देशाच्या अर्थसंकल्पाचे काम जेथे केले जाते, त्या ‘नॉर्थ ब्लॉक’ या वास्तूविषयी तपशिलातील नोंदी. दोन वर्षे येथे काम करताना एका अधिकाऱ्याला येथे काय पाहायला मिळाले? त्याच्या कुतूहलातून आणि नानाविध निरीक्षणांतून उभे राहिलेले शब्दचित्र..

दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकमध्ये काम करणे हे प्रत्येक सनदी अधिकाऱ्याचे स्वप्न! १४ वर्षांपूर्वी मी जेव्हा दिल्लीमध्ये रुजू झालो तेव्हा पहिल्यांदा या भव्य इमारतीचे दर्शन मला झाले आणि मी भारावून गेलो. दोन वर्षे इथे काम केल्यावर आता बदलीस्तव इथून दुसऱ्या कार्यालयात रुजू होणार आहे; त्याआधी इथल्या आठवणी नोंदवाव्यात म्हणून हा प्रपंच! त्यातल्या त्यात असेही ऐकण्यात आलेय की, नुकतेच या इमारतीला एका संग्रहालयाचे स्वरूप देण्यात येणार आहे, त्यामुळे तर ‘नॉर्थ ब्लॉक संस्कृतीच्या’ स्मृती जतन करून ठेवणे अधिक गरजेचे वाटत आहे.

pune metropolis have lack of basic facilities and infrastructure
बकालीकरणाकडे…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
maharashtra vidhan sabha election 2024 ,
बेलापूरच्या प्रचारात राम, कृष्ण, गजाननाचा गजर !
A walk through Delhi’s historical tapestry
UPSC essentials: पांडवांच इंद्रप्रस्थ ते मुघलांची राजधानी; देवदत्त पटनाईक यांच्याबरोबरीने दिल्लीची मुशाफिरी!
Jahnavi Killekar
बिग बॉसमध्ये जाण्याचा निर्णय योग्य होता का? जान्हवी किल्लेकर म्हणाली, “तसंही महाराष्ट्र मला खलनायिका…”

मध्य दिल्लीमध्ये (ज्याला Lutyens’ Delhi असेही ओळखले जाते) ‘कर्तव्य पथ’ (आधीचा राजपथ) ‘राईसीना हिल्स’ला जिथे राष्ट्रपती भवनाला मिळतो तिथे उत्तरेला आपले लक्ष वेधणारी वास्तू म्हणजे ‘नॉर्थ ब्लॉक’. दक्षिणेला- म्हणजे नॉर्थ ब्लॉकच्या अगदी समोर- साऊथ ब्लॉक. दोन्ही वास्तू एकमेकींचे प्रतिबिंबच जणू. यातील नॉर्थ ब्लॉक म्हणजे अर्थ मंत्रालय आणि गृह मंत्रालय यांचे मुख्यालय. म्हणजे केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचा जवळजवळ ४० टक्के व्यवहार इथे चालतो, असे म्हणायला हरकत नाही. बरे, बजेटदेखील इथेच बनते. ब्रिटिश सरकारने १९३१मध्ये नवी दिल्लीला राजधानी बनवण्याच्या आधी सर एडविन लुटेन्स आणि दक्षिण आफ्रिकी वास्तुविशारद सर हर्बर्ट बेकर यांच्याकडून इतर सरकारी कचेऱ्यांसोबत नॉर्थ ब्लॉकची रचना करून घेतली.

