आनंद हर्डीकर
महाराष्ट्रातील वैचारिक प्रबोधनाचा ज्यांनी पाया घातला, त्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी जशा विविध संस्था स्थापन केल्या, तसे अनेक उपक्रमही चिकाटीने राबविले. ‘राईज ऑफ द मराठा पॉवर’ हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ तर त्यांनी लिहिलाच, पण लयास गेलेल्या मराठेशाहीच्या उत्तरार्धाचा इतिहास विस्मरणात जाऊ नये म्हणून ब्रिटिश सरकारच्या ताब्यात असलेल्या पेशवे दफ्तरातील हजारो दस्तऐवजही प्रयत्नपूर्वक मिळवले. रावबहादूर जी. सी. वाड यांच्या सहकार्याने त्यांनी पार पाडलेली ही कामगिरी त्यांच्या इतर कार्याच्या मानाने तशी उपेक्षितच राहिली. न्यायमूर्तींनी पेशवे दफ्तरातले थोडेथोडके नव्हेत, तब्बल ५०,००० कागद मिळवले होते आणि त्यातले निवडक ५००० कागद ‘डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी’ या स्वत:च पुढाकर घेऊन स्थापलेल्या संस्थेतर्फे प्रसिद्ध होतील, अशी तजवीजही केली. नऊ खंडांमध्ये प्रसिद्ध करावयाच्या त्या ऐतिहासिक साधनग्रंथाला साजेलशी सामायिक प्रस्तावनाही त्यांनी लिहिली. तथापि ‘पेशवे रोजनिशी’ चे ते खंड प्रकाशित होण्यापूर्वीच दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. थोड्याशा विलंबाने, पण त्या संस्थेने ते सर्व खंड प्रसिद्ध केलेदेखील. (पुढे यथावकाश संस्थेचे ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था’ असे नामांतर झाले.)

शंभर वर्षांपूर्वीच्या त्या घटनेची आज नव्याने दखल घेण्याचे कारणही तसेच महत्त्वाचे आहे. गेली कित्येक वर्षे दुर्मीळ असलेल्या त्या पेशवे रोजनिशीच्या आधारे संस्थेचे विद्यामान अध्यक्ष डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी लिहिलेला ‘पेशवेकालीन समाज आणि प्रशासन’ हा ग्रंथ नुकताच प्रसिद्ध झाला आहे. विशेष म्हणजे त्यांच्यासारख्या व्यासंगी विद्वानाने हा ग्रंथ लिहून न्यायमूर्तींच्या ‘त्या’ पायाभूत संकलन/ संपादनकार्याला यथोचित मानवंदना तर दिली आहेच, पण तसे करतानाच न्यायमूर्तींनी रोजनिशीच्या नऊ खंडांना लिहिलेल्या प्रस्तावनेत व्यक्त केलेली खंत लक्षात घेतली आहे; आणि ती दूर करण्याचा संकल्प पूर्णत्वास नेला आहे. ‘पेशवेकालीन इतिहासावर लिहिताना मुख्यत: राजकारण, लढाया यावरच अधिक भर दिला गेला, त्यावेळचे समाजजीवन आणि जनसामान्यांचे जीवन इकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही,’ ही न्या. रानडे यांनी व्यक्त केलेली खंत दूर करणारा हा ग्रंथ म्हणूनही दखलपात्र ठरतो. या ग्रंथाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तो पेशवाईचे गुणगान करण्यासाठी जसा लिहिलेला नाही, तसाच तो मुद्दाम एखाद्या विविष्ट ज्ञातिसमूहावर आगपाखड करण्यासाठीही लिहिलेला नाही. तत्कालीन समाजाचे त्यांच्या गुणदोषासह पारदर्शक चित्र वाचकांसमोर उभे राहावे, याच दृष्टिकोनातून दोन भागांतील एकूण पंधरा प्रकरणांची मांडणी करण्यात आली आहे. पेशवाईतील धार्मिक वातावरण, त्यात सांभाळली जाणारी परधर्मसहिष्णुता, जातिप्रथेचे किंवा गुलामगिरीचे अस्तित्व असतानाच अंगवळणी पडलेल्या माणुसकीच्या प्रथा, विद्वानांचा मान राखला जात असला, तरीही संस्थात्मक औपचारिक शिक्षणव्यवस्थेचा जाणवण्याजोगा अभाव, जनसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी कायमची उपचारकेंद्रे उपलब्ध नसली, तरीही गोरगरिबांना मोफत औषधे पुरविणारे वैद्या सर्वत्र उपलब्ध असतील अशी तरतूद, बारा बलुतेदारांच्या मर्यादित ग्रामकेंद्रित अर्थव्यवस्थेवरचा वतनदारीचा प्रभाव, सर्रास रुढ असणारी लाचखोरी, संदेशांच्या देवाणघेवाणीसाठी आवश्यकतेनुसार ‘जासूद’ किंवा ‘कासिद’ नेमण्याची पद्धत, आर्थिक व्यवहारांमध्ये सावकारांना दिली जाणारी प्रतिष्ठा व हमी, करदाते समाधानी राहतील अशी महसूलवसुलीची पद्धत, पेठा-वाडे-बागा-मंदिरे या सर्वांची यथायोग्य व्यवस्था पाहणारी नगररचना, महिलांच्या सुरक्षिततेविषयी विशेष दक्षता घेणारी न्यायव्यवस्था, राज्यविस्तार झाल्यानंतरही सह्याद्रीतील गडांवरचा बंदोबस्त कडक राखण्याची दक्षता, अठराव्या शतकाच्या पूर्वार्धापासूनच सुरू झालेले पुण्यासाठीच्या पाण्याचे नियोजन… या आणि अशाच इतरही अनेक मुद्द्यांबद्दलचे साधार, सोदाहरण विवेचन आपल्याला या ग्रंथात वाचावयास मिळते.

