पत्रकारितेतले काही काही प्रवास फार आनंददायी असतात, तर काही खूप शिकवणारे असतात. आनंददायी प्रवास अनेक. शिकवणारे तसे तुलनेनं कमी. त्यातला एक विशेष उल्लेखनीय. त्यातलं शिकवणं आजही ताजं तर आहेच; पण तितकंच उपयोगीही आहे.
अशा शिकवणाऱ्या प्रवासातल्या अध्यापकाचं नाव शरद जोशी. विख्यात कृषी अर्थतज्ज्ञ. ते लालकृष्ण अडवाणी यांच्या एका मेळाव्यासाठी विदर्भात आले होते तेव्हाची ही गोष्ट. मोठा मेळावा होता. बरेच कोण कोण असणार होते. मी वार्तांकनासाठी गेलो होतो. जाताना प्रमोद महाजन यांच्याबरोबर होतो. मेळाव्यानंतर ते अडवाणी यांच्याबरोबर दिल्लीला जाणार होते. आणि मला परतीचं रात्रीचं विमान पकडायचं होतं नागपूरहून. त्या मेळाव्यात जोशींची भेट झाली. अगदीच जुजबी ओळख होती आधी. माझी अर्थविषयक बातमीदारी त्यांना काहीशी परिचित होती. एखादा राजकीय नेता काही वाचल्याचं सांगतो त्यापेक्षा कित्येक पट आनंद जोशींच्या विधानानं झाला.
कारण माझ्या पिढीच्या राजकीय-आर्थिक-कृषी समजाचा पाया शरद जोशींच्या मांडणीनं घातलेला. पुण्यात रानडे इन्स्टिट्यूटला पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात होतो १९८४-८५ साली; तेव्हा शरद जोशी बुद्धिवादी वर्गाचा मुख्य चर्चा विषय होते. नुकतीच त्यांची ‘इंडिया’ आणि ‘भारत’ ही मांडणी घराघरात पोहोचलेली. एरवीच्या पठडीच्या, स्तब्ध साचलेल्या राजकारणात शरद जोशी नवा चेहरा आणि नवी मांडणी घेऊन आले होते. आणीबाणीउत्तर काळात काँग्रेस खलनायक झालेली आणि भाजप नायकत्वाचा रस्ता चाचपडत होता. त्या काळाच्या सांदीत शरद जोशी उगवले आणि आकर्षणाचा विषय झाले. आपल्याला बरंच काही कळतं, कळायला हवं आणि कळत नसेल तर ज्यांना कळतं ते आपल्याला कळलेत असं वाटायचं वय ते. त्या वेळी ‘रानडे’च्या समोर ‘रूपाली’वर जोशी डावे की उजवे? वगैरे चर्चांत कित्येक कप चहा पोटात जायचे. तेव्हाच्या पुण्यातले ज्येष्ठ समव्यवसायी सतीश कामत, विनय हर्डिकर वगैरे भारी वाटायचे. कारण? शरद जोशी त्यांनी ‘कव्हर’ केले होते, एखादी तरी मुलाखत वगैरे घेतली होती आणि/ किंवा आंबेठाणला जोशींचा ‘अंगारमळा’ अनुभवलेला होता. जोशींकडून कॉम्प्लिमेंट आली आणि तो सगळा भूतकाळ लख्खन आठवून गेला. ते त्यांना सांगितलं. गप्पा वाढत गेल्या. ‘‘मुक्काम कुठे?’’ या त्यांच्या प्रश्नावर जेव्हा म्हटलं, ‘‘रात्रीच्या विमानानं लगेच निघणार.’’ तर म्हणाले, ‘‘छान… बरोबरच जाऊ… मीही त्याच विमानानं परततोय.’’ हे ऐकलं आणि त्या राजकीय मेळाव्यातला माझा रसच संपला. वेध लागले नागपूरपर्यंतच्या त्यांच्या प्रवासाचे… चांगले तीन तास मिळणार होते.

