‘लोकरंग’ (७ जानेवारी) मधील ‘आठवणींचा सराफा’ या सदरात स्वानंद किरकिरे यांचा ‘मी मराठी.. माळव्याचा!’ हा लेख वाचला. या लेखात त्यांनी इंदौरमधील वैशिष्टय़पूर्ण लोकजीवनाचा घेतलेला आलेख खूप छान! गेल्या दोन वर्षांत तीनवेळा धार्मिक पर्यटनाच्या निमित्ताने इंदौर, उज्जैनला जाणे झाले. इंदौरमधील स्वच्छता कौतुक करण्यासारखी असून त्यासाठी अनेक वर्षे या शहराला पुरस्कार मिळत आहे. येथील खाऊगल्ली, आता नवीन झालेले इंदौर ५६, येथील लोकांची नम्रतापूर्ण वागणूक सारे काही छान वाटते. त्यामुळे पुन्हा एकदा इंदौरला केव्हा जायला मिळेल याची वाट पाहत असतो. –प्र. मु. काळे, नाशिक

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडली

‘लोकरंग’ (३१ डिसेंबर)मधील माधव गाडगीळ यांचा ‘गजराजाचा पहावा प्रताप’ हा लेख वाचला. लेखकाने या अभ्यासपूर्ण आणि अनुभवसंपन्न लेखात अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले, ते खूप भावले. स्वीडन, नॉर्वे देशांप्रमाणे आता आपणही वन्यजीवविषयक धोरण ठेवायला हवे, हे पूर्णत: पटते. मी अमरावती जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबातील आहे. आमची शेती आहे. आज शेतकऱ्यांना हत्ती, गवे, रानडुकरे, हरिण, नीलगायी (विदर्भात रोही म्हणतात), वानरे यांचा प्रचंड उपद्रव होतो. या प्राण्यांच्या उपद्रवामुळे विदर्भातील कॉर्प पॅटर्न पूर्णत: बदलावा लागला. ज्वारी, बाजरी, मग, उडीद, चवळी, जवस यांसारखी पिके आता घ्यायची पूर्णत: बंद झाली. वन्यजीवांमुळे केवळ विदर्भातच वर्षांला शंभराच्या वर माणसे प्राणास मुकल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांतून येतात. प्रत्यक्षात किती लोक जीव गमावत असतील देव जाणे!

यंदा डुकरांनी आमच्या शेतातील तुरीचे जवळपास १० क्विंटल इतके नुकसान केले. रु. ७०,०००/- फस्त! यामुळे रात्रंदिवस राखणदारीचा खर्च वाढला तो वेगळा. डुकरे पेरलेले दाणेसुद्धा उकरून खातात, नासधूस करतात. तसेच हरणांचे कळप उगवलेली कोवळी रोपे फस्त करतात. त्यामुळे पेरणीनंतर किमान महिनाभर शेतात रात्रंदिवस राखण ठेवणे भाग पडते. डुकरे तर तारेच्या कंपाऊंडखालून शेतात घुसतात आणि हरिण त्यावरून उडय़ा मारून नासधूस करतात. मी कोल्हापूर जिल्ह्यात होतो. तेथील राधानगरी धरणाच्या परिसरातील शेकडो एकर जमीन मला पडीक दिसली. चौकशी केल्यावर कळले की, रानगव्यांच्या उपद्रवामुळे हे घडले. आज शेतकरी उद्ध्वस्त होण्यामध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव हा एक महत्त्वाचा घटक आहे. तरीही शासनकर्ते याकडे अजिबात लक्ष देत नाही. शेतकरी संघटनासुद्धा हा मुद्दा रेटण्यात कमी पडतात. लेखकाने या विषयाला आपल्या शास्त्रीय अध्ययनातून, अनुभवातून वाचा फोडली, याबद्दल त्यांचे आभारच मानावे लागतील.-डॉ. अरुण मानकर, नागपूर</strong>

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lokrang readers respond readers opinion letter amy