आजही वाटतं की किशोरीबाईंना काही विचारणं आणि त्याचं उत्तर गद्यात द्यायला लावणं हे अगदी फजुल आहे. त्यापेक्षा बाईंना ऐकावं. लहान लहान वाटणारे गोल गोल जिने हळूहळू चढत आता डोळ्यासमोर होत्या असं वाटणाऱ्या बाई गात गात आयफेलच्या उंचीवर कशा जातात ते पाहत दरवेळी अचंबित व्हावं… ते जास्त सोपं आणि कमालीचं आनंददायी…

‘अर्धसत्य’ सिनेमातला एक प्रसंग कायमचा डोक्यात बसलाय. का ते माहीत नाही. ओम पुरी हवालदाराच्या भूमिकेत आहेत त्यात. त्यांचे वडीलही पोलीस अधिकारी. परिस्थितीनं पिचलेले. म्हणून चिडके असे. घरी एकदा काही होतं आणि पत्नीच्या मुस्कटात मारतात ते. आपण सुन्नं होतो ते पाहून आणि त्या क्षणी मागे रेडिओवर गाणं वाजू लागतं… हे श्याम सुंदर राजसा…

तेव्हापासून त्या आवाजाच्या गळ्याशी परिचय व्हावा असं वाटायचं. पुण्याला पत्रकारितेच्या उमेदवारीच्या काळात ‘तरुण भारत’मध्ये होतो तेव्हा भरपूर बैठकांना, ‘सवाई’ला हजेरी लावलेली. एकदा एक सहकारी म्हणाला, ‘‘उद्या रविवारी गरवारेला प्रभातकालीन बैठक आहे… किशोरीबाई आहेत… ‘सहेला रे’ नक्की गातील.’’ म्हणून ऐन थंडीत सायकल हाणत आम्ही भल्या पहाटे त्या बैठकीला गेलो. किशोरीताईंनी ‘सहेला रे’ तर गायलं नाहीच, पण सकाळचे रागही गायले नाहीत. त्या वेळी समग्र पुणेकर किशोरीताईंच्या ‘सहेला रे’च्या भूपात आणि प्रभा अत्रेंच्या ‘जागु मैं सारी रैना’च्या मारुबिहागात आकंठ बुडालेले. तेव्हा मी काम करत होतो त्या ‘तरुण भारत’च्या कार्यालयात दोन गट होते. एक भीमसेनवादी आणि दुसरा कुमारांचा. संजय संगवई (शुभांगीचा दिवंगत भाऊ), मुकुंद संगोराम यांच्या सौजन्यानं कुमारांच्या गाण्याची चव निर्माण होऊ लागलेली. डॉ. श्रीरंग संगोराम, तात्या बाक्रे, शांता निसळ (‘उंबरठा’ चित्रपट ज्यांच्या कथेवरून आहे त्या), श्रीकृष्ण दळवी असे तगडे लेखक महाराष्ट्राला गाणं समजावून देण्याचं फार मोठं कार्य करत होते तो हा काळ. कोणत्याही दैनिकात आलेलं असो, यातलं कोणीही गाण्याविषयी काहीही लिहिलेलं त्या वेळी कधी चुकवायचं नाही, असा शिरस्ता होता. त्यातल्या शांताबाईंचा प्रत्यक्ष परिचय झालेला, कारण त्या ‘तरुण भारता’त लिहायच्या. बाई इतकं सुंदर परीक्षण करायच्या की प्रत्यक्ष बैठक ऐकली नसली तरी ‘ऐकू’ यायची त्यांचं वाचून. गाण्यातल्या त्रुटीही इतक्या हलक्या हाताने सांगायच्या की त्या गायकालाही समजून घेण्यात आनंद वाटावा. तर त्या काळात भीमसेन आणि कुमार हे दोन सूर्यचंद्र; बाकी आपले मधल्या जागा भरायला ठीक अशी धारणा झालेली. त्यात किशोरीताईंनी हा असा रसभंग केला. पुणेरी आणि पुण्यातले मित्र त्या वेळी नाराज झाले. किशोरीबाईंचा उल्लेख एकेरीत करण्याची फॅशन नुकतीच सुरू होत होती. हा असा अगं-तुगं उल्लेख करण्याचा अधिकार मिळालेल्यांना आयुष्यात काही हासील केल्यासारखं वाटायचं. ‘गरवारे’च्या बाहेर शालीत गुरफटून घेतलेल्या पुणेकरांची चर्चा सुरू झाली… किशोरी हल्ली असं काय करते काही कळत नाही. मग सगळे एकापाठोपाठ एक त्यांच्या कथित लहरीपणाच्या खºयाखोट्या कहाण्या आपापल्या मगदुराप्रमाणं ऐकवू लागले.

