‘लोकरंग’ (३१ डिसेंबर) मधील महेश सरलष्कर लिखित ‘हिंदूंच्या राजकीय पर्यटनाचा आरंभ’ या लेखावरील निवडक प्रतिक्रिया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केवळ राजकीय फायद्यासाठी रामनवमीची तिथी टाळून २२ जानेवारीच्या मुहूर्तावर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. धर्म आणि राजकारण यांची सांगड घालून, जनमताचा कौल आपल्या बाजूने वळविण्यासाठी, व्यूहरचनेचा आराखडा अमलात आणण्यात केंद्र आणि राज्य सरकारने बाजी मारली असली तरी सत्तेचे महाद्वार उघडण्याची सुत‘राम’ शक्यता नाही. रामाच्या नावावर जनमनाच्या नौकेवर स्वार होता येईलही, पण गोरगरिबांच्या पोटात शिरता येणार नाही. मोठमोठाले पूल, रस्ते, मॉल, विमानतळे, सुसाट धावणाऱ्या रेल्वे आणि आकर्षक नामाधिमान करून, मतदारांच्या हृदयावर अनभिषिक्त राज्य करता येत नसते. त्यासाठी शिक्षण आणि हाताला काम द्यावे लागते, गरिबीचे उच्चाटन आणि महिलांचे उत्थान करावे लागते. २२ जानेवारीला दीपोत्सव साजरा करण्याचे केलेले आवाहन म्हणजे धर्म आणि राजकारण यांचे उत्तम गुणोत्तर असावे.

-डॉ. नूतनकुमार सी, पाटणी

देशाच्या समस्यांकडे दुर्लक्ष

रामाचे महत्त्व छोटया देवळांतही होते, आहे आणि त्याची कित्येक हजार कोटी खर्च करून भव्यदिव्य मंदिरात प्रतिष्ठापना करून लोकांची श्रद्धा बदलेल असे नाही. अयोध्येचे रेल्वे स्टेशन खूप अद्ययावत केले गेले आहे, जे सहजासहजी झाले नसते. आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ बांधले गेले आहे ते सर्वसामान्यांसाठी खरेच उपयुक्त आहे का? ४० फुटांचा रस्ता ८० फुटांचा केला गेला आहे. त्यासाठी दुकानदारांना नुकसानभरपाई देऊन त्यांना छोटी दुकाने थाटून गुजराण करावी लागत आहे. जेव्हा आरबीआयचा अहवाल वाढलेल्या कर्जाची धोक्याची सूचना देत असताना! स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना पाडयांत राहणाऱ्या आदिवासींपर्यंत कोणत्याही सुविधा पोहोचलेल्या नाहीत. राजकारणाची दिशा काही तरी एकच भव्य करून जनतेचे डोळे दिपवून टाकून देशाच्या समस्यांकडे सर्वसामान्यांचे दुर्लक्ष कसे होईल याकडे चालली आहे.

-नीता शेरे, दहिसर

अन्य सुविधांचे आव्हान असेल

या लेखातून अयोध्येची सद्यपरिस्थिती जाणून घेता आली. रेल्वे स्टेशन जरी विमानतळासारखे निर्माण केले असले तरी अयोध्येतल्या गल्लीबोळांना हायवेचा दर्जा मिळणार नाही हे निश्चित. अयोध्येला जर पंचतारांकित राजकीय पर्यटनाचा दर्जा बहाल करायचा असेल तर रुंद रस्ते, पंचतारांकित निवास व इतर सुविधा निर्माण करण्याचे आव्हान स्थानिक प्रशासनाला स्वीकारावे लागेल. नाही तर अयोध्येची ‘धार्मिक राजकीय सत्ता’ पुन्हा गल्लीबोळातच अडकलेली पाहायला मिळेल.

– धनराज खरटमल, मुलुंड

‘राम’ भाजपलाच पावणार?

रामजन्मभूमी अयोध्या आणि तेथील आताच्या भव्यदिव्य मंदिराचे आकर्षण भारतातील सर्वच हिंदूंना- भले मग ते कोणत्याही राजकीय पक्षांत असोत- आहे. राम मंदिर उभारणीत बाबरी मशीद हाच मुख्य अडसर होता, तोच नाहीसा झाल्याने मंदिर उभारणे तसे सोपे झाले. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजप राम मंदिराचा मुद्दा प्रामुख्याने उचलणार आणि त्याचा फायदा भाजपला झाल्याशिवाय राहणार नाही, ही काळया दगडावरची रेघच समजा!  – बेंजामिन केदारकर