world environment council lokrang
विळखा काजळमायेचा!
we the documentary maker Dheeraj akolkar
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: आनंददायी दृश्य-व्यायाम
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
Padmashri Physicist Dr Rohini Godbole Memoirs by Researcher Dr Radhika Vinze
विज्ञानव्रती
readers reaction on different lokrang articles
पडसाद : हा तर बुद्धिभेद
river, Indians, source of water, faith, river news,
अभ्यासपूर्ण नदी परिक्रमा
Diwali and Books, Book list, Diwali, Books,
पाहू, निवडू आणि वाचू आनंदे…
Selected reactions to the article pracharak sanghacha kana
पडसाद : हे कौतुक फार दिवस पुरणार नाही…
abhyanagsnan on narak Chaturdashi
बालमैफल: अभ्यंगस्नान

पुण्यातली सुप्रसिद्ध सदाशिव पेठ म्हणजे पूर्वीचे मौजे नायगाव उर्फ सांडस नावाचे खेडेगाव ही ‘पेशवे रोजनिशी’त सापडलेली नोंद असो किंवा इ. स. १७५२ आणि १८०४-०५ मधील दोन नोंदींच्या आधारे महाराष्ट्रातील एकूण ३०५ किल्ल्यांची दिलेली सूची असो, ‘पेशवे रोजनिशी’ मधील १२६८ कठीण शब्दांचे अर्थ सांगणारे परिशिष्ट असो किंवा महाप्रतापी थोरले बाजीराव पेशवे उत्तम ग्रंथसंग्राहकही होते, हे प्रकाशझोतात आणणारे तपशील असोत… या ग्रंथात पानोपानी विखुरलेल्या असंख्य बाबी पेशवाईच्या काळातील समाज आणि प्रशासन याबद्दलचे वस्तुनिष्ठ चित्र उभे करण्यात यशस्वी ठरल्या आहेत, असे जाणवते. डॉ. गो. बं. देगलूरकर यांचे आणि या अभ्यासप्रकल्पात त्यांना साहाय्य करणाऱ्या अविनाश श्री चाफेकर व आनंद नी. दामले या दोघांचेही त्याबद्दल इतिहासप्रेमी अभ्यासक नेहमीच ऋणी राहतील. आणि या प्रकल्पाला आर्थिक पाठबळ पुरवल्याबद्दल आयसीएचआरचेही आभार मानायला हवेत.

‘पेशवेकालीन समाज आणि प्रशासन’, गो. बं. देगलूरकर, प्रकाशक- अपरांत व महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, पुणे, पाने- ३१० +२० (आर्टप्लेट्स), किंमत- ५०० रुपये.