… आणि त्या प्रवासात सुरुवात झाली माझ्या पुढच्या जवळपास दशकभराच्या अर्थशास्त्र, त्यातही कृषी अर्थशास्त्र… अॅग्रो इकॉनॉमी… या विषयाच्या वर्गास. जोशी सर्वार्थाने भारतीय होते. म्हणजे त्यांच्या जाणिवा या मातीतल्या होत्या. त्यांच्या ज्ञानानं आधीच मी भारावलेला. त्यात त्यांच्याबरोबर तीन-चार तासांचा प्रवास. सुरुवातीलाच त्यांचं मी काय काय वाचलंय, त्यांची मांडणी कशी मला आवडते वगैरे सांगायला सुरुवात केली. त्यांच्या त्यावरच्या प्रतिसादात खास ‘जोशी’पणा होता. मला म्हणाले. ‘‘हे सगळं ठीकाय रे… पण मी लोकांना का मोठा वाटतो माहितीये?’’ जोशींची जीभ जरा जड होती. त्यामुळेही असेल, पण ते एखाद्या जुन्या प्रामाणिक शिक्षकासारखे शांतपणे बोलायचे. आपला मुद्दा पटतोय की नाही, पटत असेल तर कितपत अशी चाचपणी करत करत बोलायचे. त्यांच्या या प्रश्नाला आपण काय उत्तर देणार… असं म्हणून मी गप्प बसून राहिलो. काही क्षणांत तेच म्हणाले, ‘‘अनेकांच्या लेखी माझं महत्त्व मी अमेरिकेतली युनोतली (संयुक्त राष्ट्र) चांगल्या पगाराची नोकरी सोडून परत भारतात आलो, या कारणासाठी आहे… आता काय बोलायचं यावर?’’ असं विचारत ते विषण्ण हसले.

खरं होतं त्यांचं. अमेरिकेतनं परत येऊन जवळपास दोन दशकं उलटून गेली होती त्यांना. पण तरीही जवळपास प्रत्येक ठिकाणी ‘‘अमेरिकेतनं भारतात परत येऊन शेतीचे प्रयोग करणारे…’’ असा उल्लेख हमखास असायचा. भारतीय समाजमनावर अमेरिकेत असण्याचा किती प्रभाव होता… आणि आहेही… याचं ते निदर्शक. सार्वजनिक कार्याचा कोणताही अनुभव नाही, कसली पार्श्वभूमी नाही आणि तरीही जिरायती जमीन घेऊन आपण काही समजून घेऊन मग सांगू बघतोय, याचं कौतुक नाही याची किंचितशी खंत त्यांना असावी, असं वाटलं ते ऐकून. त्या दिवशी गाडीतल्या गप्पातनं एका मुद्द्याची खरी खात्री पटली. शरद जोशी हे खरेखुरे मातीतले जागतिकवादी आहेत याची. मराठी कविता ते मार्क्स अशा विशाल टप्प्यात ते सहज संचार करायचे. त्यांची ती पहिली भेट पुढच्या अनेक भेटींची आस वाढवणारी ठरली.

जोशींची मतं वेगळी असायची. म्हटलं तर स्वच्छ जागतिकीकरणवादी, जागतिक व्यापार कराराचं उघड समर्थन करणारे होते. त्या वेळी तसे बरेच होते. त्यांना सरसकट ‘उजवे’ गणलं जायचं. उरलेले आपल्याकडच्या समाजवादी रोमँटीसिझममध्ये अडकलेले. जोशींचा मार्ग यातला मधला होता. आणि आपल्याकडे मधल्यांना मोजायची पद्धत नाही. तुम्ही एकतर या बाजूचे तरी असायला हवे किंवा त्या बाजूचे. या बाजूचे असाल तर डाव्यांच्या, समाजवाद्यांच्या व्यासपीठांवर स्थान मिळणार, माध्यमांतनं विचारवंत म्हणून गौरवबिवरव होत राहणार. त्या काळी अशांची चलती होती. कारण उजव्यांना सत्ता मिळाली होती तरी तीत आता आहे तसा जोर नव्हता. त्यामुळे त्या बाजूच्यांची तशी उपेक्षाच व्हायची. आता वाटतं, जोशी आता असते तरी त्यांची उपेक्षाच झाली असती. कारण त्यांच्या मांडणीत आपल्या चर्चा परिघातनं गायब झालेला तर्क असायचा.

