अमित भोळे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
निखळ पाणी, त्याचे छोटय़ा छोटय़ा स्टेप्सचे दोन-तीन धबधबे आणि ते वरून डौलात पाहणारा मेघालयातील डबल-डेकर ब्रीज! अगदी एका मजल्यावर दुसरा असा भास व्हावा असा त्या मुळा- फांद्यांचा सांगाडा! वारकऱ्याला वारीअंती विठ्ठल भेटावा असं झालं.
वळणदार रस्ता.. सर्वत्र अंधार आणि त्या अंधाराला चिरत जाणारा आमच्या गाडीचा लाइट!!! बस.. इतकंच दिसत होतं. आम्ही एका अनोळखी खेडेगावात आज रात्री मुक्कामी जाणार होतो. राज्य नवीन, खेडं, गावाचं नाव विचित्र आणि केवळ इंटरनेटवरून नंबर काढून बुक केलेली राहण्याची व्यवस्था! का? तर ओढ होती नैसर्गिकरीत्या बनलेल्या डबल डेकर ब्रिज पाहण्याची!
साधारण रात्री सातच्या सुमारास आम्ही टायरणा नामक खेडेगावात पोहोचलो. ईशान्येकडील मेघालयात मुळातच सूर्यास्त लवकर होतो. त्यात आम्ही पोहोचल्यावर त्या खेडेगावात वीजप्रवाह खंडित झाला होता. असं वाटत होतं की, वाट तर नाही ना चुकलो आहोत? जशी आमची गाडी थांबली तशी दोन-चार तरुण मुलं ‘इकडे राहायला या, तिकडे राहायला या’ असं कधी तोडक्या मोडक्या हिंदीत तर कधी इंग्रजीमध्ये बोलत आमच्यापाशी येऊ लागली. पण जेव्हा त्यांना कळलं की आम्ही अगोदरच आमचं बुकिंग केलेलं आहे; तेव्हा मात्र त्यांनी आम्हाला तिथे जाण्याचा रस्तादेखील दाखवला. आम्ही ज्याच्याकडे जाणार होतो त्याचं नाव जॉय होतं. जॉयनं फोनवर आमच्याकडून आधीच आमची सविस्तर माहिती घेतली होती. नाव, कधी येणार, कधी जाणार याचा सविस्तर अंदाज, खाण्याची आवड इत्यादी. त्याबरोबर त्यानं youtube वरचा त्याचा त्याच्या घराकडे जाणारा एक व्हिडीओदेखील आम्हाला पाठवला होता. त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी पोहोचायला थोडादेखील त्रास झाला नाही (अंधारात असूनदेखील). गाडीतून उतरल्यावर साधारणत: शंभर पावलं चालत आम्ही दोन-चार ठेंगण्या ठुसक्या घरांना पार केल्यावर जॉयचं घर आलं. या पठ्ठय़ानं आपल्या दुमजली घरालाच एक होम स्टेचं स्वरूप दिलं होतं. त्यात किचन अधिक चार रूम असा त्याचा व्याप होता. किचन तो स्वत:च चालवे. आम्ही चटकन आमच्या बॅगा आमच्या रूममध्ये टाकल्या आणि रूम न्याहाळू लागलो. छोटीशी दहा बाय बाराची रूम त्यानं इतक्या छान पद्धतीनं शिस्तीत सजवून ठेवली होती की आपसूकच आपण कुठे आहोत, किती लांब आहोत याची जाणीवही न व्हावी. मी, पत्नी आणि दोन मुली आम्ही गरम पाण्यानं हात-पाय धुऊन डीनरची वाट पाहू लागलो. मेघालयात असताना अस्सल तिथलं म्हणून खासी स्टाइलमध्ये चिकन केलं होतं. जॉयनं आमच्यासाठी जेवणाची व्यवस्था बाहेर अंगणातच केली. दिवसभर पाऊस झाल्यानं कॅम्प फायर होऊ शकत नव्हतं खरं; मात्र त्याची कमीदेखील न भासावी असा आहार आम्हाला मिळणार होता. भाजी-पोळी, भात-डाळ, सलाड आणि सोबत मोकळं आकाश आणि समोरचा मीट्ट अंधार. पहिल्यांदाच आम्ही मेघालयातील अन्नाचा स्वाद घेत होतो आणि ते प्रचंड चविष्ट लागलं. सगळं संपवल्यावर जॉय आणि टीमनं फिडबॅकदेखील घेतला. भरपेट जेवण केल्यावर मग आम्ही जवळच फेरफटका मारण्याचा विचार केला. अंधारात मोबइलचा काजवा चमकवत १००-२०० मीटपर्यंत फेरफटका मारला. अंधार असला, जागा नवीन असली तरी भीती म्हणून वाटली नाही. मेघालयचं हे वैशिष्टय़ अगदी सर्वदूर जाणवतं.
