साहित्यिकांनी आणि शिक्षकांनी कायम गरीब रहावं, कोणी आमंत्रण दिलं तर मानधन न घेता लोकांच्या प्रबोधनासाठी जावं आणि त्यासाठी प्रवासखर्चाचीही अपेक्षा करू नये असा काही नियम आहे का? मार्क्‍सवादी म्हणवून घेणारे लेखकही रशियाच्या वाऱ्या करून आलेतच की! त्यांना सन्मानानं बोलावलं तर त्यांनी का जाऊ नये? हजार भागांच्या एखाद्या टुकार मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्यांचा चेहरा सतत दाखवणाऱ्या एखाद्या न्यूज चॅनलला नवीन पुस्तक बाजारात आलेल्या साहित्यिकाचा चेहरा जाऊ द्यात, पण पुस्तकही दाखवावंसं वाटत नाही..
आपल्या सर्जनशील लेखनानं प्रसिद्धीस पावलेल्या, साहित्य, संशोधन आणि समीक्षेचा गंभीरपणे विचार करणाऱ्या आणि सन्मानानं निमंत्रण मिळालेल्या साहित्यिकांना, केवळ विश्व साहित्य संमेलनाला जाण्याचा अविचार केल्यानं गेल्या काही दिवसात निलाजरे, भिकारी, बाजारबुणगे, फुकट फौजदार इत्यादी बिरूदं प्राप्त झाली हे एका अर्थानं बरंच झालं. महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येकानं मनात किंवा जाहीरपणे या साहित्यिकांना झोडपलं असणारच. एकूणच आज समाजाचं होत असलेलं अध:पतन पाहून मनात उफाळून आलेली चीड व्यक्त करण्यासाठी आपल्याला कोणालातरी झोडपावसं वाटत असतं आणि त्यासाठी कोणतं तरी निमित्त लागत असतंच. मग ते अण्णा हजारेंचं भ्रष्टाचाराविरोधातलं आंदोलन असेल, शिक्षक, प्राध्यापकांचा किंवा डॉक्टरांचा संप असेल, राजकीय पक्षांचे घोटाळे असतील किंवा नोकरशाहीचा अरेरावी कारभार असेल, नाहीतर साहित्य संमेलन आणि साहित्यिक असतील. मीडिया मग तो इलेक्ट्रॉनिक असो की िपट्र असो, कोणत्या ना कोणत्या कारणानं लोकांची सालटी सोलण्यासाठी तयार बसलेलाच असतो. या माध्यमातल्या बजबजपुरीवर मात्र आपल्याला काही लिहिता येत नाही किंवा त्याविषयी बोलता येत नाही. कारण आपल्या हातात लेखणी असली तरी शेवटी लोकांपर्यंत पोचण्याचा मार्ग या माध्यमातूनच जात असतो. सुदैवानं संपादकांना हाताशी न धरताही मला साहित्यिक आणि सांस्कृतिक घडामोडींवर लिहिण्यासाठी हा स्तंभ मिळाला आहे. त्यामुळे विश्व साहित्य संमेलनाचे आयोजक, महामंडळ आणि साहित्यिक यांच्यासंबंधी झालेल्या लेखनावर व चच्रेवर काही मतं व्यक्त करण्याची संधी मी घेते आहे.
