लोकेश शेवडे

‘‘…माझ्यावर विषप्रयोग झालाय आणि मी मरणार आहे.’’ हे सांगून मी फ्लाइट अटेन्डन्टच्या पायाशीच विमानाच्या फ्लोअरवर कोसळलो. हळूहळू माझ्या आजूबाजूच्या लोकांचे आवाज ऐकू येणं बंद झालं. एक महिला मला ओरडून सांगत होती- ‘‘झोपू नका, जागे राहा – जागे राहा.’’ ते मला ऐकू आलेले शेवटचे शब्द. मग मी मेलो. …पण सुदैवानं मी खरोखर मेलो नव्हतो. काही दिवसांनी मला जाग आली तेव्हा मी एका व्हीलचेअरवर होतो. माझी बायको आणि काही डॉक्टर्स मला माझ्या आजूबाजूला दिसत होते. ते मला सांगत होते, ‘‘अलेक्सी, बोल, काहीतरी बोल.’’ मग माझ्या लक्षात आलं की, माझं नाव अलेक्सी आहे.’’

अलेक्सी नवाल्नी नावाच्या हुकूमशाही- भ्रष्टाचारविरोधी रशियन आंदोलनकर्त्या, म्हणजेच पुतिनच्या राजकीय विरोधकाच्या आत्मचरित्रातली ही वाक्यं आहेत. याच आत्मचरित्रात तो पुढे म्हणतो, ‘‘त्या वेळी मला बोलता – लिहिता येत नव्हतं, इतकंच नव्हे, तर मला ऐकू आलेलंदेखील समजत नव्हतं. माझी बायको, माझे सहकारी, डॉक्टर्स मला बरेचदा सांगत होते की, मी सैबेरियातून परतत असताना पुतिनच्या लोकांनी माझ्यावर कसा, केव्हा आणि कुठे विषप्रयोग केला, मी विमानात कसा बेशुद्ध पडलो, मग विमान तातडीनं ओम्सला उतरवलं- तिथं काही उपचार करून मग मला बर्लिनला आणलं गेलं- मला ते ऐकू येत होतं, पण मला कळत मात्र नव्हतं. नंतर मला हळूहळू कळायला लागलं आणि माझ्या प्रकृतीत सुधारणा व्हायला लागली. २३ सप्टेंबर २०२० रोजी मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यापूर्वी तिथे डॉक्टर्स आले तेव्हा त्यांच्या मागे एक ज्येष्ठ महिलादेखील होती. तिचा चेहरा मला ओळखीचा वाटला. ती महिला म्हणजे जर्मनीच्या चॅन्सलर अँगेला मर्केल होत्या. त्यांनीच माझ्यावर योग्य औषधोपचार – इलाज करण्यासाठी पुतिनवर दबाव आणून मला रशियातून बर्लिनला आणलं होतं. त्यांनी माझ्याशी रशियातल्या राजकीय बाबींवर चर्चा केली आणि मला विचारलं, ‘‘पुढे काय करणार आहात?’’

मी उत्तर दिलं, ‘‘मला लागलीच रशियाला परत जायचंय.’’

त्या मला म्हणाल्या, ‘‘घाई करण्याची काही गरज नाही.’’

‘‘मला ठाऊक आहे की मी रशियात ‘असणं’ क्रेमलिनला अजिबात नको आहे. पण मला लवकरात लवकर रशियात जायचंच आहे.’’

मर्केल यांच्या वाक्याचा गर्भितार्थ सामान्य माणसाच्या मराठीत ‘कशाला जातोयेस तिथे मरायला?’ असा असणार. तो अर्थ कळूनही, चालताफिरता येऊ लागल्याबरोबर नवाल्नी मॉस्कोला जायला निघाला.