तेव्हा अशा किशोरीबाईंशी आपला कधीतरी संबंध येईल असं वाटायची सुतराम शक्यता नव्हती. एक तर अशा लहरी… काहींच्या मते यास प्रतिशब्द ‘चक्रम’ असा आहे… व्यक्तींविषयी मला भयंकर आदर. आपल्या देशात सगळे पोलिटिकली करेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असताना हा करेक्टनेस खुंटीवर टांगायला फार धैर्य लागतं. त्यार्ची ंकमत मोजावी लागते. किशोरीताई ती देत होत्या आणि दुसरं असं की, एकदा का असा लौकिक पसरला की माणसं उगा सलगी दाखवायचा प्रयत्न करीत नाहीत. चार हात लांब राहतात अशा व्यक्तींपासून. (नंतरची एक गंमत. राज ठाकरेंनी बाईंना एका कार्यक्रमाला बोलावलेलं. अन्य मराठी गायक/संगीतकारही होते. मी, काही समव्यवसायी मित्र वगैरेही होतो. मध्यंतरात बाई व्हॅनिटी व्हॅनपाशी आल्या. आत मराठी गायक/ संगीतकारांचा गप्पांचा फड रंगलेला. त्यातले दोन उत्साहानं बाईंना पाहिल्यावर समोर आले… स्वत:चा परिचय करून देऊ लागले. त्यांना वाटलं बाई त्यांच्या कामाविषयी वगैरे काही बोलतील, विचारतील. बाईंनी विचारलं, ‘‘या व्हॅनमध्ये वॉशरूम आहे ना…?’’ ती होती. बाई सरळ तिकडे गेल्या आणि नंतर आल्या तशा परत निघून गेल्या. एक शब्द नाही कोणाशी. तो धक्का इतका जबर होता की आतल्या गप्पा आणि गप्पेकरी मुकाट निघून गेले.)

नंतर पुणं सुटलं. मग मुंबई. गोवा. तिथे तर गाणंच गाणं. परत मुंबईला आल्यावरही जमेल तशा बैठकांना जाणं व्हायचं. किशोरीताईंची ‘नेहरू सेंटर’मधली एक वर्षाकालीन बैठक आवर्जून आठवते. डोंबिवलीहून अवघडलेली बायको आणि मी रविवारी लोकलनं भिजत कसेबसे पोहोचलो वेळेत. बाई पहिल्या गाणार होत्या. अजूनही टक्क आठवतंय… बाई ‘खंबावती’ गायल्या. हा राग त्याच्या नावासकट पहिल्यांदा ऐकला त्या दिवशी. पुण्याचा अनुभव होता, त्यामुळे जराही वाईट वाटलं नाही. ते वाटायचं कारणही खरं तर नव्हतं. कारण शेवटी त्या किशोरीबाई होत्या.