परत आल्यावर आम्ही जॉयला सांगितलं की आमचा नाश्ता तयार ठेव, आम्ही सकाळी लवकर ट्रेक सुरू करणार आहोत. किती वेळ लागेल याचा त्याच्याकडून अंदाजदेखील घेतला. डबल डेकर ब्रिज करताना ३५०० स्टेप्स चालाव्या लागतात; पण रोज १०००० स्टेप्स चालणाऱ्या मला वाटलं हा तर हातचा (की पायाचा) मळ! पण जॉयनं माझा भ्रम दूर केला. पायऱ्या म्हणजे पायऱ्या, पावलं नव्हे! आणि साधारणत: गड, डोंगर, ट्रेक करताना आपण खालून सुरुवात करतो आणि वर चढतो, जेणे करून येताना उतरणीला त्रास कमी होतो. इथे मात्र आधी उतरायचं आहे. खाली ३५०० पायऱ्या उतरून आपण डबल डेकरला पोहचतो आणि तितकेच अंतर पुढे गेलो की येतो rainbow falls! जॉयच्या म्हणण्यानुसार सकाळी पाचच्या सुमारास सुरुवात करून पटाईत ट्रेकर ४ पर्यंत rainbow falls करून परततात देखील.
आम्ही खूप उत्सुकतेतच निजायला गेलो. वेळ ठरली होती सकाळी सात वाजेची. पॅक केलेला नाश्ता घेऊन आमच्या ट्रेकची सुरुवात करणार होतो, पण म्हणतात ना मॅन प्रपोजेस अँड गॉड डिस्पोजेस! सकाळी पाच वाजेपासून धो धो पाऊस सुरू झाला. आमची झोप तर मोडलीच. मात्र ट्रेक करता येणार नाही या कल्पनेनं अधिकच अस्वस्थ झालो. सातच्या सुमारास पाऊस कमी झाला खरा, पण रिप रिप सुरूच होती. आमच्या यजमानाला आमचा नाश्ता तिथेच गरम करून द्यायला सांगितला. मी तर नांगीच टाकली होती. विठ्ठलाची वारी केल्यावर सावळय़ाचे दर्शन न व्हावे किंवा देवीच्या गडाच्या पायथ्यापासूनच परतावं लागावं अशा नाना गोष्टी मनात येत होत्या. पण माझी पार्टनर खंबीर! तिनं जॉयजवळ प्रश्नांचा ससेमिरा लावला. पायऱ्या कशा आहेत? रेनकोट मिळेल का? आणलेल्या छत्र्या नेल्या तर ट्रेकसाठी जड तर पडणार नाहीत ना? जॉयनंदेखील तिच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं दिली!
साधारण नऊच्या सुमारास ट्रेक सुरू झाला. तिथल्या गेटपाशी आमच्या गाडीनं उतरवलं. आणि जसे आम्ही उतरलो तशी लोकल पोरं परत जवळ आली. यावेळी त्यांच्या हातात काठय़ा होत्या. बांबूच्या झाडापासून काढलेल्या या काठय़ांचा उपयोग ट्रेकमध्ये आधारासाठी होतो म्हणून आम्हीपण एक-दोन काठय़ा घेतल्या. किंमत मात्र रुपये २०, अट- परतल्यावर काठय़ा परत करायच्या. पाऊस सुरू होताच. आम्ही सुरुवात केली तर पायऱ्यांच्या आजूबाजूला घराघरांत दुकानं उघडलेली दिसली. कुणी अंडी, कुणी मॅगी तर कोणी चहा विकत होते. त्यातल्या एका दुकानात भाडय़ाने रेनकोट मिळाला. किंमत रुपये सव्वाशे, अट तीच.
समोर काय दडलंय याची काही कल्पना नसताना केवळ डबल-डेकरच्या ओढीनं आम्ही सुरुवात केली. ढग पायांत उतरलेले होते. ५० मीटर असेल. रुंद ठेंगण्या पायऱ्या आणि भोवताली निसर्ग सोबतीला. असं वाटत होतं, हॉलीवूडच्या सिनेमातील अॅमेझॉनच्या जंगलातला एखादा सीन पाहत आहोत. थोडे पुढे गेल्यावर मग पायऱ्यांचा उतार तीव्र होत होता. एकेक पायरीवरून एकेक नवदृश्य उघडावं असं होतं. घनदाट डोंगरावर वरच्या टोकावर ढगांचा गोंधळ, मग नजर खाली यावी तेव्हा त्या समान हरित थरातून मधूनच डोकावणारी उंच झाडे म्हणजे शाळेच्या मैदानात कवायतीत दोन-तीन टारगट पोरं जशी उगाच हातपाय फेकताना नजरेस यावी तसं वाटत होतं. मग खाली तुरळक वस्ती, त्यातून मधूनच जाणारी आणि दिसेनाशी होणारी पायवाट! इकडे डावीकडे खाली आपल्या पायऱ्या कुठे पोहोचवत आहेत, त्यात कुठे त्या डबल डेकरची झलक दिसते आहे का याची ओढ.. सगळं कसं जादुईहोतं! पावसानं आधीच हजेरी लावल्यानं त्या ट्रेकला अधिकच चॅलेंजिंग बनवलं होतं.
