संपादक आणि प्रकाशकाला दृष्टी असण्याच्या आणि त्याच्या मताला किंमत असलेल्या काळापासून डॉ. रामदास भटकळ हे महत्त्वाचे प्रकाशक. साठोत्तरीतील महत्त्वाच्या लेखकांना घडविण्यापासून अनुवाद सुविधा केंद्रांची स्थापना करण्यापर्यंत कित्येक गोष्टी त्यांच्या नावावर आहेत. आज (५ जानेवारी) नव्वदाव्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या कार्याला उजाळा…

मराठी तसेच इंग्रजी ग्रंथव्यवहारात मानाचे स्थान मिळविलेल्या आणि शंभरीत पोचलेल्या ‘पॉप्युलर प्रकाशन संस्थे’शी जन्मत:च नाळ जुळलेले ज्येष्ठ प्रकाशक आणि मर्मज्ञ लेखक, नाटककार व गायक डॉ. रामदास भटकळ आज वयाची नव्वदी पूर्ण करताहेत. नव्वद वर्षांचं सर्वार्थानं परिपूर्ण आयुष्य जगणाऱ्या आणि साहित्य, संगीत व कला क्षेत्रात महत्त्वाचं योगदान असणाऱ्या भटकळसरांना मन:पूर्वक शुभेच्छा.

Loksatta lokrang Love Pictures Poet Relationship PWD Engineer
अन्यथा.. स्नेहचित्रे : अजंठ्याची पुसट रेषा…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Mumbai Suburb, Mumbai Suburb Nature, Congestion ,
शांत काळोखाचे तुकडे
cyber crime
सायबर सुरक्षाकवच
Solutions to achieve educational goals by inculcating interest in learning
सांदीत सापडलेले…!: उपाय
mazhi maitrin
माझी मैत्रीण: फासला दोनों से मिटाया ना गया…
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
article about donald trump strategy to win us presidential election 2024
प्रचारात लोकांचे मुद्दे हरले, ट्रम्प जिंकले!

भटकळसरांची आणि माझी पहिली ओळख झाली ती ‘साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट’नं २००२ मध्ये रायगड जिल्ह्यातील माणगाव जवळील लोणेरे येथे घेतलेल्या पहिल्या ‘साहित्य संवादाच्या’ वेळी. त्याआधी कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात त्यांना लांबून पाहिलं होतं. पण साहित्य क्षेत्रातील त्यांचं स्थान, प्रकाशक म्हणून असलेला त्यांचा दबदबा यामुळे त्यांच्याशी थेट बोलण्याचं धाडस केलं नव्हतं. ‘साहित्य संवाद’ नंतर झालेल्या श्रमपरिहाराच्या बैठकीत मात्र त्यांना स्वत:हून भेटले, ओळख सांगितली तेव्हा ते म्हणाले, ‘ओळखतो तुला, चांगलं लिहितेस’ म्हणून कौतुक केलं आणि आपोआपच आमच्यातली औपचारिकता संपली आणि एक ज्येष्ठ सुहृद कायमचा आय़ुष्यात आला.

