मंदार अनंत भारदे

भरजरी इतिहास आणि गतवैभवाची शाल पांघरून  बसलेल्या मराठी समुदायाला उत्सवाभिमान प्रगटीकरणाची संधी याही आठवडयात आहेच. सारेच मूलभूत प्रश्न-चिंता विसरून आणि विकासाच्या नावावर उभारलेल्या भ्रामक देखाव्यांना भुलून येणारे ‘दिवस’ सणासारखे वाजत-गाजत-नाचत साजरे करायच्या अलीकडच्या नवप्रवाहात ‘मराठी भाषा गौरव दिना’चा देखील समावेश झाला तर आश्चर्य नसेल. भाषा अभिजात कधी होईल ती होवो, भाषेविषयी ‘अभिजात आस्था’ आधी तयार का व्हायला हवी, याचे तिरकस चिंतन..

official language in india article 343 for official language of the union
संविधानभान : राष्ट्रभाषा नव्हे; राजभाषा
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Sarangi maestro Pt Ram Narayan passes away
व्यक्तिवेध : पं. रामनारायण
Offense against speaker along with organizer due to offensive statements
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वक्त्यासह आयोजकावर गुन्हा
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?
Musical dance drama Urmilayan Aryans Group of Companies Kamesh Modi
सांगीतिक नृत्यनाट्य ‘ऊर्मिलायन’
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई

‘माझी माय मराठी डोक्यावर रत्नजडित मुगुट आणि अंगावर फाटकी वस्त्रे लेवून मंत्रालयाच्या दारात उभी आहे’, असे अत्यंत तेजस्वी उद्गार कुसुमाग्रजांनी काढल्यावर शासन खडबडून जागे झाले. हे साधारण मागच्या शतकाचे शेवटचे दशक असावे. मला आठवतंय त्याप्रमाणे तोपर्यंत यशवंतराव चव्हाणांच्या रूपाने सांस्कृतिक आणि साहित्यिक जाणिवा असलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला होता, असे म्हणून विषय सोडून दिला जात असे. महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतरावांनी आणला आणि ते सुसंस्कृत होते इतके म्हणून भागत असे. नेत्याने सुसंस्कृत असणे आवश्यक आहे, अशी अवास्तव अपेक्षा केली जात नसे.

पण तत्कालीन नेतृत्वाला अचानक सुसंस्कृत होणे गरजेचे आहे, असे वाटले आणि त्यांनी माझी माय मराठी डोक्यावर मुगुट आणि अंगावर फाटकी वस्त्रे लेवून मंत्रालयाच्या दारात उभी आहे, याविषयी करावयाच्या उपाययोजना याबाबत तातडीची बैठक मंत्रालयात लावली. प्रत्येक जिल्ह्यातून वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात बोलावले गेले. सामान्य प्रशासन विभागाने गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, श्रीमती मराठी महोदया जर मंत्रालयाच्या दारात उभ्या असतील, तर त्यांना ओळखपत्र बघून आणि सुरक्षा तपासणी करून प्रवेश देण्याचे निर्देश द्यावेत आणि प्रवेश दिल्याचा कार्य अहवाल सात दिवसांत सदर कार्यालयाला सादर करावा. गृह विभागाला सा. प्र. वि.ने या विषयात लक्ष घातलेले आवडलेले नव्हते, त्यामुळे त्यांनी श्रीमती मराठी महोदया यांचा काही गुन्हेगारी पूर्वेतिहास आहे काय, याची माहिती करून घेऊन त्यांचे चारित्र्य तपासल्याशिवाय त्यांना मंत्रालयात येऊ देणे धोक्याचे आहे, असा शेरा ‘मिनिट्स’मध्ये नोंदवला.

ज्या अर्थी श्रीमती मराठी महोदया यांची वस्त्रे फाटकी आहेत त्या अर्थी त्या दुबळया प्रवर्गातील असतीलच. महिला आहेत म्हणजे अनुकंपा किंवा सक्षमीकरण करणे शक्य होईलच आणि त्यामुळेच श्रीमती मराठी यांच्यासाठी नव्या वस्त्रांची खरेदी यासाठी टेंडर काढता येऊ शकेल, असा साक्षात्कार अचानक सगळय़ांना झाला आणि बैठकीचा नूरच बदलला. महाराष्ट्रातल्या सगळयाच महिलांप्रति शासनाची जबाबदारी आहे. महाराष्ट्रात नऊ कोटी लोकसंख्येत बारक्या मुलींपासून म्हाताऱ्या-कोताऱ्या मोजल्या तरी होलसेलमध्ये साडेचार कोटी तरी महिला असतीलच. मंत्रालयाच्या दारात आलेल्या श्रीमती मराठी महोदया यांनाच फक्त वस्त्रे दिली, तर मराठवाडयासह सगळयाच इतर महिलांवर अन्याय होईल आणि शासन काही करेल किंवा करणारही नाही, पण अन्याय मात्र अजिबात करू शकत नाही. पण मग आता साडेचार कोटी महिलांना वस्त्रे कशी देणार? आणि निकष काय लावणार? असा मोठाच गंभीर प्रश्न उभा राहिला. ‘टेंडर’ या विषयातल्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी सुचवले की जी महिला मुगुट घालून येईल तिला ‘सरसगट’ वस्त्रे द्यायला काहीच हरकत नाही. त्यामुळे श्रीमती मराठी आणि इतर यांना फाटकी वस्त्रे त्यागायची असतील तर डोक्यावर मुगुट घालून येणे आवश्यक ठरले.