तर झालं असं की, वसईचे मनोज आचार्य एकदा कार्यालयात आले भेटायला. ते एका साप्ताहिकाशी संबंधित होते. त्या साप्ताहिकाचा वर्धापन दिन होता. त्यात किशोरीताईंची मुलाखत घ्यायची होती आणि दुसरा कोणीही तयार नव्हता. घाबरत असावेत. मनोजचा बाईंशी परिचय होता. त्यांनी विचारलं, ‘‘मुलाखत घ्याल का?’’ मी नाही म्हणायचा प्रश्न नव्हता. जिथे जायला शहाणे बिचकतात, तिथे वेडे सहज जातात, अशा अर्थाचं एक इंग्रजी वचन आहे. ते माहीत असल्यानं मी बिनधास्त ‘हो’ म्हणालो. तेव्हा मी अर्थविषयक दैनिकात होतो. तेव्हा खरा प्रश्न मी बाईंना चालणार का… हा होता. पण तो मनोजनं आधीच सोडवलेला. बाईंची हरकत नव्हती. पहिल्यांदा एकदा मनोजबरोबर बाईंकडे जायचं ठरलं. दुपारच्या वेळेत गेलो. आता लक्षात येतंय त्या अनुभवांचं महानपण!

बाईंचा क्लास सुरू होता. आठवतंय नंदिनी बेडेकरही होत्या. आणखी एकदोन कोणी होते. बाई जराही डिस्टर्ब झाल्या नाहीत. दखलही घेतली नाही त्यांनी. घेतली असती तर ते सुरेल वातावरण खळकन् फुटलं असतं. या अशा मोठ्या गायकांना शिकवताना ऐकण्याचा आनंद बैठकांपेक्षा किती तरी अधिक असतो, असं मला नेहमीच वाटत आलंय. डोंबिवलीला गजाननराव जोशींच्या अथवा कशाळकरांच्या घरी ही गुरुवर्य मंडळी शिष्यांना स्वरांचं बांधकाम करताना शिकवतात ते अनेकदा अनुभवलेलं. केवळ शब्दातीत. बाईंच्या इतक्या बैठका ऐकल्यात, इतकं त्यांचं काय काय संग्रही आहे… पण त्यावेळी मी जे ऐकत होतो ते सर्व त्या पलीकडचं होतं. पाऊणएक तास ते सुरू होतं. ते संपल्यावर एकदम गद्यात यावं लागलं. तसं अवघडच होतं. मनोज ओळख करून देत असताना मग मी सोपा मार्ग निवडला… गोव्यातून जाणारा. माझा एक गोंयकार सहकारी कुर्डी गावचा. ते गाव धरणाखाली गेलेलं. मी त्या गावाला बाईंसमोर हात घातला आणि मग पुढचं सगळं सहज-सोपं होत गेलं. बाई एकदम प्रेमळ एकेरीवर. नंतर या मुलाखतीच्या निमित्तानं बाईंकडे जाणं वाढलं. त्यातला एक अनुभव स्वर्गीय.

