साठोत्तरी कालखंडातील ‘स्वामी’ आणि ‘कोसला’ या दोन कादंबऱ्या महत्त्वाच्या मानल्या जातात. या दोन कादंबऱ्या म्हणजे दोन वेगळे असे स्वतंत्र प्रवाह आहेत. या कादंबरीनंतर रणजित देसाई यांना ‘स्वामी’कार आणि भालचंद्र नेमाडे यांना ‘कोसला’कार अशी त्यांच्या कलाकृतीच्या नावाने उपाधी मिळाली हेदेखील महत्त्वाचे स्थित्यंतर आहे.मराठी साहित्यामध्ये अक्षरलेणी असा गौरव करता येईल अशा या दोन्ही कादंबऱ्यांतील ‘स्वामी’ प्रसिद्ध होऊन ५० वर्षे पूर्ण झाली तर ‘कोसला’ ने पन्नाशीत प्रवेश केला. त्यानिमित्त ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांनी या कादंबऱ्यांचा घेतलेला आढावा..
मराठी साहित्यामध्ये साठोत्तरी कालखंड हा महत्त्वाचा मानतात. भारताच्या स्वातंत्र्यानंतरचे दशक उलटून गेले होते. या काळामध्ये अनेक स्थित्यंतरे घडून आली. या स्थित्यंतराचे प्रतिबिंब साहित्यामध्येदेखील उमटले. ही स्थित्यंतरे मराठी साहित्यातील निर्णायक निकष ठरली आहेत. मर्ढेकरी कालखंड आणि मर्ढेकरयुगाच्या प्रभावाने नवसाहित्याचे विविध प्रकार उदयास आले. कथा, कादंबऱ्या, कविता आणि नाटके या वाङ्मय प्रकाराचा यामध्ये समावेश होतो. साठोत्तरी कालखंडातील ‘स्वामी’ आणि ‘कोसला’ या दोन कादंबऱ्या महत्त्वाच्या मानल्या जातात. या दोन कादंबऱ्या म्हणजे दोन वेगळे असे स्वतंत्र प्रवाह आहेत. या कादंबरीनंतर रणजित देसाई यांना ‘स्वामी’कार आणि भालचंद्र नेमाडे यांना ‘कोसला’कार अशी त्यांच्या कलाकृतीच्या नावाने उपाधी मिळाली हेदेखील महत्त्वाचे स्थित्यंतर आहे. मराठी साहित्यामध्ये अक्षरलेणी असा गौरव करता येईल अशा या दोन्ही कादंबऱ्या सुवर्णमहोत्सव साजरा करीत असताना त्या दोन्ही अजूनही लोकप्रिय आहेत याचाच अर्थ हे दोन्ही प्रवाह समाजामध्ये अद्यापही कायम आहेत असेच म्हणता येईल. मात्र, या दोन्ही कलाकृतींच्या लोकप्रियतेचे अर्थ वेगळे आहेत. ‘स्वामी’ ही खऱ्या अर्थाने लोकप्रिय कादंबरी आहे. तर ‘कोसला’ ही गंभीर वृत्तीने लिहिलेली गंभीर पण लोकांना आवडलेली कादंबरी आहे. या दोन्ही कादंबरीतील कथानकाशी वाचक स्वत:ला ‘रिलेट’ होऊ शकतो, हे या दोन्ही कादंबऱ्यांचे बलस्थान आहे, असे म्हणता येते.