म्हणजे कायदा-सुव्यवस्थेचं महत्त्व सांगताना ते इंग्रजी राजवटीचं उदाहरण द्यायचे. इंग्रज आपल्याकडे आले त्या वेळी त्यांच्या देशात अॅडम स्मिथच्या आर्थिक विचारांची चलती होती. अशा आर्थिक विचारांत प्रगती साधायची असेल तर कायदा-सुव्यवस्था चोख असावी लागते. नागरिकांना यात गरीब-श्रीमंत सर्वच आले- कायद्याचा धाक असावा लागतो. म्हणून इंग्रजांनी भारतात पहिल्यांदा कायद्याची जरब बसवली. ‘‘काठीला सोनं बांधून खुशाल काशीयात्रेला जाता यायचं असं तेव्हाचे लोक म्हणायचे, याचं कारण इंग्रजांच्या या कायद्याच्या बडग्यात आहे,’’ असं जोशी सांगायचे. आताशा इंग्रज येण्यापूर्वी भारतात कशी सोन्याची कौलं होती वगैरे बाता मारणाऱ्यांची चलती आहे. अशांना खरं तर इतिहासात अखंड भारत कोणत्या टप्प्यावर होता असं आता हयात असते तर जोशींनी नक्की विचारलं असतं. तेव्हा संस्थानिकसुद्धा गुंडपुंडांच्या, पेंढाऱ्यांच्या टोळ्या बाळगून आपल्या तिजोऱ्या भरायचे, असं जोशी सोदाहरण सांगायचे. इंग्रजांनी या सगळ्यांना आधी सरळ केलं, मग रेल्वे वगैरे सुधारणा केल्या, हे त्यांचं प्रतिपादन. खुल्या अर्थव्यवस्थेत कायद्याचं राज्य नसेल तर मूठभरांचंच भलं होतं, त्यांचीच चलती असते, हे त्यांचं तेव्हाचं म्हणणं त्यांनी आता मांडलं असतं तर काय झालं असतं, हा प्रश्नच आहे. आणखी एक मुद्दा ते जोरकसपणे मांडायचे. त्यांच्या मते, सरकारी योजना म्हणजे याची हमी, त्याची हमी, यावर अनुदान, त्यावर सवलत वगैरे म्हणजे ‘सरकार पुरस्कृत भीकवाद!’ ही ना धड खरी समाजवादी अर्थव्यवस्था, ना खरं आर्थिक खुलेपण. म्हणजे लाडक्या बहिणींचा पुळका येण्याच्या काळात जोशींना गावकुसाबाहेरच राहावं लागलं असतं. विषय कोणताही असो, जोशींचा अर्थविचार त्यातनं कधी सुटायचा नाही. मग दारूबंदीसारखा सोवळा विषय का असेना. ‘‘कोणत्याही शेतीपदार्थापासनं दारू तयार करता येते, ही गांधीजींना आणि नंतरच्या दारूबंदीवाल्यांना कधी कळलंच नाही. आणि दुसरं असं की, शेतीतनं काही हाताला फारसं लागत नसताना दारू बनवून चार पैसे तो कमावणारच ना…’’ हा त्यांचा युक्तिवाद बिनतोड. दारूबंदीमुळे उलट नुकसान झालं आणि यंत्रणा भ्रष्ट झाली या त्यांच्या मतावर एकदा त्यांना ‘चिअर्स’ केलेलं. अशा वेळी मग जगात कोणी कोणी दारूबंदीचा प्रयत्न केला आणि तो किती भव्य प्रमाणात अयशस्वी ठरला याचा साद्यांत इतिहास बारीकसारीक तपशिलांसह ते देणार. कोणत्याही विषयाची अशी इत्थंभूत माहिती ही त्यांची खासियत.

नंतर काही वर्षांतच इंग्रजी पत्रकारिता सोडून मी ‘लोकसत्ता’त आलो. इंग्रजीत अर्थविषयक दैनिकात होतो तेव्हा जोशी त्यांचं लिखाण आवर्जून पाठवायचे. दक्षिणेतल्या ‘हिंदु बिझनेस लाइन’मध्ये बऱ्याचदा ते लिहायचे. मी ते वाचायचोच; पण तरीही जोशी पाठवायचे आणि नंतर फोन करून त्यातलं काय कळायला हवं ते कळलं की नाही, याची खातरजमा करायचे. त्यांचा गंडाबंद शिष्य असल्यासारखं ते बरंच काही समजावून सांगायचे. त्यांचा प्रत्यक्ष किंवा फोनसहवास मग आणखी वाढला. कधी काही प्रश्न पडला तर सरळ फोन करायचो. सुरुवात ‘बोला कुबेर’नं व्हायची आणि दुसऱ्या वाक्यातच त्यांच्यातला गुरुजी जागा झाल्यावर ‘गिरीश, तुला सांगतो…’ असं म्हणत विषय समजावून सांगायचे. ‘लोकसत्ता’त संपादकीय सहकाऱ्यांशी अगदी निवांत गप्पा मारायला आले एकदा. एक आख्खं पानभर त्यांची मुलाखत छापली होती त्या वेळी. आपली शेती किती आतबट्ट्याची आहे, ते इतकं सहज त्यांनी समजावून सांगितलं होतं की, त्यांना ऐकणारे सगळेच ‘शेतकरीवादी’ होऊन गेले. त्यांच्याकडूनच ‘उल्टी पल्टी’ हा प्रकार समजून घेता आला. शेतमाल बाजारात पाठवला की त्याचं मोल शेतकऱ्यांना द्यायच्या ऐवजी, अडतेच उलट विक्रीचा खर्च शेतकऱ्यांकडे मागतात. कारण भाव इतका पडलेला असतो की शेतकऱ्याला काही मिळण्याऐवजी उलट अडत्यालाच काही मोल द्यावं लागतं. खुद्द शरद जोशींनी याचा अनुभव घेतला आणि त्यातूनच मग शेतमालाला रास्त भाव मिळायला हवा यासाठी आंदोलनं करण्याची गरज त्यांना वाटू लागली.

