देश, राष्ट्र, प्रजासत्ताक अशा भारदस्त शब्दांचा संकल्पनात्मक अर्थ नीट कळेपर्यंत ‘आपण भारत नावाच्या देशात राहतो आणि इथे जे काही बरं-वाईट चाललं आहे त्याबद्दल आपण आपलं मत मांडू शकतो – इथपर्यंतची मुभा तरी आपल्याला आहे.’ असं प्रजासत्ताकाच्या पहिल्या काही वर्षांच्या दर्शनाचं माझं आकलन होतं. आणीबाणी संपायच्या एक महिना आधी जन्माला आल्यानंतर पुढे २००० पर्यंतच्या पाव शतकात आणि त्यापुढे आजवरच्या २५ वर्षांत आपण कसे घडलो-बिघडलो आणि ‘प्रजासत्ताक’ आपल्याला कसं दिसत गेलं हा अर्थातच बरेच ताणे-बाणे असणारा विषय आहे. आपलं जगणं कसं होतं आणि कसं बदलत गेलं यावर काही बोलता येणं शक्य असलं तरी कवी-गीतकार इर्शाद कामिलला वाटते ती भीती मलाही वाटते- ‘जो भी मैं कहना चाहूँ, बरबाद करे अल्फाज मेरे!’ तरी प्रयत्न करतो.
आणीबाणीत १९७५-७६ दरम्यान काही महिने माझे वडील तिहार तुरुंगात होते. त्याआधी १९७४ मध्ये काही दिवस मुजफ्फरपूर तुरुंगातही होते. घरात गांधी, विनोबा आणि जेपी ही तीन नावं आणि त्यांचे प्रतिध्वनी कायम घुमत असायचे. घर अर्थातच स्वतःचं नव्हतं. त्या काळात सर्वव्यापी असणारा ‘अतिमध्यमवर्ग’, ‘चाळ’ नावाच्या एका सर्वव्यापी गृहरचनेत राहत असे. भिवंडी शहरात आम्हीही अशाच एका रचनेत राहत होतो… पावसाळ्यात घरात येणारं पाणी, ते बाहेर काढणारी आई आणि घरात नसलेले वडील हे आठवतं. आईदेखील सर्वव्यापकच होती. कुटुंबाबरोबरच चाळ नावाच्या रचनेतले परस्परसंबंध आणि एकूणच या रचनेचं गतिशास्त्र याची मुख्य काळजी तीच वाहायची. जयप्रकाश नारायण आणि विनोबा भावे यांच्यात नक्की काय मतभेद झाले होते या तपशिलात जाण्यापेक्षा आईने रेशनच्या रांगेत उभं राहायला सांगितल्याचं जास्त लक्षात राहत होतं. (देशाला ‘माता’ म्हणणं कधीकधी फारच प्रस्तुत वाटतं!) १९८३चा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून देणारा सामना, १९८४ सालच्या मे महिन्यातल्या भिवंडी दंगलीत संचारबंदी लागलेली असताना पोलिसांनी काही जणांना दिलेले फटके, त्याच वर्षी जून महिन्यात अमृतसरला झालेलं ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’, नंतर ऑक्टोबरमध्ये झालेली इंदिरा गांधींची हत्या, १९८५ च्या बेन्सन अँड हेजेस चॅम्पियनशिपमध्ये रवी शास्त्रीने त्याला मिळालेल्या ऑडीतून टीममधल्या इतर खेळाडूंना घेऊन मारलेली चक्कर ही आठवणीतली काही पहिलीवहिली दृश्यं आहेत – शेजाऱ्यांच्या टीव्हीवर पाहिलेली. टीव्ही बघायला शेजारी जाणं यात प्रबळ इच्छा आणि नामुष्की दोन्हीचं मिश्रण असायचं. ‘शेजारी’ ही कुटुंबसंस्थेसारखीच एक मजबूत संस्था होती. केवळ घरं वेगळी असायची इतकंच.