नारायण सुर्वे, अरुण कोलटकर, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, नामदेव ढसाळ, आरती प्रभू, ग्रेस, ना. धों. महानोर हे साठोत्तरी कालखंडातील प्रमुख कवी आहेत. पु. भा. भावे, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर आणि अरिवद गोखले हे मराठी नवकथेचे प्रवर्तक आहेत. साने गुरुजी यांच्या ‘आस्तिक’ या कादंबरीनंतर साठोत्तरी कालखंडामध्ये रणजित देसाई आणि भालचंद्र नेमाडे हे दोन कादंबरीकार उदयास आले. १९६२ मध्ये ‘स्वामी’ कादंबरी प्रकाशित झाली, तेव्हा रणजित देसाई हे ३४ वर्षांचे होते. तर पुढच्याच वर्षी ‘कोसला’ ही कादंबरी वाचकांच्या हाती आली, त्या वेळी भालचंद्र नेमाडे हे अवघ्या २५ वर्षांचे होते. हा काळ असा होता की स्वातंत्र्यानंतरचे दशक संपले होते. नेहरू युगाच्या मावळतीला सुरुवात झाली होती. स्वातंत्र्याचे रूपांतर सुराज्यामध्ये होईल या अपेक्षा काही अंशी फोल ठरू लागल्या होत्या. त्यामुळे सर्वच प्रस्थापितांच्या विरोधात वातावरण होण्याची सुरुवात होऊ लागली होती. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचे बंड आणि विद्रोहाची भावना वाढीस लागत होती. याच कालखंडामध्ये मराठी लघु नियतकालिकांची पंरपरा सुरू झाली, ती या व्यवस्थेविरुद्धच्या विद्रोहाला वाचा फोडण्याचे साहित्य प्रकाशित करण्यासाठीच. अशा वातावरणात आलेल्या ‘स्वामी’ आणि ‘कोसला’ या दोन्ही कादंबऱ्यांना वाचकांनी आपलेसे केले ही गोष्ट नाकारता येणार नाही.

गंगा-यमुनेचा संगम होतो तेव्हा दोन प्रवाह स्पष्टपणे दिसतात. गंगेचे पाणी पांढरे स्वच्छ तर, यमुनेचे पाणी काळे असल्याचे स्पष्टपणे दिसते. त्याच धर्तीवर ‘स्वामी ’ आणि ‘कोसला’ या दोन परस्परविरोधी धारा एकाच वेळी समाजरूपी वाचकांच्या हाती आल्या. वाचकांनी या दोन्ही कलाकृतींचे स्वागतच केले. एवढेच नव्हे, तर या दोन कादंबऱ्यांना डोक्यावर घेतले, ही वस्तुस्थिती आहे.

after Devendra Fadnavis elected as cm Nagpur is waiting for Devendra fadnavis Arrival at Ramgiri
‘रामगिरी’ला ‘देवा’भाऊची प्रतीक्षा; आता लवकर या…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
Pusad Naik family, Indranil Naik , Vasantrao Naik,
अजित पवारांसोबत गेलेल्या नाईक घराण्याला मंत्रिपदाची भेट ?
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागाबाबत आदित्य ठाकरेंची मोठी मागणी; म्हणाले, “सर्व विवादित भाग…”

गंगा-यमुनेचा संगम होतो तेव्हा दोन प्रवाह स्पष्टपणे दिसतात. गंगेचे पाणी पांढरे स्वच्छ तर, यमुनेचे पाणी काळे असल्याचे स्पष्टपणे दिसते. त्याच धर्तीवर ‘स्वामी ’ आणि ‘कोसला’ या दोन परस्परविरोधी धारा एकाच वेळी समाजरूपी वाचकांच्या हाती आल्या. वाचकांनी या दोन्ही कलाकृतींचे स्वागतच केले. एवढेच नव्हे, तर या दोन कादंबऱ्यांना डोक्यावर घेतले, ही वस्तुस्थिती आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ातील रणजित देसाई हे एका