आज महाराष्ट्रातील अनेक साहित्यसंस्थांमध्ये लेखनाशी संबंध नसलेले अनेक लोक आहेत. त्यातील सर्वाचाच साहित्याशी काही संबंध नाही असं म्हणता येणार नाही. कारण चांगला कार्यकर्ता, प्रकाशक, संपादक, मुद्रकही स्वत: लिहीत नसला तरी चांगलं साहित्य वाचत असतो. चांगलं लिहिणाऱ्यांविषयी त्यांना प्रेम असतं. यातले काही लोक मात्र अतिउत्साही पण उथळ असतात. हे लोक अशा संस्थांवर आपली वर्णी लागावी म्हणून प्रयत्न करत असतात. अशा लोकांची एकूणच साहित्याविषयीची जाण तपासून पाहिली तर आक्षेप घेता येईल. अनेकदा साहित्य संस्था चालवण्यासाठी, कार्यक्रम करण्यासाठी किंवा संमेलनं भरवण्यासाठी कार्यकत्रे आवश्यक असतात. मग गंभीर वाचक नसले तरी, साहित्याची थोडीफार जाण असणाऱ्या ‘किंचित’ कवी किंवा लेखकांना हाताशी धरून या संस्था चालवल्या जातात. सतरंज्या उचलता उचलता आपली एखादी बाळबोध कविता वाचून कवी म्हणून ओळख मिळवता येईल असं वाटणाऱ्या अशा काही कार्यकर्त्यांमुळे संमेलनाचा किंवा संस्थेच्या कार्यक्रमांचा दर्जा घसरत असतो, हे त्या संस्थेच्या अध्यक्षांना कळत असलं तरी कार्यकत्रे टिकवून ठेवण्यासाठी त्यांना दुर्लक्ष करावं लागतं. अशा वेळी त्या संस्था बंद झाल्या तरी चालेल असा विचार केला जात नाही हे खरं आहे. केवळ छोटय़ाच नाही तर मोठय़ा संस्थांचीही हीच स्थिती आहे. दर्जा घसरला तरी एके काळी उभारलेलं तुमचं संस्थान खालसा करायचं का? हा प्रश्न पडतो. तो पडला तरी ते संपवताना कार्यकारिणीचा विचार घ्यावा लागतो. असे निर्णय घेण्याचं बळही लागतं. ते बळ सगळ्यांमध्ये असतं, तर केवळ महामंडळच नाही तर आज लोकमान्य लोकशक्ती किंवा वाचकांची मित्र असलेली महाराष्ट्रातील छोटी -मोठी आणि महत्त्वाची अशी सारीच वृत्तपत्रं आणि सगळी चॅनल्सही बंद करावी लागली असती. बाळशास्त्री जांभेकर, आगरकर, लोकमान्य टिळक यांचा वारसा सांगणाऱ्या पत्रकारितेचा आजचा व्यवहार पाहिला तर तो साहित्य महामंडळापेक्षा वेगळा आहे असं नाही. आजच्या जवळजवळ सर्वच माध्यमांच्या दृष्टीनं साहित्य, कला आणि संस्कृती म्हणजे चित्रपटातील तारे-तारकांचे वेगवेगळ्या पोझेसमधले फोटो, त्यांना आवडणाऱ्या रेसिपिज, त्यांच्या आठवणीतला पाऊस, दर्जा घसरलेल्या विनोदांचं दळण, गणेशोत्सव, दिवाळी किंवा रंगपंचमीच्या रंगात रंगलेले त्यांचे चेहरे किंवा मंगळागौरीचे अथवा नवरात्रीतल्या नऊ रंगांचे इव्हेंट्स वाटतात की काय काय अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांना तर पुस्तकांविषयी काही पडलेलं नसतंच. वर्षांतून एकदा दिवाळी अंकांवर किंवा संमेलनावर एखादं फिचर करायचं आणि त्यात पुन्हा साहित्य संस्कृतीच्या नावानं गळा काढायचा. काही वर्तमानपत्रात पुस्तकांच्या परीक्षणासाठी भरपूर जाहिराती असलेल्या पानावरचा एखादा कोपरा असतो. शिल्पकला, चित्रकला, संगीत आदी कलांच्या क्षेत्रांतील घडामोडी व त्यावरील लेखांचा तर अभावच असतो. वैचारिक लेखन तर लोकांनाच वाचायचं नसतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सकारात्मक काम करणाऱ्या लोकांच्या किंवा संस्थांच्या कामाची दखल अपवादानेच घेतली जाते. सारंच नकारात्मक छापून किंवा दाखवून आज माध्यमं सगळ्या जनतेची नकारात्मक मानसिकता तयार करण्यात हातभार लावताहेत का, याचाही विचार करावा लागेल. पानभर जाहिरातीत एखादी बातमी शोधण्याची वेळ या वर्तमानपत्रांनी आणली आहेच, पण अनेक वर्तमानपत्रांतली संपादकीय देखील अत्यंत सपक व एकरेषीय लिहिली जातात. खरं तर आज प्रत्येक क्षेत्राचं अवमूल्यन झालं आहे