पं. सुरेश तळवलकर
घराणी मूल्यसापेक्ष असतात आणि शैली व्यक्तिसापेक्ष असते. मात्र या दोन्हींचा उत्तम संयोग साधल्यामुळे झाकीरभाईंचे वादन स्वत:च्या वेगळ्या शैलीच्या स्वरूपात समोर आले. तबलावादनात ‘झाकीर हुसेन’ ही स्वतंत्र शैली झाली… हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतापासून ते जगभरच्या संगीतपंथांशी तालसंगम साधणाऱ्या या अवलिया तबलियाच्या वादनविश्वाला आणखी एका तालतपस्वीची आदरांजली…
उस्ताद झाकीर हुसेन… इतिहास घडवणारे हे नाव कधी नव्हे ते सम चुकवत, हुलकावणी देत आपल्यातून निघून गेले. खूप काही करणे शिल्लक असताना वयाच्या अवघ्या ७३ व्या वर्षी त्यांच्या बोटांमधील लखलखते तेज, लवणारी वीज शांत करून विधात्याने न पटणारा न्याय केला. मात्र झाकीरजींचेच वाक्य उसने घेऊन सांगायचे तर पुण्यात्म्यांचे कधीच निधन होत नसते. ते निजधर्म असणाऱ्या देहांमध्ये आपले प्राण पेरून जातात… तेव्हा त्यांचे प्राणही इथेच कुठे असतील.
उस्ताद झाकीर हुसेन हे तबल्याला समानार्थी, पूरक ठरलेले आणि या अवकाशात सहजी सामावलेले नाव काळाच्या पाटीवरून पुसले गेले. आज देहरूपाने ते आपल्यामध्ये नाहीत. मात्र त्यांचे असणे किती रूपाने आणि स्वरूपाने आपल्यामध्ये राहणार आहे, हे कदाचित आपल्यालाही ठाऊक नसेल.
झाकीरभाईंचे वडील उस्ताद अल्लारखासाहेब दिल्ली, अजराडा, फरूखाबाद, लखनौ, पंजाब आणि बनारस या तबल्याच्या सहा घराण्यांमधील पंजाब या घराण्याचे वादक होते. त्यामुळेच वडिलांकडून त्यांना घराण्याचे बाळकडू मिळाले होतेच. खेरीज घराण्याच्या नावलौकिकात भर टाकण्याचा अल्लारखासाहेबांचा विचारही लहान वयापासूनच त्यांना मिळाला होता. ही देणगी अत्यंत मोलाची ठरल्याचे अगदी लहान वयापासून बघायला मिळालेल्या त्यांच्या तबलावादनाद्वारे प्रत्ययास आले. उस्ताद अल्लारखासाहेब आपले विचार कधी लयीच्या सूक्ष्मतेतून व्यक्त करायचे, तर कधी तिहाईमधून व्यक्त व्हायचे. मुळात तबलाजगताला उस्ताद अल्लारखासाहेबांकडून मिळालेली ही दृष्टीच एक वरदान म्हणावी लागेल. असे असताना यातील सर्वस्व उस्ताद झाकीर हुसेन यांना मिळणे ही फार मोठी बाब म्हणावी लागेल. अर्थात एकीकडे असे असले तरी त्यांच्यामध्ये घराण्याच्या पलीकडे जाण्याची क्षमताही होती. वडिलांच्या तबलावादनाचा अभिमान बाळगण्याबरोबरच अन्य तबलावादकांचा मनस्वी अभिमान असल्यामुळे; आणि या सगळ्यांचा अत्यंत सूक्ष्मतेने अभ्यास केल्यामुळेच त्यांच्यामध्ये वेगळा विचार करण्याची अलौकिक क्षमता निर्माण झाली होती. झाकीर हुसेन यांना आपल्या वडिलांचेही ज्येष्ठ असणाऱ्या उस्ताद अहमद जान थिरकवा, उस्ताद अमीर हुसेन खाँ, उस्ताद हबीबुद्दीन खाँ यांच्या तबलावादकांविषयी विलक्षण आदर होता. त्यांच्या वाजवण्याच्या शैलीचा चांगला अभ्यास होता आणि तो आपल्याकडून व्यक्त व्हावा अशी इच्छाही होती. या बळावरच त्यांनी वादनातील शास्त्र आणि त्यामागील दिग्गजांचा विचार आत्मसात केला होता. झाकीरभाईंच्या संपूर्ण कार्यकाळातील ही अत्यंत महत्त्वाची बाब म्हणावी लागेल, त्यामुळेच वडिलांकडून तबल्याबाबत मिळालेली वेगळी दृष्टी जपत, त्यांनी प्रस्थापित केलेल्या आणि रक्तासमान अंगी मुरलेल्या विचारांना न्याय देत नवतेचा ध्यास घेत राहणे त्यांना शक्य झाले आणि यातून पुढे ते इतिहास घडवू शकले. उस्ताद अल्लारखा साहेबांच्या वादनात बघायला मिळणारी लयीची सूक्ष्मता म्हणजे त्या काळी नवतेचा एक हुंकार होता. अर्थातच त्यांच्यातील हे आणि असे सर्व गुण झाकीरभाईंमध्ये भिनले होते आणि परंपरेतून आलेले विचार व्यक्त करण्यासाठीच जणू त्यांनी जन्म घेतला होता. त्यामुळेच कदाचित त्यांना अभिव्यक्तीसाठी कधी फारसा वेळ लागलाच नाही. ते अनाहूतपणे व्यक्त होत राहिले. अवघ्या पाचव्या वर्षी त्यांच्यात पाहिलेली ऊर्जा ७३ व्या वर्षापर्यंत तशीच कायम राहिलेली दिसली. या वर्षीच्या जुलैमध्ये त्यांना ऐकताना ती स्पष्ट जाणवली होती.
