आपली कौशल्ये आणि आपले धन हे सर्वांचे भले करण्यासाठी विश्वस्त म्हणून मिळालेले कर्ज आहे…- ख्रिास्तोफर बेनिंजर

नुकतेच निधन झालेले आर्किटेक्ट ख्रिास्तोफर बेनिंजर यांचे नाव आणि मोठेपण मला माहीत होते. दहा वर्षांपूर्वी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालमत्तांचा अभ्यास करून प्राथमिक नियोजन धोरण सुचविण्यासाठी केंद्र शासनाने समिती नेमली होती. तेथे अनपेक्षितपणे माझी त्यांच्याशी ओळख झाली. पहिल्या भेटीतच आमचे सूर जुळले. यान गेल यांच्या ‘सिटीज फॉर पीपल’चे मी भाषांतर केलेले ‘असावी शहरे आपुली छान’ हे पुस्तक मी त्यांना दिले. तर त्यांनी मला त्यांचे ‘लेटर्स टू यंग आर्किटेक्टस्’ हे पुस्तक दिले. त्या पुस्तकाचा गुजराती आणि चिनी भाषेत अनुवाद झाला होता. या पुस्तकात त्यांनी ठिकठिकाणी दिलेली व्याख्याने, लिहिलेले लेख समाविष्ट आहेत. ‘मराठीमध्ये भाषांतर करशील का?’ म्हणून विचारले. त्यांनी आर्किटेक्चर हा व्यवसाय कसा निवडला आणि नंतर तो त्यांचा जीवनमार्ग कसा झाला याबद्दल लिहिले आहे. स्वत:च्या आयुष्याचे वर्णन त्यांनी चार आश्रमातला प्रवास असे केले आहे. त्यांच्या पुस्तकाच्या अनुवादाचे काम माझ्याकडून अजूनही होऊ शकले नाही याचे आज वाईट वाटते आहे.

mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
loksatta editorial on inflation
अग्रलेख: थाली बचाव…!
loksatta editorial on aliens
अग्रलेख : ‘तारे’ तोडण्याचे तर्कट!
sajag raho campaign
घडी मोडली कशी याचाही विचार करू या!
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
Indian origin Kamala Harris Rishi Sunak President Election
कौतुक कमला हॅरिसचं आणि..
Diwali and Books, Book list, Diwali, Books,
पाहू, निवडू आणि वाचू आनंदे…

ख्रिास्तोफर बेनिंजर हे मूळचे अमेरिकेतले. विद्यार्थीदशेतच त्यांनी मार्टिन लुथर किंगच्या प्रेरणेने सुरू असलेल्या वंशभेद विरोधी चळवळींमध्ये भाग घेतला होता. पंधराव्या वर्षी आर्किटेक्ट फ्रॅंक लॉइड राईट यांनी लिहिलेले ‘द नॅचरल हाऊस’ हे पुस्तक वाचून ते प्रभावित झाले. फ्लोरिडा युनिव्हर्सिटीतून त्यांनी आर्किटेक्चरची पदवी घेतली. हे शिक्षण आव्हानात्मक होते. पहिल्या वर्षी २५० विद्यार्थी दाखल झालेले असताना त्यापैकी केवळ १६ जण पास होऊ शकले!

शिक्षकांच्या सल्ल्यावरून ख्रिास्तोफर यांनी नंतर हार्वर्ड आणि एमआयटीमधून आर्किटेक्चर आणि नगररचना विषयातले उच्च शिक्षण घेतले. सत्यशोधन हे त्या विद्यापीठांचे वैज्ञानिक ध्येय होते. १९६०च्या दशकात अमेरिकेत आर्किटेक्चरच्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग होत होते. अनुभवातून कलाकृती हा तेथील शिक्षणाचा पाया होता. फ्रॅंक लॉइड राईट हे नैसर्गिक साधनांमधून निसर्गपूरक वास्तुरचना करीत. त्यांच्या रचनांवर निसर्ग, प्राणिजगत आणि बदलते ऋतू यांचा प्रभाव असे. लुई कान, फिलिप जॉन्सन यांचा आर्किटेक्चरच्या क्षेत्रात मोठा दबदबा होता. केविन लिंच यांचे विचार नगर नियोजनाच्या क्षेत्रात क्रांती करीत होते. नागरी समाजजीवनावर विशेष संशोधन होत होते. याउलट युरोपमधील ली कार्बुझिए यांसारखे आर्किटेक्ट इमारतींना आणि मानव संस्कृतीला निसर्गाच्या वरचढ मानून काँक्रीटच्या इमारती डिझाइन करीत होते.

