श्रीकांत आगवणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिनेमा दिग्दर्शन विभागात पुणे येथील FTII आणि  MIT- ADTमध्ये माजी सहाय्यक प्राध्यापक. ‘आर्टिस्ट इन रेसिडन्स’च्या निमित्ताने ऑस्ट्रिया, जर्मनी आणि कोलंबिया या देशांत काही काळ अभ्यास. व्हिडीओ माध्यमात काम, सध्या ‘लोककथा आणि संस्कृती’ याविषयात अध्ययन आणि चित्रपट दिग्दर्शन.

मला माझ्या एका वरिष्ठाने त्याच्या डॉक्युमेण्ट्रीच्या पहिल्या वर्गाबद्दल सांगितलं की, सर आले, ते जिथे उभे होते तिथे त्यांनी एक काल्पनिक रेषा ओढली, एका बाजूला फिक्शन आणि दुसऱ्या बाजूला डॉक्युमेण्ट्री, ते फिक्शनच्या घरात होते, ती काल्पनिक रेषा ओलांडून ते दुसऱ्या घरात गेले.. ही इतकी सताड उघडी दारं असणारी विभागणी आहे..

माझ्या ‘द फस्र्ट इज फार्स’ या अगदी ताज्या फिल्मपासून सुरुवात करतो. कट्टर हिंदुत्ववादी कर्तारसिंग थत्ते या वल्लीवर खूप दिवसांपासून ‘डॉक्युमेण्ट’ करून ठेवावं असं वाटत होतं. आजूबाजूचा जो उजव्या विचारसरणीचा भरतीचा काळ आहे त्या ‘नदीचं मूळ’ (थत्ते यांच्या शब्दात), त्यांच्याबद्दलची उपलब्ध (केवळ ऐकीव) माहिती घेऊन त्या सगळय़ा श्राव्य अनुभवाला एक चेहरा द्यावा असा आराखडा होता, पुढे यात डॉ. वर्तक, पु. ना. ओक, नॉस्टड्रॅमस असे ज्ञात-अज्ञात वीर जमा झाले.. हे सारेच माझ्या पिढीच्या कळत्या वयात कानावर पडलेले लोक. त्यामुळे ही फिल्म एका अर्थानं ‘कुठून कुठे आलो’ या प्रवासाचा दस्तावेजी माहितीपट! सध्या सारेच लोक आपापला इतिहास सांगत आहेत, मग या साऱ्या इतिहासाची नोंद घेण्यासाठी डॉक्युमेण्ट्रीशिवाय कोणता चांगला पर्याय? यात एक खोटं बोलणाऱ्या ‘खऱ्या’ इतिहास संशोधिका दिसतात, एक नासाचा फ्रेंच बोलणारा संशोधक म्हणून येतो, एक मोठ्ठे अभिनेते त्यांचा खरा अनुभव ‘किश्श्यां’सारखा सांगतात.. दस्तावेज- दाखले- पुरावे-सबटायटल्स हे भडक गुलाबी रंगाच्या अक्षरात येतात आणि या गुलाबी रंगाला सोबत म्हणून बप्पीदांचं संगीत..

ही अशी फिल्म कितपत खरी? हे प्रेक्षकांच्या ‘भावनेवर’ अवलंबून! सत्योत्तर (पोस्ट ट्रूथ) काळातली १००% अस्सल मॉक्युमेण्ट्री किंवा डॉक्युमेण्ट्री! १८९८ साली म्हणजे, लूमीयेर भावांनी पहिला सिनेमा केल्यांनतर लगेचच तीन वर्षांत व्हिटाग्राफ कंपनीच्या दोन डॉक्युमेण्ट्रीवाल्यांनी युद्धातील महत्त्वाचा भाग शूट करता आला नाही म्हणून घरात, टबातल्या पाण्यात बोटीचा फोटो बुडवून, सिग्रेटीचा धूर वापरून बनवलेली काही दृश्य ‘खऱ्या-खुऱ्या’ डॉक्युमेण्ट्रीत वापरली- असा डॉक्युमेण्ट्रीचा समृद्ध इतिहास आहेच.