घराणी मूल्यसापेक्ष असतात आणि शैली व्यक्तिसापेक्ष असते. मात्र या दोन्हींचा उत्तम संयोग साधल्यामुळे झाकीरभाईंचे वादन स्वत:च्या वेगळ्या शैलीच्या स्वरूपात समोर आले. तबलावादनात ‘झाकीर हुसेन’ ही स्वतंत्र शैली झाली. ती अनेकांना अनुकरण करावेसे वाटण्याजोगी होती. त्यांनी नवनवीन प्रयोग केले. वाद्यासंगीतामध्ये साथ करताना तबल्यामधून वाद्यावादकाचे जसेच्या तसे अनुकरण करणे म्हणजे त्यांचे लय-तालाचे विचार तबल्यातून व्यक्त करणेच होते. त्यामुळेच पं. रविशंकर, पं. शिवकुमार शर्मा, उस्ताद अमजद अली खाँ, उस्ताद विलायत खाँ यांसारख्या महनीयांचे विचार तबल्यातून व्यक्त करताना त्या दर्जाची साथ करण्यासाठी आधी झाकीरभाईंनी प्रत्येकाची साथीची गरज काय आहे हे समजून घेतलेले असायचे. खेरीज त्या कलाकाराची तबलावादकासंबंधीची मानसिकता काय आहे, याचाही त्यांनी विचार केलेला असायचा. म्हणजेच त्याला काय वाजवलेले आवडते वा काय वाजवलेले आवडत नाही, हे त्यांना साथीला बसण्यापूर्वी ठाऊक असायचे. अर्थातच याबाबत स्पष्टता असायची. इतकेच नव्हे तर ते तबलावादकाने केलेला विस्तार ते कसा स्वीकारतात आणि किती कमी वाजवले तर आनंदी होतात हेदेखील त्यांना माहिती असायचे. अशा प्रकारे समोरच्या कलाकाराच्या कलाविषयक मागण्या आणि गरजांबरोबरच त्या त्या कलाकाराच्या वैयक्तिक गरजांविषयीचा त्यांचा अभ्यासही पक्का होता. म्हणूनच ते कोणाचीही साथ इतक्या सहजतेने पकडायचे की आश्चर्य वाटल्याखेरीज राहायचे नाही.
दुसऱ्याचे अनुकरण करत असताना कधी कधी नक्कल होण्याचा धोका नाकारता येत नाही; वा अमका तमका कलाकार दुसऱ्या कलाकाराची कॉपी करत असल्याचा बभ्राही होऊ शकतो. हे टाळण्यासाठी अनुकरण करताना स्वत:ची प्रतिभाही तेवढीच लखलखीत ठेवणे गरजेचे असते. झाकीरभाईंनी या दोन्हीचा संयोगही उत्तम पद्धतीने साधला. नवनवीन प्रयोग करत असताना त्यांनी अनेकांना साथ दिली. तबलावाद्या कर्नाटक शैलीमध्ये कसे वाजवता येईल याचा विचार करत त्यांनी या शैलीतील अनेक लोकांबरोबर वादन केले. आजही ख्यातनाम तबलावादकांना कर्नाटक शैलीची साथ करायला सांगितले तर जमणार नाही, कारण ही शैली वेगळी आहे. मात्र झाकीरभाईंनी या शैलीचा अभ्यास केला होता. त्यामुळेच ते हे दिव्य पार पाडू शकले. याच पद्धतीने त्यांनी तबला गझल, ख्याल, ध्रुपद, धमार, वाद्यासंगीत, नृत्य अशा सगळ्याबरोबर वाजवला. प्रयोगाच्या पातळीवर काहीही करायचे बाकी ठेवले नाही. परंपरेतून नवतेकडे जाण्याची क्षमता असल्यामुळेच हे साध्य होऊ शकले, असे आपण म्हणू शकतो.
काळानुरूप माध्यमे बदलतात. पिढी बदलते. मात्र संगीताची भाषा तीच असते. रसाळ, मोहक, वेधक भाषा कालातीत राहते. झाकीरभाईंच्या लोकप्रियतेने ही बाबही प्रकर्षाने दर्शवून दिली. त्यांनी केलेल्या असंख्य प्रयोगांमधून हे असेही होऊ शकते… हा विचार मिळत गेला. विशेषत: त्यांची विस्तार करण्याची क्षमता अफाट होती. विस्तारामध्ये कलाकार दिसतो आणि अविस्तारक्षम बंदिशीमधून रचनाकार दिसतो तेव्हा विस्तारामध्ये त्यांची ताकद फार मोठी होती. आधी उल्लेख केल्याप्रमाणे या क्षेत्रातील कलाकारांना अनुकरण करावेसे वाटण्याइतके त्यांचे विचार तगडे होते. निकोप आणि स्पष्ट वादन, तांत्रिकदृष्ट्या अत्यंत प्रभावी मांडणी हीदेखील त्यांच्या वादनाची बलस्थाने होती आणि त्याचबरोबर त्यातील बुद्धीचा विचारही अफाट होता. दुसरीकडे दुसऱ्याचे मन ओळखण्याची त्यांची क्षमता तर अफाट होतीच. थोडक्यात सांगायचे तर शरीर, मन आणि बुद्धी या तिन्ही स्तरांवर विकसित पावणारे संगीत सादर करत असल्यामुळेच ते समाजमनावर विलक्षण प्रभाव टाकू शकले आणि हे नाव इतिहास घडवणारे ठरले. ते समाजातील सर्व स्तरांवर संवाद साधू शकले. आपण बघतो की, काही कलाकारांची कला विद्वानांपुरती सीमित राहते तर काहींची सामान्यापुरतीच मर्यादित राहते. मात्र अनेक बलस्थाने असल्यामुळे झाकीरभाईंची कला सर्व स्तरांपर्यंत पोहोचली. हीदेखील एक महत्त्वपूर्ण बाब म्हणावी लागेल.
आज देशविदेशामध्ये झाकीरभाईंचे शिष्य आहेत. अर्थातच त्यातील सगळ्यांनीच त्यांच्यापुढे प्रत्यक्ष बसून शिक्षण घेतले असेल असे नाही. यासंदर्भात आपल्याकडे एकलव्याचे मोठे उदाहरण आहे. आज जगभर त्यांचे अनुकरण करणारे लोक आहेत. कदाचित त्यातील काही गुरू म्हणून झाकीरभाईंचे नाव न घेता अन्य कोणाचे नाव घेण्याची शक्यताही नाकारता येत नाही. परंतु ऐकताच ती व्यक्ती झाकीरभाईंचे अनुकरण करत असल्याचे स्पष्ट झाल्याशिवायही राहणार नाही. मुळात स्वत:चे गुरुकुल स्थापन करणे, शिष्य घडवणे यासाठी लागणारा वेळ झाकीरभाईंकडे नव्हता. ते कायम कोणत्या ना कोणत्या कामामध्ये गढून गेलेले असायचे. कायम व्यस्त असायचे. आज जपानला, उद्या अमेरिकेला, परवा लंडनला तर चौथ्या दिवशी भारतात अशी त्यांची भ्रमंती अविरत सुरू असायची. कार्यक्रमही पाठीला पाठ लावून असायचे, त्यामुळे गुरू-शिष्य परंपरेसंदर्भात बघायचे तर ते फारसे कोणाच्या हाती लागले असतील असे वाटत नाही. मात्र हे एक स्थान नव्हते तर चालते-बोलते विद्यापीठ होते. या विद्यापीठाने अनेकांना ऊर्जा दिली, प्रेरणा दिली. अनेकांचे मोकळ्या मनाने कौतुक केले. पाठीवर प्रेमाने थाप दिली. त्याचे स्मरण कायमच राहील. देहरूपाने नसला तरी हा उस्ताद कायमच आपल्या मनात जिवंत राहील. झाकीरभाईंना विनम्र आदरांजली.
(लेखक प्रख्यात तबलावादक आहेत.)
(शब्दांकन स्वाती पेशवे)