‘लोकरंग’मधील (३० मार्च) ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ सदरातील गिरीश कुबेर यांचा ‘ये शरद जोशी कौन?’ हा लेख अप्रतिम आहे. लेखाच्या शेवटी राजकारण्यांची रेवडी उडविली आहे. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे उभे आयुष्य वादळी प्रसंगांनी भरलेले आहे. आम्ही जेव्हा पुण्यात प्रभात रोड गल्ली क्र १४ च्या जयगड मार्गावर १९६५ साली राहायला आलो तेव्हा भारती निवास सहकारी गृहनिर्माण संस्थेत छोटेखानी ८५ बैठे बंगले होते. त्यातील पोस्टाच्या पेटीच्या गल्लीत शेवटी एक बैठा छोटा बंगला शरद जोशी यांचा होता. त्याकाळी ते त्यांच्या धावत्या दौऱ्या दरम्यान वेळ काढून आपल्या वृद्ध आईला भेटायला यायचे. अमेरिकेतील युनायटेड नेशन्स (युनो) मधील मोठ्या पगाराची नोकरी सोडून सुखासीन आयुष्याचा त्याग करून उर्वरित संपूर्ण आयुष्य शेतकरी संघटनेला त्यांनी अक्षरश: वाहून घेतले होते. हा निर्णय धाडसी होता. त्यांचे म्हणणे एकच- शेतकरी आणि बाजारपेठ यांच्यातून सरकारने बाजूला व्हावे! दलाल, अडते यांना दूर करून शेतकरी ग्राहकांशी थेट संपर्क साधेल! मागणी आणि पुरवठा यातील गणितावर कृषी मालाचा बाजारभाव ठरेल. मात्र लेखात म्हटल्याप्रमाणे, सत्ताधाऱ्यांनी त्यांना समर्थन न करता अडगळीत टाकले आणि एक क्रियावान कृषिपंडित अनुल्लेखाने मारला गेला.डॉ. विकास इनामदार

कृतिशील विचारवंत

‘लोकरंग’मधील (३० मार्च) ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ सदरातील गिरीश कुबेर यांचा ‘ये शरद जोशी कौन?’ हा लेख वाचला. स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने देश प्रथम हे ब्रीद घेऊन विचार करणारे, त्यानुसार कृती करणारे जे काही मोजके विचारवंत नेते होऊन गेले त्यात शरद जोशी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. ते अर्थशास्त्रज्ञ होते, कृतिशील विचारवंत होते, शेतकरी नेते होते आणि एक योद्धा होते.डॉ. श्याम बापुराव तेलंगनांदेड.

जोशींची भेट हे सौभाग्य

‘लोकरंग’मधील (३० मार्च) ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ सदरातील गिरीश कुबेर यांचा ‘ये शरद जोशी कौन?’ हा लेख वाचून शरद जोशी यांच्या जुन्या आठवणी जागृत झाल्या. शेतकरी संघटनेचे आंदोलन ऐन भरात असताना त्यांनी वेळात वेळ काढून जळगावातल्या आमच्या पिंपळगाव हरेश्वर येथे येण्याचे कबूल केले व त्यानुसार पिंपळगाव बसवंत नंतर पिंपळगाव हरेश्वर येथे त्यांची ऐतिहासिक, न भूतो न भविष्यति अशी जंगी सभा झाली. माझे लहान बंधू विश्वनाथ महाजन यांच्या खास आग्रहाखातर १९८३ मध्ये जाहीर सभा झाली. त्यावेळी त्यांची प्रत्यक्ष भेट व चर्चा झाली होती. त्याकाळी ते जीन्सची पॅन्ट व टी-शर्ट अशा पेहरावात राहात असत. मानपान घेणे त्यांना अजिबात आवडत नसे. सभा संपल्यानंतर जेवणासाठी सर्व कार्यकर्त्यांसोबत पंगतीत बसूनच जेवले होते. त्यावेळी सभेला हजर असलेले अनिल गोटे, महेंद्रसिंह पाटील व आर. ओ. पाटील आमदार झाले. जोशींनी शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध शेवटपर्यंत लढा दिला त्याची इतिहासात कायम नोंद घेतली जाईल. राजकारणात प्रवेश केला नसता तर शेतकरी संघटनाही एक दबाव गट म्हणून कार्यरत राहिली असती. तसेच त्यांची जातसुद्धा आंदोलनाला काहीशी मारक ठरली ती घाणेरड्या राजकारणामुळे! पुण्यात नोकरीत असतानासुद्धा त्यांच्या सिंध हौसिंग सोसायटीतील घरी भेट झाली होती. त्यांनी परदेशातील सुखासीन नोकरी सोडल्याबद्दल त्यांच्या पत्नी कायम नाराज असत. अशा महान व्यक्तीला भेटण्याचे सौभाग्य लाभले ही माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाची बाब आहे, असे नमूद करावेसे वाटते.माधवराव महाजनजळगाव.

