‘लोकरंग’ मधील (२०ऑगस्ट) ‘कण.. कण.. हत्या’ हा सुनीती सु. र. यांचा लेख वाचला. वाराणसीतील गांधी विद्या संस्थान या ऐतिहासिक वास्तूच्या संरक्षणासाठी केलेले शांतता मार्गाचे सर्व प्रयत्न हाणून पाडले व सरकारने ही वास्तू उद्ध्वस्त केली हे वाचून अतीव दु:ख झाले. अशा वास्तू या त्या त्या देशाचे सांस्कृतिक वैभव असतं. परदेशात अशा वास्तूंचं काळजीपूर्वक सरंक्षण केलं जातं व आपल्या देशात व्यावसायिकीकरणासाठी अशा वास्तूंचं अस्तित्व संपवलं जातं हे अतिशय चीड आणणारं आहे. लोकशाही मार्गानं केलेल्या आंदोलनाचा कोणताही परिणाम झाला नाही म्हणून प्रश्न पडतो- खरंच आपण लोकशाही राष्ट्रात राहात आहोत का? – दीपक मराठे, भडगाव.
भयावह भविष्याची नांदी
‘लोकरंग’ मधील (२०ऑगस्ट) ‘कण.. कण.. हत्या’ हा सुनीती सु. र. यांचा लेख वाचून डोळे भरून आले. देशातील उजव्या विचारांच्या अनधिकृत झुंडशाहीच्या जोडीनं आता ही शासकीय अधिकृत झुंडशाही सुरू झाली आहे, असंच म्हटलं पाहिजे. सत्तेच्या जोरावर आपल्याला हवा तसा न्याय, तोही विनाविलंब पदरात पाडून घेणं हे सरकारचं मोठंच हत्यार झालं आहे. किंबहुना या प्रकारच्या ‘बुलडोझर जस्टिस’साठी लोकशाहीप्रणीत न्यायालयांची गरजच नाही. त्यांच्या न्यायनिवाडय़ाची वाट पाहण्यासाठी वेळ आहेच कुणाकडे? महात्म्याचा सद्विचार जतन करण्यासाठी तितक्याच सद्विचारी लोकांनी निर्माण केलेलं गांधी विद्या संस्थानसुद्धा उद्ध्वस्त केलं जाऊ शकतं, तेही स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत, ही घटना सहिष्णू भारत आता किती असहिष्णू झाला आहे, हेच दाखवून देतं. देशाचे अत्युच्च नेतृत्व गांधी प्रतिमेला वंदन करतं, हा गांधींचा देश, लोकशाहीची जननी वगैरे जगभर सांगत फिरतं. प्रत्यक्षात मात्र गांधींचा द्वेष सुरू आहे, हा केवढा विरोधाभास! हा द्वेष भविष्यात कोणत्या थराला जाईल, याची कल्पना करताना भीतीने छाती दडपून जाते. पंतप्रधानांनी ‘मेरी माटी’ गोळा करताना या उद्ध्वस्त केलेल्या संस्थानाचीही माती घ्यावी म्हणजे ‘मेरा देश’ कुठं चालला आहे, हेही जगाला समजेल. अखेर गांधीद्वेषाचे केवळ गांधींचे देशावरील उपकार मानणारे किंवा लोकशाही मानणारेच बळी ठरतील असे नव्हे, तर साऱ्या देशालाच भयावह भविष्याला सामोरे जावे लागेल, अशी सार्थ भीती वाटते. – प्रा. अनिल फराकटे, गारगोटी.
भयावह स्थिती
‘लोकरंग’ मधील (२०ऑगस्ट) ‘कण.. कण.. हत्या’ हा सुनीती सु. र. यांच्या लेखातील माहिती भयावह आहे. मी नियमितपणे वर्तमानपत्र वाचत असतो. पण त्यावेळी या घटनेची भयानकता तेवढी जाणवली नाही. या लेखामुळे ती तीव्रपणे जाणवली. या लेखामुळे या शासनकर्त्यांविषयी एक तीव्र सणक डोक्यातून जाते. हे भीषण वास्तव वाचकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल आभार.- यशवंत करंजकर