लुटेन्स जरी संपूर्ण वास्तुरचनेसाठी ओळखले जात असले, बेकर हा खरा कर्ता म्हणवला जावा. त्याचे मुख्य कारण म्हणजे आधी जेव्हा व्हॉइसरॉय हाऊस (सध्याचे राष्ट्रपती भवन) बनले तेव्हा ल्युटेन्सला त्यासमोर राईसीना हिल्सवर काहीच नको होते. पण बेकरने त्याच्याशी वाद घालत सचिवालयाच्या दोन भव्य इमारतींचा हट्ट धरला. त्यानुसार राईसीना हिल्सवर उंचावर जर सचिवालय असेल तर तेथून इंग्रजी सत्तेला आपसूकच एक उच्चभ्रूपणाचा आव आणून राज्य करणे शक्य होईल, हे कारण होते. त्या दोघांतल्या वादाला ‘बेकरलू’ची लढाई असेही म्हटले जाते. कित्येक बैठका आणि पत्राचारानंतर अखेर बेकरच ही लढाई जिंकला. आणि नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉक अस्तित्वात आलेत.

नॉर्थ ब्लॉकचे बांधीव क्षेत्र (बिल्टअप एरिया) ७५,२८९ चौ.मी. आहे आणि या वास्तूतील (कोर्ट यार्ड) आवारक्षेत्र (फूटप्रिंट एरिया) जवळजवळ २६ हजार चौ.मी. आहे. यावरून या वास्तूची भव्यता लक्षात येते. विजय चौकपासून जर मोजले तर साधारणत: ९ मी. उंच असलेले नॉर्थ ब्लॉक १२६० फूट लांब आणि ५१० फूट रुंद आहे. बाहेरून पाहता मुख्यत: मुघल आणि राजस्थानी शैलीची छाप असलेले नॉर्थ ब्लॉक लालसर रंगाच्या दगडांपासून बनले गेले आहे. खालचा तळमजला (लोवर ग्राउंड फ्लोअर) पकडला तर तळमजला, पहिला आणि दुसरा मजला असे एकूण चार मजले यात आहेत. खालच्या तळमजल्याला पाच आणि तळमजल्यावर पाच अशी एकूण दहा प्रवेशद्वारे नॉर्थ ब्लॉकला आहेत. तशी ही सर्व प्रवेशद्वारे वापरात नसून सुरक्षा कारणास्तव केवळ चार-पाच द्वारेच वापरली जातात. नॉर्थ ब्लॉकमध्ये दोन कॅबिनेट मंत्री, सहा राज्यमंत्री यांची ऑफिसेस आहेत. एकूण ऑफिसची संख्या ५१७ असून कमीत कमी दोन-एक हजार कर्मचारी येथे काम करतात. मंत्र्यांसह केंद्र सरकारचे अनेक सचिव तसेच प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर बोर्डाचे अध्यक्ष असे महत्त्वाचे सनदी अधिकारी नॉर्थ ब्लॉकमध्ये बसतात. जिथे लॉर्ड माऊंटबॅटन बसत असे तिथे सध्या त्याच दालनात अप्रत्यक्ष कर बोर्डाचे अध्यक्ष बसतात. एकूणच, एकदम नवनियुक्त साहाय्यकापासून कॅबिनेट मंत्रीपर्यंत सर्वांना ही इमारत सामावून घेते. मी तर असेही काही कर्मचारी इथे पाहिले आहेत, ज्यांनी म्हणे सरकारी नोकरी इथूनच रुजू केली आणि निवृत्तही नॉर्थ ब्लॉकमध्येच झालेत. नॉर्थ ब्लॉकमध्ये काम सुरू केल्यावर माझ्या कुतूहलाला आणि नानाविध निरीक्षणांना सीमाच उरली नाही.