विनाशाच्या दिशेने वाटचाल

‘लोकरंग’मधील (२३ मार्च) ‘दिन हो गये है जालीम-राते है कातीलाना’ हा पाकिजा चित्रपटातील गाण्याचं शीर्षक असलेला अतुल देऊळगावकर यांचा लेख वाचला. लेखकाने शब्दांकित केलेली ही चिंतनिका मन सुन्न करणारी आहे. विकासाचा अतिरिक्त हव्यास मानवी जीवन दुस्तर करणार असेल तर त्याचा काय उपयोग? या ध्यासापोटी रोज प्रचंड प्रमाणावर वृक्षतोड सुरू आहे. डोंगर टेकड्या जे.सी.बी.च्या रेट्याखाली भुईसपाट होत आहेत. त्यावर तसेच त्याच्या आश्रयाने होणारे पशु-पक्षी आणि प्राणी मृत किंवा विस्थापित होत आहेत. आज परिस्थिती अशी आहे की, पक्षी-प्राणी यांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत. उरलेल्या होण्याच्या मार्गावर आहेत. एकीकडे काँक्रीटची जंगले बेसुमार वाढत आहेत आणि हिरवाई कमी नव्हे तर नष्ट होत आहे. सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, मेक्सिको, जपान आदी देशांत शहरी वनांची निर्मिती केली जात आहे ती हिरवाई वाढून तापमान नियंत्रित करण्यासाठी. तर आमच्या पुण्यात मुठा नदीचा काठ सुशोभित करण्याच्या गोंडस नावाखाली तिथं वर्षानुवर्षे उभी असलेली वृक्षराई तोडण्याचा घाट घातला जातो- जो पर्यावरण प्रेमींच्या प्रखर विरोधामुळे बारगळला. तसेच वेताळ टेकडी भुईसपाट करण्याची योजनाही पुण्यातील मंडळींनी हाणून पाडली. प्रवास करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूस एनए प्लॉट विक्रीची शेकडो होर्डिंग्ज दिसतील. याचाच अर्थ असा आहे कधी पुढील दहा-पंधरा वर्षांत इथली हिरवाई पूर्ण नष्ट ह़ोऊन मोठमोठे टॉवर्स उभे राहणार. तात्पर्य, आपला विकास हा पर्यावरणाच्या मुळावर येणारा आहे. म्हणून तो पर्यावरणाभिमुखच असला पाहिजे असा आग्रह आपण सर्वांनीच धरला पाहिजे. नपेक्षा आपण सध्या भाजतो आहोत, काही दिवसांनी होरपळून जाऊ. शासनाने याची वेळीच दखल घेऊन योग्य ती पावले उचलली पाहिजेत. नपेक्षा झळा तीव्र होतील.अशोक आफळेकोल्हापूर.