त्या बैठकीत भटकळसरांनी साने गुरुजींची आंतरभारतीची संकल्पना पुढे नेण्यासाठी स्मारकानं अनुवादकांना सुविधा देणारं ‘अनुवाद सुविधा केंद्र’ काढावं ही सूचना केली होती आणि साने गुरुजी स्मारकाचे संस्थापक सदस्य असलेले गजानन खातू आणि अध्यक्ष ज्येष्ठ कवी अर्जुन डांगळे वगैरे मंडळींनी ती उचलून धरली. साने गुरुजींनी मांडलेला आंतरभारतीचा विचार पुढे न्यायचा असेल तर भारतीय भाषांतील साहित्य, तत्त्वज्ञान, वैचारिक लेखन यांचं आदानप्रदान व्हायला हवं आणि त्यासाठी सर्व भाषांत पूल तयार झाला पहिजे आणि तो पूल तयार करायचा असेल तर अनुवादाशिवाय पर्याय नाही असं त्यांना वाटत होतं. त्यासाठी स्मारकानं ‘आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र’ स्थापण्याचा विचार केला आणि वीस वर्षांपूर्वी अनुवाद सुविधा केंद्राची स्थापना झाली. त्याचे पहिले अध्यक्ष अर्थात डॉ. रामदास भटकळच होते. अनुवाद सुविधा केंद्र स्थापन झाल्यानंतर त्यांच्यासोबत जे लोक काम करत होते त्यांत ज्येष्ठ नाट्य समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे, प्र. ना. परांजपे, कवयित्री उषा मेहता, पत्रकार व लेखक सुनील कर्णिक अशा अनेक लोकांमध्ये माझाही समावेश झाला आणि पुढील वीस वर्षांत आम्ही अनुवाद सुविधा केंद्राला वाहून घेतलं. या काळात भटकळसरांशी भेटी वाढू लागल्या. सतत नावीन्याचा ध्यास घेतलेल्या या गृहस्थाच्या डोक्यात किती विविध कल्पना येत असतात आणि त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी ते त्याचा कशा प्रकारे पाठपुरावा करत असतात हे त्या काळात पाहायला मिळालं. भटकळसरांबरोबर काम करण्याचा आनंद वेगळाच होता. अनुवाद सुविधा केंद्राचं काम करताना साहित्य क्षेत्रातील अनेक दिग्गजांचा सहवास लाभला. हळूहळू ‘मायमावशी’चं संपादन आणि अनुवाद सुविधा केंद्राचं कार्याध्यक्षपदही माझ्याकडं आलं आणि त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकत गेले. हा सगळा काळ त्यांच्याबरोबर राहण्याचा, वेगवेगळ्या संकल्पांचं साक्षीदार होण्याचा काळ होता. चांगले अनुवादक घडावेत म्हणून आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राच्या वतीनं अनुवाद कार्यशाळा घेणं, अनुवादकांना कायम मार्गदर्शन मिळावं म्हणून ‘मायमावशी’सारखं केवळ अनुवादाविषयी बोलणारं षण्मासिक सुरू करणं आणि उत्तम अनुवादाला जांभेकर पुरस्कार देण्यासाठी विंदा करंदीकरांसारख्या कवीशी बोलणं आणि विंदानीही अगदी उदार मनानं ज्ञानपीठ पुरस्काराच्या रकमेतले पैसे त्यासाठी देणं अशा मराठी साहित्य आणि अनुवादाच्या कामासाठी भटकळसरांनी केलेल्या साऱ्या प्रयत्नांची मी साक्षीदार झाले. आजही रामदास भटकळ या संस्थेच्या सल्लागारपदी कार्यरत आहेत. अर्थात अनुवाद सुविधा केंद्रांची स्थापना ही त्यांच्या अनेक कल्पनांतील प्रत्यक्षात आलेली एक गोष्ट आहे. रामदास भटकळ हे व्यक्तिमत्त्व यापलीकडचं आहे.

मी लिहायला लागले त्या काळात मौज, पॉप्युलर, मॅजेस्टिक, लोकवाङ्मयगृह अशा काही प्रकाशन संस्थाचा साहित्य विश्वात खूप बोलबाला होता. आणि यातील श्री. पु. भागवत आणि रामदास भटकळ या दोन प्रकाशकांच्या नावांचाही दबदबा होता. या प्रकाशकांची मेहरनजर व्हावी आणि आपलं पुस्तक मौजेनं किंवा पॉप्युलरनं स्वीकारावं असं स्वप्नं चांगलं लिहिणारा लेखक पाहत असे. प्रकाशकांना पैसे देऊन पुस्तकं काढण्याचे ते दिवस नव्हते. त्यामुळे प्रकाशकाच्या आत लपलेल्या चांगल्या वाचकाची आणि समीक्षकाची मोहर आपल्या लेखनावर उमटावी आणि ती उमटली तर आपण लिहितोय ते वेगळं, चांगलं, साहित्यव्यवहारात भर टाकणारं असेल याची खात्री लेखककवींना वाटत असे.

