परेश जयश्री मनोहर

‘सातमाय कथा’ ही हृषीकेश पाळंदे यांची पाचवी कादंबरी, याशिवाय त्यांनी काही कथाही लिहिलेल्या आहेत. एखादी अत्यंत गुंतवून ठेवणारी गूढ रम्यकथा- ज्यात आपण स्थळ, काळ, एक आखीव रेखीव लॉजिक बाजूला ठेवून जसे वाचत जातो आणि लेखकाने आपल्याला जे विश्व दाखवायचे ठरवले आहे; त्यात लेखकाचे बोट धरून आपण जसे उत्सुकतेने, उत्कंठेने पुढे काय होऊ शकेल याचा अंदाज बांधत कथेत उतरत जातो तसे ही कादंबरी आपल्याला सातमायांच्या जगात घेऊन जाते.

आदिमाय आणि तिच्या सात लेकी ज्या या पृथ्वीवर लोकांचे भले करण्यासाठी, त्यांना सांभाळून घेण्यासाठी, त्यांच्या चुका पदरात घेऊन मनाचे मोठेपण दाखवत त्यांना सोबत करण्यासाठी आहेत. त्यांचा आणि मानव जमातीचा प्रवास या कादंबरीत आपण अनुभवत पुढे जात राहतो. या सातमाया प्रचंड कोपिष्टही आहेत आणि नैवेद्या दाखवला, चुकलो माय म्हणत शरण आलो की पुन्हा माफही करणाऱ्या आहेत. अर्थातच त्या आदिमायेच्या मुली असल्याने सगळी चराचर सृष्टी त्यांचे ऐकणारी आहे- मग नदीचा डोह असो किंवा पक्षी, साप असो किंवा गरुड.

मानव समाजाच्या उत्क्रांतीची जराशी समज असणाऱ्या वाचकांना ही कादंबरी वाचताना आदिम शेती, लोहयुग, ताम्रयुग, संपत्ती, खासगी मालमत्ता आणि लग्न यांसारख्या उत्क्रांत होत जाणाऱ्या व्यवस्था आणि ही कथा यांचे नाते कळायला सोपे जाते. आणि ती माहिती नसेल तरीही कादंबरी समजायला अडचण होत नाही.

कादंबरीमध्ये कोणताही काळ असो, येणारी सगळी पुरुष पात्रं मग बिरोबा, बानोबा, सूर्य, असो किंवा दाप्या आणि खोत असो… सगळे पुरुष हे सत्ताशरण, लोभ आणि अधिक ताकदीचा हव्यास असणारे, सतत युद्धोत्सुक असे आहेत. तर आदिमाय असो किंवा सातमाया किंवा दाप्याची आई किंवा अजून साधी पक्षीण या सगळ्या चुकांना पोटात घेणाऱ्या आणि क्षमाशील आहेत.

मानवी समाजाच्या इतिहासाची, त्यातल्या जन्माला येत गेलेल्या व्यवस्थांची काळाचे मोठे पट अलगद ओलांडत येणारी ही खरं तर एक रम्य कथा आहे. हा सलग मोठा पट एकसंगतेने सुरू असतो तेव्हा तुम्ही लेखकाचे आणि सातमायांचे बोट धरून स्वत:चे आजचे जगणे बाजूला ठेवून त्यात मिसळून जाता. आणि अचानक एका टप्प्यावर काळाचे बंध जोडण्याच्या नादात लेखक तुम्हाला चालू वर्तमानाच्या पन्नास वर्षं आधीच्या काळात आणून टाकतो. मग वाचक म्हणून संगती लावताना तुमची गडबड होते. आदिम काळापासून चालत आलेल्या गोष्टी ऐकताना तुम्ही एक सूट स्वत:ला दिलेली असते- काळ, वास्तव आणि लॉजिक या गोष्टींपासून मुक्त असण्याची. त्याला तुमची ना नसते आणि त्या कथेतली अंतर्गत संगती समजून घेत तुम्ही कथेत मुरत राहता, मग अचानक ते सगळं मागे टाकून लेखक जेव्हा चालू वर्तमानात तुम्हाला आणून टाकतो आणि सोबतच त्याच जुन्या स्थळ काळ लॉजिक मुक्त विचारांनी या चालू वर्तमानातही तुमचे बोट पकडू पाहतो तेव्हा ते बोट सुटू लागलेले असते. जर संपूर्ण कथेत सातत्याने ही आदिम आणि चालू वर्तमानाची ये जा सुरू असेल तर तुम्ही त्यातली संगतीही समजून घेताच, पण तसे होत नसताना अचानक हा मेळ घालण्याचा प्रयत्न होतो तेव्हा जराशी दमछाक नक्की होते. अर्थातच ही वाचक म्हणून माझी व्यक्तिगत मर्यादाही असूच शकते.

पण आजच्या काळात हे लेखन करणे धाडसाचे आहे आणि हृषीकेश हे सातत्याने करत आहेत ही महत्त्वाची बाब आहे. खरं तर आजच्या काळात प्रामुख्याने वाचकशरण आणि तंत्रशरण असे दोन प्रकारचे लेखन सातत्याने होताना दिसते. अशा काळात हृषीकेश पाळंदेसारखा लेखक थेट जगण्याला भिडत आपले अनुभव गोळा करत त्यावर काम करत लिहिण्याचा प्रयत्न सातत्याने करतो ही फारच महत्त्वाची बाब आहे. त्याच्या सगळ्याच लिखाणात अगदी प्रामुख्याने जाणवते ती स्वत:सोबत प्रामाणिक असण्याची शिस्त आणि सचोटी.

‘सातमाय कथा’ – हृषीकेश पाळंदे, पपायरस प्रकाशन,

पाने- १९२, किंमत- ३९९