रमेश लक्ष्मणराव होलबोले
जगभरातील तीसहून अधिक डॉक्युमेण्ट्री आणि चित्रपट महोत्सवांत महाराष्ट्रातील आगासवाडी या गावातील दु:ख मांडणाऱ्या चित्रकर्त्याची ही गोष्ट. भारताच्या तुलनेत युरोपात माहितीपटांना दिले जाणारे महत्त्व लक्षात घेतानाही इथल्या नव्या दिग्दर्शकांबाबत आशावादी राहणे गरजेचे असल्याचे त्याचे मत महत्त्वाचे…
‘आगासवाडी’ ही फिल्म करताना मी स्वत:ला प्रश्न विचारत होतो की खरंच आपण जे वास्तव पाहतोय त्याच्याशी एकरूप होऊन, प्रतिमांच्या पलीकडे जाऊन लोकांचे आदिम काळापासूनचे दु:ख हे डॉक्युमेण्ट्रीच्या माध्यमातून मांडू पाहतोय त्यास न्याय देऊ शकू का?
आगासवाडी या गावाविषयी मला पहिल्यांदा कळालं ते आनंद विंगकर यांच्या ‘माणदेश दरसाल दुष्काळ’ या पुस्तकातून. लेखकाने दुष्काळी भागात फिरून तेथील जीवनानुभव अत्यंत पोटतिडकीने या पुस्तकात मांडले आहेत. अशा प्रकारचे लेखन असणारे कदाचित मराठीतील हे एकमेव पुस्तक असावे. त्यांची ‘अवकाळी पावसा दरम्यानची गोष्ट’ ही कादंबरी वाचून मी भारावून गेलो होतो. प्रचंड सिनेमॅटिक पोटेन्शियल असेलेली ही कादंबरी तुम्हाला अस्वस्थ करून सोडते. भोवतालची पडझड समजावून घेऊन लिहिणारा हा लेखक आपल्याला वास्तविकतेची जाणीव अतिशय तीव्रतेने करून देऊन विचार करायला भाग पाडतो.
‘एफटीआयआय’मध्ये द्वितीय वर्षात शिकत असताना आम्हाला एक डॉक्युमेण्ट्री फिल्म बनवायची असते. आमच्या बॅचपासून नवीन अभ्यासक्रमाला सुरुवात झाली होती, त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील काही विभाग वाटून देण्यात आले होते. मला सातारा व परिसर हा विषय देण्यात आला. या परिसरामध्ये दहा दिवस संशोधन करून तुमच्या आवडीनुसार विषय निवडायचा आणि त्यावर आधारित फिल्म बनवायची. दहा दिवस तसे विषय निवडीसाठी खूपच कमी होते. सुरुवातीचे दोन-तीन दिवस नुसते गोंधळात गेले. काहीच सुचत नव्हते. शिक्षकांना रोज रिपोर्टिंग करावं लागायचं, प्रेशर वाढत होतं, मनासारखा विषय सापडत नव्हता. मला नेमकं सुचलं की, कराडमध्ये आनंद विंगकर राहतात. मी विंगकरांचा दूरध्वनी क्रमांक मिळवला. त्यांना फोन केला आणि माझा परिचय दिला. त्यांना सांगितलं की मला तुमच्या ‘माणदेश दरसाल दुष्काळ’ या पुस्तकातील ‘आगासवाडी’ गावावर डॉक्युमेण्ट्री बनवायची आहे. त्यांनी मला त्यांच्या घरी बोलावले. रात्री त्यांच्या इथे मुक्कामी असताना गप्पांची मैफल जमली. विविध विषयांवर आम्ही चर्चा केली, त्यांना सविस्तर माझ्या डोक्यातील कल्पना सांगितली. सकाळी लवकर उठून आम्ही टमटमने आगासवाडीच्या दिशेने निघालो. जवळपास ७० किलोमीटरचा हा प्रवास करायला आम्हाला तीन तास लागले. कराड, राजमाची, म्हसुर्णे, मायणी ही गावं करत आम्हाला पोहोचायला भर दुपार झाली. उन्हाची तीव्रता वाढली होती. जवळपास ४० डिग्री तापमान असावं. अंगाची लाहीलाही होत होती, घामाच्या धारा वाहत होत्या. डोंगरावर असलेला हा गाव नजर जाईल तिथपर्यंत पवनचक्क्यांनी घेरलेला आहे, सतत पवन चक्क्यांचा घोंगावणारा आवाज, ओसाड पडलेली जमीन, सगळीकडे कुसळाचं साम्राज्य, कुठेतरी तुरळक झाडं दिसत होती. आपण एखाद्या विज्ञानकथेवरच्या चित्रपटातील गावात आहोत, असा भास होत होता.