माझ्या शाळेतले इंग्रजीचे एक शिक्षक म्हणायचे, डिक्शनरीमधला कोणताही शब्द काढून पुढे कल्चर शब्द लावला तर आपली ओळख नव्या संस्कृतीसोबत होऊ शकते. जसे प्रत्येक कार्यस्थळाची एक विशिष्ट संस्कृती असते, तशीच नॉर्थ ब्लॉकची देखील आहे. नॉर्थ ब्लॉक संस्कृतीनुसार नवीन रुजू अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतो. त्याला ‘कॉलऑन’ असे म्हणतात. तसेच कॉलऑन करण्यासाठी रुजू झाल्या झाल्या मी एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जावे म्हणून त्यांच्या साहाय्यकाला फोन लावला आणि रूम नंबर विचारला तर तो म्हणाला, ‘अमुक अमुक रूम नंबर पाकिस्तान मे!’ मला वाटलं मी काही तरी चुकीच ऐकत आहे. मी परत विचारलं तर तो म्हणाला, ‘पाकिस्तान साइड आना पडेगा!’ मी उडालोच. जरा विचारपूस केल्यावर कळलं की, नॉर्थ ब्लॉकच्या दुसऱ्या माळ्यावरची पूर्व बाजू इतर इमारतीपासून विभक्त आहे आणि तिथे जायचे असेल तर एकच जिना वापरावा लागतो. इतकेच नाही तर फाळणीनंतर काही काळ हा भाग पाकिस्तानी सरकार वापरत असे. म्हणून त्याचे नाव पडले पाकिस्तान, ते आजतागायत वापरले जाते.

मूळ संरचनेप्रमाणे दर मजल्यावर ९८ दालने ऑफिसेस असे नियोजन असले तरी गरजेप्रमाणे यात बदल होत गेले. दालनांसोबतच मग मीटिंग रूम्स, कॉन्फरन्स हॉलदेखील अस्तित्वात आलेत. त्यांची नावेदेखील विशिष्ट आहेत. ‘कल्पतरू’, ‘सप्तर्षी’, ‘फ्रेस्को’ या फ्रेस्कोमध्ये तर नावाप्रमाणे लोभनीय भित्तिचित्रे आहेत. बसण्याची व्यवस्था वक्राकार असून वर गोल घुमट आहे. अर्थात त्यावरही चित्रे आहेतच. बसण्याची व्यवस्था अशी की, सभेच्या अध्यक्षाची खुर्ची मुख्य दरवाजापाशी आहे. जेणेकरून सर्व सदस्य आले की अध्यक्ष येतील आणि मीटिंग संपताच जातील. साधारण ४० क्षमता असलेल्या फ्रेस्कोचे दुसरे (खुश्कीचे) द्वार चहा/ कॉफी आणून देणारे वापरतात. नॉर्थ ब्लॉक संस्कृतीचे विभाज्य घटक म्हणजे इथे असलेले भारतीय चहा मंडळ/ भारतीय कॉफी मंडळाचे आऊटलेट. कॉफी बोर्डची इथली कॉफी ही दूरदूरपर्यंत प्रसिद्ध आहे. इथे बोर्डाची ही व्यवस्था उपलब्ध करण्यामागे म्हणे अशी कथा आहे की, स्वातंत्र्योत्तर काळात ‘टी बोर्ड’, ‘कॉफी बोर्ड’ यांची सेवा केवळ संसद सदस्यांसाठीच होती. मात्र मंत्री जेव्हा आपल्या ऑफिसमध्ये, नॉर्थ ब्लॉकमध्ये येत आणि या चहा, कॉफीची मागणी करत तेव्हा तेव्हाच्या संसद क्षेत्रातून चहा, कॉफी इथे पोहोचेपर्यंत थंडगार होई. (विशेषकरून हिवाळी अधिवेशनावेळी) म्हणून बोर्डाने आपली आऊटलेट नॉर्थ ब्लॉकमध्ये आणली. आजही कॉफी ‘सर्व्ह’ केली जाते त्या कपबशीवर ‘पार्लमेण्ट ऑफ इंडिया’ असे लिहिले आहे. कॉफी ‘सर्व्ह’ करण्याची अजून एक विशेष गंमत म्हणजे जो अधिकारी जितका वरिष्ठ तितका त्याच्या कॉफीमध्ये फेस जास्त! हे इतके नेटाने पाळले जाते की फ्रेस्कोमध्ये मीटिंगसाठी येणाऱ्या बाहेरच्या अधिकाऱ्यांना फेसच्या पातळीवरूनच कळते कोण अधिकारी वरिष्ठ आहेत आणि कोण नाहीत असे!