बेनिंजर सुट्टीमध्ये युरोपमधील देश पायी हिंडून बघत. अमेरिका आणि युरोप यामधील वास्तुसंस्कृतींचा अनुभव घेत खोलवर विचार करीत. या काळात त्यांनी गालब्रेथ यांच्याकडून अर्थशास्त्राचे धडे घेतले. मानववंश शास्त्रज्ञ मार्गारेट मिड आणि इतर अनेक शास्त्रज्ञांशी त्यांचा परिचय झाला. ख्रिास्तोफर यांनी त्याला ब्रह्मचारी आश्रमातील शिक्षण काळ म्हटले आहे. पुढे जन्मभर त्यांनी भारतामध्ये राहून ज्ञान ग्रहणाचे व्रत चालूच ठेवले.

हार्वर्डमध्ये अध्यापनाचे काम करताना फुलब्राईट शिष्यवृत्ती मिळवून १९६८ मध्ये बेनिंजर अहमदाबादला आले. भारतातील प्रसिद्ध आर्किटेक्ट बाळकृष्ण दोशी यांच्या भेटीने प्रभावित झाले. १९७१ मध्ये त्यांच्या आमंत्रणाचा स्वीकार केला. त्यांच्या संस्थेतील आर्किटेक्चर डिझाइन स्टुडिओमध्ये अध्यापन सुरू केले. पुढे ते भारतातच स्थायिक झाले.

आर्किटेक्चरचा स्टुडिओ म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी यांचे एकमेकांकडून शिकण्याचे खुले दालन असे. विद्यार्थी आणि शिक्षकांचे ग्रामीण-नागरी परिसर, तेथील वैशिष्ट्यपूर्ण वास्तुरचना, लोकसंस्कृती, बांधकाम साहित्य आणि तंत्र, परंपरा, राहणीमान या सर्वांची चर्चा करण्याचे ठिकाण म्हणजे स्टुडिओ. वैचारिक मंथनातून इमारतींच्या रचना करण्याचे कौशल्य विकसित करणे हा हेतू. तेव्हापासून ख्रिास्तोफर यांची भारतीय जीवनाशी, संस्कृतीशी नाळ जुळली ती कायमची. पुढे त्यांच्याच नेतृत्वाखाली १९७३ मध्ये अहमदाबादला नगर रचना विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाला. सेन्टर फॉर एनव्हिरॉन्मेंट प्लांनिग अँड टेक्नॉलॉजीचे ( Centre for Environment Planning and Technology, CEPT) ते पहिले संचालक झाले. भारतीय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम तयार करण्यापासून त्यांनी सुरुवात केली. पुण्याच्या अनिता गोखले यांच्याशी लग्न करून गृहस्थाश्रमात प्रवेश केला.

१९७०च्या दशकात भारतामध्ये आर्किटेक्चरचे शिक्षण देणाऱ्या संस्था मोजक्याच होत्या. सिव्हिल इंजिनीअर आणि आर्किटेक्ट असे वेगळे व्यावसायिक असतात याची कल्पना मुंबई, दिल्ली, कलकत्ता अशी शहरे सोडता इतर ठिकाणी नव्हती. १९७२ साली भारतामध्ये आर्किटेक्ट्ससाठी कायदा झाला. त्यानंतर शिक्षण संस्था आणि व्यावसायिक वाढू लागले. या व्यवसायाबद्दल ख्रिास्तोफर यांनी आपल्या पुस्तकात महत्त्वाचे निरीक्षण केले आहे.