ही तर निसर्गाने दिलेली शिक्षाच

‘लोकरंग’मधील (२३ मार्च) ‘दिन हो गये है जालीम-राते है कातीलाना’ हा अतुल देऊळगावकर यांचा लेख वाचला. पूर्ण महाराष्ट्र बिल्डरांच्या ताब्यात गेला आहे आणि विकासाच्या नावाखाली शासनाने कोणतेही काम हातात घेतले की प्रथम काम केले जाते ते म्हणजे वृक्षतोडीचे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानसुद्धा अतिक्रमण आणि बिल्डर्सनी उभारलेल्या आणि पाडलेल्या इमारतीच्या साहित्याचा राडारोडा टाकून बंद करायच्या मागे लागले आहेत. सर्व नाले-नद्या कचरा टाकून गटारे बनविली आहेत. बिल्डर्सच्या हातात मुंबई देऊन कित्येक विहिरी बुजवून भूगर्भात जाणारा पाण्याचा स्राोत संपवून टाकला आहे. प्रचंड बांधकामांना परवानग्या देऊन धुळीचे प्रदूषण वाढले आहे. ती धूळ खाली बसण्यासाठी टँकरने पाणी आणून रस्ते धुतले जात आहेत. पिण्याचे पाणी पुरत नाही म्हणून इमारतींना बोअरवेल पाडायला सांगून भूगर्भातील पाणी संपविले जात आहे. सर्वत्र सिमेंट काँक्रीट केल्याने आणि वृक्षतोड झाल्याने भूगर्भात पाणी झिरपण्याची प्रक्रिया थांबली आहे. पावसाचे पाणी भूगर्भात न झिरपता समुद्राला जाऊन मिळून खारट बनत आहे. त्यावर उपाय म्हणून ते पाणी गोड करण्यासाठी कित्येक कोटी खर्चाच्या योजना राबविण्याचे घाटत आहे. उन्हाळा इतका कडक होऊ लागला आहे की धरणाच्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाण्याची पातळी झपाट्याने घटू लागली आहे. आपण जर निसर्ग नियमांच्या विरोधात जाऊन विकास करू लागलो आहोत तर तो आपल्याला धडा शिकवणार आहे. म्हणूनच जंगलात लागणारे वणवे, अतोनात पाऊस, काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी ऐन पावसाळ्यात पावसाने घेतलेली ओढ, अतिथंडी आणि अति उन्हाळा, कधी भूकंपाचे धक्के हे सर्व म्हणजे आपल्याला निसर्ग देत असलेली शिक्षाच आहे.नीता शेरेदहिसर.

तरच दुही टळेल

‘लोकरंग’मधील (२३ मार्च) ‘सामूहिक भ्रमिष्टपणाच्या लाटेवर’ हा अंजली चिपलकट्टी यांचा लेख आज समाजातील विचारहीन प्रवृत्तीच्या लोकांमुळे देशाची वाटचाल ऱ्हासाकडे चालली असल्याचा निर्देश करणारा आहे. अलीकडेच कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेला व्हिडीओ व त्यामुळे झालेली दंगल या सामूहिक भ्रमिष्टपणाचे ज्वलंत उदाहरण आहे. विनोद हा वैयक्तिक टीका करण्यासाठी नसावा या मूलभूत विचाराचे पालन न केल्यामुळे तो व्हायरल झाल्यावर त्याच्याविरोधात व्यक्त झालेला क्षोभ नैसर्गिक आहे. पण समाज म्हणजे लोकांचा जमाव नव्हे, तर लोकांचा एकोपा हा विचार मागे पडला. परिणामी समाजाचे पुढारीपण मिळविण्यासाठी संधी मिळताच बेरोजगारांना हाताशी धरून दंगल माजविण्याचे प्रकार वाढत जात आहेत. यावरील उपाय म्हणजे, माणसांनी माणसाला मदत करावी, जेणेकरून एकतेमुळे समाजाचा उद्धार होईल व अकारण निर्माण झालेली दुही टळली जाईल.सूर्यकांत भोसलेमुलुंड.

नोकरशाहीतील आईकमन जागृत झालेला…

‘लोकरंग’मधील (२३ मार्च) ‘सामूहिक भ्रमिष्टपणाच्या लाटेवर’ हा अंजली चिपलकट्टी यांच्या लेखात दिलेली उदाहरणे ही अतिशय समर्पक ठरतात. ही उदाहरणे सध्याच्या महाराष्ट्रातील परिस्थितीला चपखल बसतात.

अधिकाऱ्यांनी आपापली कर्तव्ये बजावताना समाजभान बाळगले पाहिजे, कारण समाजासाठी नियम आहेत, नियमांसाठी समाज नाही यात समाजानुरूप भूमिका घेणे सरस ठरते. याचे उदाहरण सांगायचे झाल्यास अतिक्रमण काढणे यात झोपडपट्टीतील गरीब जनता, पुलाखाली राहणारे भिकारी यांना शिक्षण, रोजगार व निवासच्या संधी निर्माण करण्याअगोदर त्यांना रस्त्यांवर आणणे यात अधिकारी वर्ग समाधान मानतो, यातून पुन्हा गुन्हेगारी वाढते. यात पोलीस अधिकारी आपल्यातला आईकमन दाखवतात, परिणामी हे गरिबी-गुन्हेगारी हे चक्र चालत राहणार. कारण सध्या आपल्या नोकरशाहीतील आईकमन उच्चकोटीचा जागृत झालेला आहे, यातून कोणता हुकूमशहा जन्म घेतो हे पाहणे बाकी आहे.चंद्रकांत कळणेनागपूर.

