खरं तर ही उत्कट प्रेमाची असफल कहाणी जशी आहे; त्याचबरोबर सीमेपलीकडल्या मित्रांनी केलेल्या विश्वासघाताचीही आहे. आणि दोन शेजारी राष्ट्रांमध्ये परिस्थितीने उभ्या केलेल्या अदृश्य भिंतीची देखील ही कहाणी साक्षीदार आहे. त्याचबरोबर ‘सोशल मीडिया’ तुमच्या जीवनाला कल्पनाही न केलेल्या एका बिकट वळणावर कसं घेऊन जातो, त्याचीही प्रचीती ही कहाणी आणून देते. खरं तर ही कहाणी म्हणजे थेट एक शोकांतिका सादर करणारा चित्रपटच आहे आणि हे आत्मकथन तो थेट आपल्या डोळ्यापुढे उभं करतो. पण या कहाणीचा सुखांत शेवट हा सर्वांनाच ठाऊक असल्यानं इथं ‘स्पॉयलर अॅलर्ट’ देण्याची काही गरजच नाही.
तरीही या पलीकडे या कहाणीला अनेक पदर आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणाची गुंतागुंत तर यातून सामोरी येत जातेच; शिवाय या कहाणीतील व्यक्तिरेखा मानवी मन कशी वेडीवाकडी वळणं घेऊ शकतं तेही दाखवून देतं. मात्र, या आत्मकथनाचं सर्वात मोठं बलस्थान म्हणजे ही निव्वळ कपोलकल्पित कहाणी नसून, ते धगधगतं वास्तव आहे.
हेही वाचा…विकलांगतेचा स्त्रीवादी विचार
वास्तव हे कल्पनेपेक्षा अधिक अद्भुत, रोमांचकारी आणि तितकंच दाहकही असतं हेच खरं. याच उक्तीचा प्रत्यय आणून देणारं ‘हमीद’ हे आत्मकथन आहे. हमीद अन्सारी हा मुंबईतील एक ‘आयटी इंजिनीअर’ सोशल मीडियाद्वारे एका युवतीच्या प्रेमात पडतो. यात नवं असं काहीच नाही. मात्र, या युवतीचं वास्तव्य असतं सीमेपलीकडल्या देशात आणि तो देश असतो पाकिस्तान. त्या युवतीला आपली ही प्रेमकहाणी आपल्या घरच्यांना सांगणं, हे मग अर्थातच कठीण असतं. मग ती आपल्या प्रियकराला साकडं घालते. ‘तू इकडे म्हणजे सीमापार करून ये आणि मला तुझ्या देशात घेऊन जा.’ अशी ती आर्जवं सुरू करते. त्याला एक कारणही असतं. पाकिस्तानातील ‘वाणी’ नावाच्या प्रथेमुळे तिचं लग्न तातडीनं लावून देण्यात आलेलं असतं. त्यामुळे तिच्या प्रेमात आकंठ बुडालेला हमीद हे धाडस करायला तयार होतो. पण पाकिस्तानला जायचं कसं? तो व्हिसासाठी प्रयत्न करतो. तो मिळणार नाही, हेही आपल्याला ठाऊकच असतं. त्यात पुन्हा ही तरुणी राहत असते, तो भाग अफगाणिस्तानच्या सीमेलगतचा. मग हमीद अफगाणिस्तानात जाऊन तेथून सीमापार करून पाकिस्तानात ‘घुसखोरी’ करण्याची एक अत्यंत धाडसी; खरं तर अत्यंत मूर्खपणाची योजना आखतो. दरम्यान एका युवक संघटनेमार्फत हमीदची तेथील काहींशी मैत्री झालेलीही असते. निदान ते आपले मित्र झालेले आहेत, असा समज हा भोळाभाबडा आणि प्रेमात बुडाल्यानं धगधगत्या वास्तवाकडे पाठ फिरवलेला हमीद करून घेतो. घरच्यांना तो आपण काही व्यावसायिक संधींसाठी अफगाणिस्तानात जात आहे, असं सांगून तिकडे रवाना होतो. मग सुरू होते ती भावभिन्या प्रेमाची दाहक आणि अंगावर शहारे आणणारी कहाणी. अफगाणिस्तानातील काही मित्रांनी केलेल्या सहकार्यामुळं तो पाकिस्तानात शिरकाव करूही शकतो. पण दगलबाजी तेथेच सुरू होते आणि तो पकडला जातो. ते होऊ शकते आणि तसं झाल्यास काय करायचं, याचा जराही विचार त्यानं केलेला नसतो.