मी फिल्मचं शिक्षण घेत असताना ‘एस आर एफ टी आय’च्या बऱ्याच पारितोषिक विजेत्या डॉक्युमेण्ट्री टीव्हीवर, फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाहिल्या होत्या.. धारावीत भरलेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनात आनंद पटवर्धन आले होते, मी तिथे स्वयंसेवक म्हणून काम करत होतो. तिथे कोण नव्हतं? बाबूराव बागुल होते, आनंद तेलतुंबडे होते, य. दि. होते, पण मला आनंद पटवर्धनांचा ‘ऑरा’ काही विलक्षणच वाटला, याच्या ‘पुढे- मागे’आयआयटीमध्ये शॉर्ट फिल्मच्या कोर्समध्ये त्यांची फिल्म एकदम गुप्त वातावरणात पाहिली होती (कारण ती सेन्सॉरनं अडकवली होती, आपल्या देशाला सर्वतोपरी सोशिक असा सांस्कृतिक वारसा असल्यानं त्यांच्या जवळपास सर्वच फिल्म्स या ‘शूटिंग- एडिटिंग- सेन्सरबोर्ड – कोर्ट- प्रदर्शन- बंदी’ या ठरावीक मार्गाने बनतात)

 हा जो ‘पुढे-मागे’ असा मोघमपणा, जो सर्वसामान्यपणे माहितीपटात बिलकूलच चालू शकत नाही, तो मी आणि इतरही बरेच जण मुद्दामहून ठेवतात. यातल्या जागा प्रेक्षकांनी आपापल्या मर्जीनं भराव्यात अशा सोयीच्या या फिल्म्स. नशिबानं माझ्या आधी हे प्रयोग झाले असल्यानं मला ही वाट बिकट नव्हती.

फिल्म्स डिव्हिजनच्या साच्यातल्या फिल्म्स, पटवर्धनांचा थेट भिडणारा लढाऊ बाणा, आणि एनसीपीएत फिल्मनंतरच्या शब्दबंबाळ झालेल्या चर्चा ऐकून मी तर या डॉक्युमेण्ट्रीच्या वाटेलाच जायचं नाही असं ठरवूनच ठेवलं होतं. त्यापेक्षा ‘फिक्शन’ बनवणं किती सोप्पं! वास्तवतेपासून दूर जाण्याचाच तर साऱ्यांचा प्रयत्न असतो.

नंतर खूप वर्षांनी, मला माझ्या एका वरिष्ठानं त्याच्या डॉक्युमेण्ट्रीच्या पहिल्या वर्गाबद्दल सांगितलं की, सर आले, ते जिथे उभे होते तिथे त्यांनी एक काल्पनिक रेषा ओढली, एका बाजूला फिक्शन आणि दुसऱ्या बाजूला डॉक्युमेण्ट्री, ते फिक्शनच्या घरात होते, ती काल्पनिक रेषा ओलांडून ते दुसऱ्या घरात गेले.. ही इतकी सताड उघडी दारं असणारी विभागणी आहे!

इन्स्टिटय़ूटच्या शेवटच्या वर्षांला डॉक्युमेण्ट्री हा विषय येतोच. मी तो टाळू पाहत होतो, पण ते शक्य झालं नाही. वेळ मारून नेण्यासाठी मी एक विषय निवडला आणि शूटिंगला सुरुवात केली. त्यात रचनेची सरमिसळ होती, मुलाखती होत्या, आडवेळेतल्या कोलकात्याची वेगवेगळी रूपे होती.. पण एडिटिंगमध्ये मी काही त्याला एक गोळीबंद रूप देऊ शकलो नाही. ती फिल्म मी व्यवस्थितपणे दडवू शकलो. त्याची एकही प्रत मी माझ्याकडे ठेवली नाही- तो एकंदरच त्रासदायक अनुभव होता.. नंतर लक्षात आलं की मला ‘स्वत:चं’ -‘खासगी’ असं सांगणं फार आवडत नाही. मला माझा आवाज आवडत नाही (निवेदनासाठी) आणि संवाद तर सतत स्वत:शीच चालतो.. यावर उपाय मिळायला मला बराच वेळ लागला. माझे बरेच आवडते माहितीपटकार किती सहजतेने कॅमेऱ्यासमोर येतात, किती सहजतेने प्रेक्षकांना हाताला धरून गोष्ट सांगतात.. हे सर्व माझ्यासाठी अशक्य आहे आणि आता तर ते गरजेचं उरलेलं नाही. माझ्या माहितीपटात कथा- कादंबऱ्या- चित्रांचा सढळ वावर असतो. लेखक-चित्रकार ही तिच्या कृतीत काळाचं दस्तावेजीकरण करत असते.