वास्तवापासून लक्ष हटविण्यासाठी…

‘लोकरंग’मधील (२३ मार्च) ‘सामूहिक भ्रमिष्टपणाच्या लाटेवर’ या अंजली चिपलकट्टी यांच्या लेखात अलीकडच्या काळात बऱ्याच ठिकाणी झालेल्या घटनांचे संदर्भ आहेत. सध्या भावनिक लाटांवर स्वार होण्याचे प्रमाण वाढत असून, वास्तवापासून दूर जाताना काहीच साध्य होत नाही हे कळणेसुद्धा कठीण होत आहे. महागाई, बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी कमी करणे जेव्हा अवघड होते तेव्हा यावरून लक्ष हटविण्यासाठी दुसरे अनेक मुद्दे, भावनिक प्रश्न मदतीला येतात. टीव्ही चॅनेल्सवरील ब्रेकिंग न्यूज पाहताना हे सहजपणे लक्षात येते. सोशल मीडियावरील आक्रमक व काही तरी चुकीचे करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या पोस्ट हेच साध्य करतात. कोणत्याही गोष्टीची दुसरी बाजू काय आहे हे जोपर्यंत पाहिले जाणार नाही तोपर्यंत हे असेच चालणार.प्र. मु. काळेनाशिक.

संगठित होऊन काम करणे आवश्यक!

‘लोकरंग’मधील (२३ मार्च) ‘दिन हो गये है जालीम-राते है कातीलाना’ हा अतुल देऊळगावकर यांचा लेख म्हणजे सध्याचं भयावह सत्य आहे. हा लेख अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. यापूर्वी जेव्हा उष्मा दिवसा वाढत असे तेव्हा रात्र हळूहळू थंड होत असे. पण आता तसं होत नाही याचं समर्पक कारण या लेखातून समजलं. समुद्र तापत असल्याने चक्रीवादळ तीव्र होणं हे अतीव धोक्याचं असल्याची जाणीव या लेखातून झाली. यामध्ये आपण काही बदल घडवून आणू शकतो याचादेखील सांगोपांग विचार यातून देण्यात आला आहे. तो सर्वांनी मनावर घेऊन करणं गरजेचं आहे. गावागावातून शेतजमिनीवर बिल्डर्स बेकायदेशीर बांधकाम करतात, पण त्यांना अडवण्याचं भान आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे हे विचार तंतोतंत पटतात. या वाढत्या उष्णतेचे परिणाम मानवालाच भोगावे लागत आहेत तरी आपण आपल्यात सुधारणा करणार आहोत का? हिरवा आणि निळा रंग कमी होऊन सर्वत्र धुळीचे लोट उठत आहेत. त्यासाठी आपणच पुढाकार घेऊन हाताबाहेर चाललेली परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते याचा आपण सर्वांनी सखोलपणे विचार केलाच पाहिजे. उष्णतेच्या काहिलीचे नवेनवे विक्रम संशोधन संस्थेने समोर आणून ठेवले आहेत याची जाणीव लेखकाने करून दिली आहे. वणवा रोखणं आपल्या हातात आहे. कारण दरवर्षी यामुळे पूर्ण डोंगरच्या डोंगर उघडे पडतात. कितीतरी वृक्ष जळून खाक होतात. अशा वेळी आपण फक्त बघ्याची भूमिका निभावत असतो. त्याऐवजी वणवा लागण्याआधीही खबरदारी प्रत्येक गावाने समर्थपणे पेलायला हवी. हल्ली काही गावांमध्ये यावर उपाय योजना होताना दिसत आहेत. काही समाजसेवी संस्था गावकऱ्यांची मदत घेऊन ‘झाडं लावा, झाडं जगवा’ हा उपक्रम राबवत आहेत. पण हे प्रयत्न पुरेसे नाहीत. सर्वांनी संगठित होऊन काम करणे आवश्यक आहे. आपल्या या लेख जागरातून अशा संवेदनशील मनाच्या लोकांकडून सकारात्मक कार्याचा पाठिंबा मिळण्यास मदतच होईल असा मला विश्वास वाटतो.डॉ. विद्या शिंदेरत्नागिरी