अविनाश देशपांडे

फिल्म इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांमध्ये डिप्लोमा फिल्म करण्यापूर्वी ‘उरकून टाकायची असते ती असाइनमेंट’ ही भावना असणाऱ्या काळापासून ते आज बदलत्या माध्यमांची ताकद वापरून डॉक्युमेण्ट्रीकडे सर्जक कला म्हणून पाहण्याइतपत बदलांचे साक्षीदार असलेल्या दिग्दर्शकाचे निर्मिती आणि समाजभान स्पष्ट करणारे मनोगत…

चित्रपट निर्मितीच्या एरवी जोमात चाललेल्या उद्याोगात, विशेषत: भारतात माहितीपटांना गौण मानलं जातं. माहितीपटांसाठी लागणारा पैसा उभा करणं कठीण जातं. त्यांच्या प्रदर्शनासाठी व्यासपीठ किंवा वितरक मिळवणं त्याहूनही कठीण असतं. आजकालच्या तरुण प्रेक्षकांना आश्चर्य वाटेल, पण पूर्वी थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्यापूर्वी १०-१५ मिनिटं तिथं भारत सरकारच्या फिल्म्स डिव्हिजनचे माहितीपट दाखवले जात. त्या माहितीपटांच्या वेळेत प्रेक्षक चहापाणी, सामोसे आणि इतर विधी उरकून घेत असत. खर्जातल्या घोगऱ्या व्हॉइसओव्हरचे गंभीर आणि रटाळ माहितीपट कोण बघणार! पण खरं सांगायचं तर सरकारी चष्म्यातून का होईना, त्या काळात आधुनिक भारताला आकार देणाऱ्या विविध पैलूंची झलक त्याच माहितीपटांमध्ये पाहायला मिळत असे. त्यासाठी फिल्म्स डिव्हिजनचे आभार मानावे तेवढे थोडेच. आजही त्यांच्या संग्रहात शोधलं तर काही अव्वल दर्जाच्या कलाकृती हाती लागतील. उस्ताद आमिर खान साहेबांवरचा वीसेक मिनिटांचा माहितीपट मला विशेष आवडला होता. कदाचित यूट्यूबवर पाहायला मिळेल. माहितीपटांमधूनसुद्धा उत्तम गोष्टी सांगता येतात. आणि मला गोष्टी सांगायला आवडतं.

Marathi cinema Paithani web series Gajendra Ahire entertainment news
सकस चित्रपट कधीच काळाच्या पडद्याआड जात नाहीत…; दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचे मत
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार…
Paaru
Video: पारू व आदित्यच्या मैत्रीत फूट पाडण्यात अनुष्का यशस्वी होणार का? पाहा ‘पारू’ मालिकेचा प्रोमो
rashmika mandanna watched pushpa 2 with vijay deverakonda
रश्मिका मंदानाने विजय देवरकोंडाच्या कुटुंबियांसह पाहिला ‘पुष्पा २’ सिनेमा, फोटो झाला व्हायरल
Kolhapurs short film Deshkari highlighting farmers and soldiers won Filmfare OTT and Jury Awards
कोल्हापुरातील देशकरी लघुपटाला फिल्मफेअर पुरस्कार
plight of RTI Act in Maharashtra Most appeals and complaints pending
आरटीआय कायद्याची महाराष्ट्रात दुर्दशा; सर्वाधिक अपिले, तक्रारी प्रलंबित
Loksatta Lokrang Documentary Space Creation Documentary Director
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: अवकाशाची निर्मिती
navjyot bandiwadekar got best debut director award (1)
नवज्योत बांदिवडेकरला ‘या’ मराठी सिनेमासाठी ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ पुरस्कार

‘द ग्रेट इंडियन स्कूल शो’