गावामध्ये गेल्यावर विंगकरांनी गावातल्या काही लोकांशी माझी ओळख करून दिली. त्यानंतर आम्ही दोन-तीन तास तिथे फिल्मच्या संदर्भात चर्चा केली. त्यांनी गावातील लोकांना मला सहकार्य करण्यास सांगितले. मला मायणीला सोडून आनंद सर आणि त्यांचे मित्र गावी परतले. मग मी दहिवडी या गावात माझा प्राध्यापक मित्र नामदेव शिंदे यांच्या घरी थांबून सहा सात दिवस रोज आगासवाडीला यायचो. गावातील लोक खूप लाजरे बुजरे असल्यामुळे एकदम नवीन माणसाशी बोलण्यास धजत नसत. दोन-तीन दिवस सतत गावात चकरा मारत होतो. गावाविषयी अभ्यास करत होतो, लोकांना बोलतं करण्याचा प्रयत्न करत होतो, गावातील प्रश्न, तेथील जीवनमान समजून घेत होतो. पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय नाही, नीट रस्ते नाहीत, रोजगाराचं कुठलं साधन नाही. नेहमीच पडणाऱ्या दुष्काळामुळे होणारे स्थलांतर, कमी विद्यार्थी संख्येमुळे शाळेवर असणारी टांगती तलवार, कुठलेही करमणुकीचे साधन नाही- जिथे लोक एकत्र जमतील. ना हॉटेल, पानटपरी ना बसस्टॅण्ड. अंधार पडला की सगळ्या गावात सामसूम. दुसऱ्या दिवशी सकाळीच एकमेकांची तोंडं बघायला मिळतात. बऱ्यापैकी इथल्या शेतजमिनी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी पवनचक्क्या विकत घेतल्यात, जमिनीच्या मोबदल्यात थोडी आर्थिक रक्कम आणि प्रत्येक घरातील एका व्यक्तीला कामावर घेण्याचं आश्वासन कंपन्यांनी दिलं होतं. पण प्लांट उभा राहीपर्यंत त्यांनी लोकांना कामावर ठेवलं आणि मग हळूहळू कामगारांना कामावरून काढून टाकलं. गावात असणारे हे विविध प्रश्न मला अस्वस्थ करत होते. नेमकं शब्दात सांगायचं झाल्यास ‘यशवंत मनोहर’ यांच्या कवितेच्या ओळी मला आठवतात ‘कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे’
नेमकं कळत नव्हतं की या सगळ्या प्रश्नांची सांगड कशी घालावी. यातून एक नॅरेटिव्ह स्ट्रक्चर कस उभं करायचं. कथासूत्र सापडत नव्हतं. एके दिवशी गावामध्ये आलो, दुपारी ऊन वाढलं होतं. प्रवास करून खूप थकलो होतो. विसाव्यासाठी म्हणून गावाबाहेर असणाऱ्या मंदिरात दुपारच्या वेळी बसलो, बसल्या जागी कधी डोळा लागला कळलेच नाही. झोपेतच कोणी तरी आपल्याला आवाज देतोय आसा भास झाला. एकदम जागा झालो, तर खरंच एक म्हातारे बाबा आवाज देत होते. ‘‘कुठल्या गावचं की पाव्हणं?’’ बाबानी विचारलं, मी माझा परिचय दिला, मग त्यांनी मला चहा पिण्यासाठी त्यांच्या घरी बोलावलं. त्यांच्या घरी गेलो. त्यांनी काही तरुण मुलांशी माझा परिचय करून दिला. मुलांकडून गावाबद्दल माहिती करून घेत होतो. बोलता, बोलता त्यातील एक जण बोलला, आमच्या गावात एक माणूस आहे, जो गेल्या दहा बारा वर्षांपासून विहीर खोदतोय… त्याला कितीही सांगितलं तरी तो काही ऐकत नाही. या डोंगरात कुठलं पाणी आलंय? खुळा आहे तो जरा… असं म्हणताच सगळे जण खिदीखिदी हसायला लागले, त्याचं आपलं सारखं विहीर खोदायचं काम सुरूच आहे. तुम्हाला भेटायचं का त्याला? मला त्या क्षणीच वाटलं की आपल्या डॉक्युमेण्ट्रीचा नायक सापडला. मी लगेच हो बोललो. त्यांच्यापैकी एक जण बोलला, चला मग रानातच असेल तो.