अर्थाने हाडाचे रोमँटिक. रोमँटिक हा शब्द येथे शास्त्रीय अर्थाने वापरला आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. देसाई यांच्यामध्ये आधुनिकतेबरोबरच सरंजामशाहीचाही प्रवाह होता. सरंजामशाहीमध्ये राजा, प्रधान आणि जनता अशी व्यवस्था असते. एका अर्थाने राजाविषयीची निष्ठा महत्त्वाची मानली जाते. रणजित देसाई यांचे व्यक्तिमत्त्व हे तशा प्रकारच्या सरंजामशाहीचे (फ्यूडॅलिझम) आहे. गोष्टीरूप आणि प्रेम यांच्या आधारे भावोत्कटतेचा प्रभाव त्यांच्यावर आहे. तसे व्यक्तिमूल्य आणि स्वातंत्र्य या आधुनिकतेच्या मूल्यांचे आकर्षण कमी असल्याचे जाणवते. माधवराव पेशवे आणि रमा या आदर्श पती-पत्नीचे संबंध हे ‘स्वामी’ या कादंबरीचे कथासूत्र आहे. अशाच प्रकारचे कथासूत्र त्यांच्या ‘श्रीमान योगी’ या पुढील कादंबरीमध्येदेखील ठळकपणाने जाणवते. समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील संबंध त्यांनी ‘श्रीमान योगी’ कादंबरीमध्ये रेखाटले आहेत. ‘स्वामी’ हे कादंबरीचे शीर्षक हेच निष्ठेचा अर्थ सूचित करणारे आहे. ही निष्ठा इतिहासावर आहे. ‘श्रीमान योगी’ कादंबरीमध्ये समर्थ रामदास हेच ‘स्वामी’ आहेत. सरंजामशाही ही केवळ बाह्य़ अवस्था नाही, तर ती जीवनमूल्ये आहेत हे रणजित देसाई यांच्या ‘स्वामी’ आणि ‘श्रीमान योगी’ या दोन्ही कादंबऱ्यांमधून स्पष्टपणाने अधोरेखित होते.
‘कोसला’ ही कलाकृती वाचकांच्या हाती आली ती १९६३ मध्ये. भालचंद्र नेमाडे हा या कादंबरीचा निर्माता त्या वेळी ऐन पंचविशीत होता. नेमाडे हे खान्देशातील. त्यामुळे पंचविशीतील संस्कारांचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर दिसतो. एका अर्थाने व्यक्तिस्वातंत्र्य, न्याय, समता आणि बंधुता या आधुनिक मूल्यांचा संस्कार त्यांच्यावर झालेला आहे. त्याच वेळी अस्तित्ववाद, जीवनातील निर्थकता याचे भानदेखील त्यांना आहे. आपली परंपरा आणि दिले जाणारे ज्ञान अर्थपूर्ण नाही. किंबहुना ते अर्थशून्यच आहे याची जाणीव त्यांना झालेली आहे. स्वातंत्र्यानंतर ज्या ज्या अपेक्षा देशवासीयांनी ठेवल्या होत्या त्या अपेक्षांची पूर्तता न होऊ शकलेल्या पिढीचे भालचंद्र नेमाडे हे प्रतिनिधी आहेत. नेहरूयुगाचा अस्त होण्याची वाटचाल सुरू झाली होती. चीनच्या युद्धातील पराभव हा भ्रमनिरास करणारा होता. पूर, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागले. अन्न-धान्याच्या निर्मितीमध्ये देश स्वयंपूर्ण नव्हता. अन्न-धान्याची आयात ही त्यामुळे अपरिहार्य झाली होती. गोदी कामगारांचा संपदेखील याच काळामध्ये झाला होता. सामान्य माणूस, मग तो शिक्षित असो किंवा अशिक्षित, अनेकांना बेकारी या समस्येने ग्रासले होते. या साऱ्याचे प्रतििबब पांडुरंग सांगवीकर या खेडय़ातून शिक्षणासाठी पुण्याच्या फग्र्युसन महाविद्यालयामध्ये आलेल्या युवकाला केंद्रस्थानी ठेवून नेमाडे यांनी कादंबरीमध्ये अधोरेखित केले. ही एक क्रांतिकारी कादंबरी ठरली.