आणि त्याला कारणीभूत आपणच आहोत. पण ज्यांच्यावर संस्कृती टिकवण्याची जबाबदारी आहे त्या साहित्यिकांनी, शिक्षकांनी आणि पत्रकारांनी हे अवमूल्यन केलं तर त्याची विशेष दखल घ्यावी लागते. अतिशय चांगलं लिहिणारे कवी, कथाकार, कादंबरीकार किंवा समीक्षक किंवा उत्कृष्ट संपादकीय लिहिणारे संपादक, पत्रकार प्रत्यक्ष जीवनात कसे असतात, हा अभ्यासाचा विषय आहेच. साहित्यिकांचं कार्यक्रमानंतरचं आणि पत्रकारांचं पत्रकार परिषदेनंतरचं पार्टी आणि दारूप्रकरण तर चिंता करायला लावणारं आहे. पण हे फक्त साहित्यिक आणि पत्रकारच करताहेत का? राजकारण्यांमागे फिरणारे लेखक जेवढे आहेत तेवढेच किंवा त्याच्यापेक्षा जास्त पत्रकार, वकील, डॉक्टरही आहेतच. शासकीय कोटय़ामध्ये घर घेणारे, दुसऱ्या वर्गानं प्रवास करून पहिल्या वर्गाचं भाडं घेणारे, एका पुस्तकानं लेखकराव होणारे, विविध मंडळांवर वर्णी लावणारे, अगदी पुरस्कार मॅनेज करणारे किंवा संपादकांना हाताशी धरून स्तंभ मागणारे काही लेखक आहेतच; पण हे सारं इतर कलाकार आणि पत्रकारही करत असतातच. याचा अर्थ सारेच सव्यसाची पत्रकार, सारे कलावंत आणि सारे लेखक असे असतात का? याचाही विचार करायला हवा. संधीचा फायदा घेणं, पशासाठी आणि प्रसिद्धीसाठी विकलं जाणं, फुकटात मिळालेली दारू पिणं हे दृष्य बरंचसं सार्वत्रिक दिसत असलं तरी सर्वच माणसं या वृत्तीची नसतात हे लक्षात घ्यायला हवं. त्यात लेखक, वकील, शिक्षक, डॉक्टर, पत्रकार असा फरक करता येणार नाही. काही माणसांना एनकेनप्रकारे समाजात स्वत:ची ओळख मिळवायची असते. ती कशी मिळवायची, लोकांसमोर कसं यायचं, कोणत्या मार्गानं यायचं ते तो ठरवतो. अनेकदा आपल्याकडे काहीच दाखवण्यासारखं नसेल तर प्रवाहाच्या विरोधात जाऊन माणसं वागतात. कोणी दोन मीटर मिशा वाढवून किंवा दोन किलो मिरची खाऊन गिनिज बुकात आपलं नाव नोंदवतात, काही लोक आध्यात्मिक गुरू होतात तर काही लेखकराव किंवा िवदा म्हणाले तसे कवडे होतात. त्यांचा उदो उदो करणारा एक वर्ग असतोच.
पण अशा कवडय़ांमध्ये हाताला टोकदार शब्द लागलेला एखादा सर्जनशील लेखक, समीक्षक, विचारवंत असतोच ना? त्यांचं आपण काय करणार आहोत? आज नव्या पत्रकारांना कोण कुठला लेखक आपल्या मुळांविषयी लिहितोय हे वाचायलाही वेळ नाही. सुषमा करोगलसारख्या बडोदा विद्यापीठाच्या विभागप्रमुख बडोद्यात मराठी टिकवताहेत, साहित्यसमीक्षेचं आणि अनुवादाचं महत्त्वाचं काम करताहेत याची कल्पनाही नाही. त्यांना आलंच कधी विश्व साहित्य संमेलनाचं आमंत्रण तर त्यांनी का जायचं नाही आपल्या इथल्या जगण्याविषयी सांगायला? उडदामाजी काळे गोरे असतातच ,पण सारेच साहित्यिक इथल्या मातीशी नाळ तुटलेले आहेत हे कोण ठरवणार? सिनेमासाठी गाणी लिहून स्वत:ला कवी म्हणवणाऱ्या आणि जाहीर कार्यक्रम करून रग्गड पसे घेणाऱ्या लोकांच्या मुलाखती पेपरात येतात आणि लोकांना हेच कवी, लेखक आहेत असं वाटत रहातं. लेखकाचा तेवढा वकूब नसताना केवळ ऑस्करसाठी चित्रपट गेला म्हणून सेलिब्रिटी झालेले लेखक आपल्याकडे असतात तर राजन गवस किंवा रमेश इंगळे उत्रादकर यांसारखे गंभीर लेखन करणारे, साहित्यसमीक्षा व्यवहाराकडे सजगपणे पहाणारे लेखक मात्र सेलिब्रिटी होत नाहीत. त्यांच्या कादंबऱ्यांवर आधारित ‘जोगवा’ व ‘निशाणी डावा अंगठा’ सारख्या चित्रपटांतील अभिनेत्यांच्या कामाचा गवगवा झाला, पण इतकं सशक्त कथाबीज देणाऱ्या लेखकांची विशेष दखल आपल्या माध्यमांनी घेतली नाही. जिप्सी, छोरी सारखी पुस्तकं लिहिणारे, अनुवादाचं भरीव काम करणारे मंगेश पाडगावकर