बाईंचा फ्लॅट वरच्या मजल्यावर. दार उघडलं की बैठकीची खोली. समोर झोपाळा. बाहेरून शिरताना त्या खोलीतल्या काहीशा अंधारात त्या झोपाळ्यावरची फ्लुरोसंटीश रंगाची गादी लक्ष वेधून घ्यायची. घरात शिरताना डाव्या हाताला बाईंचं देवघर. छोटीशी खोलीच. त्या दिवशी बाईंची पूजा चाललेली. शुभ्र साडीतल्या बाई आणि स्वत:च स्वत:शी चाललेला स्वरसंवाद. आसपासच्या जगाचा आणि बाई त्यावेळी जिथे होत्या त्या विश्वाचा काडीचाही संबंध नव्हता. ते अनुभवायला मी आणि बाईंच्या पट्टशिष्या बेडेकर. किती वेळ गेला ते लक्षात नाही. बाई नंतर पूजेचं तबक घेऊन आल्या तेव्हा जाणीव झाली सरस्वतीला देहरूप असेल तर ते हेच! वाटून गेलं बाईंचं हे स्वरस्वगत रेकॉर्ड करायला हवं होतं. हे असले राजवर्खी तुकडे इतिहासात परत मिळत नाहीत. पण ते राहून गेलं. बाईंशी मग मुलाखतीविषयी बोलणं. बाई मधेमधे इंग्रजीत शिरायच्या. त्यांचा अ‍ॅक्सेंट अगदी खास होता. अक्षरही गाण्यासारखंच सुरेख. पण खरं सांगायचं तर बाईंचं गाण्याविषयीचं बोलणं अगम्य होतं. पूर्ण अ‍ॅबस्ट्रॅक्ट. त्याचा एक आनंद असतोच असतो. पण या अ‍ॅबस्ट्रॅक्ट, आभासी, अधांतरी मुद्द्यांना वास्तवात शब्दात आणणं कर्मकठीण काम. प्रश्नाच्या निमित्तानं आपण तसा प्रयत्न करायचा, बाई त्याचं उत्तर देण्यापुरतं जमिनीवर येणार… पण काही क्षणच! पुन्हा लगेच होत्या तिकडे जाऊन बसणार. मग पुन्हा त्यांना आपल्या जनसामान्यांच्या पातळीवर आणायचं…

असा खेळ बराच काळ चालला. प्रश्नांची तालीम. तालमीची तालीम. मग आधी जे मान्य होतं त्यात बदल करण्याची इच्छा… मग तसा आग्रह आणि मग प्रत्यक्ष बदल! एकदा दुपारीच त्यांचा फोन आला. दोनच्या आसपास. मी ऑफिसमध्ये पोहोचून कामाला सुरुवात करणार तर बाईंचा फोन. कावून म्हणाल्या, ‘‘कुठे रे तू… येतो म्हणाला आणि आलाच नाही… मी जेवली नाहीये.’’ वगैरे वगैरे. माझ्या पोटात गोळेच गोळे. सगळं आठवून पाहिलं. आज भेटायचं अजिबात ठरलेलं नव्हतं. तेव्हा मी येतो असा शब्द देण्याचा काही प्रश्नच नव्हता. पण बाईंना हे सांगण्याचा प्रयत्न करून जिवंत ज्वालामुखी अनुभवण्याची माझी सुतराम इच्छा नव्हती. मी म्हणालो, ‘‘हा काय पोचतोच आहे… तुम्हाला फोनच करणार होतो… काय भयंकर ट्राफिक आहे…’’ वगैरे वगैरे. व्हीटीहून टॅक्सी केली आणि बाईंच्या घरी धडकलो. बाईंना या पृथ्वीतलावर ठेवणं किती अशक्य असेल… याची जाणीव पुन्हापुन्हा होत गेली.

मुंबईतली मुलाखत झाली. अनेकांना मी प्रश्न काय विचारले यापेक्षा बाई काय बोलल्या यातच अधिक रस असणार… हे उघड आहे. आजही कधीतरी एखाद्या चॅनेलवर बाईंच्या स्मृतिदिनी वगैरे लावतात ते रेकॉर्डिंग. ती बरी झाली असावी असं म्हणायचं कारण पुण्यातूनही तशा मुलाखतीची मागणी आली. पुण्यातली मुलाखत बाईंच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं असणार होती. विजयाबाई (मेहता) बोलणार होत्या. तेव्हा पुण्यातील अनेक सिल्कचे कुडते-पायजमे, गजºयांतल्या कांथा/ चंदेरी वा कांचीवरमसह गर्दी करणार हे उघड होतं. या वर्गाशी चांगला(च) परिचय होता एव्हाना. काही काळ काम केलं होतं त्या शहरात. ‘‘काल किशोरी/ कुमारच्या बैठकीस दिसला नाहीस.’’ असं हजर नसलेल्या प्रत्येकासमोर जाऊन जाऊन म्हणत ‘‘मी (मात्र) गेलो होतो’’ याचे ढोल बडवणारे यातले खुपसे चांगले परिचित. हा वर्ग ‘कार्यक्रम टू कार्यक्रम’ भेटतोच भेटतो. तो आता इथे असणार.

