‘आता निघायची वेळ झाली…!’ या लेखावर साहित्य विश्वातून, साहित्यप्रेमींकडून मोठ्या संख्येने प्रतिक्रिया आल्याच; पण महत्त्वाचं म्हणजे खुद्द महेश एलकुंचवार ‘सर’ व्यक्त झाले. त्यांच्या प्रतिक्रिया फोनमधील तीन तपशील महत्त्वाचे. एक कालिदासासंदर्भातला. ‘‘कालिदासाचा काळ कोणता वगैरे याविषयी मतभेद आहेत. माझा मुद्दा होता तो त्याच्याबद्दल नाही… तर त्याच्या नायकांबद्दल. त्याचे सगळे नायक हे पंचेचाळिशीपन्नाशीचे आहेत आणि तरीही तरुणींभोवती रुंजी घालतात’’, असं सांगत सरांनी वाकाटक वगैरे काल, कालिदास रामटेकला कसा आला असेल वगैरे इतिहास समोर मांडला. दुसरा मुद्दा गोमांस शिजवण्याच्या विधीचा. ‘‘त्याचं नाव मधुपर्क… मधुपाक नाही. भवभूतीच्या उत्तररामचरित्रातही संमासो मधुपर्क: … असा उल्लेख आहे.’’ आणि तिसरा. ‘लोकसत्ता गप्पा’त सहभागी होण्याचा. गप्पांचा तपशील लवकरच…- गिरीश कुबेर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लोकरंग’मधील (१२ जानेवारी)‘ मराठी प्रेक्षक गेले कुठे?’ याअंतर्गत राहुल देशपांडे आणि नीरजा पटवर्धन यांचे लेख वाचले. या दोघांनी मराठी चित्रपट वितरण संदर्भात केलेले भाष्य व अनुभव पाहता आपल्याच राज्यात मराठी चित्रपटांची उपेक्षा होत आहे असे वाटते. चित्रपटांचे बजेट मोठे नसल्याने हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटाची भव्यदिव्यता नसते. त्यातून सिंगल स्क्रीन थिएटर खूपच कमी झाल्याने मल्टिप्लेक्समध्ये शो मिळवणे व टिकवणे सोपे नाही. जाहिरातीवर मोठा खर्च नसतो, असे अनेक नकारात्मक मुद्दे असले तरीही निर्माते दिग्दर्शक चांगले चित्रपट देऊन प्रदर्शित करतात. प्रेक्षकांनी याची जाणीव ठेवून चांगला प्रतिसाद देणे गरजेचे आहे.प्रफुल्लचंद्र काळेसातपूर. नाशिक.

प्रामाणिक कलाकारांची व्यथा

‘लोकरंग’मधील (१२ जानेवारी)‘ मराठी प्रेक्षक गेले कुठे?’ याअंतर्गत राहुल देशपांडे आणि नीरजा पटवर्धन यांचे लेख वाचले. एखाद्या कलाकाराने, मोठ्या कष्टाने, उत्साहाने चित्रपट निर्मिती करावी, त्यासाठी अनंत अडचणींना सामोरे जावे. प्रतिकूल, नकारात्मक टिप्पणी शांतपणे पचवावी आणि तरीही चित्रपट प्रदर्शनातील अडथळे दूर होऊ नयेत याला काय म्हणावे? अनेक मराठी कलाकार विविध क्षेत्रात पुढे येण्यासाठीच नव्हे तर आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटविण्यासाठी धडपडत आहेत. मराठी माणसांनी त्यांच्या कलाकृती थिएटरमध्ये जाऊन पाहिल्या पाहिजेत. इतकेच नव्हे तर आपल्या मित्रमंडळींना, आप्त-स्वकियांनाही तसे करण्यास सुचविले पाहिजे. कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा येथील प्रेक्षक आठवडा आठवडा थिएटर बुक करतात. असा उत्साह मराठी प्रेक्षक का दाखवत नाहीत हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तेव्हा यात प्रेक्षकांचीही तेवढीच जबाबदारी आहे. तरच आपल्या कलाकृतींना चांगले दिवस येतील.- अशोक आफळेकोल्हापूर.

भारत एकमेव प्रजासत्ताक देश

‘लोकरंग’ मधील (२६ जानेवारी) ‘उमटलेले प्रजासत्ताकाचे ठसे’ दोन पिढ्यांना जवळ आणणारे होते. भारत हा देश प्रजासत्ताक आहे हे छातीठोकपणे सांगायला वयाची अट नको. कारण प्रत्येक भारतीयाचा तो अधिकार आहे. ‘एकता का वृक्ष वठला काय?’ हा उत्पल व. बा यांचा लेख वाचला व १९९७ ते २००० मधला भारतीय स्टेट बँक, भिवंडी शाखेतील माझा शाखा प्रमुख म्हणून तीन वर्षांचा काळ आठवला. तिथले यंत्रमाग जणू उत्तर भारतीय मजुरांसाठी पोट भरण्याचे एकमेव ठिकाण होते. महिना उलटला की त्यांचा पगार व्हायचा. मग १ तारखेला सगळे धावत सकाळीच बँकेसमोर येऊन रांगेत उभे राहायचे. त्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागत असे. या गर्दीत हिंदू कोण व मुस्लीम कोण हे समजत नसे. त्यांच्या गावी असलेल्या वृद्ध मातापिता, मुले यांच्या भुकेलेल्या पोटाची आग विझविण्यासाठी हे मजूर ड्राफ्ट घेण्यासाठी तासन् तास रांगेत उभे राहायचे. आम्ही बँकेची वेळ संपली तरी उशिरापर्यंत त्यांना सेवा देत होतो. सर्व शांतपणे पार पडल्यावर बँक बंद व्हायची. भारत देश हे मोठे कुटुंब आहे याची जाणीव ठेवून प्रत्येकाने एकमेकांची गरज ओळखून आपल्या क्षमतेनुसार मदत करणे हीच प्रजासत्ताक देशाची खरी खूण आहे. मग प्रजासत्ताक म्हणजे ‘समृद्ध अडगळीचे ओझे’ असो, एकता का वृक्ष वठला काय?, अस्वस्थता रिचवायची आहे किंवा नाही, जगणं आकलनाच्या दिशेने आहे किंवा नाही, पण आपला भारत देश जगातील एकमेव प्रजासत्ताक देश आहे हे निर्विवाद सत्य आहे.सूर्यकांत भोसलेमुलुंड

डॉ. आंबेडकर यांचा बौद्धधर्म

‘लोकरंग’मधील (१२ जानेवारी) ‘धर्म, अस्मिता आणि हिंदू!’ या राजा देसाई यांच्या लेखात भगवान बुद्धांबद्दलचे स्वामी विवेकानंद यांचे विचार वाचले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आठवण येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची करुणादेखील अखिल मानव जातीसाठी होती. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या विचारावर आधारित ‘अॅनिहिलेशन ऑफ कास्ट’ हा ग्रंथ आहे. राज्यघटनेनुसार असलेले मूलभूत हक्क मानवाला प्रतिष्ठा देतात. लोकशाही प्रजासत्ताक हाच भारतीय लोकांचा धर्म राहील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध धर्मात कर्मकांड नाही. धर्मगुरू नाही. धार्मिक प्रायाश्चित्त नाही.युगानंद गुलाबराव साळवेपुणे.