आम्ही जेव्हा त्यांच्या रानात गेलो तेव्हा भीमराव आणि त्याचा मुलगा जनावर चारत बसले होते, मेहनतीनं रापलेला चेहरा, अकाली आलेलं प्रौढत्व, हसल्यावर तंबाखूनं रंगलेले दात, अंगात बंडी आणि डोक्याला रुमाल बांधलेला. भीमराव शहरातला माणूस बघून जरा कावराबावरा झाला. तिथे शेजारीच भीमराव खोदत असलेली विहीर होती. साधारणत: पंधरा ते वीस फूट खोल असावी. गेल्या दहा वर्षांपासून त्यांना आपल्या रोजच्या कामातून जसा वेळ मिळतोय तसं तो विहीर खोदण्याचं काम करतोय. सगळं गाव चेष्टा करतंय, पण त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलंय. त्यांना विचारलं की कशी काय कल्पना सुचली तुम्हाला विहीर खोदण्याची?
‘तरुणपणात मीही मुंबईला कामाला गेलो होतो गावातील इतर मुलांसारखा. हमाली करायचो ‘जेएनपीटी’ बंदरामध्ये. परदेशातून येणाऱ्या मोठमोठ्या जहाजांमधून सामान उतरवायचं आणि चढवायचं मेहनतीचं काम होतं. पैसेपण बरे मिळत होते. काही वर्षं ते काम केलं. घरी पैसे पाठवायचो, पण अचानक एके दिवशी काम बंद झालं. कारण काय दिलं तर आतापासून इथे सगळं काम क्रेनद्वारे चालणार. काही कळत नव्हतं. अचानक असं काम बंद झालं. म्हणून मग इतर कामगारांसोबत भायखळ्यातल्या भाजी मार्केटमध्ये हमाली केली. एका खोलीमध्ये पाच-सहा जण राहत होतो, कुटुंब गावाकडं राहायचं. मुंबईतले दिवस खूप अवघड होते. तिथं काही मन रमत नव्हतं, आधीच्या सारखं आता अंगमेहनतीचं काम होत नव्हतं. मग एके दिवशी हे सगळं सोडून गावाकडं जायचा निर्णय घेतला.
इथं आलो तर परिस्थिती आणखी अवघड, आगीतून फुफाट्यात आल्याची सातत्याने जाणीव व्हायची. सगळं कोरडवाहू रान, दर वर्षी दुष्काळ पडायचा. कुठलंच उदरनिर्वाहाचं साधन नाही. पार दुसऱ्या गावी रोजगाराची कामं करायला जावं लागायचं. या सगळ्याचा मला वैताग आलेला. मग एके दिवशी मी निर्णय घेतला की आपणच इथं रानात विहीर खोदू. मी शेजारीच असलेली विहीर पाहत होतो. जी भीमराव गेल्या दहा-बारा वर्षांपासून खोदतोय. मला एकदम बिहारमधल्या मांझीची आठवण झाली- ज्याने पूर्ण पहाड फोडून गावासाठी रस्ता तयार केला होता. आपल्या अवतीभोवती अशी ध्येयाने पछाडलेली अनंत माणसे आहेत, ज्यांनी हे जग आपल्यासाठी त्यांच्या मेहनतीनं अधिक सुंदर बनवलं.
मला फक्त त्यांच्या अडचणी मांडायच्या नव्हत्या, तर त्यांच्याशी समरस होऊन त्यांच्या मनातील कित्येक वर्षांपासूनचा आक्रोश, तेथील जीवनमान गोष्टीच्या स्वरूपात मांडायचे होते. या जागतिकीकरणाच्या काळात मूलभूत सोयीसुविधांपासून कोसो दूर असणाऱ्या अशा असंख्य गावं, वस्त्यांचा आवाज बनायचं होतं. खूप साऱ्या डॉक्युमेण्ट्री फिल्म्सचा प्रभाव होता. जगभरात या माध्यमात प्रयोग करणारे असे काही दिग्दर्शक आहेत, ज्यांनी फिक्शन आणि नॉनफिक्शन यांतील अंतर संपुष्टात आणले. प्रचंड प्रयोग तुम्ही या माध्यमात करू शकता, त्यामुळे मी माझ्या छायाचित्रकाराशी चर्चा करताना असे ठरले की, आपण ‘स्टॅटिक कॅमेरा मूव्हमेंट’ वापरूया. त्याचे कारण एकूणच आगासवाडी या गावामध्ये पवनचक्क्यांशिवाय दुसरी काही हालचाल दिसत नाही. संपूर्ण वातावरणात एक तणाव भरलेला आहे. तेथे जणू काही वेळ थांबली आहे, असा प्रत्यय सातत्याने येतो. प्रेक्षकांना तेथील प्रश्नांची तीव्रता जाणवावी म्हणून आम्ही पवनचक्क्यांचा आवाज हा फोरग्राऊंडला वापरण्याचे ठरवले. त्यामध्ये विशिष्ट ध्वनीप्रयोग वापरून आपण विज्ञानपट पाहतोय असा अनुभव आणता येऊ शकतो. खऱ्या अर्थाने कुठलीही डॉक्युमेण्ट्री फिल्म ही संकलनाच्या (एडिटिंग) प्रक्रियेत बनत असते, आम्ही खूप वेगवेळ्या स्वरूपाचे आराखडे ताडून पाहिले. फिल्ममध्ये वेगवेगळ्या प्रश्नांची छोटीछोटी दृश्यमालिका तयार करून भीमरावच्या माध्यमातून संपूर्ण गोष्ट मांडली.