पण गंमत म्हणजे, याचं जराही टेन्शन आलं नाही. कारण अर्थातच किशोरीबाई! आपण काहीही विचारलं तरी बाई अगम्यच बोलणार आणि हा समोरचा वर्ग सग्ळंसग्ळं कळल्यासारखं ‘वा वा’ करणार आणि टाळ्या वाजवणार… याची कमालीची खात्री होती. थोडक्यात कार्यक्रम उत्तम होणार आणि तसं बाईंपर्यंत पोच नसलेले आपल्याला सांगणार याबद्दल जराही शंका नव्हती. त्यामुळे मुंबईतल्यापेक्षा पुण्यातल्या जाहीर मुलाखतीत मी अधिक निवांत होतो. पुढचं सगळं तंतोतंत झालं…! आजही यूट्यूबवर, वृत्तवाहिन्यांवर लावतात ते रेकॉर्डिंग कधी कधी. पण आजही वाटतं. त्यांना काही विचारणं आणि त्याचं उत्तर गद्यात द्याायला लावणं हे अगदी फजुल आहे. त्यापेक्षा बाईंना ऐकावं. लहान लहान वाटणारे गोल गोल जिने हळूहळू चढत आता डोळ्यासमोर होत्या असं वाटणाºया बाई गात गात आयफेलच्या उंचीवर कशा जातात ते पाहत दरवेळी अचंबित व्हावं… ते जास्त सोपं आणि कमालीचं आनंददायी !

या दोन्हीही मुलाखतींनंतर बाईंना भेटणं तसं कमी झालं. भेटी व्हायच्या, पण इतक्या नाही. एव्हाना बाईंच्या कुटुंबीयांशीही चांगला परिचय झालेला. नातीलाही गाताना ऐकलेलं. बाईंच्या प्रकृतीच्या बातम्या आता कानावर येऊ लागलेल्या. असंच एक दिवस दुपारी येऊ नये असं वाटणारी, पण या वाटण्यास काहीच कसा अर्थ नसतो त्याची जाणीव करून देणारी बातमी आली. बाईंच्या घरी जाण्याआधी दादरला राज (ठाकरे) यांच्याकडे भेटायचं ठरलं. जातीनं ते सगळं पाहत होते. बरोबरच ‘रवींद्र’ला गेलो. बाईंचं पार्थिव तिथं आणायचं होतं. अंत्यदर्शनासाठी. एव्हाना बातमी सर्वत्र झालेली. चाहत्यांची रांग लागली. त्यांची उत्स्फूर्त गर्दी. आमचा (राज आणि मी) प्रयत्न होता सरकारतर्फे जमेल तितक्या उच्चपदस्थांनी यायला हवं. खूप फोनाफोनी केली. मंत्रालयात कसली महत्त्वाची र्मींटग होती. फार कोणी फिरकलं नाही. बाई पंचत्वात विलीन झाल्या.

दोनेक वर्षांनी कोलकत्यात सौमित्रा चतर्जी गेले तर करोना-काल असूनही मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसह डावे-उजवे सगळे संपूर्ण अंत्ययात्रा चालले.

अगदी अलीकडे एका निवांत सायंकाळी बाईंची आणि पाठोपाठ त्यांच्याच घराण्याच्या मन्सुरअण्णांची मारुबिहागमधली ‘रसिया आओ ना…’ ऐकत होतो. हे सगळं आठवलं. घशात कोंडल्यासारखं झालं आणि वाटलं… रसिया आओ ना हे खरं व्हावं… पण महाराष्ट्रात नको !

Story img Loader