‘स्वामी’ या कादंबरीचा प्रवाह मूर्तिपूजक आहे. तर व्यक्तिस्वातंत्र्य आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा आविष्कार हा ‘कोसला’ या कादंबरीचा मूर्तिभंजक प्रवाह आहे. एकाच कालखंडात आलेल्या या दोन कादंबऱ्यांचे हे जोमदार प्रवाह वाचकांनी आपलेसे केले हे वास्तव नाकारून चालणार नाही. एकाच वेळी व्यक्तिपूजेला, पंरपरेला मानणारी आणि दुसरीकडे व्यक्तिपूजा नाकारणारी, जीवनातील निर्थकता अभिव्यक्त करणारी असे दोन्ही प्रवाह कादंबरीच्या माध्यमातून वाचकांसमोर आले. ‘मी का नायक नाही’ हा विचार तरुणांमध्ये त्या काळी गाजला होता. यातील मी म्हणजे त्या काळातील तरुण हेच त्यामागे अभिप्रेत होते. या देशातील मध्यमवर्गीयांचे भवितव्य काय हा विषयदेखील त्या वेळी चर्चेला आला होता.
इतिहास आणि परंपरा पूजन हा एक ‘ट्रेन्ड’ आपल्या समाजामध्ये आहे. त्याचे प्रतिनिधित्व ‘स्वामी’ ही कादंबरी करते. माधवराव पेशवे हे त्या कालखंडातील सर्वात मोठे पेशवे. पण अल्पायुषी असल्यामुळे महापराक्रमी असूनही हे पेशवे एका अर्थाने दुर्दैवी ठरले. ‘स्वामी’ या शब्दातील निष्ठा हे सरंजामशाहीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. मराठी साहित्यामध्ये सतीचे इतके अप्रतिम वर्णन हे रणजित देसाई यांच्या प्रतिभेचेच द्योतक आहे. एका बाजूला राजकीय कर्तृत्व, तर दुसऱ्या बाजूला शोकात्म प्रेमकथा हेच ‘स्वामी’ कादंबरीचे सूत्र आहे. कादंबरीतील प्रसंग इतिहासातील असले तरी त्याला परंपरागत मूल्यांची बैठक होती. ही शैली रणजित देसाई यांच्याकडे होतीच. भावोत्कट व्यक्तिचित्रण, कलात्मक आकृतिबंध, नाटय़ आणि इतिहासाचे पारंपरिक भान ही ‘स्वामी’ या कादंबरीची वैशिष्टय़े आहेत. इतिहासातील कण वेचून त्याचे हिमशिखर करण्याची क्षमता रणजित देसाई यांच्या प्रतिभेमध्ये आहे. लोकप्रिय साहित्य ही समाजाची गरज असते. ‘पॉप्युलर’ लेखकांमध्ये लोकाभिरुचीचा अनुनय करण्याचा कल स्पष्टपणे जाणवतो. साने गुरुजींची ‘आस्तिक’, वि. स. खांडेकर यांची ‘ययाति’, रणजित देसाई यांची ‘स्वामी’ आणि शिवाजी सावंत यांची ‘मृत्युंजय’ या कादंबऱ्या एका अर्थाने ऐतिहासिक घटनांचा कालानुरूप अन्वयार्थ लावलेल्या ‘क्लासिक’ कलाकृती आहेत. रणजित देसाई यांना ‘कोसला’ लिहिता आली नसती. त्याचप्रमाणे कितीही प्रयत्न केले तरी भालचंद्र नेमाडे यांना अजूनही ‘स्वामी’ लिहिता येणार नाही, असेच म्हणावेसे वाटते.
