कविता आणि कवी यांचं माझं नातं… सहज कळेल असं उदाहरण द्यायचं तर… प्रेयसी आणि तिचे वडील किंवा कॉलेजमधली जुनी मैत्रीण आणि तिचा ‘पीडब्ल्यूडी’ इंजिनीयर नवरा यांच्याशी असलेल्या संबंधांसारखं आहे. एकामागून दुसरं येतं आणि मग पहिलंच नकोसं वाटतं…! याला काही हृद्या अपवाद अर्थातच आहेत. अशा अपवादांची कविता तर आवडतेच; पण ती करणारे कवीही तितकेच आवडतात.
हे नातं असं का असावं? खरं तर वाचायची आवड निर्माण झाली तेव्हापासून कविताही आवडत आलेली आहे. कित्येक अगदी सहज पाठ झालेल्या आहेत. डोंबिवलीत राहत होतो तेव्हा ‘साहित्य सभा’, ‘काव्य रसिक मंडळ’ वगैरे संस्थांशी संबंध होता. तिथे एक गोष्ट जाणवायची. कवी, लेखक आपलं कवीपण, लेखकपण कुडत्यावर जाकीट असावं तसं वागवायचे. खरं तर कविता सुचते आणि ती प्रत्यक्षात उतरते ते क्षण सोडले तर कवी हा सर्वसामान्य माणसांसारखाच. अशा सर्वसामान्य चारचौघांत आपलं कवीपण इतरांच्या लक्षात यावं यासाठी त्यानं सारखं आपलं ‘‘अहाहा’’, ‘‘ओहोहो’’, ‘‘क्या बात है’’ वगैरे करत राहायची काय गरज? पूर्णविरामच नाही बोलण्यात. सतत आपली उद्गारचिन्हं!
इंदिरा संतांशी स्नेह जडला आणि हा फरक लक्षात यायला लागला. डोंबिवलीत होतो तेव्हाही इंदिराबाईंची कविता आवडायची. पण ८९ च्या अखेरीस गोव्याला गेलो आणि त्यांची कविता ‘कळायला’, ‘दिसायला’ लागली. म्हणून इंदिराबाई आणि त्यांची कविता जास्त आवडायला लागली. बाईंच्या कवितेतलं ‘झळंबलेलं’ आकाश एकदा पणजीत मीरामार बीचवर समोर दिसलं; आणि ते दिसलं आणि बाई म्हणतात ते ‘झळंबलेलं’ आकाश ते हेच हे लक्षात आलं. बाईंच्या कवितेतली ‘निळी कुसुंबी धुसर संध्या’ डोंबिवलीच्या क्षितिजावर कशी उगवणार? आणि ‘हिरवा माळ नि पिवळा मोहर’ यांचा काही मुंबईतल्या जगण्याशी संबंधच नाही. गोव्यात गेल्यावर बाईंच्या कवितेतला निसर्गाचा रंगोत्सव हा असा येता-जाता साजरा व्हायला लागला आणि कविता-कर्तीलाही भेटायला हवं असं कधी नव्हे ते वाटू लागलं. ते शक्य आहे असंही लक्षात आलं.
गोव्यात गेल्यावर तिथल्या एकाशी चांगला दोस्ताना जमला. दिलीप देशपांडे हा पणजीच्या आकाशवाणी केंद्राचा वृत्तसंपादक. मूळचा बेळगावचा. त्याचा तिथला मित्र किरण ठाकूर. ‘बेळगाव तरुण भारत’चे संपादक वगैरे. दिलीपमुळे मग ठाकूर जोडले गेले. (अजूनही आहेत.)
दोघांच्याही बोलण्यात छान कर्नाटकी हेल. ‘येडा की खुळा’ वगैरे. तर एकदा गप्पा मारताना माझ्याकडून इंदिराबाईंचा विषय निघाला. त्यांच्या कविता कशा आवडतात, त्यांना भेटायला आवडेल असं काही. ठाकूर म्हणाले, ‘‘त्यात काय… ये की… जाऊन सोडूया!’’ तो मोबाइलच्या आधीचा काळ. ठाकूरांनी इंदिराबाईंचा पत्ता कळवला. बाईंना पत्र टाकलं. म्हटलं, ‘‘येऊ का भेटायला.’’ उलट टपाली उत्तर आलं, ‘‘… कधीही या. मी घरीच असते… दुपारी येणार असाल तर जेवायलाच या.’’ पहिल्याच भेटीत हे असं काही जेवण गेलं नसतं. तेव्हा पणजीहून सकाळी ‘कदंब’ची (आपली एसटी, गोव्याची कदंब) बस सुटायची बेळगावला. संध्याकाळी उशिरा तीच परत यायची पणजीला. तिने गेलो. उतरल्यावर एखाद तास टाइमपास करून, जेवणाची वेळ टळल्याची खात्री करून इंदिराबाईंच्या घरी गेलो.
मुंबई वगळता अशा गावातल्या घरात एक गारवा असतो. बाईंच्या घरात तो तसा होता. नऊवारी साडीतल्या इंदिराबाई. अंगावर शाल घेतलेली. त्यांनीच दरवाजा उघडला. खरं तर बाईंच्या आधी अनेक कवी माहिती होते. त्यांना कसं ‘हाताळायचं’ असतं हेही माहीत होतं. पण इथं स्वत:च्या कवीपणाचं कसलंही अस्तित्व न मिरवणाऱ्या इंदिराबाईंशी काय बोलावं हे कळेना. आजच्या शब्दांत सांगायचं तर तो ‘फॅन मोमेंट’ होता. बाईंच्याही लक्षात आलं ते अवघडलेपण. रव्याचा लाडू घेऊन आल्या… कालच केलेला होता तो… असं करत करत गाडी कवितांवर आली. तेव्हाही बाईंचा सूर साधारण ‘‘ओह… त्या कवयित्री इंदिरा संत वेगळ्या.’’ असा काहीसा होता. कौतुकानं सुखावल्या एकदा फक्त जेव्हा त्यांना म्हटलं, ‘तुमची मृण्मयी माझी मुलगी आहे’ हे ऐकल्यावर. नंतर पत्रात ‘चि. मृण्मयीस आशीर्वाद’ असं आवर्जून लिहायच्या.
पहिली भेट ही अशीच संपली. सगळं ओझं बाईंनीच फेकून दिलं. पुढचा प्रवास आता सोपा होता. तसाच तो झाला. दिलीपकडे किंवा दिलीपबरोबर ठाकूरांकडे जेव्हा जेव्हा जायचो तेव्हा बाईंकडे चक्कर व्हायची. एकदा आठवतंय, पुरुषोत्तम पाटील यांच्या ‘कवितारती’चा इंदिरा संत विशेषांक घेऊन गेलो होतो. बाईंना दाखवला ‘‘अगं बाई… हो का’’… इतकंच. त्यांना म्हटलं, ‘‘त्यावर स्वाक्षरी द्या.’’ तर म्हणाल्या, ‘‘माझी कशाला.. पाटलांची घ्या.’’
लवकरच बाईंकडे हक्कानं जायला कारण मिळालं. कोल्हापुरात भरणारं साहित्य संमेलन. १९९२ सालची ही घटना. काही उचापतखोर संपादक, पत्रकारांनी त्या संमेलनासाठी बाईंचं नाव पुढे केलं होतं. ही धकाधक त्यांच्या स्वभावात नव्हती खरं तर. पण त्या वेळी पत्रकारांचे गट-तटच साहित्य संस्था चालवायचे. म्हणून मग लढाई- हे वर्तमानपत्र विरुद्ध ते अशी असायची. इंदिराबाईंना हे काही मानवणारं नव्हतं. पण त्याचं नाव साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी पुढे केलं गेलं आणि एकच धुरळा उडाला. आणि समोर कोण? तर रमेश मंत्री. मराठी सारस्वताच्या बुभुक्षित जगात काही ना काही कारणांनी उपकृत करण्याची क्षमता असलेल्यांना डोक्यावर घेतलं जातं. मग अगदी कोणाच्या परदेशी दौऱ्यातला यजमानसुद्धा त्याच्या पाहुणचाराच्या (आणि त्याच्या घरातनं केलेल्या फुकट आयएसडी कॉलच्याही) बदल्यात साहित्यिक मानला जायचा. त्यात हे रमेशभाऊ आधीच मंत्री आणि त्यात अमेरिकी माहिती केंद्रातले अधिकारी. अनेक अनुवादाची कामं देणारे, (शक्य झाल्यास) अमेरिकावारी करवणारे वगैरे. त्यामुळे त्यांचा तसा दबदबा होता साहित्यविश्वात. वास्तविक अशा माणसास आपण पर्याय आहोत या कल्पनेनंच इंदिराबाईंना कसंनुसं झालेलं. पण मागनं रेटणाऱ्यांमुळे माघार घेतली नसावी त्यांनी. हे साहित्य संमेलन चांगलंच गाजलं. (पुढे मला दिलेल्या एका मुलाखतीत भालचंद्र नेमाडे म्हणाले, ‘‘साहित्य संमेलनं ही चोरांची संमेलनं असतात आणि साहित्यिक हे दुय्यमपेक्षाही खालच्या दर्जाचे राजकारणी असतात.’’ ती मुलाखत नेमाड्यांच्या निवडक मुलाखतींच्या संग्रहात आहे. आदरणीय होते तेेव्हा नेमाडे. असो.) रमेश मंत्री मतदारांना भेटण्यासाठी दौरे वगैरे करणार होते. म्हटलं पाहू या, इंदिराबाई काय करतात. त्यासाठी बेळगावला त्यांच्या घरी गेलो.
त्यांनी उत्तम मुलाखत दिली. बाईंना विचारलं, ‘‘तुमचे प्रतिस्पर्धी रमेश मंत्री आणि प्रमोद नवलकर यांच्याविषयी तुमचं मत काय?’’ त्या म्हणाल्या, ‘‘मी काय सांगणार? मंत्रींचं मी काही वाचलेलं नाही आणि नवलकर हे कोण मला माहीत नाही. तेव्हा मी काही बोलणं बरोबर नाही.’’
बोलण्याच्या ओघात सहज दिसत होतं बाईंना अध्यक्षपदात काडीचाही रस नव्हता. तसं त्यांना विचारलं. त्यावर त्यांचं उत्तर होतं, ‘‘मी अध्यक्षपदासाठी फार उत्सुक आहे असं नाही आणि अनुत्सुक आहे अशातलाही भाग नाही. मी काही प्रयत्न वगैरे (निवडून येण्यासाठी) अजिबात करणार नाही. मधु मंगेश कर्णिकांनी माझी निवड बिनविरोध व्हावी म्हणून सुचवलं, मी मान्य केलं इतकंच.’’
त्यावर त्या वेळी बाईंना म्हटलं, ‘‘अहो, पण खुद्द मधु मंगेश आधीच्या निवडणुकीत उतरले होते, त्याचं काय?’’ त्यावर बाई नुसत्या मंद हसल्या. काही प्रतिक्रिया नाही की कुत्सित हुंकार वगैरेही नाही. बाईंचं म्हणणं स्पष्ट होतं : ‘‘साहित्य संमेलनात मान महत्त्वाचा… आणि निवडणुकीत संख्या. तिथं मान नसतो. त्यामुळे मी काहीही झालं तरी माझी निवडणूक होऊ देणार नाही. मत द्या वगैरे म्हणणार नाही. संमेलन अध्यक्षपदाचा मान स्वत:हून ज्येष्ठांना द्यायला हवा. माझं जाऊ द्या… मी साध्या कविता लिहिणारी बाई. पण विंदा (करंदीकर), श्रीना (पेंडसे) झालंच तर सेतु माधवराव (पगडी) वगैरेंच काय? त्यांना कुठं मिळालंय हे पद? हे जे कोण ठरवतात त्यातल्या काहींनी एकत्र येऊन याचं (अध्यक्षपदाचं) काही तरी ठरवावं. अहो, हिरकुडी घ्यायची तर रत्नपारख्यांकडे जायला हवं… ती काय कासाराला नेऊन दाखवणार!’’
बाई नेमकं बोलायच्या. त्या वेळी बेळगाव सीमावाद हा प्रत्येक संमेलनात हमखास येणारा विषय. बाई बेळगावच्या. त्यांचं मत यावर काय? ‘‘आमच्या साहित्य संमेलनातल्या चिठ्ठ्याचपाट्यांना विचारतो कोण.’’ बाईंचा निरुत्तर करणारा प्रश्न. अजूनही साहित्य संमेलनात बेळगावच्या महाराष्ट्री विलीनीकरणाचा ठराव आवर्जून केला जातो. ते पाहिल्यावर बाई किती शहाण्या हे कळतं.
वचावचा करणारा बदाबदा बोलला तरी शांत माणसाच्या निग्रहाचं वजन एका वाक्यात जाणवतं. ही मुलाखत तशी होती. उत्तम काही मिळाल्याच्या आनंदात त्याची बातमी पाठवून दिली तर आश्री केतकरांचा फोन आला… ‘‘बातमी नको… गोविंदरावांनी सांगितलंय रविवारचा लेख करा!’’ (तेव्हा ‘मटा’त सगळे ज्येष्ठ कनिष्ठांना अहोजाहो करत.) इंदिराबाईंच्या मुलाखतीच्या बातमीचा लेख करा असं गोविंदराव तळवलकरांनी सांगणं यापेक्षा आनंदाचं काही असूच शकत नव्हतं असा तो काळ. ‘‘लक्ष्मीचे उत्सव करता, मग सरस्वतीचा का नको’’ अशा शीर्षकानं इंदिराबाईंना उद्धृत करत रविवारच्या ‘मटा’त त्या वेळी तो लेख छापून आला.
अर्थातच साहित्य संमेलनाची निवडणूक या मंत्र्यांनी जिंकली. काही काही पराभव हे विजयापेक्षा अधिक पवित्र असतात. हा तसा. साहित्य संमेलनाच्या दिवशी अध्यक्षीय भाषणावर संपादकीय लिहिण्याची मराठी वर्तमानपत्रांची परंपरा. त्या संमेलनाच्या उद्घाटनदिनी गोविंदराव तळवलकरांनी अग्रलेख लिहिला इंदिराबाईंवर. त्या अजरामर अग्रलेखाचं शीर्षक होतं ‘प्राजक्ताचे फूल’.
नंतर लवकरच पुन्हा एकदा बेळगावला गेलो. खास बाईंना भेटायला. या वेळी कॅमेरा घेऊन गेलो. पण तिकडे गेल्यावर कळलं बाईंना नागीण झालीये. चेहऱ्यावर. त्या नागिणीची आग, वेदना बाईंनी जराही गप्पांमध्ये येऊ दिली नाही. साहित्य संमेलनाच्या निमित्तानं जे काही झालं त्याचा कोणताही कडवटपणा बाईंच्या एकाही शब्दात जाणवला नाही. जणू क्षुद्रांच्या जगात हे असं होणारच… हे त्यांना सहजमान्य होतं. या खेपेला हातात मोठी बॅग होती. बाईंनी विचारलं, ‘‘काय कुठे जायचंय का?’’ म्हटलं, ‘‘नाही; ती कॅमेऱ्याची बॅग आहे. तुमचे फोटो काढायची इच्छा आहे.’’ हे खरं कसं सांगायचं हा प्रश्न होता. बाईंना नागीण झालेली. त्यांनीच विचारल्यामुळे सांगून टाकलं. ते ऐकल्यावर म्हणाल्या, ‘‘मग काढूयात की!’’
‘‘पण तुम्हाला नागीण झालीये… त्रास नाही का होणार?
‘‘फोटो काढणार तू… मला कसला त्रास आलाय! फक्त एकाच बाजूने काढ म्हणजे झालं.’’
बाई बाहेर आल्या. झोपाळ्यावर बसल्या. मला फोटो काढू दिले. कसलाही आविर्भाव नाही की त्रास होत असतानाही ‘मी बघ किती करतीये’ असं काही जाणवून देणंही नाही. थोड्या वेळानं निघालो. निघताना म्हणाल्या, ‘‘गोविंदरावांना नमस्कार सांग.’’ लक्षात आलं इतका स्वत:वरचा अग्रलेख छापून आला म्हणून ना त्या अजिबात हुरळून गेल्या होत्या ना गोविंदरावांविषयी उपकृततेची भावना त्यांच्या मनात होती. सगळं कसं आहे तसं, आहे तितकं स्वीकारणं.
नंतर जाणं होत राहिलं बाईंकडे. पुढे माझं गोवा सुटलं आणि भेटी कमी झाल्या. नंतर लंडन आणि परतल्यावर अर्थविषयक दैनिकांत. मराठी पत्रकारितेत होतो तोपर्यंत कवितेची आंतरिक गरज व्यावसायिक गरजांशी जोडून घेता येत होती. नंतरही आंतरिक गरज कायम होती; पण व्यावसायिक गरज राहिली नाही. त्यामुळे संवाद कमी झाला.
आणि मग बाई गेल्याच. आता कडकडीत उन्ह-पाऊस-चांदणं, पहाटवारा, प्राजक्ताचा सडा आणि त्या फुलांचे पोवळ्यासारखे देठ यांचा स्पर्श झाला की, डोक्यात राख गेल्यासारखा फुललेला बहावा पाहिला की… इंदिराबाईंची कविता सहज आठवते. त्यांच्या भेटी आठवतात. गप्पा आठवतात. स्नेहाळ वागणं आठवतं. आणि मग ‘‘अजंठ्याच्या कलाकाराची विसरून राहिलेली एक पुसट रेषा माझ्या रक्तांतून वाहत आहे…’’ ही बाईंची ‘मृगजळ’मधली ओळही आठवते.
आशा आहे… लुप्त सरस्वतीप्रमाणे ही रेषाही मराठी सारस्वताच्या अंगणात कधी तरी पुन्हा उमटेल.
कला, साहित्य, उद्योग आदी विविध क्षेत्रांतील भेटलेल्या आणि मनात साठलेल्या व्यक्तींची स्नेहचित्रे चितारणारे नवे सदर दर पंधरवड्यास…
आता कडकडीत उन्ह-पाऊस-चांदणं, पहाटवारा, प्राजक्ताचा सडा आणि त्या फुलांचे पोवळ्यासारखे देठ यांचा स्पर्श झाला की, डोक्यात राख गेल्यासारखा फुललेला बहावा पाहिला की… इंदिराबाईंची कविता सहज आठवते. त्यांच्या भेटी आठवतात. गप्पा आठवतात. स्नेहाळ वागणं आठवतं…
girish.kuber@expressindia.com
@girishkuber