वीसेक वर्षांपूर्वी टीव्हीवरच्या एका बातमीकडे माझं लक्ष गेलं. नागपुरातल्या एका शाळेत जवळजवळ दोनशे सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले होते. शाळेचे वर्ग, कॉरिडॉर, वऱ्हांडे, स्टाफरूम, मैदानं, प्रयोगशाळा, सगळी सगळीकडे. वाटलं ‘हे सगळं कशासाठी?’, ‘अशा तऱ्हेने कुणावर विनाकारण पाळत ठेवणं कितपत योग्य आहे?’ तुरुंगात कैद्यांवर देखरेख ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या सर्व्हेलन्सची व्यवस्था असते हे माहिती होतं, पण शाळेमध्ये का? काही मित्रमैत्रिणींशी, सहकाऱ्यांशी बोललो. काहींना सीसीटीव्हीची कल्पना फारच भारी वाटली. म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याची ही नामी युक्ती आहे!’ पण इतर काही माझ्यासारखेच भयचकित झाले होते. त्या शाळेचे मुख्याध्यापक हेच शाळेचे मालकही होते. अगदीच साधेसुधे गृहस्थ वाटले. मोठ्या आनंदाने त्यांनी शाळेत चित्रीकरण करण्याची, शाळेतले शिक्षक, इतर कर्मचारी, विद्यार्थी अशा सगळ्यांशी बातचीत करण्याची पूर्ण मोकळीक दिली. आम्ही वर्गातले आणि वर्गाबाहेरचे उपक्रम, विशेष वार्षिक कार्यक्रम, मुलाखती, मुलांची मैदानातली पकडापकडी सगळं चित्रित केलं, पण माहीत होतं की आमचा कॅमेरा टिपतोय ते त्यांचं स्वाभाविक, स्वयंस्फूर्त वागणं-बोलणं नसून ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या समोर केलेली नाटकं किंवा कवायती आहेत. आणि तेच तर आम्हाला टिपायचं होतं- सगळ्यांच्या वागण्यातलं वरवरचेपण. मुख्याध्यापकांची मुलाखत त्यांच्याच केबिनमध्ये घेतली. डझनावारी सीसीटीव्ही मॉनिटरनी भरून गेलेल्या भिंतींमुळे त्यांची केबिन एखाद्या सायन्स फिक्शनच्या सेटसारखी दिसत होती. मॉनिटर्समधून सगळ्यांवर करडी नजर ठेवणाऱ्या बिग ब्रदरची भूमिका करण्यात मुख्याध्यापकांना ना खेद होता, ना जॉर्ज ऑर्वेलचा काही धाक. त्यांच्या औद्धत्याचं मला राहून राहून आश्चर्य वाटत राहिलं आहे. माहितीपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला. भारतात आणि न्यूयॉर्क, पॅरिस, वॉर्सा, काठमांडू, कराची आदी वीसेक विख्यात आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल्समध्ये तो प्रदर्शितही झाला. पॅरिसमधल्या प्रदर्शनानंतरचं प्रश्नोत्तरांचं सत्र जेव्हा दिवंगत दिग्दर्शक मणी कौल यांनी घेतलं तेव्हा मला जग जिंकल्यासारखं वाटलं. वॉर्सामध्ये माहितीपट पाहिल्यानंतर एका विधी महाविद्यालयातील प्राध्यापकाने तो आपल्या विद्यार्थ्यांना दाखवण्याची परवानगी मागितली तेव्हाही तितकंच कृतकृत्य वाटलं होतं. सर्व्हेलन्सच्या इतिहासातला एक लहानसा, पण महत्त्वाचा दस्तावेज आपण तयार केला हे मला सुखावून गेलं. वीस वर्षांपूर्वी जी गोष्ट मला व्यक्तिगत खासगीपणाला फार मारक आणि म्हणून आक्षेपार्ह वाटली होती, आणि काही प्रमाणात अजूनही तसंच वाटतं, तीच गोष्ट आता सर्वमान्य झालेली दिसते. सरकारने शाळांमध्ये ‘सीसीटीव्ही’ लावणं आता बंधनकारक केलं आहे. अर्थात किती नियंत्रण म्हणजे अति नियंत्रण हा प्रश्नही उरतोच. वास्तवाची खोली आणि त्याचे कंगोरे तपासताना त्याच्या प्रवाहीपणाचं भान माहितीपटकर्त्यांनी ठेवायला हवं.