.. तर या त्रासदायक प्रकरणानंतर मी हाय-तोबा केलं होतं खरं, पण मला अचानक एका मैत्रिणीच्या कृपेने एका ‘अडलेल्या’ फिल्मसाठी विचारलं गेलं. ही फिल्म ‘सिनेमा सिटी’ या एका मोठय़ा प्रोजेक्टचा भाग होती. इतर फिल्म्स बनवून झाल्या होत्या आणि ही फिल्म बनवल्याशिवाय पुढचे पैसे येणं अवघड होतं, त्यामुळे लवकरात लवकर तिला ‘मोकळं’ करणं मला भाग होतं. विषय वाटले गेले होते. माझ्या वाटणीला आलेला विषय ‘गुन्हेगारी आणि शहराचं बदलतं स्वरूप’ हा होता. मी धारावीचा असल्यानं आणि नवद्दोत्तरीत वाढलो असल्यानं मला हे सोप्पंही होतं आणि अवघडही! त्यात ही फिल्म जवळपास १०-१५ दिवसांत बनवून हवी होती. मग मी चक्क त्याची स्क्रिप्टच लिहायला घेतली. लिहिणं हे आणखी कष्टदायक असल्याचं लक्षात आल्यावर मी चित्र- आकृत्या या भाषेत सुरुवात केली.

मी धारावीतून पहाटे होणारी दारूची स्मगिलग पहिलीये, ‘अधांतर’मधला नरू, ‘सत्या’ पाहिला होता आणि सत्यम कॉप्युटर्ससारखे बरेच ‘सफेद गुन्हे’ झाले होते. ‘तुमचा दाऊद तर आमचा..’ अशी वाटणी करण्याची वेळ निघून गेली होती आणि ते मिथक वाटणारे ‘गँगस्टर्स’ही.. १९९२ हे वर्ष डंकेल-गॅट आणि बाबरी मशीदसाठी तर फेमस आहेच, पण एका नव्या गुन्ह्यांची नांदी सुरू झाली होती. या बिंदूवर माझी फिल्म- ‘सिनसिटी’ संपेल हे मी आधी ठरवलं. सात बेटांच्या मुंबईवरची डॉक्युमेण्ट्री दोन भागांत वाटली- जमीन आणि समुद्र. इंग्रजी- हिंदी लिपीतल्या नावांबरोबरच मी उर्दू लिपीतही ती नावं लिहिली होती. ९० नंतर गुन्हे बदलले, समाज बदलला, तसे सिनेमे बदलले, ‘दिल चाहता है’पासून सिनेमाचा उर्दू बाज अडगळीत गेला आणि सिनेमात दिसणारं मुंबई शहरही बदललं.

स्मगिलगचा फिल्मी इतिहास फारच थोर आहे. देवानंद, गुरुदत्त ते अमिताभ बच्चनच्या विजयपर्यंत.. आपण सर्वसाधारणपणे ‘गुन्ह्यस्य कथा रम्या’ असा लांब सुरक्षित अंतरावरूनच ऐकतो, अगदी दगडी चाळीत- धारावीत राहणारेही श्रोतेच असतात (दर्शक नाही). मानसशास्त्रीय अभ्यास असा सांगतो की, गंध आणि आवाज यात आपल्या जास्त आठवणी जपलेल्या असतात, म्हणून मी साऊंड डिझाइनला पुढे आणलं आणि दृश्यं मागच्या बाकावर बसवली. दृश्यं काय ‘खरी’ असणार होती? मी तरी कुठून ‘खरे’ गुन्हेगार आणणार होतो? मी तर हे सर्व माझ्या प्रेक्षकासारखं हिंदी सिनेमातच बघितलंय. अर्थात, टोळीत सामील करून घेण्याआधी द्यायच्या परीक्षा, परवलीचे शब्द, असे आँखो देखे लोक माझ्या ओळखीत होते तरीही हे मी नाकारलं, कारण मला काही हे असं ताटात सजवून एका विशिष्ट वर्गाच्या प्रेक्षकाला वाढायचं नव्हतं. माहितीपटात किंवा इतरही दृश्यकलेत तुमचा प्रेक्षक कोण असणार, आणि कोणाला तुम्ही प्रवेश नाकारणार हे तुमच्या वर्गसंघर्षांच्या आकलनानुसार ठरतं. माझ्या मते, ही कलाकाराची राजकीय भूमिका असते.

बॉलीवूडी सिनेमाचा संदर्भ तर या फिल्मला होताच, तरीही आठवणीतल्या फिल्म या वेगळय़ाच दिसतात. कॅमेऱ्यात थोडा बदल करून सर्व फिल्म मी हिरव्या रंगात शूट केली. पोस्टप्रोडक्शनमध्ये एका क्लीकसरशी हे मी करू शकलो असतो, पण परतीचे दोर कापून टाकल्याशिवाय पर्याय नाही हे मी मानतो. यानं झालं काय की बकरीपाडा, चोरबाजार इकडच्या वस्त्या, दारूखान्यातल्या तोडल्या जाणाऱ्या बोटी, माहीम-बांद्राची खाडी, गल्लीत फिरणारी कोंबडय़ा- बदकं, पतंग उडवणारी मुलं अशा साध्या साध्या दिसणाऱ्या गोष्टी या आपल्या भोवती एक ‘गूढ’ पडदा लावून आल्या. त्यात ‘.. पडदा न उठाओ’ असं चाळवणारं आव्हानही प्रेक्षकांच्या स्मृतींना होतंच. मोजक्याच तीन मुलाखती – हेमंत कर्णिक- चुनाभट्टी, माजी नगरसेवक रामकृष्ण केणी- धारावी, गुन्हेपत्रकार विजय चव्हाण- लालबाग (बनवलेली प्रश्नावली वेगळी होती, उत्तर म्हणून सांगितलेल्या आठवणी भन्नाट होत्या, हे माहितीपटात नेहमीच होणारे गोड अपघात. हे ज्यांना त्याची कदर त्यांच्या सोबतच होतात असं एक वचन आहे.) या मुलाखतींबरोबर सिनेमातले संवाद आणि बॉलीवूडने गुन्ह्यासाठीचा म्हणून खास कमावलेला आवाज, बॅकग्राऊंड संगीत (उदा. ‘ढिश्यूम’सारखा प्रतिभाशाली आवाज) हे संगीत म्हणून होतं. दृश्यांतली गूढता ही काही उच्च नव्हतीच, त्यामुळे तिला लगेच ‘पचवून’ दृश्याबरोबर आलेल्या ध्वनीबरोबर एक वेगळा अर्थ जोडायला मी एक सवड दिली होती. त्यामुळेच या फिल्मनंतर जे प्रेक्षक भेटत होते, ते फिल्म कशी वाटली यापेक्षा आपापले ‘एरिया’, ‘भाई’ असं स्मरणरंजन सांगायचे.. ‘बदलतं शहर’ असं काही ठोस पकडता येत नाही.. शहराच्या सीमा फक्त भौगोलिक नसतात. सी लिंक बनला, मेट्रो आली की स्मगिलगसाठी प्रसिद्ध असणारा वर्सोवा, बांद्रा खाडी, लालबाग हे अंतर्धान होणारच.