मग सुरू होतो गजाआडच्या छळछावण्यांमधील हमीदचा प्रवास. तिथं त्याला अर्थातच भारतानं पाठवलेला हेर म्हणून पकडलं गेलेलं असतं. इकडे भारतात हमीदचे कुटुंबीय त्याच्याशी संपर्क होत नसल्यानं कमालीचे हवालदिल झालेले. ते त्याची समाजमाध्यमांवरील खाती उघडतात आणि ही दर्दभरी प्रेमकहाणी त्यांच्या समोर एखाद्या भयपटाप्रमाणे उलगडत जाते. आपला मुलगा अफगाणिस्तानातून ‘घुसखोरी’ करून पाकिस्तानात गेला आहे, हे वास्तव सामोरे येताच हमीदची आई फौजिया आणि त्याच्या कुटुबीयांचा थरकाप उडतो. त्यानंतर फौजिया आणि कुटुंबीयांचा दिसेल ते दार थोटावण्याचा प्रवास. या प्रवासात त्यांना अखेरपर्यंत साथ देतात ते मुंबईतील एक शांततावादी कार्यकर्ता आणि भारत-पाक मच्छीमारांसंबंधात अतुलनीय कामगिरी बजावणारा जतिन देसाई आणि पत्रकार राजदीप सरदेसाई. जतिनच त्यांना तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे घेऊन गेला आणि त्या जणू हमीदची दुसरी आईच होऊन गेल्या. पुढे एका अवचित क्षणी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांची राजदीप सरदेसाई यांच्याशी भेट कशी होते आणि परिणामी हमीदची शिक्षा संपताच, तो लगोलग भारतात कसा परततो ते मुळातूनच वाचायला हवे.
हेही वाचा…नव्या वर्षाचं स्वागत करताना…
हमीद भारतात परतल्यापासून त्याची ही कहाणी शब्दबद्ध व्हायला हवी, असे अनेकांना वाटत होते. पण हमीदला हा सुटकेचा सुखद धक्का आणि पाकिस्तानात भोगाव्या लागलेल्या अंधारकोठडीतील अपरंपार यमयातना यातून बाहेर पडण्यास बरेच दिवस जावे लागले. अखेरीस ‘इंडिया टुडे’च्या ज्येष्ठ पत्रकार गीता मोहन यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि हमीद त्यांच्याशी बोलायला तयार झाला. मात्र, ही कहाणी शब्दांकित करताना त्यांच्यापुढे एक पेच उभा ठाकला. हमीद पाकिस्तानात असताना, इकडे भारतात त्याची आई फौजिया आणि अन्सारी कुटुंबीयांनी त्याच्या सुटकेसाठी केलेले अथक प्रयत्न, त्यात भल्याभल्यांनी केलेली त्यांची फसवणूक आणि मदतीला धावून आलेले अनेक असंख्य अनोळखी… या साऱ्याचं चित्रणही त्याच वेळी होणं गरजेचं होतं. त्यामुळे गीता मोहन यांनी ही कहाणी सांगताना एक वेगळाच बाज निवडला आहे. एका प्रकरणात थेट हमीद आपल्याशी बोलत असतो, तर दुसऱ्याच प्रकरणात लेखिका तटस्थ नजरेने हा अंगावर येणारा भूतकाळ चित्रित करत असते. त्यामुळेच शेवट ठाऊक असलेली ही कहाणीही आपल्याला गुंतवून ठेवते. पाकिस्तानातील दगाबाज तथाकथित मित्रांची ही जशी कहाणी आहे, तसंच काही मोजकेच का होईना पाकिस्तानी हमीदच्या मदतीलाही धावून आले आणि प्राणांची बाजी लावून त्यांनी फौजिया अन्सारी यांना कशी साथ दिली, तेही मुळातूनच वाचायला हवं. त्यातून सीमेपलीकडेही माणुसकीचा ओलावा कसा असतो, त्याचीही प्रचीती येते.
‘हमीद’ हे आवर्जून वाचलं पाहिजे, असं पुस्तक- अनुवादिका सविता दामले यांनी मराठीत आणलं. कहाणीचा ओघ कुठेही तुटणार नाही आणि वाचक पुढे वाचतच राहील, अशा सुबोध पद्धतीनं त्यांनी ही कहाणी आपल्याला सांगितली आहे. हमीद म्हणतो त्याप्रमाणे, ‘माझा बंदिवास, बंदिवासातही टिकून राहण्याची धडपड आणि अखेर स्वातंत्र्य’ याचीच ही कहाणी आहे. ‘हमीद’ , हमीद अन्सारी आणि गीता मोहन अनुवाद : सविता दामले, अक्षर प्रकाशन, पाने- ४८८, किंमत- ६०० रुपये.