आम्ही आठ दिवस तिथे चित्रीकरण केले. त्यादरम्यान आम्ही गावातच राहिलो. सुरुवातीला लाजणारी बुजणारी माणसं जेव्हा चित्रीकरण पूर्ण झाल्यावर आम्हाला निरोप द्यायला आली, तेव्हा भावनिक झाली होती. त्यांच्यासोबत गावात राहिल्यामुळे एक विश्वासाचे नाते निर्माण झाले होते. ते मी त्यांच्या डोळ्यात पाहू शकत होतो. त्यातला एक जण बोलला की, तुम्ही गावात शूटिंग करीत असल्यामुळे इथं कसं एकदम जत्रेचे स्वरूप आलेलं. आता तुम्ही परत जाणार. गावात पूर्वीसारखाच सन्नाटा दिसणार. हे ऐकून आम्ही सारे अधिक भावूक झालो होतो. नेमकं काय बोलावं सुचत नव्हतं.
ही फिल्म करताना आम्ही खूप नवीन गोष्टी शिकलो. माझ्या आयुष्याला एक नवीन कलाटणी मिळाली. कधीही विमानात न बसलेला मी इटली, जर्मनी, चीन या देशांमधील चित्रपट महोत्सवामध्ये सहभागी झालो. अनेक पारितोषिके मिळाली. माझं क्षितिज विस्तारत जातंय, पण आगासवाडी आहे त्याच अवस्थेत आहे, याची कायम मनात खंत आहे. गेल्या तीन वर्षांपासून युरोपात वास्तव्य आहे. काही चित्रपट महोत्सवांसाठी काम केलं. खूप प्रवास केलाय. या सर्व अनुभवातून प्रकर्षाने जाणवते की पाश्चिमात्य जगामध्ये डॉक्युमेण्ट्री हे माध्यम खूप महत्त्वाचे मानले जाते. फिक्शन फिल्म्सपेक्षा येथे डॉक्युमेण्ट्री फिल्मचे मार्केट मोठे आहे. अनुदान देणाऱ्या खूप संस्था आहेत. जगभरातल्या अनेक विद्यापीठांमध्ये एक नवीन विद्याशाखा म्हणून ती उदयास येत आहे. भारतात पण हे माध्यम शिकवणाऱ्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत. गेल्या तीन-चार वर्षांमध्ये भारतीय डॉक्युमेण्ट्री फिल्म्सनी जगाचं लक्ष आपल्याकडे आकर्षित केलं. ‘रायटिंग विथ फायर’, ‘टू किल अ टायगर’, ‘वसुधैव कुटुंबकम’, ‘अ नाइट ऑफ नोइंग नथिंग’, ‘द गोल्डन थ्रेड’ अशा काही फिल्म्सनी आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहत्सव गाजवले. ‘आर्टिफिशियल इंटेलिजेंस’च्या या काळात जग एका नव्या संक्रमणातून जात असताना भारतात डॉक्युमेण्ट्री फिल्म्स हे माध्यम वेगाने विकसित होत आहे. वेगवेगळ्या सामाजिक स्तरातून नवीन फिल्ममेकर्स त्यांच्या गोष्टी सांगण्यासाठी उत्सुक आहेत आणि जग त्या ऐकण्यासाठी.
मराठी साहित्यात एम.ए. झाल्यानंतर चित्रपटाचे शिक्षण. इटली आणि रोमानिया येथील चित्रपट महोत्सवात ‘आगासवाडी’ला मानाचे पुरस्कार. सध्या जर्मनी येथे वास्तव्य आणि दीर्घ डॉक्युमेण्ट्रीच्या कामात व्यग्र.
rameshholbole@gmail.com