नवाल्नीवर वापरलेलं विष हे रशियन गुप्त संशोधन संस्थेनं बनवलेलं ‘नोविचोक’ होतं आणि ते त्याला संपवण्यासाठीच वापरलं होतं हे त्याला पक्कं माहीत होतं. त्याआधी तीन वर्षांपूर्वी त्याच्यावर घातक केमिकल्स फेकली गेली होती, ज्यामुळे त्याच्या एका डोळ्याची ८०% दृष्टी गेली होती. त्यानं पुतिनच्या हुकूमशाही आणि भ्रष्टाचाराला विरोध सुरू केल्यापासून सातत्यानं त्याला विविध आरोपांखाली अटक करून तुरुंगात डांबलं जात होतं. कोणतीही सत्ता-संपत्ती नसताना त्याच्यावर घोटाळ्याचे आरोप ठेवून ‘ईडी’चे छापे टाकून कोठडीत टाकण्यात आलं होतं. एका व्यक्तीच्या बदनामीसारखा अगदीच फुटकळ आरोप ठेवून त्यात तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. काही ना काही आरोपाखाली त्याच्या पक्षाला आणि त्याला, आंदोलनासाठी, मोर्चांसाठी, निवडणुकीत सहभागासाठी बंदी घातली जात होती. हे सारं त्यानं स्वत: अनुभवलं असल्यामुळे, आपलं रशियात ‘असणं’ हे पुतिनला नको आहे, पुतिनच्या सर्वच विरोधकांच्या बाबतीत जे घडत आलंय- तसंच आपल्या बाबतीतदेखील घडेलर्- ंकबहुना आता आपण कायमचं ‘नसण्या’चे प्रयत्न अधिक तीव्र होतील याची अलेक्सी नवाल्नीला खात्रीच होती. तरीही बर्लिनसारखं सुरक्षित- सुखसोयीचं ठिकाण सोडून स्वत:हून तो मृत्यूच्या दाढेत जायला तयार झाला. प्रत्येक शिक्षा सुनावणीच्या वेळी त्याच्या बाजूनं हजारो लोक रस्त्यावर उतरून निषेध करत, त्याच्यावर लादलेल्या बंदीविरुद्ध ब ऱ्याच शहरांमध्ये निदर्शनं केली जात, त्याच्या यूट्यूबवरील भाषणांना तीस ते पन्नास लाख श्रोते मिळत. त्यानं औषधोपचारांसाठी तुरुंगात उपोषण सुरू केलं तेव्हा त्याच्या बाजूनं लाखो लोक रस्तोरस्ती मूक मोर्चे काढत होते. जीव धोक्यात टाकून त्यानं केलेल्या पुतिनच्या विरोधाचं त्याच्या समर्थकांना पूर्वीही कौतुक होतंच, पण जीव कसाबसा वाचल्यावर अधिक धोक्यात घालून तो पुन्हा रशियात यायला निघाल्यावर ते थक्क झाले…

वास्तविक पराभवाची खात्री असूनही जिवावर उदार होऊन लढणारा अलेक्सी नवाल्नी पहिलाच नव्हे. प्राचीन-अर्वाचीन काळापासून पराभर्व ंकवा मृत्यूची पर्वा न करता लढाई खेळलेल्या शेकडो व्यक्ती जगभरात होऊन गेल्या. स्पार्टाकस (रोमन साम्राज्य- इसपू. पहिलं शतक), विल्यम वॉलेस (स्कॉटलंड – तेरावं शतक), जोन ऑफ आर्क (फ्रान्स-पंधरावं शतक) या युरोपीय व्यक्तींपासून आपल्याकडच्या प्रतापराव गुजर- बाजी प्रभू देशपांडे (सतरावं शतक), राणी लक्ष्मीबाई (एकोणिसावं शतक) पर्यंत कित्येकांची नावं त्यांत घेता येतील. तथापि, त्या काळात लोकशाही व्यवस्था-राष्ट्र संकल्पना जगात रुजली नसल्यामुळे त्या लढाया लोकशाही मूल्यांशी निगडित नव्हत्या. गेल्या दीड शतकात राष्ट्र संकल्पना-लोकशाही मूल्य व्यवस्था जगभरातील लोकांपर्यंत पोहोचली आहे. सबब, त्या काळी बहुतांश लढाया परकीयांविरुद्ध असायच्या, त्याऐवजी आता प्रामुख्यानं राष्ट्रांतर्गत स्वकीयांच्या हुकूमशाहीविरुद्ध असतात हा एक मोलाचा फरक. तथापि, अन्यायी-जुलमी स्वकीय राज्यकर्त्यां विरूद्ध लढण्यासाठी जीव पणाला लावणारा नवाल्नी गेल्या दीड शतकातलादेखील अन्योन्य नाही. स्वकीयांच्या अन्यायाविरुद्ध लढत वेदना, मृत्यूला बिनदिक्कत सामोरे जाणाऱ्याही अनेक व्यक्ती गेल्या दीडएक शतकात होऊन गेल्या. स्वकीय हिटलर विरुद्ध ‘व्हाइट रोज’ चळवळ उभारताना छळ, तुरुंगवास भोगून वयाच्या २४-२१व्या वर्षी गिलोटिनखाली धीरानं मान दिलेले ‘हॅन्स बंधू-भगिनी’(जर्मनी – १९४३), कविता-नाटकांतून उजव्या-फॅसिस्ट स्वकीय राज्यकर्त्यांविरूद्ध विचार मांडल्यामुळे बंदुकीच्या गोळ्या झेलणारा गार्सिया लार्का (स्पेन-१९३६), कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी स्वकीय गो ऱ्यांशी लढणारा १९ दिवस हातापायात बेड्या घातलेल्या-निर्वस्त्र अवस्थेत मारहाण सोसत मृत्यूच्या कुशीत शिरणारा स्टीव्ह बिको (दक्षिण आफ्रिका – १९७७). हे बाकीच्या देशांचे मासले. खुद्द रशियातच अ‍ॅना पॉलिटकोवस्काया या पत्रकार महिलेवर एकदा विषप्रयोगाचा प्रयत्न होऊन नंतर अनेक धमक्या आलेल्या असतानाही तिनं ‘पुतिन्स रशिया – लाइफ इन फेलिन्ग डेमॉक्रेसी’, ‘ए रशियन डायरी’ ही पुतिन यांची एकाधिकारशाही, दहशत आणि भ्रष्टाचार उघड करणारी पुस्तकं प्रकाशित केलीत. तसेच डोक्यात पिस्तुलाच्या चार गोळ्या स्वीकारल्या. माजी उपपंतप्रधान बॉरिस नेमस्टॉव यांना परिणामांची कल्पना असूनही युद्धाला विरोध करत क्रेमलिनच्या भ्रष्टाचाराचा अहवाल जाहीर केला आणि क्रेमलिनसमोरच गोळीबारात शरीराची चाळण करून घेतली. मुळात नवाल्नीवर वापरलेलं नोविचोकदेखील त्याच्या अगोदर किमान चार पुतिन विरोधकांवर ‘यशस्वी’पणे वापरलं गेलं होतं…