संपादक आणि प्रकाशकाला दृष्टी असण्याच्या आणि त्याच्या मताला किंमत असण्याच्या दिवसांतले रामदास भटकळ हे महत्त्वाचे प्रकाशक आहेत. आपल्या कुटुंबातून आणि वडिलांकडून लाभलेल्या प्रकाशन संस्थेचा संपन्न वारसा जपतानाच मराठीवरील प्रेमाखातर १९५२ पासून स्वतंत्र मराठी प्रकाशन विभाग त्यांनी सुरू केला आणि मराठीतील दर्जेदार लेखनाचा सातत्यानं शोध घेत राहिले. पॉप्युलर प्रकाशनानं काढलेल्या पुस्तकांवर एक नजर टाकली तरी लक्षात येतं की, मराठीतील उत्तमोत्तम लेखककवींची पुस्तकं या प्रकाशनानं काढली आहेत. मामा वरेरकर, वसंत कानेटकर, वि. वा शिरवाडकर, विजय तेंडुलकर यांच्यापासून ते धर्मकीर्ती सुमंत, मकरंद साठे, प्रशांत दळवी अशा अनेक नाटककारांच्या नाट्यसंहिता त्यांनी प्रकाशित केल्या. कथाकार जी. ए. कुलकर्णी, अरविंद गोखले, गंगाधर गाडगीळ, तारा वनारसे, दुर्गा भागवत, कवी कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, ग्रेस, नारायण सुर्वे, ना. धों. महानोर, सदानंद रेगे, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, पुरुषोत्तम पाटील, केशव मेश्राम, प्रभा गणोरकर यांच्यापासून ते आजच्या पिढीचे महत्त्वाचे कवी सौमित्र, दासू वैद्या, प्रज्ञा दया पवार हे पॉप्युलर प्रकाशनाचे लेखककवी म्हणूनच पुढे आले. ‘नवे कवी नव्या कविता’ या मालिकेत उत्तमोत्तम कवींचे काव्यसंग्रह त्यांनी प्रकाशित केले. प्रकाशक म्हणूनच खऱ्या अर्थानं मराठी साहित्यविश्वात चांगल्या पुस्तकांची भर पडावी, त्यावर चर्चा व्हावी असे लेखक आणि त्याची पुस्तकं यांच्या शोधात रामदास भटकळ कायम होते. प्रकाशकाचं काम ते पाहत होते त्या काळातील व त्यानंतरच्या कळातीलही पॉप्युलर प्रकाशनानं निवडलेल्या लेखककवींच्या नावांवर नजर टाकली तरी आपल्या लक्षात येतं की मराठीतील अत्यंत महत्त्वाचे लेखक त्यांनी प्रकाशित केले. आणि या प्रत्येकाची लिहिण्याची शैली, लेखनाचा पोत, भाषा, संरचना, तंत्र वेगवेगळं होतं. एक प्रकाशक म्हणून डॉ. रामदास भटकळ यांनी मराठी साहित्यविश्वाला ज्ञानपीठ मिळवून देणारे तीन दर्जेदार लेखक दिलेच, पण आपल्या सगळ्याच लेखकांशी प्रकाशक या नात्यानं जिव्हाळ्याचे संबंध ठेवत त्यांच्याशी एक कौटुंबिक नातंही निर्माण केलं.

उत्तम साहित्याची दृष्टी असणाऱ्या रामदास भटकळांनी स्वत:ही उत्तम साहित्यनिर्मितीही केली. राज्यशास्त्राचे व कायद्याचे पदवीधर असलेल्या रामदास भटकळ यांच्यात एक संवेदनशील आणि सर्जनशील माणूस तसेच लेखक-कलाकार लपलेला आहे. त्यामुळेच ते जेवढा रस पुस्तक प्रकाशनामध्ये घेतात तेवढाच रसं लेखनात आणि गायनातही घेतात. त्यांनी लिहिलेल्या जिगसॉ, जिव्हाळा, मोहनमाया, जगदंबा या पुस्तकांवर नजर टाकली तर लक्षात येतं की रामदासांना रस आहे तो माणसांमध्ये, त्यांच्या स्वभावविशेषात, त्यांच्या जगण्यात आणि त्यांच्या जगण्याच्या वेगवेगळ्या तऱ्हांमध्ये. विविध क्षेत्रातील दिग्गजांशी असलेले त्यांचे स्नेहपूर्ण भावबंध त्यांच्या लेखनातून कायम उलगडले गेले. ‘जिगसॉ’, ‘जिव्हाळा’ आणि ‘जिज्ञासा’ यांसारख्या पुस्तकांतून आपल्या आय़ुष्याच्या प्रवासात भेटलेल्या अनेक संवेदनशील व्यक्तींवर तेवढ्याच संवेदनशीलतेने आणि आत्मयीतेनं त्यांनी लिहिलं आहे.

महात्मा गांधी हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा आणि प्रेमाचा विषय. ‘गांधी अँड हिज अँडव्हर्सरीज’ या विषयावर त्यांनी संशोधन केलं. त्याबद्दल त्यांना पीएच.डी मिळालेली आहे. मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेत त्यांनी गांधीयन फिलॉसॉफी या विषयावर अध्ययनही केलं आहे. त्यांचं ‘मोहनमाया’ हे गांधीवरील पुस्तक सर्वश्रुत आहेच, पण कस्तुरबांवर लिहिलेलं ‘जगदंबा’ हे नाटकही खूप गाजलं. आजच्या काळात गांधींना वैचारिकदृष्ट्या संपवण्याचा आणि त्यांना मारणाऱ्यांचं उदत्तीकरण करण्याचा प्रयत्न चालला असताना, महात्मा गांधी आणि त्यांचे विचार जिवंत ठेवण्याचा नेटाने प्रयत्न करणाऱ्या लेखकांतील रामदास भटकळ हे एक महत्त्वाचे लेखक आणि अनुवादक आहेत.

