्र्याची गाणी गायली गेली. प्रेम, सौहार्द, करुणा यांचा विहंगम उत्सव या आंदोलनांमधून बघायला मिळाला. या दोन्ही आंदोलनांना तात्कालिक यशही मिळाले. ही दोन्ही आंदोलने जुलूमकारी कायद्यातून मुक्त होण्यासाठी होती. ती नागरिकांची होती. त्यांना राजकीय पाठिंबा जरी असला तरी तो बाहेरून होता. या आंदोलनांच्या कार्यकारिणीमध्ये राजकीय नेत्यांचा प्रत्यक्ष हस्तक्षेप नव्हता. ‘रेझिस्टन्स’च्या पहिल्या भागाला याचीच पार्श्वभूमी होती.

आता इथे सुरू होतो मुक्तीचा आणि प्रतिकाराचा सारीपाट. भारतात मुक्त होण्याचा आध्यात्मिक अंगानेच विचार केला गेला आहे. निर्वाण, मुक्ती, मोक्ष या सर्व आध्यात्मिक साधनांद्वारे प्राप्त करायच्या गोष्टी आहेत. ही इथली व्यवस्थेची परंपरा सांगते, पण त्याला समांतर अशी भौतिक मुक्तीचा पुरजोर एल्गार करणारी परंपराही आहे आणि या दोन्ही परंपरा तितक्याच प्राचीन आहेत. त्या खरे तर एकमेकांमधूनच जन्म घेतात. शोषणाचा, बंधनांचा जोर वाढतो तेव्हा स्वातंत्र्याचा, समतेचा झेंडा घेऊन एखाददुसरा अवलिया प्रत्येक कालखंडात या भारतात झालेला आहे. भारतामध्ये भौतिक बंधनांपासून म्हणजे जातिप्रथा, संसाधनांचे मालकीहक्क, रूढी, चालीरीती यांच्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर ती व्यवस्थेशी प्रतिकार करूनच मिळवावी लागलेली आहे. व्यवस्थेच्या कोणत्याही धर्मग्रंथांनी/ कायदेपुस्तकांनी ही मुक्ती कधीच दिलेली नाही. मी एक माणूस म्हणून जन्मापासून मुक्त आहे. माझ्यावरच्या जात-धर्म-पंथांच्या उपाध्या या तकलादू आहेत. हे ठामपणे ‘ब्रह्मवाक्य’ म्हणून व्यवस्थेने कधीही ठसवले नाही. याउलट शोषणाच्या उतरंडीवरच सगळ्या समाजाला ठेवले गेले. अगदी वैदिक काळापासून किंवा त्याही आधीपासून जेव्हा केव्हा या भारतात पहिल्यांदा एखादी गोष्ट देव म्हणून पुजली गेली असेल किंवा एखादा सामाजिक धर्म/पंथ/टोळी चालू झाली असेल तेव्हाच त्याला प्रश्नही तेवढ्याच जोरकसपणे विचारले गेले आहेत, की आपण हे करतोय, ते का करतोय? आणि या दोन परंपरांमधला आदिम संघर्ष सध्याच्या काळात सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय स्वरूपात जो आम्हाला दिसला तो दाखवण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही आमच्या डॉक्युमेण्ट्रीच्या ‘इन सर्च ऑफ लिगसी’ (वारशाच्या शोधात) या भागात केला.

आमच्या डॉक्युमेण्ट्रीचा दुसरा भाग सुरू होतो तो नोव्हेंबर २०२२ मध्ये राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात देगलूरजवळ प्रवेश करते तिथपासून. आधीच्या दोन आंदोलनांमध्ये आणि भारत जोडो यात्रेत बराच मोठा फरक होता. ती धरणे आंदोलने होती आणि ही यात्रा. या यात्रेत राहुल गांधी त्यांचे १२० भारतयात्री यांच्यासोबत महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांत फिरत होते. कष्टकरी माणूस, अनेक वंचित जातीजमाती समूह, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, नेते आणि वेगवेगळ्या मागण्या, प्रश्न घेऊन येणाऱ्या सामाजिक संघटना यांच्या संपर्कात येत होते. दिवसाला तब्बल २५-३० किलोमीटरचा टप्पा रोज पार करत होते. राजकीय कारणांसाठी एवढे मोठे आणि दीर्घकालीन यात्रेचे रूप गेल्या अनेक दशकांमध्ये भारतीयांनी पाहिले नव्हते. भारत जोडो यात्रा ही काही तरी अनोखीच गोष्ट होती. राजकीय, सामाजिक, आर्थिक, आध्यात्मिक अशा सर्वच रंगांच्या छटा या यात्रेत होत्या. मुळात दीर्घ टप्प्यासाठी रोज चालणे ही क्रियाच अंतर्मुख करायला लावणारी आहे. पण या यात्रेमधून आणि तिच्या आध्यात्मिक अनुभूतीतून सामाजिक तसेच राजकीय प्रश्न सुटतील का, हा प्रश्न उभा राहतोच. या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न म्हणजे आमच्या डॉक्युमेण्ट्रीचा तिसरा एपिसोड ‘इन सर्च ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस’ (काँग्रेसच्या शोधात). भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासून आतापर्यंत तिच्यामध्ये होत गेलेले बदल, भारताच्या सत्ताकारणात झालेले बदल आणि प्रतिकाराची परंपरा एवढी उघड स्वीकारताना होणारे काँग्रेसमधले ताणतणाव, हे मांडण्याचा प्रयत्न या भागात आम्ही केला.

