निमा पाटील
१० डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस साजरा केला जातो, याच दिवशी काही वर्षांपूर्वी अमरावती जिल्ह्यात एका रजियाने- मूळची रजनी, मुस्लीम तरुणाबरोबर प्रेमविवाह केल्यानंतर रजिया सुलतानाने बेदम मारहाण करू पाहणाऱ्या नवऱ्याचा हात थोपवला. त्या दिवशी रजियाला आपण इतरांच्या मानवी हक्कांसाठी लढणार आहोत हे माहीत नव्हतं. ती फक्त स्वत:चा लढा देत होती. हा लढा शब्दबद्ध केला आहे ‘रजनी ते रजिया, लढा अस्तित्व आणि अस्मितेचा’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकात. या पुस्तकात पत्रकार-लेखिका-सामाजिक कार्यकर्त्या रजिया सुलताना यांनी स्वत:च्या संघर्षाची कहाणी सांगितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गरिबीतील बालपण आणि तारुण्यात स्वीकारलेलं खडतर वैवाहिक जीवन यांच्याशी संघर्ष करता करता रजिया सुलताना यांनी भरपूर लेखन केलं. त्यासाठी वाचन केलं, स्वत:च्या पायात पडलेल्या बेड्या पूर्णपणे सोडवता आल्या नाहीत तरी निदान सैल केल्या आणि इतरांनाही मोकळा श्वास घेता यावा यासाठी कामात स्वत:ला झोकून दिलं. हा प्रवास वैवाहिक आयुष्यातील जाचापासून सुटका करून घेण्यासाठी वाचन, त्यातून अधिक विस्तारलेल्या जाणिवा, मन मोकळे करण्यासाठी केलेलं लेखन आणि समाजातील विविध घटकांसाठी दिलेला लढा या दिशेने झालेला दिसतो.

जगभरातील स्त्रियांची लढाई जितकी एकसारखी असते तितकीच ती भिन्नही असते. ही भिन्नता येते ती त्या स्त्रीने परिस्थितीला दिलेल्या प्रतिसादामुळे. कठीण आर्थिक परिस्थितीतून आईवडिलांच्या पाठिंब्याने दहावीनंतर डीएडचं शिक्षण घेऊन शिक्षिका म्हणून नोकरीवर असताना शेजारी दूध घालायला येणाऱ्या मोबीनची आधी ओळख, आकर्षण, ओढ आणि प्रेम असा प्रवास झपाट्याने पार पाडत रजनी किसनराव खवलेने एका दिवसात आंतरधर्मीय विवाह करताना हिंदू, मुस्लीम आणि नोंदणी अशा तीन पद्धतींनी विवाह केला आणि ‘रजिया सुलताना’ या नवीन नावाने आयुष्याला सुरुवात केली. पुस्तक वाचत जाताना लक्षात येतं की, या प्रवासामध्ये नवरा-बायकोची मैत्री व्हायची राहून गेली. ही मैत्री झाली असती तर त्यांच्या वाट्याला आलेलं दु:ख, संकटं कितीतरी प्रमाणात कमी आणि सुसह्य झाली असती असं वाटत राहतं. लेखिकेने हा विचार केला आहे की नाही, हे या आत्मचरित्रातून लक्षात येत नाही. मात्र, संवादाचा अभाव असल्यास संसार सुखाचा होत नाही हे त्यांनी वारंवार नमूद केलं आहे.

रजिया यांना सासरी आलेल्या अनुभवांमुळे त्यांच्या आयुष्याला भिन्न वळण लागलं. ‘अस्सं सासर’ आणि ‘छळाचा खेळ’ या दोन प्रकरणांमधून त्यांनी यासंबंधीचे विविध प्रसंग नमूद केले आहेत. सर्वसामान्य हिंदू मुलगी लग्न करून पुराणमतवादी मुस्लीम घरामध्ये गेल्यानंतर सुरुवातीला बसलेले सांस्कृतिक धक्के पचवत लेखिकेचा संसार सुरू झाला. सासरे तुलनेने उदारमतवादी होते, काँग्रेसचे कार्यकर्ते होते. पण नवरा संशयी आणि जावा व सासू अशिक्षित… यातून संघर्षाचे बरेच प्रसंग उद्भवले.