आर्किटेक्चरचे कॉलेज शिक्षण हा फक्त व्यवसायात शिरण्यापूर्वी प्राथमिक टप्पा असतो. त्यानंतर विद्यार्थ्यांना दोन प्रकारचे मार्ग आकर्षित करीत असतात. सरधोपट मार्ग म्हणजे प्रचलित व्यवस्थेमधील ग्राहकांच्या मागणीनुसार, प्रचलित फॅशननुसार इमारतीचे, प्रकल्पांचे अभिकल्प तयार करण्याचा. यात ना लोकांचा विचार असतो ना पर्यावरणावर आणि आरोग्यावर होणाऱ्या घातक परिणामांचा. उपयुक्त इमारतींना छानशा आकर्षक वेष्टनात गुंडाळून सादर करण्याचे कौशल्य असा हा धंदा तेजीत आहे. त्यातून प्रसिद्धी, पैसे, व्यावसायिक यश वगैरे मिळवता येते. अलीकडच्या काळात देशाच्या आणि राज्यांच्या शासकीय संस्था, विकासक आणि राजकारणी अशा व्यावसायिकांचे मुख्य ग्राहक बनले आहेत. अवास्तव चटई क्षेत्र वापरून विचित्र आकाराच्या इमारती बांधण्याची स्पर्धा आर्किटेक्चरच्या व्यवसायात सुरू आहे.

दुसरा मार्ग आहे तो आर्किटेक्चरचा व्यवसाय हा मानवी समाजाला सुसंस्कृत करण्यासाठी धडपडणाऱ्या ध्येयवादी, संवेदनशीलपणे व्यावसायिकांचा- असे ध्येयवादी व्यावसायिक घडविण्यासाठी तसेच गुरू लागतात. त्यासाठी वेगळ्या प्रकारचे गुरुकुल लागते. असे आर्किटेक्ट घडविण्यासाठी १९७६ मध्ये ख्रिास्तोफर आणि अनिता यांनी पुण्यामध्ये Centre for Development Studies and Activities ( CDSA) ही संस्था स्थापन केली. अशा व्यावसायिकांसाठी केवळ बांधकामांची तंत्रे, चित्रकला, संगणक शिक्षण पुरेसे नसते. विद्यार्थ्याना समाजातील विविध लोकसमूहांच्या जीवनक्रमांची जाण असावी लागते. त्यांच्या प्रति आत्मीयता असावी लागते. लोकांच्या, समाजाच्या गरजा, अपेक्षा आणि मर्यादा यांचे भान असावे लागते. लोकांशी संवाद करण्याचे कसब लागते. स्थानिक इकोसिस्टिमबद्दल सजगता आणि काळजी असावी लागते. अशी कौशल्ये कॉलेजमध्ये सहसा शिकवली जात नाहीत. ती अनुभवातून आणि प्रत्यक्ष काम करण्याच्या प्रक्रियेतून, चुकत- शिकत विकसित होत असतात. उऊरअ मध्ये त्यांनी अनेक अल्पकालीन आणि दीर्घकालीन अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले; प्रकल्पांमध्ये काम करून अनुभव घेण्याची सोय केली. सर्व रचनांमध्ये माणूस केंद्रीभूत असला पाहिजे हा विचार त्या मागे होता.