लघु नियतकालिकांच्या परंपरेतून भालचंद्र नेमाडे, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, राजा ढाले, अरुण कोलटकर, नामदेव ढसाळ यांच्यासारखे नवे लेखक उदयास आले. प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात म्हणजेच एका अर्थाने हे सत्यकथेविरुद्धचे बंड होते. शब्दांची मोडतोड करून वेगळेच लिहायचे. याचे प्रतििबब आपल्याला ‘कोसला’ या कादंबरीमध्ये दिसते. ‘उदाहरणार्थ’ हे ‘कोसला’चे व्यवच्छेदक लक्षण आहे. विफलतेची, अर्थशून्य अशी असहाय आणि अगतिक झाल्याची भावना ‘कोसला ’ कादंबरीतून अभिव्यक्त होते. एका अर्थाने ‘कोसला’ कादंबरी ही शोकात्मिकेची जनक आहे, असेच म्हणता येईल. त्या वेळच्या पिढीची ही शोकात्म भावना वाचकांच्या मनात निर्माण करण्याचे संवेदनशील चित्रण ‘कोसला’ या कलाकृतीमध्ये आहे. तत्कालीन तरुणांच्या अस्वस्थतेला आणि वैफल्याला ‘कोसला’ कादंबरीने वाट मोकळी करून दिली. ‘वुई आर आऊटसायडर्स’ या भावनेला शब्द दिला. कुठल्याही पिढीच्या कालखंडातील युवा वर्गाचे हे ‘ट्रॅजिक’ संवेदन कायम राहते हे ‘कोसला’ कादंबरीचे यश म्हणावे लागेल की समाजबांधणीचे अपयश हाच खरा प्रश्न आहे. वेडावाकडा असला तरी वाचायलाच पाहिजे, असा या कादंबरीचा आकृतिबंध आहे. कादंबरी तंत्रदृष्टय़ा वैशिष्टय़पूर्ण आहे. आजवर मराठी साहित्यामध्ये चालत आलेल्या वाङ्मयीन मंत्रतंत्राचा ‘कोसला ’कादंबरीने चक्काचूर केला आहे. भालचंद्र नेमाडे यांनी विकसित केलेल्या या तंत्राचा अनुकरण करण्याचा प्रयत्न अजूनही होतो. हेच या कादंबरीच्या टवटवीतपणाचे रहस्य आहे. वाचकाला कोणत्याही कलाकृतीशी ‘आयडेंटीफाय’ होता आले पाहिजे. तसे झाले तरच त्याला ती कलाकृती आवडते. त्या दृष्टीने अस्वस्थ असलेल्या प्रत्येकाला ‘कोसला’ ही आपलीच कथा आहे असे वाटते. ही कला प्रतिभावंत लेखकाकडे असते, जी रणजित देसाई आणि भालचंद्र नेमाडे या दोघांकडेही आहे.
ज्या कारणांसाठी मला ‘स्वामी’ आणि ‘कोसला’ या कलाकृती आवडल्या त्याच कारणांसाठी या कलाकृती दुसऱ्या व्यक्तीला आवडतील असे नाही. तसा कोणत्याही लेखकाचा आग्रहदेखील नसतो. वाचकाला आवडणारी कलाकृती हेच चांगल्या साहित्यकृतीचे एकमेव लक्षण नाही. जी कलाकृती नवनवोन्मेषशाली असते, ती आशयघनही असते. या दोन्ही कादंबऱ्यांनी वाचकवर्गाचा अनुभवाचा परीघ विस्तारला हे नाकारता येणार नाही. ज्याप्रमाणे राजसत्ता, ज्ञानसत्ता, धनसत्ता आणि सांस्कृतिक सत्ता आहे त्याचप्रमाणे साहित्य हीदेखील एक सत्ता आहे. साहित्यलेखन करणाऱ्याला समाजामध्ये मान मिळतो. त्यामुळे ही सत्ता आपल्याला मिळाली पाहिजे या ध्येयातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून दलित, आदिवासी यांनी साहित्यनिर्मिती करून समाजामध्ये सत्ता हस्तगत केली. उत्तर आधुनिकतेचा संस्कार आणि बंडखोरी या साहित्यकृतींमधून सूचित होते. शब्दांच्या माध्यमातून साकारत जाणारी कलाकृती ती मानवी मनाला एकाच वेळी अस्वस्थ करते तशीच ती समृद्धदेखील करत असते. या दृष्टीने ‘कोसला’ या कादंबरीचे महत्त्वपूर्ण स्थान आहे असे मला वाटते.

Story img Loader