सामाजिक न्याय विभागातल्या अधिकाऱ्यांनी सुचवले की समाजातला एक मोठा घटक वर्षांनुवर्षे पिचलेला राहिल्याने त्यांच्याकडे मुगुट वगैरे काही नाही. मग अशा वंचित महिलांना नवी वस्त्रे तुमच्या मुगुटाच्या निकषांवर कशी मिळणार? त्यामुळे सामाजिक न्यायाला धोका होऊ शकतो. त्यामुळे श्रीमती मराठी महोदया यांच्याप्रमाणे आधी गावोगाव घरोघरी शासनाने मुगुट द्यावेत आणि ते घालून शासनाच्या दारात महिला आल्या की त्यांना वस्त्रे द्यावीत. मराठी ताईवरचा अन्याय दूर करायचा असेल तर मुगुटही शासनाने द्यावा आणि वस्त्रेही शासनाने द्यावीत.

आता इतक्या महिलांना मुगुट द्यायचे म्हणजे मुगुटाच्या कंपन्या उभारणे आले, त्यामुळे रोजगाराची निर्मिती होणार याच्या जाहिराती करणे आले, वस्त्राचे कारखाने आले, या सामग्रीची वाहतूक आली आणि मुख्य म्हणजे या सगळयासाठी ‘टेंडर’ काढणे आले! श्रीमती मराठी महोदया जीर्णशीर्ण वस्त्रे लेवून रत्नजडित मुगुट घालून मंत्रालयाच्या दारात काय उभ्या राहिल्या, त्यांनी टेंडरमार्फत विकासाच्या शेकडो शक्यता निर्माण केल्या यामुळे शासन खूश झाले; आणि त्यांनी विविध समाजघटकांनाही मुगुट आणि जीर्ण वस्त्राच्या खेळात सहभागी व्हायचे आवाहन केले.

सर्व टेंडर मार्गी लागल्याची खात्री झाल्यावर आपल्या मंत्री महोदयांनीही थोडेसे मराठीच्या विकासाला झोकून दिले पाहिजे, असे वाटल्याने मंत्री महोदयांकरिता भाषण लिहिणारे त्यांना जाऊन भेटले आणि म्हणाले, ‘‘साहेब, आता गरिबांचे कल्याण, अर्थव्यवस्थेचा विकास, शिक्षण, आरोग्य हे विषय जुने झाले. आता आपण लोकांच्या भावनेला हात घालू. इथून पुढे मी काही चांगल्या कविता, कथा, शेर तुमच्या भाषणात आणेन. तुम्ही जरा सराव करा. मंत्री महोदयांनाही विकास, गरिबी या विषयांचा कंटाळाच आला होता म्हणून ते हो म्हणाले. एक-दोन दिवस बरे चालले. ओळखीपाळखीच्या वर्तमानपत्रांनी ‘राज्याचा नवा सुसंस्कृत चेहरा’ म्हणून त्यांचा उल्लेख केला. कोणत्याही कार्यक्रमाला गेले की लोक त्यांना आजवर दबंग किंवा धूर्त म्हणायचे. पहिल्यांदा कोणी तरी त्यांचा सुसंस्कृत उल्लेख केल्याने ते भलतेच खूश झाले. पूर्वी कोणत्याही कार्यक्रमाला गेले की लोक त्यांना गदा द्यायचे, ते आता मुगुट द्यायला लागले. जीर्ण वस्त्र ल्यायलेली मुगुटमंडित श्रीमती मराठी आपल्याला भारीच ‘लकी’ आहे असे त्यांना वाटले आणि त्या आनंदात मोहरून जाऊन त्यांनी कुसुमाग्रजांनी लिहिलेले पसायदान माझी मामी रोज संध्याकाळी माझ्याकडून म्हणून घ्यायची आणि मला आजही ते पाठ आहे, असे म्हणून ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का?’ हे म्हणून दाखवले. सुसंस्कृत बनण्याच्या नादात ते इतके बेफाम झाले होते की बालकवी तान्हे असतानाच्या वयापासून लिहीत असत, असेही एकदा सांगून बसले. भोवळ आलेल्या माणसाला जसे मोजा हुंगवून शुद्धीवर आणतात, तसे एका कार्यक्रमात त्यांना गदा देऊन सुसंस्कृततेच्या पाशातून बाहेर काढले.