बकरी ईदची कुर्बानी असो किंवा पाच वेळा नमाज पढण्याची जावांनी केलेली सक्ती असो, रजिया यांना त्याचा त्रास होत होता. त्याचे त्यांनी बारकाईने आणि व्यवस्थित वर्णन केले आहे. त्याचबरोबर हे वर्णन करताना त्यामध्ये हिंदू-मुस्लीम कटुता किंवा इस्लामविषयी आकस असे काही दिसत नाही. इस्लाममधील मान्य नसलेल्या अनेक प्रथांविषयी खुलेपणाने लिहिल्यानंतरही हे वैशिष्ट्य जाणवत राहतं. सासरी कुराणाव्यतिरिक्त इतर कोणतीही पुस्तके वाचली जात नसत. अशी दुसरी पुस्तके वाचली तर बरकत (भरभराट) जाते अशी अंधश्रद्धा त्याच्या मुळाशी होती.

पत्नी कुराणाव्यतिरिक्त अन्य मराठी पुस्तके आणि वर्तमानपत्रे किंवा मासिके वाचते म्हणून नवऱ्याने केलेला छळ रजिया यांनी अगदी मोकळेपणाने मांडला आहे. पत्नीला लैंगिक सुख नाकारणे हा त्या छळाचा महत्त्वाचा भाग होता. हुकुमी अस्त्रच म्हणा ना. पती-पत्नी संबंधात लैंगिक संबंधाचा पूर्ण अभाव किंवा अतिरेक हे दोन्ही छळाचेच प्रकार असल्याचे लेखिकेने लिहिले आहे. त्यातून होणाऱ्या कुचंबणेतून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी त्या अधिक वाचन, लेखन आणि सरतेशेवटी सामाजिक कार्य या दिशेने प्रवास करू लागल्या. लैंगिक संबंधाबद्दल इतक्या स्पष्टपणे लिहिण्याची हिंमत किंवा मानसिकता किंवा मोकळेपणा येण्यासाठी किशोर वयातील काही घटना कारणीभूत होत्या, हेही त्यांनी सुरुवातीच्या भागात नमूद केले आहे.

पुढे शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करताना शाळेला लागून असलेल्या तुरुंगातील कायद्यांची ओळख आणि त्यातून पुढे कायद्यासाठी मानवी हक्क कार्यकर्ते म्हणून तब्बल वीस वर्षे केलेले काम, कायद्यांचा केलेला अभ्यास, तृतीयपंथीयांच्या जगाशी ओळख,आणि त्यांच्यासाठी काम करायला सुरुवात. या सर्वांवर, काम करताना आलेल्या अनुभवांवर, त्यांच्या समस्यांवर लेखिकेने अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्याचाही गोषवारा त्यांनी शेवटच्या प्रकरणात थोडक्यात दिला आहे.

यादरम्यान संसारातील ‘खेळा’मुळे उभ्या राहिलेल्या मानसिक समस्या, त्यावेळी नवऱ्याने दिलेली साथ आणि पुन्हा दिलेला त्रास याचेही तपशील आहेत. एका वर्तमानपत्रात हज यात्रेच्या निमित्ताने कुर्बानीसंबंधी लिहिलेल्या लेखामुळे उठलेले वादंग, मुस्लीम समाजात उठलेल्या संतप्त प्रतिक्रिया, जिवाला निर्माण झालेला धोका, परिणामी लपून-छपून राहावं लागणं… असे अनेक अनुभव लेखिकेने घेतले. कामानिमित्त भेटलेले लोक, कामासाठी केलेला राज्यातील, देशातील आणि परदेशातील प्रवास नवऱ्यासोबत केलेली हज यात्रा असे तऱ्हेतऱ्हेचे अनुभव यामुळे पुस्तक वाचनीय झाले आहे.

‘रजनी ते रजिया – लढा अस्तित्व आणि अस्मितेचा’, – रजिया सुलताना, मनोविकास प्रकाशन, पाने- १९६, किंमत- २५० रुपये.

nima. patil@expressindia.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lokrang international human rights day rajni te rajiya autobiographical books amy
Show comments