साधारण हजार एक पायऱ्या उतरल्यावर एक वस्ती लागते. तिथे चहा, पाणी असा विसावा घेता येतो. तिथे जागोजागी MNREGA चे बोर्ड लावले होते. म्हणजे इथे राहणाऱ्या लोकांना रोजगार तर मिळालाच त्याबरोबर पर्यटकांना सिमेंटच्या पायऱ्यादेखील मिळाल्या होत्या. इतक्या पायऱ्या उतरून थकायला होताच डबल डेकरकडे नेणारा रस्ता प्रत्येक वेळेस नवं सरप्राईज देत होता. पुढे गेल्यावर आम्हाला एक लोखंडी पूल लागला. खळखळत्या नदीच्या पात्रावरून लोखंडी सळ्या, तार यांनी बनलेला पूल पल्याड नेतो.
दिल्लीजवळ व्हिलेज टुरिझमच्या नावाखाली आपण जे काही साहसी खेळांचे प्रकार करतो त्याहून कितीतरी साहसी, नैसर्गिक तसेच फुकट (हे महत्त्वाचे) इथे एन्जॉय करत आहोत ही भावना तो पूल ओलांडतानाच्या एक्साइटमेंटमुळे बिलकूल डोकावली नाही. त्या ब्रिजवरून पल्याड गेल्यावर आम्हाला वाटलं की आपली मंजिल आलीच असणार, पण नाहीच. थोडं पुढे गेल्यावर अजून एक iron bridge ओलांडायचा होता. हा पूल तितकासा साहसी नव्हता खरं, पण थेट घेऊन जात होता जिंगमहमच्या लिविंग रूट ब्रिजला. ही जागा म्हणजे एक सेरेंडीपेटी! वृक्षाच्या फांद्या-पारंब्या पासून बनलेला पूल.. आम्ही तर त्याला न्याहाळू लागलो- समोरून, पार करून, खाली पात्रात उतरून, फोटो-सेल्फीचा तर नुसता पाऊसच! पण मन धावत होतं डबल डेकरकडे! तिथून झाडापानांतून दूर डबल डेकरची झलक दिसली. मग आम्ही न थांबता पायऱ्यांवरून डबल-डेकरला पोहोचलो. इथे अगोदरच पर्यटकांची गर्दी होती. जवळपास होम स्टेच्या नावाखाली स्थानिकांनी आपला व्हरांडाही भाडय़ाने देण्याची सोय केलेली दिसत होती. आपलं नाव नोंदवून डबल डेकरच्या परिसरात प्रवेश मिळतो. निखळ पाणी, त्याचे छोटय़ा छोटय़ा स्टेप्सचे दोन-तीन धबधबे आणि ते वरून डौलात पाहणारा डबल-डेकर ब्रिज! अगदी एका मजल्यावर दुसरा असा भास व्हावा असा त्या मुळा- फांद्यांचा सांगाडा! वारकऱ्याला वारीअंती विठ्ठल भेटावा असं झालं. आम्ही मनसोक्त नजरेत, श्वासात निसर्ग कोंबला. माझ्या दोन्ही पाखरांनी त्या पाण्याचा भरपूर आनंद घेतला. आमच्या वेगाने, क्षमतेने आम्हाला रेनबो फॉल्सपर्यंत जाताच येणार नाही हे स्पष्ट होते. मन भरल्यावर आम्ही परतीचा- नव्हे चढतीचा प्रवास सुरू केला. आता मात्र हमें नानी याद आ गई. दर शंभर पायऱ्यांनंतर आपण थांबू असं आधी ठरवलं. मग हा टप्पा ७०, ४०, ३० पायऱ्यांवर येऊन थांबला. हळू चालत, बसत, उठत आम्ही आमचा प्रवास साधारण चार वाजेपर्यंत संपवला. बाहेर येताच सोबत घेतलेलं सामान परत करून आम्ही जॉयकडे परतलो. त्याच्या हातचा चहा पिऊन आणि पुढच्या वेळेस रेनबो फॉलसाठी परतण्याचा पण करून गाडीत बसलो आणि थेट निजलोच!
amitbhole@gmail.com
(लेखक सनदी अधिकारी असून केंद्र सरकारच्या सेवेत आहेत.)