मी डॉक्युमेण्ट्रीऐवजी फिल्म का संबोधतोय तर त्याचं उत्तर फिल्म बनवण्याच्या पद्धतीमध्ये आहे. वरवर पाहता त्याला एक डॉक्युमेण्ट्रीचा बाज आहे, पण त्यातल्या सर्वच गोष्टी या पूर्वनियोजित असतात. जसं मुलाखत कोण देणार, ते काय बोलणार, कोणत्या जागेवर बसून ही मुलखात होणार हे सारं मी ठरवतो. यात आणि एका कलाकाराचे संवाद, काय फरक आहे, एक शिक्षित भारतीय, हिंदू, पुरुष, मध्यमवर्गीय अशी ‘स्व’ ओळख लक्षात आली की विषय शोधण्यासाठी काही ‘इतर’ ठिकाणी जाण्याची गरज नसते. तुमच्याकडेच तुमचे विषय असतात. नागरी संस्कृतीत वाढलेला मी नागरी संस्कृतीवरच फिल्म बनवणार हे आपसूक आहे. ‘फ्लेक्स आणि फेसेस’ आणि ‘वॉकिंग इन द सिटी’ या अनुक्रमे ‘टिस’ फेलोशिप आणि ‘पीएसबीटी’ फिल्मग्रान्टसाठी केलेल्या डॉक्युफिल्म्स त्यातल्याच.

‘फ्लेक्स आणि फेसेस’मध्ये फलकावर शुभेच्छा देणारे हसरे चेहरे आणि मुगल लघुचित्रशैलीमधले दरबारी यातलं साम्य मला दिसलं. फ्लेक्सचा एक अर्थ दंडाच्या बेंडकुळय़ा दाखवणं असाही आहेच, याचेच मी जरा आणखी पापुद्रे काढले. या फिल्ममध्ये मी ज्यांच्या मुलाखती घेतल्या त्या साऱ्यांना एक हजारपट स्लो मोशन करून ते फलकावरच्या हसऱ्या चेहऱ्यांच्या जवळ जातील याची काळजी घेतली. हे असे स्थिर-स्टॅटिक चेहरे पाहणं खूप विचित्र अनुभव देत होतं, पण हेच तर आपण आजूबाजूला पाहतो- अंतर्मनात नोंदवतो- त्याचा एक अर्थ लावतो.

‘वॉकिंग इन द सिटी’, स्लो ट्रॅव्हिलगसारखी असणारी एक फिल्म. तुमच्या वेगानुसार आजूबाजूची दुनिया उलगडते. तुम्ही गाडीत असाल तर फास्ट आणि चालत असाल तर हळूहळू.. माझं स्वत:चं चालणं, ‘त्रिशंकू’ अनुभव देणारा बांद्य्रातला स्कायवॉक, सुखवस्तू फिरस्ते, संतोका तानेदाच्या चालण्यावरच्या हायकू; आणि या साऱ्या प्रकाराकडे अकादमीक दृष्टीने पाहणारे मिशेल द सत्रो (यांच्याच निंबधाचं नाव मी फिल्मला दिलं), हायवे शेजारी शॉर्टकट म्हणून बनलेल्या, रेल्वे रुळातून जाणाऱ्या पायवाटा हे सारं यात आलं. या फिल्ममध्ये चालणारी माणसं दिसत नाहीत, पण त्यांच्या पायाखालून वाहणारे रस्ते- वाटा- गल्ल्या मात्र नायकासारखे येतात.

‘द फस्र्ट इज फार्स’ फिल्मच्या खेळानंतर नेहमीचा विचारला जाणारा प्रश्न होताच की, ही फिल्म कशी सुचली? तर त्याचं उत्तर म्हणून मी गुरुदत्तच्या सिनेमातला एक संवाद सांगितला.

‘तू काय कम्युनिस्ट आहेस?’ तो म्हणतो ‘नाही, मी कार्टूनिस्ट आहे.’ मला वाटतं की माझ्यात (न बनलेल्या) कार्टूनिस्टची एक नजर आहे आणि त्यानेच मी वास्तव जगासाठी मांडतो. कधी लिहितो, कधी उगी राहतो तर कधी फिल्म बनवतो.

डॅक्युफिल्म्सच्या लिंक्स-

Sincity https:// vimeo. com/102808717? share= copy

walking in the city https:// vimeo. com/124033497? share= copy

Flex n Faces https:// vimeo. com/167747889? share= copy

 (सिनसिटी)