भिवंडी आणि यंत्रमाग हे एक अद्वैत आहे. यंत्रमागाच्या त्या आवाजाची साथ शुक्रवार सोडता कायम असायची. शुक्रवारी वीज नसणं हा जणू कायदाच आहे अशी आमची समजूत होती. अर्थात इतर दिवशीही वीज जायचीच. मुळात वीजपुरवठा हा माणसांकडून नव्हे तर ईश्वराकडूनच ‘मॅनेज’ होतो, त्यामुळे तो देईल त्यात सुखी असावं अशी एकूण मानसिकता होती. तेव्हाचं हे छोटं औद्योगिक शहर, तिथली अठरापगड वस्ती, आणि तरी कुठे कधी स्पष्ट तर कधी अलिखित असं जाती-धर्मनिहाय विभाजन हा अंगवळणी पडलेला भाग होता. ब्राह्मण आळी, वाणी आळी अशी स्पष्ट नावं होती तर भय्ये, अंडुगुंडू (पक्षी : दाक्षिणात्य) यांचा ‘एरिया’ होता. मुसलमान एरियाही होता. ‘दाक्षिणात्य’ याचा विस्तार ‘मद्रासी’ इतकाच होत होता. दक्षिणेत आंध्र, केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडू असे चार भाषक गट आहेत इतका विचार होत नव्हता. पण एक गोष्ट मात्र नोंदवलीच पाहिजे की जातनिहाय किंवा धर्मनिहाय विभागणी असली तरी तो दैनंदिन जगण्यात अस्मितेचा वगैरे विषय कधीच झाल्याचं आठवत नाही.
मध्यमवर्गीय भवतालाचा जो परिणाम होतो तो होतच होता; पण दैनंदिन कक्षेबाहेरच्या गोष्टीही परिणाम करतच होत्या. जगण्याचे संदर्भ मुळात सामाजिक-आर्थिक-राजकीय असेच असतात. तुम्ही थेटपणे त्यात गुंतलेले नसलात तरी. त्यामुळे काही गोष्टी थेटच आघात करायच्या. यंत्रमाग कामगारांची वस्ती ही त्यातली एक. बहुतांश सगळे उत्तरेतून आलेले. एका छोट्या खोलीत तिघे-चौघे राहत असत. कुटुंब तिकडे – ‘मुलुकात’. (पक्षी : उत्तर प्रदेश). तिथेच स्वयंपाक करत. इतर गरीब वस्त्या, सार्वजनिक अस्वच्छता, रस्त्यावर होणारी नवरा-बायको आणि इतर भांडणं, मारामाऱ्या या सगळ्या गोष्टींकडे बघताना त्या वेळी आघात झाले तरी बहुधा त्या वयात मन जास्त लवचीकही असतं. कारण व्यक्तिगत इच्छा-आकांक्षा वरचढ ठरत असतात. पुढे मात्र साहिर लुधियानवीसारखा ‘जिन्हें नाज है हिंद पर वो कहाँ है’ हा उद्वेग बरेचदा मनातून बाहेर पडला.
विशीत आल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी आणि त्यांचं १६ दिवसांचं सरकार, मग इंद्रकुमार गुजराल, पुन्हा वाजपेयी, पोखरण अणुचाचणी, नंतर ‘शायनिंग इंडिया’ कँपेन आणि मग मनमोहन सिंग असा एक ढोबळ प्रवास लक्षात राहिला. मनमोहन सिंगांची पगडीधारी, चष्मा लावलेली, काळा सूट किंवा पांढरा कुर्ता घातलेली, हात जोडून पुढे येणारी आकृती डोक्यात बसली आहे. त्यांचं अर्थमंत्री म्हणूनचं आणि पुढे पंतप्रधान म्हणूनचं कर्तृत्व समजण्याइतकी – त्याची प्रशंसा किंवा टीका करण्याइतकी – कुवत तेव्हा नव्हतीच. पण पंतप्रधानपदावरचा मनुष्य निश्चितच काहीतरी थोर बौद्धिक सामर्थ्याचा असणार म्हणूनच तो पंतप्रधान झाला आणि तो काय करतो त्यात आपण कशाला पडा, आपल्याला त्यातलं काय कळतंय असं एक साधारण गृहीतक होतं. (आपल्याला कोका-कोला प्यायला मिळायला लागला त्याला मनमोहनसिंग जबाबदार होते हे नंतर कळू लागलं).