श्रीमती मराठी जीर्ण वस्त्रांत का आहेत? या प्रश्नाने सामान्य मराठी माणूस फारच अस्वस्थ झाला. त्याला सारखा आपल्यावर अन्याय होतोय, असे वाटायला लागले. दुकानावरच्या पाटया बदलल्या, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, गणपतीत २४ तास डीजे बडवायला मिळाला आणि गोिवदाला आठ-दहा थर लावायला मिळाले, इतर भाषिकांना मराठी शिकणे सक्तीचे केले गेले आणि मुख्य म्हणजे त्यांचे लोक फक्त जे त्यांच्याच लोकांच्या पाठीशी धंद्यात उभे राहतात ते त्यांनी करायचे थांबवले तर मराठी माणसाचे सगळेच प्रश्न सुटणार होते.

श्रीमती मराठी महोदया मुगुट घालून उपोषणाला बसू शकतील का? ही शक्यताही त्यांनी तपासून पाहिली. सदासर्वकाळ मराठी माणूस कोणी तरी आपल्या वतीने उपोषणाला बसावे, याच्या शोधात असतो. आपल्या वतीने उपोषणाला बसायला कोणी नसणे, हे मराठी माणसाला फारच कमीपणाचे वाटते. प्रत्येक घरात काहीही न करणारे; परंतु उदात्त ध्येय असणारे लोक असतात. त्यांना अनुदानित उपोषणकर्ते म्हणून जर मान्यता मिळाली तर गावोगाव खूप जणांना रोजगार मिळू शकेल याच शक्यतेचा विचार झाला. मराठी शाळांचा प्रश्न त्यांच्यासाठी महत्त्वाचाच होता. त्यांच्या मुलांना काही कारणाने शक्य झाले नव्हते, पण जगाने मात्र त्यांची मुले मराठी शाळेतच घातली पाहिजे याबद्दल ते आग्रही होते.

२५ वर्षांपूर्वी कुसुमाग्रजांनी जेव्हा मराठीबद्दल चिंता व्यक्त केली तेव्हाची वर्तमानपत्रे काढा आणि त्यांची आजशी तुलना करा. तारीख सोडले तर काहीही बदललेले दिसणार नाही. मराठी माणसावर अन्याय होत असेलच, मराठी माणूस धंद्यात मागे असेलच, मराठी नाटक आणि चित्रपटाची प्रेक्षक संख्या रोडावत असेलच, काही तरी निरर्थक गोष्टींवर शासन मराठीच्या नावावर खर्च करीत असेलच, पुस्तकाच्या प्रकाशनाची संख्या खूप, पण वाचणारे कोणी नाही हे असेलच, उद्योगधंदे पळवले जात असतीलच, शेतकरी गाळात आणि व्यापारी सुखात असतीलच, मराठी माणसाचा हा काय विकास आहे, जो पंचवीस वर्षांतही ना वर चढतो, ना पुढे सरकतो.

मराठी माणसाचा स्वभाव कुसुमाग्रजांनी काय छान ओळखला होता. सगळेच गतकाळाचा मुगुट मिरवण्याच्या नादात विरलेल्या वस्त्राचे वास्तव विसरणारे वीर, स्वत:चे हरवलेले सत्त्व मंत्रालयाच्या दारात शोधायला निघालेले. महाराज शाहू – फुले – आंबेडकर हे आमच्या डोक्यावरचे मुगुट, तर आम्हाला त्यांच्या पराक्रमाऐवजी जाती आठवतात हे आमचे फाटके वस्त्र, सह्याद्रीच्या कडेकपारीतून अटकेपार झेंडे लावणारा भूतकाळ हा मुगुट तर आज गल्लीबोळात महाराजांच्या नावाने दंगा करीत फिरणारे आपले फाटके वस्त्र, किर्लोस्कर- गरवारे- शिर्के आपले मुगुट तर नोकऱ्या शोधत हिंडणारे कळप हे आपले फाटके कपडे.

भरजरी इतिहासाची आणि गतवैभवाच्या अहंकाराची कात मराठी माणूस टाकेल आणि वर्तमानात त्याच्या कर्तृत्वाची सळसळ परत ऐकायला येईल याची आशा याही मराठी भाषा गौरव दिनाला जागृत ठेवू या!

 mandarbharde@gmail.com