गांधी विचारांशी ठामपणे उभे राहणारे रामदास भटकळ त्या विचारांवर भरभरून बोलत असतात. ‘इंडियन होम रूल’ या महात्मा गांधीनी लिहिलेल्या पुस्तकाचा ‘हिंद स्वराज’ या नावाने अनुवादही त्यांनी केला आहे. महात्मा गांधी आणि त्यांच्या विचारांवर प्रेम असलेले रामदास भटकळ म्हणूनच कायम राजकीय भूमिका घेत राहिले. आजच्या बदललेल्या सामाजिक आणि राजकीय वास्तवाविषयीची चिंता ते व्यक्त करतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं मूल्य जपणारे भटकळसर त्याचा उच्चार वारंवार करतात.

प्रकाशक, लेखक, विविध संस्थांचे अध्यक्ष, अनुवादक अशा भूमिका पार पाडणारे रामदास भटकळ उत्तम गायकही आहेत. शब्दांबरोबर सुरांची भूल पडलेल्या भटकळांनी त्यांचे मामा पंडित चिदानंद नगरकर यांच्यामुळे संगीताचे धडे घेतले. भारतीय संगीत शिक्षापीठात त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले होते, पण पुढे त्यात खंड पडला. संगीतविषयक पुस्तकांचं प्रकाशन करण्यानिमित्तानं त्यांचा अनेक संगीतकार, गायक यांच्याशी संपर्क वाढला आणि त्यातून पुन्हा संगीताकडे वळण्याची इच्छा त्यांना झाली. आणि हा छंद त्यांनी जोपासावा म्हणून मुलगा सत्यजित भटकळ याने त्यांना पुन्हा एकदा संगीताकडे वळण्याचा सल्ला दिला. पंडित एस. सी. आर. भट यांच्याकडे जवळजवळ अठ्ठावीस वर्षं शास्त्रीय संगीताची तालीम घेतलेल्या रामदास भटकळांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठान, केशवसुत स्मारक, मालगुंड अशा अनेक ठिकाणी संगीत मैफिलींना सुरुवात केली आणि आपलं गाणं देशविदेशातही नेलं. जे काम करायचे ते मन लावून, पूर्णपणे त्या गोष्टीला वाहून हा स्वभाव असल्यानेच रामदास भटकळ उतारवयातही आपली ही आवड जोपासू शकले. लेखन, अनुवाद आणि प्रकाशन यांबरोबरच संगीतातील त्यांची साधना म्हणूनच महत्त्वाची वाटते.

एक नि:स्पृह प्रकाशक आणि दर्जेदार लेखक म्हणून मराठी रसिक वाचकांनी व शासनादी संस्थांनी त्यांची दखल घेतली आहे. आजवर ते अनेक पुरस्कारांनी सन्मानित झाले आहेत. महाराष्ट्र शासनाचा पहिला ‘श्री. पु. भागवत पुरस्कार’ त्यांना मिळाला आहे. भाषांतरीत पुस्तकांच्या प्रकाशनासाठी त्यांना ‘वर्णमाला’ या संस्थेचा ‘प्रकाशनभारती’ हा पुरस्कारही मिळालेला आहे. औरंगाबाद येथे झालेल्या मराठी प्रकाशक संमेलनाचे ते अध्यक्षही झाले आहेत. महाराष्ट्र फाऊंडेशन, अमेरिका यांनी त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानितही केले आहे.

एकूणच मराठी प्रकाशनविश्वात आणि साहित्यविश्वात ज्या माणसाचं नाव आदरानं घेतलं जातं अशा या माणसानं वयाची शंभरी पूर्ण करावी आणि आजच्या कठीण काळात गोंधळलेल्या तरुणाईला मार्गदर्शन करत राहावं हीच आज माझ्यासारख्या प्रत्येकाची भावना आहे. शंभरीसाठी रामदास भटकळसरांना मन:पूर्वक सदिच्छा.

nrajan20@gmail.com

Story img Loader