अक्राळ-विक्राळ राज्यव्यवस्थेविरुद्धच्या लढाईत आपला पराभर्व ंकवा मृत्यू अटळ असतो, तर अशा हरणा ऱ्या लढाईत उतरण्यासाठी लागणारं धैर्य, नैतिक बळ हॅन्स बंधू-भगिनींपासून पॉलिटकोवस्कायापर्यंत असंख्य लढवय्यांना कुठून मिळत असावं? – असा प्रश्न स्वत:ला संवेदनशील मानणा ऱ्यांना नेहमी पडत असतो; तसाच नवाल्नीच्या बाबतीतही पडला असावा. नवाल्नीच्या बाजूनं वारंवार रस्त्यावर उतरलेले हजारो निदर्शक, त्याच्यावरच्या अन्यायाविरुद्ध काढले गेलेले निषेध मोर्चे, त्याच्या यूट्यूबवरच्या भाषणांना मिळालेले लाखो लाइक्स, यातून त्याला नैतिक बळ-धैर्य मिळतं, असं त्या प्रश्नाचं उत्तर त्या संवेदनशील लोकांपैकी बहुतांशांना वाटत असार्वं. ंकबहुना ‘आपल्या सहभागामुळे नवाल्नीला बळ मिळेल’ असं वाटल्यामुळेच त्याच्या बाजूच्या मोर्चांमध्ये, रस्त्यावरच्या निदर्शनांमध्ये ते सामील झाले असावेत आणि त्यांनी लाइक्स दिले असावेत. तथापि, ही प्रश्नोत्तरं केवळ भावनात्मक आहेत… राज्यकर्ते अन्याय-भ्रष्टाचार करतात, त्याविरुद्ध एखादा लढवय्या उभा राहतो, मग राज्यकर्ते त्याचं दमन करतात, त्यावर त्याला बळ मिळण्यासाठी कधीतरी काही संवेदनशील त्या लढवय्याच्या बाजूनं दमनाचा निषेध करतात, निदर्शनं करतात. दरम्यान लढवय्या हरर्तो ंकवा संपतो- राज्यकर्त्यांचा अन्याय-भ्रष्टाचार तसाच राहतो…