दुष्टकाळ

‘यूएनडीपी’ला भारतातल्या विकास प्रकल्पांविषयी अनेक माहितीपट करायचे होते. सत्तरच्या दशकापासून देशाला भेडसावणाऱ्या आणि व्याकूळ करणाऱ्या ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या’ हा विषय मी निवडला. वर्तमानपत्रांतल्या बातम्यांमधून कळणारी वस्तुस्थिती हादरवून टाकणारी होती. पण शेतकऱ्यांना खरंच कशाची गरज आहे याचा मला काहीच अंदाज नव्हता. हे कसं समजून घायचं? इकडून तिकडून नाही. थेट शेतकऱ्यांच्या तोंडूनच. त्यांनाच बोलतं करायचं ठरवलं. नागपूर, अमरावती, वर्धा आणि अर्थातच महाराष्ट्रातल्या शेतकरी आत्महत्यांचा भूकंपबिंदू ठरलेल्या यवतमाळ जिल्ह्यांमधली गावं तुडवत, शेतकऱ्यांना ऐकत आणि चित्रीकरण करत मी आणि माझे सहकारी हिंडलो. खेडेगावात कधीच न राहिलेल्या मला प्रत्येक दिवस, प्रत्येक अनुभव नवा होता. जाणीवपूर्वक आम्ही डेटा आणि आकडेवारीच्या आधारे विषय मांडण्याची पुस्तकी रीत टाळली. शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्या शब्दांत आणि त्यांच्याच आवाजात मांडल्या. अर्थातच व्हॉइसओव्हर अजिबात वापरला नाही. आम्ही शेतकऱ्यांना छळणाऱ्या काळ्या दुष्टकाळासमोर जमेल तसा, जमेल तेवढा फक्त आरसा धरला. त्यांची सत्याहूनही सत्य अशी कथा सांगायचा प्रयत्न केला.

आत्महत्या केलेल्या एका तरुण शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना आम्ही त्यांच्या लहानशा तोडक्या-मोडक्या घरी भेटलो; तेव्हा प्रसंगाचं गांभीर्य जाणून सहानुभूतीपूर्वक शूटिंग केलं. हतबल झालेल्या त्याच्या भावाला जे होऊन गेलं त्याहीपेक्षा त्यांच्या भविष्याची चिंता खात होती. ‘बँकेचं कर्ज पायजेल. एक बैलजोडी लागतीय. हे समदं कसं भेटल?’ त्यांची गाऱ्हाणी, त्यांच्या इच्छा-अपेक्षा, सरकारी योजना, तोकडी अनुदानं आणि तथाकथित शेतीतज्ज्ञांनी केलेली निराशा, याविषयी ते पोटतिडकीने बोलले. ‘आम्हाला जे हवंय ते द्या. पाणी, वीज, बी-बियाणं, तंत्रज्ञान, शेतीचं विज्ञान, माहिती हे समदं द्या. आम्हाला पैशांची भीक नको. आम्ही काय भिकारी आहोत?’ याला सगळ्याच शेतकऱ्यांनी माना डोलावल्या. शेती व्यवसायातल्या आपल्या कौशल्याबद्दल त्यांना अभिमान होता. आणि ते पुरेसं नव्हतं. कापूस शेतीला खूप पाणी लागतं. एखाददोन वर्ष कमी पाऊस झाला तर शेती आणि शेतकऱ्याचं जगणं, सगळंच कोलमडून पडतं. शेतकरी समुदायाची वीणही विरायला लागते. शेतकऱ्याला कोणी आपली मुलगी देत नाही. त्यापेक्षा एखाद्या कार्यालयातला चपराशी ते जावई म्हणून पत्करतात. शेतीला डावलून कारखान्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा तळतळाट बुजुर्ग शेतकरी करत होते. शेतीचं कारखानदारीत होणारं दारुण पर्यवसान, पाणी धोरण आणि त्याच्या खालून वाहणारं गलिच्छ राजकारण असं तोट्याचं समीकरण त्यांच्यासमोर होतं.

पूर्वी टीव्हीवर पाहिलेली डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांची एक मुलाखत आठवली. ‘वर्षानुवर्षं धूळ खात पडलेला स्वामिनाथन कमिटीचा रिपोर्ट कुठलंही सरकार अमलात आणणार नाही,’ असं ते पैजेवर सांगत होते. शूटिंगच्या त्या दहा दिवसांत माझ्या बुद्धीला जितकं उमगलं, मनात त्याच्या दहापट गोंधळ माजला होता. शेतीसंकटावर जेवढ्या उपाययोजना समोर आल्या, त्यापेक्षा अनुत्तरित प्रश्नांचं पारडं जड होतं. आपल्या देशाच्या विकास प्रक्रियांमधली गुंतागुंत लक्षात घेता प्रदीर्घ उलटसुलट चर्चा घडणं आणि त्याच वेळी विकासाच्या दिशेनं ठोस पावलं उचलणं अपेक्षित आहे. ‘दुष्टकाळ’ तयार झाल्यावर वाटलं, एक फिल्ममेकर म्हणून शेतकऱ्यांची कथा, व्यथा त्यांच्या आवाजात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली तर खरं, पण ‘यातून काय निष्पन्न होणार?’ मरणोत्तर भारतरत्न मिळालेल्या डॉ. स्वामिनाथन यांनी फार पूर्वी अधोरेखित केलेली पराकोटीची सरकारी अनास्था कशी, केव्हा आणि कोण बदलणार?

