श्रीनिवास बाळकृष्ण

प्रिय मित्रा,

तुझी वार्षिक परीक्षा सुरू होईल तसा पर्यटन स्थळांवर शुकशुकाट असेल. ती संधी साधून समुद्राने मला राहायला बोलावलेय. मीही पहिल्यांदाच समुद्र पाहणार आहे.

मला शाळेत सांगितलेले की, समुद्र निळ्या रंगाचा असतो. त्यामुळे आजवर मी हमखास निळ्या रंगाचा खडू कागदावर घास घास घासायचो. सर्वात पहिला तोच खडू संपायचा. आज गर्दी नसताना एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पसरलेला हा समुद्र पाहताना तो केवळ निळ्या रंगाचा दिसत नाहीये. त्यात निळ्याच्या अनेक छटा (शेड्स) आहेत. त्या छटांची नावे मला अजिबात सांगता येणार नाहीये, पण तो रंग कागदावर बनवायचा प्रयत्न करू शकतो. लख्ख उन्हात मला निळ्यासोबत गडद निळा, हिरवट हिरवा, मध्यभागी निळसर अक्वा रंग दिसत आहे. पिवळ्या वाळूमुळे निळा अधिक उठून दिसतोय. किनाऱ्यापर्यंत वाळूयुक्त पाण्याला करडा रंग दिसतोय. लाट ओल्या काळ्या दगडावर आपटली की उंच पांढरे कारंजे फुलतात.

सूर्य खाली येताना समुद्रात पिवळा, नारंगी रंगाच्या पायऱ्या तयार होतायेत. सूर्य आणखी जवळ आला की समुद्राला लाली चढते. तो गेला की मग समुद्र जांभळट रंग घेतो. आणखी काही वेळाने पूर्ण काळा होतो. त्या रात्रीत शंभर कासवांची पिल्ले समुद्रात शिरतात तर लाटांचे शंभर शुभ्र पांढरे ससे एकामागोमाग एक किनाऱ्याकडे धाव घेत विरतात.

आता समजतेय की, शाळेत सांगतात तसे निसर्गात एकच एका रंगाचे असे काहीच नसते. घरी येणाऱ्या पालेभाज्यांत किती प्रकारच्या हिरव्या असतात. दगड, मातीत चिक्कार फरक असतो.

आकाशाचे बदलते रंग विचारायलाच नको. एकाच कुटुंबातल्या माणसांची त्वचा वेगवेगळ्या रंगांची असते. तुला हे सर्व दिसते का? तसे दिसत असल्यास मलाही त्या रंगछटा चितारून पाठवशील?

तुझा खासमखास मित्र,

श्रीबा

shriba29@gmail.com

Story img Loader