खरं तर जोशी इतके शेतकरीवादी, पण शेतकऱ्यांच्या हिताची भाषा करणाऱ्या राजकीय पक्षांनी त्यांना हवी तशी काही साथ दिली नाही. कारण उघड आहे. आपले सगळेच्या सगळे राजकीय पक्ष खोटे ‘ग्राहकवादी’ आहेत. हे ग्राहक शहरात असतात. कांद्याचे भाव वाढले की त्यांचा घास अडतो. पण आपल्या पोरांच्या कॅडबरीसाठी त्यांच्याकडे पैसा असतो. ‘‘कामावरनं घरी परत येताना कॅडबरी आणणारा शहरातला सुटाबुटातला बाप टीव्हीवरच्या जाहिरातीत पाहिल्यावर शेतावरनं घामटलेला, कळकट कपड्यातला आपला बाप परत येताना पाहून गावाकडच्या पोरांना काय वाटत असेल?’’ असा एकदा त्यांचा प्रश्न होता. ‘‘मग सांग शेती करावी असं का वाटेल कोणाला?’’ हा युक्तिवाद निरुत्तर करणारा होता. आजही कधी कोणाकडे जाताना त्यांच्या घरच्या लहानग्यांसाठी कॅडबरी घेताना जोशींचा हा प्रश्न आठवतो.

त्यांचे हे प्रश्नच राजकीय पक्षांना कधी झेपले नाहीत. आणि हे आपले प्रश्न त्यांना पेलवत नाहीयेत हे जोशींना कधी कळलं नाही. किंवा कळूनही कधी वळलं नसावं. इतके ते बुद्धिमान तेव्हा त्यांना हे कळलेलं नसणं अशक्यच. पण त्यांचाही नाइलाज झाला असणार. राजकीय ताकद मागे नसेल तर काही करता येत नाही आपल्याकडे. आणि राजकीय ताकद मिळवण्यासाठी बुद्धिमान असण्याची गरजही नसते म्हणा. समोरच्यांना जास्तीत जास्त मूर्ख बनवण्याची ताकद पुरते राजकारणात यशस्वी होण्यासाठी. ती ताकद काही नव्हती जोशींकडे. म्हणून मग ती ज्यांच्याकडे आहे त्यांच्या मागे जात राहिले ते. आयुष्यभर त्यांची एकच एक मागणी होती. शेतकऱ्याला मोफत वीज नको, खतांत अनुदान नको, आयकर माफी नको… त्याला फक्त एकच द्या. त्याच्या पिकाला रास्त भाव आणि तो ठरवण्याचा अधिकार! पण सोप्या गोष्टी करायच्या नाहीत आणि अवघडाची स्वप्नं दाखवत वेळ आणि निवडणुका मारून न्यायच्या हे आपलं राजकीय वैशिष्ट्य. प्रामाणिक मांडणी करणाऱ्यापेक्षा अप्रमाणिक मूर्ख बनवणारे आपल्याला अधिक प्रिय. तेव्हा राजकारणाच्या आघाडीवर जोशी तसे चांगलेच अपयशी ठरले. आपल्याकडे त्यांच्या आधी अनेक शेतकरी नेते होऊन गेले, पण शेतीचा इतका शास्त्रशुद्ध अर्थवेद मांडणारा हा पहिला महाभाग! तोही मराठी. कोण अभिमान असायला हवा आपल्याला त्यांचा…

… तर ते गेले २०१५ सालच्या डिसेंबरात. तेव्हा मी ‘लोकसत्ता’च्या दिल्ली प्रतिनिधीला सांगितलं, ‘‘कृषीमंत्र्यांकडे जा आणि सविस्तर प्रतिक्रिया घेऊन ये.’’ तो गेला. थोड्या वेळानं त्यांच्याच कार्यालयाबाहेरनं त्याचा फोन आला, ‘‘कृषीमंत्र्यांनी विचारलं, ‘ये शरद जोशी कौन?’’