प्रतिकाराची अनेक रूपे या तीनही चळवळींमध्ये आम्हाला बघायला मिळाली. त्यांची संगती लावणं अवघड आहे. म्हणून आमच्या डॉक्युमेण्ट्रीची चार भागांत विभागणी करावी लागली. प्रतिकाराची नवीन भाषा आणि नवीनच व्याकरण आम्ही पाहत होतो. आपलं प्रेम जेव्हा तुम्ही ओसंडून वाहू देता, आपल्या भावनांना कोणत्याही धर्म, भाषा, जात, प्रदेशाच्या भावनांमध्ये अडकवून न ठेवता तुम्ही फक्त एक माणूस म्हणून वाट फुटू देता तेव्हा तुम्ही शून्य होऊन जाता. असं शून्य होऊन तुम्ही फक्त दुसऱ्या व्यक्तीवर प्रेमच करू शकता. द्वेष, मत्सर नष्ट होत जातात. हा एक प्रकारचा कॅथार्सिसच आहे. इथं मुक्तीचं अध्यात्म नव्याने पुन्हा आकाराला येतं. याची चिकित्सा ‘गॅदरिंग द रेझिस्टन्स’ या चौथ्या आणि शेवटच्या भागात केली.

अनेक प्रश्नांचा मागमूस घेण्याचा प्रयत्न या डॉक्युमेण्ट्री मालिकेमधून आम्ही केला. म्हणूनच तिच्या ‘अवाजवी’ आकाराविषयीही थोडं सांगावं वाटतं. ज्या वस्तूचे पाच रुपयांचे छोटे पॅकेट उपलब्ध असते त्याचा खप अधिक होतो. तसंच सध्याच्या उत्तर आधुनिक काळात दृश्यगोष्टीसुद्धा छोट्या छोट्या रील्समध्ये कंझ्युम केल्या जात आहेत. भरगच्च संगीत, आटोकाट फिल्टर्स लावून तयार झालेल्या रील्सनी बऱ्याच प्रमाणात माहितीपटांचा बाजार काबीज केलेला आहे. दीर्घ आकाराच्या डॉक्युमेण्ट्रीला प्रेक्षक राहिलेला नाही. माझ्या लहानपणी एक वाक्प्रचार होता, की ‘अमुक- तमुकने तहानभूक विसरून एखादं पुस्तक एका बैठकीत वाचून काढलं.’ आता तो फारसा वापरला जात नाही. कुठल्याही कलेचे अंतिम प्रेयस असलेली प्रेक्षकांची तहानभूक विसरायला लावणारी तल्लीनता आताच्या काळात मिळवणे अशक्य झालेले आहे. आणि त्यामुळे ‘रेझिस्टन्स’च्या १९५ मिनिटांच्या आकाराविषयी मनात धाकधूक होतीच. तरीही दीर्घ स्वरूपात या विषयाचे दस्तावेजीकरण होणे महत्त्वाचे होते. ‘रेझिस्टन्स’चे सगळे पैलू यात आम्ही दाखवले आहेत. त्यामुळे ‘व्ह्युज / रीच’ वरती परिणाम होईल हे माहीत असताना आम्ही आकाराबाबत तडजोड कली नाही. या निर्मितीतला एडिटिंग हा सगळ्यात अवघड भाग होता. तीन वर्षांच्या कालावधीत एकूण २०० तासांच्या वर असलेले, आठ वेगवेगळ्या कॅमेऱ्याने शूट झालेले, तब्बल आठ टेराबाइटचे अगडबंब फुटेज खंगाळून त्यातून वेगवेगळे धागे सुटे काढले. त्यात निवेदन बसवून त्याची गोष्ट तयार केली. हे जवळपास वर्षभर दमछाक करून टाकणारे काम होते. त्यात आमचा कस लागला, पण अशा प्रकारच्या दीर्घ कामांचे भविष्य मात्र इथून पुढच्या काळात खूपच क्षीण आहे, असे मला वाटते. मुळात डॉक्युमेण्ट्री या प्रकाराविषयीच भारतीय प्रेक्षकांमध्ये एक उदासीनता आहे. ती पूर्णपणे काढून टाकता आली तर या माध्यमाचे भविष्य उज्ज्वल असेल.

माणूस हा जन्मापासून स्वतंत्र आहे. हे स्वातंत्र्य निसर्गदत्त आहे. इतर माणसांनी तयार केलेल्या व्यवस्थेतून पारतंत्र्य जन्माला येतं. या पारतंत्र्याचा, शोषणाचा प्रतिकार म्हणजे आयुष्य. हा प्रतिकार माणसाच्या धमन्यांमध्ये फिरत असतो. शोषण जेवढे अनादी तेवढाच प्रतिकारही. शोषणाच्या सिस्टीममध्ये जेवढे सातत्य आहे तेवढेच प्रतिकारातही आहे. शोषण वेदांपासून, कुराणांपासून, बायबलपासून सुरू होत असेल तर प्रतिकारही वेद, कुराण, बायबलमधूनच सुरू होतो. तो फक्त ओळखता आला पाहिजे. गोष्ट बनवून सांगता आला पाहिजे. गाता आलं पाहिजे. हवे ते चितारता आलं पाहिजे. हे करणं हाही एक महत्त्वाचा प्रतिकार आहे. सर्व प्रकारच्या शोषित माणसांनी हजारो वर्षे हे सतत जबाबदारीने केलेलं आहे. ही मुख्य गोम गवसणं हाच आमच्या ‘रेझिस्टन्स’ या डॉक्युमेण्ट्रीचे उद्दिष्ट आहे. ती पोहोचवण्यात आम्ही पास झालोय की नापास हे प्रेक्षकच ठरवू शकतात.

लिंक – https://youtube.com/playlist?list= PLdUhrlhvUqsGL9BNxdXd3yshDg1annCJm&si= gIogWfRWLxjgwXtk

arvindgj.cinema@gmail.com

Story img Loader