प्रश्नाचं खरं स्वरूप राक्षसी आहे. निवडणूकप्रधान लोकशाहीत हुकूमशहा हा प्रामुख्यानं स्वकीय विरोधकांवरच अन्याय-अत्याचार करत असतो; आणि त्यांच्यावरच्या अत्याचारासाठी तो उर्वरित स्वकीयांना आपलंसं करून त्यांचा वापर करत असतो. नवाल्नीसारख्या एखाद्याा लढवय्याच्या बाजूनं हजारो-लाखो निदर्शक रस्त्यावर उतरले, याचा अर्थ उर्वरित करोडो लोक त्याच्यावरच्या विषप्रयोगाविरुद्ध रस्त्यावर उतरले नाहीत असा आहे. नवाल्नीला वेगवेगळ्या निवडणुकांत १० ते २६ टक्के मतं मिळाली, याचा अर्थ किमान ७४ टक्के मतं त्याच्या विरुद्ध पडली असा आहे. नवाल्नी हा राज्यकर्त्यांचा विरोधक असला तरी त्याच्या पक्षावर बंदी घालू नये, त्याला तुरुंगात डांबू नये, निदान त्याच्यावर विषप्रयोग तरी होऊ नये असं ७४ टक्के लोकांना वाटलं नाही. विरोधकांचं दमन करणारा, तुरुंगात डांबणारा, संपवू पाहणारा नेताच हवा असणा ऱ्यांची संख्या किमान ७४ टक्क्यांपर्यंत आहे. ही बाब केवळ नवाल्नीच नव्हे तर इटलीच्या संसदेसमोर मारलेल्या विरोधी पक्षनेता जॉकोमो मित्तीओत्तीपासून रशियाच्या क्रेमलिनसमोर मारलेल्या माजी उपपंतप्रधान बॉरिस नेमस्टॉवपर्यंत प्रत्येकाच्या बाबतीत लागू आहे. मुसोलिनी, हिटलरच्या काळातही हेच घडत होतं. छळ-छावण्यांना, नाझी युद्धखोरीला विरोध करणारे ‘हॅन्स बंधू-भगिनी’ काही परकीय नव्हते आणि ज्यूदेखील नव्हते. त्यांना तुरुंगात डांबलं तेव्हा, गिलोटिन केलं तेव्हा किती जर्मनांनी निषेध केला? बेड्या ठोकून – निर्वस्त्र करून स्टीव्ह बिकोला मारून टाकल्यावर किती दक्षिण आफ्रिकनांनी निदर्शनं केली? रशियाच्या अपारदर्शी कारभारामुळे नवाल्नी-पुतिनबाबत जनमताची खरी आकडेवारी कधीच कळत नाही. पण बाकीच्या जगावरून अंदाज करता येऊ शकतो. प्रश्न खरे असे आहेत की, प्रचंड बहुमत मिळवणा ऱ्या राज्यकर्त्याला, केवळ २६ टक्के मतं मिळवणा ऱ्या विरोधकाला तुरुंगात डांबावंसं किंवा मारून टाकावंसं का वाटावं? असे असंवेदनशील- क्रूर राज्यकर्ते निवडून येतातच कसे? … मग उत्तर मिळण्याऐवजी पुन्हा प्रश्न पडतो, मुळात अशांना निवडून देणारे देशोदेशीचे बहुसंख्याकच संवेदनाहीन आणि क्रूर असतात की काय?

… नवाल्नी मॉस्कोला जायला निघाला. नवाल्नीचं विमान नियोजित ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच वळवण्यात येऊन त्याला दुस ऱ्या विमानतळावर उतरवण्यात आलं आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक जुने-नवे खटले सुरू करण्यात येऊन त्याचा तुरुंगवास सुरू करण्यात आला. मग एका तुरुंगातून दुस ऱ्या तुरुंगात अशा चक्रात त्याला अडकवून ठेवलं गेलं. डिसेंबर २०२३ मध्ये त्याचा मित्रपरिवाराशी संपर्क तुटला. ब ऱ्याच चौकशांनंतर तीन आठवड्यांनी त्यांना कळलं की त्याला रशियातील सर्वात कराल मानल्या जाणा ऱ्या सैबेरियातील ‘खार्प’मधल्या तुरुंगात ठेवण्यात आलं. हा तुरुंग रशियामध्ये मृत्यूचा जबडा म्हणून ओळखला जातो. तिथे असताना त्याच्यावर व्हिडीओवरून खटला चालवला गेला. तो खटला चालवण्यासाठी- दंडासाठीदेखील त्याच्याकडे पैसे नव्हते म्हणून त्यानं न्यायाधीशांकडेच पैशांची मागणी केली. दुस ऱ्या दिवशी तो मृत झाल्याचं जाहीर करण्यात आलं. तारीख होती १६ फेब्रुवारी २०२४!

मग काही ठिकाणी निषेध केला गेला, काही ठिकाणी मूक निदर्शनं केली गेली. निवडणुकादेखील कधीतरी होतील. श्रद्धांजली मात्र ब ऱ्याच ठिकाणी वाहण्यात येत आहे.

Story img Loader