व्ही. बाबासाहेब : लाइफ इन फुल ओपन

पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये तीन दशकं स्टील फोटोग्राफी शिकवणारे माझे गुरुमित्र भरत कान्हेरेंनी सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर वस्ताद बाबासाहेबांना कधीकाळी असिस्ट केलं होतं. त्याच काळात दोघांमध्ये एक आदरभावयुक्त दाट मैत्रीचं नातं निर्माण झालं आणि का नाही! मिरजसारख्या लहान गावातून आलेला एक अशिक्षित, अप्रशिक्षित तरुण मुंबईतल्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीत एक मान्यताप्राप्त सिनेमॅटोग्राफर म्हणून स्थान मिळवतो. ‘गंगा-जमुना’, ‘लीडर’, ‘आप की कसम’, ‘सीमा’ यांसारखे मोठ्या बॅनरचे त्रेपन्न सिनेमे चित्रित करतो, ही गोष्ट भारावून टाकणारीच आहे. मीही भारावून गेलो. कान्हेरेसरांची बाबासाहेबांवर माहितीपट करण्याची कल्पना मी लगेच उचलून धरली. पण मला नुसता बाबासाहेबांच्या चित्रीकरण व्यवसायातल्या नैपुण्याचा, त्यातल्या बारकाव्यांचा अभ्यास करायचा नव्हता, तर व्यक्ती म्हणून त्यांच्या आयुष्याचा सौम्य सूक्ष्म शोध घ्यायचा होता. माझा कॅमेरा मला कॅमेऱ्याच्या पाठीमागे अनेक दशकं समृद्ध जीवन जगलेल्या बाबासाहेब या वस्तादावर वळवायचा होता. त्यांचं सरसकट चरित्र न मांडता एक सूक्ष्म तरल व्यक्तिचित्र चितारावं असं ठरलं.

पहिल्या भेटीतच माझी नव्वदीतल्या उमद्या बाबासाहेबांशी दोस्ती झाली. मिरजेतल्या त्यांच्या दुमजली घरात त्यांची मुलाखत घेतली. बोलताना ते ज्या सहजतेने मोठमोठी नावं घेत, त्यावरून सिनेसृष्टीतल्या त्यांच्या दीर्घ आणि अफाट अनुभवाची ओळख पटली. घराजवळच्या ज्या मशिदीत ते नमाज पढत तिथं चित्रीकरण करायला ते तयार झाले. दिलीपकुमार सिनेसृष्टीवर राज्य करत होते त्या काळात बाबासाहेब त्यांना त्या मशिदीत घेऊन गेले होते. एकदा नाही तर दोनदा. बाबासाहेबांच्या इलाक्यात राहणारे लोक बाबासाहेबांची आदराने, प्रेमाने विचारपूस करताना पाहणं फार लोभस होतं. जिथं बाबासाहेबांनी स्टुडिओ झाडण्यापासून त्यांच्या भव्य कारकीर्दीची सुरुवात केली त्या प्रभात स्टुडिओतही माहितीपटाच्या चित्रीकरणासाठी यायला ते तयार झाले. फिल्म इन्स्टिट्यूटमधल्या भेटीत, तिथले विद्यार्थी आणि शिक्षक दुपारी प्रॅक्टिकल्स करण्यात मग्न असताना अचानक त्यांची बाबासाहेबांशी भेट घडवून आम्ही त्यांना चकित केलं. जुन्या आठवणींना उजाळा देत तिथल्या भल्यामोठ्या मिचेल कॅमेऱ्यामागे बाबासाहेब कौतुकानं उभे राहिले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे वाजवलेल्या टाळ्यांच्या पार्श्वसंगीतात बाबासाहेबांनी कॅमेऱ्याच्या डोळ्याला डोळा लावून पाहिलं तो प्रसंग हृद्या होता. माहितीपटाचा प्राण त्या एका रूपकात एकवटला होता. बाबासाहेबांच्या वेळचे तंत्रज्ञ, लॅब कलरिस्ट, आशा पारेख, जितेंद्र, धर्मेंद्रसारखे कलाकार, जे. ओम प्रकाश, मोहन कुमारसारखे मोठे निर्माते या सगळ्यांच्या मुलाखती हृद्या होत्या. त्या सर्वांना बाबासाहेबांच्या विनयशीलतेबद्दल, कौशल्यपूर्ण आणि चोख कार्यशैलीबद्दल अतोनात आदर होता. ‘बाबासाहेबांची चाळीस वर्षांची फिल्म इंडस्ट्रीतली कारकीर्दच त्यांच्या कलेविषयी पुरेशी बोलकी आहे,’ असं दिवंगत सिनेमॅटोग्राफर अशोक मेहता तेव्हा म्हणाले होते. कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलनं ‘लाइफ इन फुल ओपन’ प्रदर्शित केला आणि तेव्हाच बाबासाहेबांचा सत्कारही केला. महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळालेला हा माहितीपट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्येही दाखवण्यात आला. २०१४ साली वयाच्या शहाण्णवव्या वर्षी वस्ताद बाबासाहेब गेले.

पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी असताना आणि पुढे तिथंच शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर माहितीपटांविषयी सिनेमाच्या विद्यार्थ्यांमध्ये काय भावना असतात ते मला अगदी जवळून पाहायला मिळालंय. सगळ्यात शेवटच्या, सहाव्या सेमिस्टरमध्ये विद्यार्थ्यांना डिप्लोमा फिल्म करायची असते. त्याआधीच्या पाचव्या सेमिस्टरमध्ये माहितीपट करायचा असतो. विद्यार्थ्यांच्या लेखी डिप्लोमा फिल्म करण्यापूर्वी ‘उरकून टाकायची असते ती असाइन्मेंट’ इतकंच महत्त्व माहितीपटाला असायचं. बहुतांशी विद्यार्थ्यांमध्ये दिसणाऱ्या माहितीपटाविषयीच्या अनास्थेने मी तेव्हा थक्क होत असे. मी विद्यार्थी असतानाही बाबापुता करून एडिटिंगच्या विद्यार्थ्यांना माहितीपट पूर्ण करायला मनवावं लागत असे. कारण त्यांच्या सिनेमाच्या वेडापुढे माहितीपटात त्यांना काडीचा रस नव्हता. बऱ्याचदा विद्यार्थी हरतऱ्हेच्या सबबी पुढे करत. ‘‘हे करायलाच हवं का’, ‘विषय सुचत नाहीये’, ‘माहितीपटासाठी स्क्रिप्ट लिहायची काय गरज?’ सुदैवानं परिस्थिती आता खूपशी बदललेली आहे. भारतीय माहितीपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भरघोस यश मिळतंय. इंटरनेटवर आता अनेक चांगले माहितीपट पाहायला मिळतात. डिजिटल कॅमेऱ्यामुळे चित्रीकरणाचं तंत्र सर्वांना सहज उपलब्ध झाल्यानं चित्रपट निर्मिती क्षेत्राचं काही प्रमाणात लोकशाहीकरण झालं आहे. आज घडीला भारतात माहितीपटांचं जग आशय, विषय, विषय हाताळण्याच्या पद्धती, साधनं आणि संधी यातल्या विविधतेनं समृद्ध झालेलं आहे. अनेक पर्याय समोर असताना विषय समर्पकपणे हाताळण्याची जबाबदारी अजूनच वाढली आहे. माहितीपट करू पाहणाऱ्या प्रत्येकाला माझा एकच प्रश्न असतो : तुम्हाला काय दाखवायचं आहे आणि ते कसं दाखवायचं आहे? विषय कसा हाताळणार आहात?

अविनाश देशपांडे हे पटकथा लेखक आणि फिल्ममेकर आहेत. ‘शाळा’ या मराठी चित्रपटासाठी पटकथा लेखनाचा राष्ट्रीय पुरस्कार. ‘द ग्रेट इंडियन स्कूल शो’चे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक. न्यूयॉर्कमधल्या ‘म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट’मध्ये माहितीपटासाठी प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ओपनिंग नाइटसाठी एका वर्षी निवड.

avinashdesh@gmail.com

Story img Loader