साठोत्तरी कालखंडातील ‘स्वामी’ आणि ‘कोसला’ या दोन कादंबऱ्या महत्त्वाच्या मानल्या जातात. या दोन कादंबऱ्या म्हणजे दोन वेगळे असे स्वतंत्र प्रवाह आहेत. या कादंबरीनंतर रणजित देसाई यांना ‘स्वामी’कार आणि भालचंद्र नेमाडे यांना ‘कोसला’कार अशी त्यांच्या कलाकृतीच्या नावाने उपाधी मिळाली हेदेखील महत्त्वाचे स्थित्यंतर आहे.मराठी साहित्यामध्ये अक्षरलेणी असा गौरव करता येईल अशा या दोन्ही कादंबऱ्यांतील ‘स्वामी’ प्रसिद्ध होऊन ५० वर्षे पूर्ण झाली तर ‘कोसला’ ने पन्नाशीत प्रवेश केला. त्यानिमित्त ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांनी या कादंबऱ्यांचा घेतलेला आढावा..
मराठी साहित्यामध्ये साठोत्तरी कालखंड हा महत्त्वाचा मानतात. भारताच्या स्वातंत्र्यानंतरचे दशक उलटून गेले होते. या काळामध्ये अनेक स्थित्यंतरे घडून आली. या स्थित्यंतराचे प्रतिबिंब साहित्यामध्येदेखील उमटले. ही स्थित्यंतरे मराठी साहित्यातील निर्णायक निकष ठरली आहेत. मर्ढेकरी कालखंड आणि मर्ढेकरयुगाच्या प्रभावाने नवसाहित्याचे विविध प्रकार उदयास आले. कथा, कादंबऱ्या, कविता आणि नाटके या वाङ्मय प्रकाराचा यामध्ये समावेश होतो. साठोत्तरी कालखंडातील ‘स्वामी’ आणि ‘कोसला’ या दोन कादंबऱ्या महत्त्वाच्या मानल्या जातात. या दोन कादंबऱ्या म्हणजे दोन वेगळे असे स्वतंत्र प्रवाह आहेत. या कादंबरीनंतर रणजित देसाई यांना ‘स्वामी’कार आणि भालचंद्र नेमाडे यांना ‘कोसला’कार अशी त्यांच्या कलाकृतीच्या नावाने उपाधी मिळाली हेदेखील महत्त्वाचे स्थित्यंतर आहे. मराठी साहित्यामध्ये अक्षरलेणी असा गौरव करता येईल अशा या दोन्ही कादंबऱ्या सुवर्णमहोत्सव साजरा करीत असताना त्या दोन्ही अजूनही लोकप्रिय आहेत याचाच अर्थ हे दोन्ही प्रवाह समाजामध्ये अद्यापही कायम आहेत असेच म्हणता येईल. मात्र, या दोन्ही कलाकृतींच्या लोकप्रियतेचे अर्थ वेगळे आहेत. ‘स्वामी’ ही खऱ्या अर्थाने लोकप्रिय कादंबरी आहे. तर ‘कोसला’ ही गंभीर वृत्तीने लिहिलेली गंभीर पण लोकांना आवडलेली कादंबरी आहे. या दोन्ही कादंबरीतील कथानकाशी वाचक स्वत:ला ‘रिलेट’ होऊ शकतो, हे या दोन्ही कादंबऱ्यांचे बलस्थान आहे, असे म्हणता येते.
नारायण सुर्वे, अरुण कोलटकर, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, नामदेव ढसाळ, आरती प्रभू, ग्रेस, ना. धों. महानोर हे साठोत्तरी कालखंडातील प्रमुख कवी आहेत. पु. भा. भावे, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर आणि अरिवद गोखले हे मराठी नवकथेचे प्रवर्तक आहेत. साने गुरुजी यांच्या ‘आस्तिक’ या कादंबरीनंतर साठोत्तरी कालखंडामध्ये रणजित देसाई आणि भालचंद्र नेमाडे हे दोन कादंबरीकार उदयास आले. १९६२ मध्ये ‘स्वामी’ कादंबरी प्रकाशित झाली, तेव्हा रणजित देसाई हे ३४ वर्षांचे होते. तर पुढच्याच वर्षी ‘कोसला’ ही कादंबरी वाचकांच्या हाती आली, त्या वेळी भालचंद्र नेमाडे हे अवघ्या २५ वर्षांचे होते. हा काळ असा होता की स्वातंत्र्यानंतरचे दशक संपले होते. नेहरू युगाच्या मावळतीला सुरुवात झाली होती. स्वातंत्र्याचे रूपांतर सुराज्यामध्ये होईल या अपेक्षा काही अंशी फोल ठरू लागल्या होत्या. त्यामुळे सर्वच प्रस्थापितांच्या विरोधात वातावरण होण्याची सुरुवात होऊ लागली होती. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचे बंड आणि विद्रोहाची भावना वाढीस लागत होती. याच कालखंडामध्ये मराठी लघु नियतकालिकांची पंरपरा सुरू झाली, ती या व्यवस्थेविरुद्धच्या विद्रोहाला वाचा फोडण्याचे साहित्य प्रकाशित करण्यासाठीच. अशा वातावरणात आलेल्या ‘स्वामी’ आणि ‘कोसला’ या दोन्ही कादंबऱ्यांना वाचकांनी आपलेसे केले ही गोष्ट नाकारता येणार नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा