सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा (१-७ सप्टेंबर) ‘नॅशनल न्यूट्रिशन वीक’ म्हणून भारतात साजरा होतो. हा साजरा करण्याचा मूळ उद्देश आहाराबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे असा आहे. आहाराचा परिणाम शरीरावर होतो. चांगला, सकस व समतोल आहार घेतला तर बरेचसे आजार टाळता येतात किंवा लांबणीवर टाकता येतात. त्यामुळे चांगल्या स्वास्थ्याचे गुपित हे चांगल्या आहारात आहे. सर्व लोक सुदृढ असतील तर आरोग्यदायी राष्ट्र निर्माण होते व त्यामुळे देशाची आर्थिक बाबतीत प्रगती होते. या उद्देशाने १९८२ पासून सप्टेंबरचा पहिला आठवडा महिला व बाल विकास मंत्रालयाच्या ‘न्यूट्रिशन बोर्ड’तर्फे ‘न्यूट्रिशन वीक’ म्हणून साजरा केला जातो. या वर्षांची संकल्पना ‘न्यूट्रिशन अवेअरनेस- की टू हेल्थ नेशन’ अशी आहे.
आहाराचे महत्त्व सर्वाना माहीत असते, पण आहार/अन्नाबद्दल फार गैरसमज आहेत. यामुळे अन्नपदार्थाबद्दल जागरूकता फार आवश्यक आहे. जर आहाराची वैज्ञानिक माहिती साध्या-सोप्या भाषेत मिळाली तर सर्वाना काय खायचे, किती खायचे हे प्रश्न पडणार नाहीत. असे झाल्याने आजारी पडल्यावर आहाराचे ‘पथ्य’ करण्यापेक्षा रोजच्या दैनंदिन जीवनात चांगले अन्नपदार्थ निवडण्यास मदत होईल.
समतोल आहार न घेतल्यामुळे ‘कुपोषण’ व ‘अतिपोषण’ असे दोन्ही विकार होऊ शकतात. आपल्या देशात लहान मुले व स्त्रियांमध्ये कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. याकरिता सरकारद्वारा ‘इन्टीग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम’, ‘मिड-डे मील’ असे कार्यक्रम राबविले जातात. यामध्ये लहान मुले, गरोदर स्त्रिया यांना आहाराबद्दलचे ज्ञान दिले जाते.
अतिपोषण हा आपल्या देशात नवीन, पण वाढती समस्या झाली आहे. अतिपोषण हेसुद्धा एक प्रकारचे कुपोषण आहे. याचे कारण असे आहे की, अतिपोषण असलेल्या व्यक्तीच्या आहारात एक किंवा दोन अन्नघटकांवर जास्त भर असतो व इतर अन्नघटक व जीवनसत्त्वे, खनिज पदार्थ यांचा अभाव आढळून येतो. अतिपोषणामुळे स्थूलता, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग होण्याची शक्यता वाढते. अतिपोषित रुग्ण/व्यक्तींमध्ये प्रथिने, व्हिटॅमिन बी१२, व्हिटॅमिन डी यांचे कुपोषण आहे, असे आढळून येते.
अतिपोषणासाठी सरकारतर्फे कोणत्याही योजना नसल्या तरी सर्वात महत्त्वाचे म्हणजे अतिपोषण असलेल्या व्यक्तींना इतर त्रास होण्यापूर्वी ओळखणे महत्त्वाचे आहे. त्यांना आहाराचा फक्त सल्ला न देता आहाराचे ज्ञान देणे आवश्यक आहे. कारण सल्ला दिल्यानुसार जेवणे रोजच शक्य होत नाही. पण आहाराचे ज्ञान असले तर समोर असलेल्या अन्नपदार्थातून स्वत:करिता चांगले असे अन्नपदार्थ निवडता येतात. अन्नपदार्थातील अन्नघटक व जीवनसत्त्व ओळखणे फारसे कठीण नाही. अशा तऱ्हेने आहाराबद्दलचे ज्ञान दिले व त्याच्या मनातील अन्नाबद्दलच्या गैरसमजुती दूर केल्या तर समतोल आहार घेण्याची त्याची इच्छा पक्की होईल.