पापडाच्या कंपनीला आपली कविता देतात तेव्हा गहजब होतो; पण याच जाहिरातींसाठी एखाद्या महत्त्वाच्या बातमीचा किंवा लेखाचा गळा दाबला जातो तेव्हा मात्र आपण गप्प बसतो. साहित्यिकांनी आणि शिक्षकांनी कायम गरीब रहावं, कोणी आमंत्रण दिलं तर मानधन न घेता लोकांच्या प्रबोधनासाठी जावं आणि त्यासाठी प्रवासखर्चाचीही अपेक्षा करू नये असा काही नियम आहे का? मार्क्‍सवादी म्हणवून घेणारे लेखकही रशियाच्या वाऱ्या करून आलेतच की! त्यांना सन्मानानं बोलावलं तर त्यांनी का जाऊ नये? हजार भागांच्या एखाद्या टुकार मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्यांचा चेहरा सतत दाखवणाऱ्या एखाद्या न्यूज चॅनलला नवीन पुस्तक बाजारात आलेल्या साहित्यिकाचा चेहरा जाऊ द्यात, पण पुस्तकही दाखवावंसं वाटत नाही. खरं तर विश्व साहित्य संमेलनाच्या निमित्तानं काही साहित्यिकांचे चेहरे टीव्हीवरच्या चर्चात्मक कार्यक्रमात पहाता तरी आले. नाहीतर अशा बाजारबुणग्यांना कोण विचारतो अलीकडे? एका चित्रपटाच्या यशानं किंवा एखाद्या मालिकेच्या यशानं सेलिब्रिटी होण्याचा वकूब त्यांच्यात नसतोच. दहीहंडीच्या कार्यक्रमात किंवा गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात आयटम साँग करून किंवा म्युझिकल शो करून लाखांच्या घरात पसे कमावण्याची अक्कल त्यांच्यात नसते. कार्यक्रमाला जर चुकून कोणी बोलावले तर विमानखर्च मागण्याचा विचार सोडाच पण फर्स्ट क्लासचं तिकीट किंवा कमीत कमी सेकंड एसीचं तिकीट मागण्याएवढय़ा लायकीची आपली ग्रंथसंपदा आहे का, हा प्रश्न त्याला पडतो. त्यामुळे प्रवासखर्चासह हजारापासून दीडशे दोनशे रुपयांपर्यंत मानधन देणाऱ्या लोकांकडेही आपलीच गरज असल्यासारखा तंगडतोड करत राज्यातल्या कोणत्याही छोटय़ाशा गावात तो जात असतो. साहित्यसेवा करणे हा आपला धर्म आहे असं मानून आपण लिहिलेल्या चांगल्या दर्जेदार पुस्तकाच्या हजार प्रतीच काय पण शंभर प्रती तरी संपतील की नाही या विवंचनेत असणाऱ्या आपल्याकडच्या चांगल्या लेखकालाही स्वत:चा असा चेहराच राहिला नाही. त्याला ना धड डोस्टोव्हस्की होता येतं ना चेतन भगत! अशा लेखकाला कोणीही यावे आणि टपली मारून जावे अशी काहीशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपल्याकडे लोकांना वाटतं फक्त साहित्यिकानं आणि शिक्षकानं मूल्यांची भाषा करायची असते. ती त्यांनी करायला हवीच. साहित्य हे मूल्यभान वाढविणारेच असतं. पण लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचं काय? या लोकशाहीत रहाणाऱ्या इतर नागरिकांचं काय? ज्या लोकांच्या करांच्या पशातून विश्व साहित्य संमेलनाला देणगी मिळली होती त्यांना विश्व साहित्य संमेलनाचा खेळखंडोबा करणाऱ्यांना प्रश्न विचारायचा आणि झोडपायचा पूर्ण अधिकार आहे. पण कोणत्याही प्रकारची जाहिरात न करता आपला पसा सामाजिक कामासाठी वापरणारे, पदरमोड करून वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करणारे, एवढय़ा मोठय़ा मराठी भाषिक राज्यात शंभर दोनशे वर्गणीदार मिळत नसतानाही दर्जेदार नियतकालिकं काढणारे आणि दर्जेदार साहित्यनिर्मिती करणारे अनेक साहित्यिक आहेत. त्यांच्याविषयी आपण बोलणार आहोत की नाही? काही साहित्यिकांच्या संधीसाधू वृत्तीचं, वाईट सवयींचं आणि महामंडळाच्या भोंगळ कारभाराचं सार्वत्रिकीकरण करून एकाच वेळी साऱ्यांना तोफेच्या तोंडी देताना पुढील काळात साहित्यिक ही एखादी शिवी होऊ नये, याचं भान आपण सर्वानीच बाळगायला हवं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा