सारिका कुलकर्णी

‘महाराष्ट्र फाऊंडेशन’ ही संस्था साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील पुरस्कारांसाठी महाराष्ट्रात ओळखली जाते. पण यापलीकडेदेखील संस्थेचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. सामाजिक क्षेत्रात ‘पंचम’ प्रकल्पांतर्गत संस्थेचे जे कार्य सुरू आहे त्याविषयी आढावा घेणारा लेख.

Innovation City
गिफ्ट सिटीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही होणार ‘Innovation City’, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Forest Minister Ganesh Naik assurance regarding the name of Navi Mumbai International Airport
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव; वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन
grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
what is the genome india project why it matters
विश्लेषण : जिनोमइंडिया प्रकल्प भारतासाठी किती महत्त्वाचा?
chief minister devendra fadnavis governance to speed up government
राज्य चालवावे नेटके…
pune best city for women loksatta news
महिलांना काम करण्यासाठी सर्वोत्कृष्ट असलेल्या पहिल्या पाच शहरांत पुण्याला स्थान
Forest Minister Ganesh Naiks first visit to Vidarbha praise work of former Forest Minister
वनमंत्र्यांच्या पहिला विदर्भ दौरा, माजी वनमंत्र्यांच्या कामाचे कौतुक

साताऱ्याच्या कास पठाराच्या उतरणीवर वसलेलं कुसुम्बी हे गाव. या गावात लगबग चालू होती. संगीताताई आणि त्यांच्या सहकारी भगिनी यांची चांगलीच धावपळ चालू होती. नाचणीच्या बिस्किटांची डिलिव्हरी पाठवण्याची तारीख येऊन ठेपलेली होती. ही पाकिटं भरण्यात सगळ्याजणी व्यग्र होत्या. दोन दिवसांनी ही सगळी पाकिटं अमेरिकेत जाणार होती. ही नाचणीची बिस्किटं बायकांनी गावातच तयार केलेली होती. नाचणीचं उत्पादनदेखील गावातच घेतलेलं होतं. पाकिटं तयार झाली आणि अचानक किरण भाऊंना आठवण झाली की अरे, पाकिटांवर लेबलं लावायची आहेत. ते लेबलं घेऊन आले आणि सगळ्यांनी मिळून ती पाकिटांवर चिकटवली. लेबलांवर शिक्का होता- ‘अॅग्रो मिलेट्स ऑल वूमन फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन.’

लवकरच या कंपनीला आपली स्वत:ची जागा मिळणार आहे आणि अद्यायावत यंत्रांनी सुसज्ज अशी त्यांची बेकरी सुरू होणार आहे. गावातील सगळ्या बायका स्वत:च्या पायावर तर उभ्या राहिल्याच आहेत, पण गावातील प्रत्येक जण आर्थिक समृद्धीची स्वप्नं पाहू लागला आहे. याच वेळी गडचिरोली जिल्ह्यातील गावात मात्र वेगळंच घडते आहे. छोटी काजल, सानिया, राही या सगळ्याजणी शाळेतील नाचात भाग घेण्याची तयारी करत आहेत. हल्ली त्यांना शाळेचा कंटाळा येत नाही, उलट शाळेत जायला गंमत वाटते. गावात नवीन मास्तर आले आहेत, ते टीव्हीवर गंमतजंमत करून शिकवतात. याच गावात रामचंद्र नरोटे, बाजीराव पदा, किल्ले मोहन टोपो असे सगळे लोक वर्षातील दुसऱ्या पिकाची तयारी करत आहेत. गावात बांधलेल्या नवीन तलावामुळे पावसाळा संपल्यावरही शेताला पाणी मिळेल. गाव हिरवे होईल. समृद्ध होईल. महाराष्ट्रातील एकेकाळी मागास असलेली ही गावे समृद्धीची स्वप्नं बघू लागली आहेत. गावकऱ्यांसाठी हा खूप मोठा बदल आहे. तो बदल घडला आहे अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनच्या एका प्रकल्पामुळं. प्रकल्पाचं नाव आहे ‘पंचम’.

खरे तर अमेरिकेत फक्त दहा मराठी कुटुंबांनी १९७८ साली एकत्र येऊन ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’ ही संस्था चालू केली होती. संस्था चालवण्याचा उद्देश अगदी साधा होता, तो म्हणजे आपल्या मायभूमीतील म्हणजे महाराष्ट्रातील गरजू लोकांना मदत करणं. देश सोडून गेल्यावर मातृभूमीच्या प्रेमाचं भरतं येणे हे काही नवीन नाही. पण याच बाबतीत महाराष्ट्र फाऊंडेशन वेगळं ठरतं. गरजू लोकांना मदत करता करता अनेक नवीन बाबी या संस्थेच्या सभासदांच्या लक्षात आल्या आणि त्यातून एक वेगळीच संस्था आकार घेऊ लागली.

नाताळच्या सुट्टीत येऊन देशातील नातेवाईकांना एकत्र भेटून, खूश करून जाणारे किंवा अजूनही आपला देश अप्रगत कसा आहे अशी नावे ठेवून मदतीचा एक चेक टाकून जाणारे हे सभासद नव्हते. आपल्याला जर देशवासीयांची मदत करायची असेल तर चेक देऊन मोकळे होणं हा काही त्यावरचा उपाय नाही, अजूनही काही ठोस पावलं उचलावी लागतील हे त्यांच्या लक्षात आलं. त्यातूनच ही संस्था महाराष्ट्रातील अनेक सेवाभावी संस्थांशी जोडली गेली. आपण दिलेली मदत या संस्थांकडे देऊन त्याकरवी या सेवाभावी संस्था करत असलेलं कार्य सुकर करावं असा मार्ग महाराष्ट्र फाऊंडेशनने निवडला. पण हळूहळू त्यातील त्रुटी त्यांच्या लक्षात येऊ लागल्या. महाराष्ट्र फाऊंडेशन आणि या सेवाभावी संस्थांची उद्दिष्टं सारखी असतीलच असे नव्हे, त्यामुळे सेवाभावी संस्था जे काही प्रकल्प हाताळत आहेत त्याला देणगी देऊन अलिप्त होणे यावाचून महाराष्ट्र फाऊंडेशनकडे कुठलाही मार्ग राहात नसे. यावर खूप मंथन झाल्यावर महाराष्ट्र फाऊंडेशननं आपली उद्दिष्टं जाहीर केली. या उद्दिष्टांच्या पंचसूत्रीचं नाव होतं ‘पंचम’. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, गरिबी निर्मूलन, स्त्री सबलीकरण या पाच सूत्रांना एकत्रित करून गावाचा एकात्मिक शाश्वत विकास करणं हे पंचम प्रकल्पाचं ध्येय आहे.

पंचम प्रकल्पासाठी बऱ्याच सामाजिक संस्था महाराष्ट्र फाऊंडेशनला साथ देत आहेत. Resource and Support Centre for Development ( RSCD ), AWARD , RUDYA आणि Door Step Schools या संस्था महाराष्ट्रात संस्थेच्या मदतीला उभ्या आहेत. पर्यावरण या विषयावर Climate Reality Project चे मोलाचे सहकार्य मिळते आहे. ग्रामपंचायत व्यवस्थेची खोलवर जाण असलेले दत्ताभाऊ गुरव पंचमचे स्थानिक समन्वयक आहेत.

‘पंचम’ या प्रकल्पांतर्गत कुठलेही गाव निवडण्याआधी महाराष्ट्र फाऊंडेशन त्या गावाचा कसून अभ्यास करते. गावाला खरंच मदतीची गरज आहे का, गावच्या पदाधिकाऱ्यांची तशी तयारी आहे का, मदत केल्यावर गावात जे बदल केले जातील ते स्वीकारण्याची गावकऱ्यांची तयारी आहे का, गावात हा प्रकल्प राबवायचा झाला तर त्यासाठी किती कालावधी लागेल, किती निधी लागेल असे सगळे मुद्दे अभ्यासले जातात आणि त्यानंतरच ते गाव विकसित करण्याचा ‘पंचम’अंतर्गत पुढाकार घेतला जातो.

महाराष्ट्र फाऊंडेशनचे एक वैशिष्ट्य म्हणजे ही संस्था सरकारपेक्षा वेगळे काम न करता त्या योजनांच्या हातात हात घालून काम करते. गावात एक माहिती केंद्र स्थापित केले जाते. त्याद्वारे गावकऱ्यांना सरकारी योजनांची माहिती दिली जाते. त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत केली जाते. गावकऱ्यांना जागरूक नागरिक बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. याव्यतिरिक्त गावांच्या विकास कामासाठी आवश्यक निधी पुरवला जातो. सध्या हे प्रकल्प सातारा जिल्ह्यातील कुसुम्बी आणि गडचिरोली जिल्ह्यातील मुतनूर इथे राबवले जात आहेत.

कुसुम्बी- कुसुम्बी गावात सर्वप्रथम ‘महिला सबलीकरण’ या सूत्रावर लक्ष केंद्रित केले गेले. महिला बचत गट गावात आधीपासूनच अस्तित्वात होते. त्याचे मजबुतीकरण केले गेले. स्त्री नेतृत्व विकसित करणाऱ्या, कौशल्य विकास करणाऱ्या विविध प्रकारच्या कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या. स्त्रियांचा ग्रामपंचायतीमधील सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न केले गेले. गावासाठी इको फ्रेंडली चुली बनवून घेतल्या. या चुलीच्या वापराची प्रसिद्धी करण्याकरिता गावातील महिलांना त्यात सहभागी करून घेतलं गेले. धूर ओकणाऱ्या चुलीपासून मुक्ती मिळावी म्हणून हा पुढाकार फार महत्त्वाचा ठरला.

कुसुम्बी गावातील नैसर्गिक झऱ्यांचे बळकटीकरण करण्यात आले. गावात जलशुद्धीकरणाचे दोन ATM बसवण्यात आलेले आहेत. रोगराई पसरण्याचे मूळ कारण हे अशुद्ध पाण्याचे सेवन असते याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे महाराष्ट्र फाऊंडेशनच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार गावात आता हे ATM मशिन्स शुद्ध पाणीपुरवठा करतात, याशिवाय गावातील शाळांमध्येदेखील पाण्याचे फिल्टर्स बसवले आहेत.

महाराष्ट्र फाऊंडेशनने RSCD आणि AWARD या सेवाभावी संस्थांच्या मदतीने ‘अॅग्रोमिलेट वूमन फार्मर प्रोड्युसर कंपनी’ अशी एक छोट्या शेतकऱ्यांसाठी असलेली योजना चालू केली. या प्रकल्पाचा मूळ उद्देश हा नाचणीचे सकस उत्पादन वाढविण्याचा होता आणि त्यातून नाचणीला उत्तम बाजारभाव मिळवून देणे, नाचणीची विविध उत्पादने तयार करणे आणि त्यांना प्रभावीपणे बाजारात रुजवणे व विकणे असे उद्दिष्ट समोर होते. या प्रकल्पामुळे कुसुम्बी गावाची आर्थिक स्थिती एकदम बदलून जाईल असा विश्वास महाराष्ट्र फाऊंडेशनला वाटतो. नाचणीच्या उत्पादनासाठी बऱ्याच प्रकारची मदत फाऊंडेशनने गावकऱ्यांना केलेली आहे. जसे की ऐंशी किलो सकस बियाणे गावकऱ्यांना दिले गेले, नाचणीच्या उत्तम शेतीकरिता सर्वप्रकारची तांत्रिक मदत केली गेली, आधुनिक शेतीच्या विकासासाठी गावकऱ्यांच्या कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या. उत्पादित नाचणीचे विविध खाद्याप्रकार बनविण्याकरिता फाऊंडेशनने गावासाठी बेकरी उघडून दिलेली आहे. या बेकरीच्या विविध उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी फाऊंडेशन हरतऱ्हेने मदत करते आहे.

कुसुम्बी गावात एवढेच करून महाराष्ट्र फाऊंडेशन थांबलेली नाही, तर फाऊंडेशनच्या सभासदांचा असा ठाम विश्वास आहे की, जोपर्यंत गावाचे भविष्य असलेली लहान मुले उत्तम शिक्षण घेत नाहीत; तोपर्यंत या विकासाची परिपूर्ती होणार नाही. त्यासाठी फाऊंडेशनने क्लायमेट रिअॅलिटी प्रोजेक्टला बरोबर घेऊन गावातील दोन शाळा ग्रीन कॅम्पस म्हणून रूपांतरित करण्याची योजना सुरू केली आहे. यासाठी शाळांमधील शिक्षकांना सोलर एनर्जी, उत्तम पर्यावरण, पावसाच्या पाण्याची साठवणूक, पाण्याचे संवर्धन अशा सगळ्या बाबतीत प्रशिक्षित केले जात आहे. हे ज्ञान पुढे विद्यार्थ्यांना रोजच्या वापरासाठी हस्तांतरित केले जावे यासाठी शिक्षकांना तयार करणे ही ग्रीन कॅम्पसची पहिली पायरी आहे.

मुतनूर- गडचिरोली जिल्ह्यातील मुतनूर हे गाव तसे वेगळे आहे. मुळात कुठल्याही सेवाभावी संस्थेने या गावात मदतीसाठी जाताना विचार करावा अशी परिस्थिती. आदिवासी लोकसंख्या जास्त असल्याने बऱ्याच प्रमाणात शिक्षणाचा अभाव होता. शिवाय गावकऱ्यांच्या मनात सेवाभावी संस्थांच्या हेतूंबद्दलच शंका होती. बाहेरचा कुठलाही माणूस विनाकारणच मदत का करेल? त्यांना आमच्या गावातून काहीतरी न्यायचे आहे, आमच्या जमिनी, जंगले, व्यवसाय बळकावयाचे आहेत, अशी भीती या गावकऱ्यांच्या मनात वसलेली होती. एकंदरच प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या माणसाने निसर्गावर जे अत्याचार केलेले आहेत ते बघता या निसर्गपूजक आदिवासी जमातीला वाटणारी ही भीती साधारच म्हणावी लागेल, पण हे आव्हान महाराष्ट्र फाउंडेशननं स्वीकारले. ‘Rudya’ या स्थानिक सेवाभावी संस्थेला जोडीला घेऊन फाऊंडेशनने या गावात आपलं काम सुरू केले.

गावकऱ्यांना विश्वासात घेऊन पाणी साठवणुकीचा सगळ्यात पहिला प्रकल्प हाती घेतला गेला. गावाला लागूनच असलेल्या तळ्याच्या खोलीकरणाचे काम हाती घेण्यात आले. मुतनूर गाव शेतीप्रधान आहे, पण दुष्काळग्रस्त आहे. त्यामुळे पाणी आणि जमीन यांचा जास्तीत जास्त वापर करता यायला हवा यासाठी पाणी साठवले जायला हवे. तळ्याचे खोलीकरण करताना गावकऱ्यांची मदत घेतली. त्यांना रोजगार हमी योजने अंतर्गत मोबदलादेखील दिला गेला. या तळ्यातून गावच्या शेतीला पाणी मिळावे म्हणून सिंचन प्रकल्प सुरू करण्याची योजना आता महाराष्ट्र फाऊंडेशनने हाती घेतलेली आहे. गावात बंधारा बांधला आहे. आपण शेतातून काढलेली उत्पादने मोजायची कशी, मागच्या वर्षीच्या तुलनेत आताचे उत्पादन किती आहे अशा अगदी बारीकसारीक, पण मूलभूत गोष्टींचा विचार करून फाऊंडेशन त्याप्रकारे गावकऱ्यांना प्रशिक्षण देते आहे. पाण्याची पातळी वाढल्यावर मत्स्यपालनासारख्या व्यवसायांना फाऊंडेशनने चालना दिली आहे.

महाराष्ट्र फाऊंडेशनच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा मुतनूर गावी भेट दिली होती तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, गावातील प्राथमिक शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्याची गरज आहे. यावर बराच विचार केल्यावर फाऊंडेशनने ‘डोअर स्टेप स्कूल’ या संस्थेला निधी देऊन मुतनूर गावात पाचारण केले. उपेक्षित समुदायाला मूलभूत शिक्षण मिळावे हा या मागचा उद्देश होता. डोअर स्टेप स्कुल कायमची गावात राहू शकत नाही. त्यामुळे गावातील त्यातल्या त्यात शिक्षित तीन जणांना प्रशिक्षण दिले आणि या मुलांचे शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती केली. प्राथमिक शाळेतील मुलांना मनोरंजक पद्धतीने भाषेचे आणि गणिताचे ज्ञान देणे हे लक्ष्य समोर ठेवण्यात आले. गावात या पुढाकाराचा आश्चर्यकारक पद्धतीने सकारात्मक प्रभाव जाणवला. शाळा सोडून गेलेली मुले परत आली, उत्साहाने शाळेत बसू लागली.

मुतनूर आणि कुसुम्बी या गावांच्या विकासाचा ध्यास महाराष्ट्र फाऊंडेशनने घेतला आहे. त्याप्रमाणे त्यांची वाटचाल देखील चालू आहे. स्थानिक सेवाभावी संस्थांच्या मदतीशिवाय हे अशक्य आहे याची जाणीव फाउंडेशनच्या सभासदांना आहे. या प्रकल्पांकडे बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी दर महिन्याला संबंधित गावाच्या विकास समितीबरोबर तसेच स्थानिक सेवा संस्थांबरोबर फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचा झूम कॉल होतो.

कुसुम्बी आणि मुतनूर या दोन गावांवरच फाऊंडेशनला थांबायचे नाही. ‘पंचम’ प्रकल्पात तीन अधिक गावांना सामावून घेण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र फाऊंडेशनचे अध्यक्ष राजीव भालेराव आणि त्यांचे सहकारी सध्या निवडक गावांना भेट देऊन गावकऱ्यांबरोबर चर्चा करत आहेत. मराठी मातीत घडलेल्या माणसाच्या सामाजिक जाणिवा प्रखर असाव्यात. त्यामुळेच की काय अमेरिकेत जाऊनही, तिथे आनंदात असूनही महाराष्ट्र फाऊंडेशनने ही जाणीव अबाधित ठेवलेली आहे. महाराष्ट्र फाऊंडेशनला लागलेले हे ‘निर्मितीचे डोहळे’ मला एखाद्या व्रतासारखे वाटतात. प्रगतीच्या ध्यासपंथावर चालणारी ही देखणी पावले अशीच निरंतर चालत राहोत, हीच शुभेच्छा.

sarika@expoentialearing.in

Story img Loader