अहमदाबादमध्ये असताना त्यांनी जामनगर येथे गरीब वर्गातील कुटुंबांसाठी परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प केला होता. पुढे चेन्नईमध्ये २००० गरीब कुटुंबांसाठी त्यांनी रचना केलेला साइट आणि सर्व्हिस हा अभिनव पद्धतीचा प्रकल्प जागतिक बँकेच्या सहकार्याने पूर्ण झाला. त्यात रस्ते, वीज, पाणी, सांडपाणी जोडण्या असलेले १०० चौ.मी.चे जोते असलेले प्लॉट दिले गेले. गरीब कुटुंबांना त्यांच्या गरजा आणि क्षमतेनुसार त्यावर एक ते तीन मजली घरे बांधण्याची सुविधा होती. गरिबांनी इतर गरिबांसाठी परवडणारी भाड्याची घरेही बांधली. ती अधिकृत गुंठेवारी योजना होती असे म्हणायला पाहिजे. अशाच प्रकारे त्यांनी हैद्राबादमध्येही हुडकोसाठी योजना केली. अमेरिकेत मार्टिन ल्युथर किंग यांच्या चळवळीतून आलेले समाजभान भारतामध्ये आर्किटेक्चरच्या व्यवसायात आणले.

CDSA मध्ये वीस वर्षे शैक्षणिक-संशोधन केल्यावर संस्थेचा कारभार अनिता यांच्याकडे सोपविला. शिकवण्याचे आवडते काम, स्वत:च्या संकल्पनेतून साकारलेले शांत संकुल आणि गृहस्थाश्रम यामधून निवृत्त होऊन त्यांनी पुण्यात इंडिया हाऊस हा आश्रम स्थापन केला. आर्किटेक्चर आणि नगररचना क्षेत्रामध्ये काम सुरू केले. त्यांचे हे ऋषिकुल एका मोठ्या इमारतीमध्ये आहे. तेथे एकाच प्लॉटमध्ये घर, गेस्ट हाऊस, स्टुडिओ, आर्ट गॅलरी, सभागृह, करमणुकीच्या जागा सामावल्या आहेत.

पुण्याच्या ऐतिहासिक वाड्यांप्रमाणे मध्यभागी मोठा खुला चौक आणि दोन बाजूला इमारती अशी या इमारतीची रचना आहे. येथे राहून ख्रिास्तोफर यांनी भूतानमधील थिंपू राजधानीचा आराखडा, बंगलोर येथील अझिम प्रेमजी विद्यापीठ, कोलकाता मधील इंडियन मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, मुंबईमधील मेरीटाइम इन्स्टिट्यूट, उदगीरमधील हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र, पुण्याजवळील महेंद्र युनाइटेड वर्ल्ड कॉलेज, तसेच गोवा, श्रीलंका येथील अनेक प्रकल्पांच्या रचना स्वत:च्या संकल्पनेनुसार केल्या. त्याद्वारे पुन्हा एकदा त्यांचा नागरी समाजाशी, कलाकारांशी, समाजसेवी संस्थांशी संपर्क प्रस्थापित झाला. अनुभवांचे पुस्तक लिहून मार्गदर्शक ग्रंथ लिहायला अवकाश मिळाला. वास्तुकला ही मानवी भावना, संस्कृती, समाज यांना एका सूत्रात आणणारी कला असते. त्यावर त्यांनी केलेले चिंतन हे मुळातूनच वाचायला हवे. त्यांच्या कामांना या क्षेत्रातील प्रतिष्ठित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. सहा प्रकल्पांना सर्वोत्तम योजनांचे बक्षीस मिळाले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चरने ग्रेट मास्टर पुरस्कार देऊन गौरव केला आहे. आज शाश्वत विकासाच्या मंत्रघोषात अशाश्वत बाजारू प्रकल्प राबविले जात आहेत. बाजारू झालेल्या आर्किटेक्चरच्या व्यवसायापासून विद्यार्थ्यांना परावृत्त करणे आणि मानववादी आणि निसर्गाचे भान असणाऱ्या रचना करण्यास प्रोत्साहित करणे हे मोठे आव्हान आहे. ख्रिास्तोफर यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी त्यांच्या संस्था, सहकारी आणि शिष्य नक्की भरून काढतील अशी आशा आहे.

sulakshana. mahajan@gmail. Com

Story img Loader