आजकालच्या जीवनशैलीत आहाराचे ज्ञान असणे फारच आवश्यक आहे. याचे दुसरे कारण असे की, धावपळीच्या जीवनात आपण बाहेरचे जेवण, विकतच्या फराळाचे पदार्थ, प्रक्रिया केलेले अन्न जसे रेडिमेड सूप, रेडिमेड मसाला यावर अवलंबून असतो. विकत घेताना आपण ते नावाजलेल्या/चांगल्या कंपनीचे आहे व एक्सपायरी डेट कधीची आहे, एवढेच पाहातो. त्या वस्तूत काय घटक आहेत व त्यातून किती ऊर्जा, प्रथिने, कबरेदके, स्निग्ध पदार्थ मिळतात ही माहितीपण असते. याचबरोबर त्यात साखरेचे, मिठाचे प्रमाण, प्रीझरव्हेटिव्हचा वापर याबद्दलचीही माहिती असते. पण ती फार तांत्रिक किंवा वैज्ञानिक आहे असे समजून त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. ही माहिती वाचली तर आपल्याला अन्नपदार्थ निवडण्यास मदत होते. त्याचबरोबर आपण काय खातो आहोत याबद्दल मनात जागरूकता निर्माण होते. या कारणामुळे अन्नपदार्थ विकत घेताना, मग ते बिस्किट असो किंवा खायचे तेल असो, माहिती वाचणे गरजेचे आहे!
मोठे झाल्यावर आपल्याला एक विशिष्ट प्रकारचे अन्न खायची सवय होते. ही सवय आपल्याला लहानपणापासून आहे म्हणून आता मोडता येत नाही, असे सर्व लोक म्हणतात. या कारणामुळे लहानपणी/ शाळकरी मुलांमध्ये अन्नाचे/ आहाराचे ज्ञान देणे फार आवश्यक आहे. जर मुलांमध्ये चांगले अन्न खाण्याच्या सवयी लावल्या तर त्यांना मोठेपणी पथ्य पाळावे लागणार नाही. ‘न्यूट्रिशन वीक’मध्ये शाळकरी मुले व त्याच्या पालकांना आहाराचे ज्ञान दिले जाते. शाळेतसुद्धा डब्यातून मुलांनी चमचमीत फराळाचे पदार्थ न आणता साधे, सकस, घरी केलेले न्याहारीचे पदार्थ किंवा ‘पोळी-भाजी’ असे पदार्थ आणावे, असे नियम केले पाहिजेत. काही शाळांमध्ये लहान मुलांना डबा नेमून देण्यात येतो. जसे ‘फ्रूट डे’, ‘सॅलड डे’, ‘स्प्राऊट डे’ इत्यादी. असे केल्याने मुलांना आहाराच्या चांगल्या सवयी लागतात. त्यांना आपण चमचमीत पदार्थातून वंचित राहतो आहोत असे वाटू नये म्हणून ‘जंकफूड डे’ म्हणजे त्या दिवशी वेफर्स, चिप्स, बिस्किट्स असे पदार्थ आणता येतात. असे केल्यामुळे मुलांना आपोआप कळते की, आठवडय़ातून रोज साधे, सकस अन्न, फळे, भाज्या खाल्ल्या की एखादा दिवस आवडीचे पदार्थ खाता येतात. असे लहानसहान उपाय करून शाळकरी मुलांच्या अन्नाच्या सवयी बदलता येतात व त्यांना योग्य आहाराचे शिक्षण देता येते.
प्रत्येक अन्नघटकाचे महत्त्व वेगवेगळ्या वयोगटांत बदलते. आहाराची माहिती साधारणत: मुलांसाठी किंवा गरोदर महिलांकरिता असते अशी समजूत आहे. लहान वयात व गरोदरपणात आहाराची जास्त गरज असते हे खरे असले तरीही आयुष्यातील प्रत्येक वयोगटात आहाराचे महत्त्व कमी होत नाही!
आहारचर्या : राष्ट्रीय आहार सप्ताह
सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा (१-७ सप्टेंबर) ‘नॅशनल न्यूट्रिशन वीक’ म्हणून भारतात साजरा होतो. हा साजरा करण्याचा मूळ उद्देश आहाराबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे असा आहे. आहाराचा परिणाम शरीरावर होतो.
आणखी वाचा
First published on: 10-09-2012 at 02:49 IST
मराठीतील सर्व आहारचर्या बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lokrang lokrang dr shilpa joshi aharcharya food diat nutrition national nutrition week