अधिकाऱ्यांच्या वरिष्ठतेचा अजून एक मापदंड म्हणजे इथल्या ओळखपत्राच्या बेल्टचा रंग! नवनियुक्त असिस्टंट अथवा कंत्राटी कामगारांसाठी जारी केलेल्या ओळखपत्रासाठी निळ्या गळपट्ट्याचा वापर केलेला आहे (मला न जाणो का वाटे, ही ब्लू कॉलर जॉबची सुरुवात तर नाही). त्यानंतर त्यापेक्षा वरिष्ठ म्हणजे कक्ष अधिकारी, अवर सचिव व तत्सम दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी हिरवा पट्टा आहे. मध्यम व्यवस्थापनात मग्न माझ्यासारख्या उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचा पिवळा पट्टा आणि संयुक्त सचिव व त्यापेक्षा वरिष्ठ – थेट सचिवांपर्यंत – ओळखपत्राच्या पट्ट्याचा रंग लाल! म्हणजे ओळखपत्रावर नाव, हुद्दा, मंत्रालय, विभाग इत्यादी तपशील असूनदेखील पट्ट्याच्या रंगावरून वर्गरचना नॉर्थ ब्लॉकखेरीज इतरही मंत्रालयांत आढळते. इतकी की, सुरक्षा कर्मचारीदेखील या पट्ट्याच्या रंगानुसार अधिकाऱ्यांच्या ये-जा करते वेळी आपली देहबोली बदलतात, हे माझे निरीक्षण!

नॉर्थ ब्लॉकमध्ये देशाचा अर्थसंकल्प तयार होतो. जेव्हा या प्रक्रियेची तयारी सुरू होते त्या वेळी नॉर्थ ब्लॉकच्या आतला भाग जणू एक गड-किल्लाच बनतो. तळमजल्यावर ठरावीक ठिकाणी तात्पुरते अडसर बांधले जातात, अर्थसंकल्पासंबंधी कागद, अधिकारी जमा होतात. आणि सुरक्षा कारणाने आणि गुप्ततेसाठी हा भाग इतरांसाठी बंद होतो. हल्ली मुख्यत: डिजिटल प्रणालीमुळे तिथली कागदपत्रांची संख्या कमी झाली आहे. अगोदर ‘बजेट प्रेस’मध्ये २०-२१ दिवसांची नजरबंदी असायची, ती आता आठेक दिवसांवर आली आहे. इथेच ‘बजेट प्रक्रिये’चा सुरुवातीचा ‘हलवा’ कार्यक्रम पार पडतो. इथे काम करणाऱ्यांना तो हलवा प्रसादाप्रमाणे थोडासा का होईना चाखणे म्हणजे सन्मानाचा भाग वाटतो.

नॉर्थ ब्लॉकमध्ये कर्मचाऱ्यांना एकत्रित येऊन उत्साहाने काही साजरे करण्याच्या इतरही संधी असतात. यात सामूहिकरीत्या तयार केल्या गेलेल्या कोर्टवर रोज बॅडमिंटन खेळणे, याव्यतिरिक्त जागतिक वुमन्स डेसारखे दिवस कोर्ट यार्ड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात साजरे करणे, रक्तदान शिबिरात उत्साहाने सहभागी होणे यांचा समावेश होतो. सध्या योजना आणि वास्तू कला विद्यालय भोपाळद्वारा नॉर्थ ब्लॉकचे सर्वेक्षण केले जाते आहे. यान्वये या वास्तूचे संग्रहालयात रूपांतरणाचे काम जोमाने सुरू आहे. ही वास्तू जनतेसाठी खुली होईल याचा आनंद आहेच, तरी नॉर्थ ब्लॉकची संस्कृती लुप्त होऊन तिचे रूपांतरण नवीन संस्कृतीत होईल हेही तितकेच खरे!

Amitbhole@gmail.com

(लेखक सनदी अधिकारी आहेत.)