‘वक्त का तकाजा’ म्हणतात तसा एकेका वयाचा तकाजा असतोच. त्यामुळे १९९१ साली आलेल्या आर्थिक उदारीकरणाने नक्की काय होईल याचा विचार करण्यापेक्षा १९९२ साली आलेल्या मणीरत्नमच्या ‘रोजा’ नामक चित्रपटातलं ‘चिन्ना चिन्ना आसै’ (हिंदीत ‘छोटीसी आशा’) हे गाणं ऐकून ए. आर. रहमान या नव्या दमाच्या संगीतकाराविषयी जे ममत्व निर्माण झालं होतं ते फार घट्ट होतं. आम्ही आणि प्रजासत्ताक यांच्यातलं नातं देशभक्ती, आदर इतपत मर्यादित होतं. बंडाचे झेंडे उभारले जातायत हे अधूनमधून दिसत होतं; पण वयाचा आणि कदाचित वृत्तीचाही तकाजा असल्याने त्यात सामील होण्यापेक्षा साहित्य, संगीत, चित्रपट या मोहात पाडणाऱ्या गोष्टी अधिक भुरळ घालत होत्या. शिवाय पु. ल. देशपांडे नावाचं एक भूत अनेक मध्यमवर्गीय मराठी मुलांच्या डोक्यावर बसलेलं होतं. मीही त्याला अपवाद नव्हतो. (पुढे ‘कोसला’ नावाचं दुसरं एक भूत बसलं. पहिलं भूत प्रेमळ, गमतीजमती सांगणारं होतं. हे भूत डोकं खाणारं होतं; पण ‘थोर’ होतं). बाकी हिंदी सिनेमा हे एक वेगळं, दीर्घ चर्चा करण्याजोगं प्रकरण होतंच.
सहस्रक उलटलं. बहुचर्चित ‘वायटूके’ने काहीच उत्पात घडवला नाही. त्यानंतरच्या दोन दशकात ‘मध्यमे’तला वर्ग हळूहळू ‘उत्तमा’त येत गेल्याचं दिसलं. नव्वदीत टेल्को, बजाज आणि बँकांचा बोलबाला होता. त्याची जागा आता ‘आयटी’ या परवलीच्या शब्दाने घेतली. ‘आयटी’मुळे हळूहळू बँकेचं पासबुक, पैसे काढण्यासाठी मिळणारं टोकन काही कळायच्या आत इतिहासजमा झाल्या. ईमेल वापरात होतीच; पण इंटरनेटने विस्मयचकित करणाऱ्या झपाट्याने हातपाय पसरले. ‘प्रत्येक प्रश्नावर गूगलची सत्ता, गूगल सांगेल देवाचा पत्ता’ अशा स्थितीत आलो. हाताला काम असो वा नसो, हातात मोबाइल आला. त्यानंतर समाजमाध्यमं, हजारो मोबाइल ॲप्स आणि आता एआय असं करत करत प्रजासत्ताक कागदावरून स्क्रीनवर आलं. स्क्रीनैव बंधू सखा स्क्रीनैव, त्वमेव सर्वम, मम देव स्क्रीनैव!
अर्थात जमिनीवरचे प्रश्न होते ते होतेच. शेतीशी फारसा संबंध न आलेल्या, शहरात वाढलेल्या माझ्यासारख्याला, सत्तेत कुणीही असलं, तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी शेतकऱ्यांचे प्रश्न का सुटत नाहीत या प्रश्नाची बोच होतीच. निवडणुकीसंदर्भातील कामासाठी घरी आलेल्या एक शिक्षिका ‘शिक्षकांकडून करून घेतली जाणारी कामं’ यावर बोलल्या तेव्हा अपराधी वाटलं. आपलं जीवनमान सुधारलं; पण सगळ्यांचं सुधारलं का, सुधारलं नसेल तर का असे प्रश्न (स्क्रीन बंद केल्यावर) पुन्हा पुन्हा पडू लागले. भिवंडीला असताना रमजानमध्ये इफ्तारला ज्या मित्रांकडे जेवायला जात होतो आणि तेही दिवाळीत घरी येत होते त्या मित्रांची ‘मुस्लीम’ ही ओळख ठसठशीत कशी झाली/केली गेली? जात-धर्म या गोष्टी माणसांच्या सहजीवनाच्या आड आलेल्या कधी पाहिल्या नव्हत्या. (अर्थात इथे सहजीवनातून ‘विवाह’ बाजूला काढला तर!) अगदी दंगे-धोपे होऊनही. मग आता या गोष्टी ऐरणीवर कशा आल्या? एके काळी दूरदर्शनवर दिसणारा ‘एकता का वृक्ष’ वठला का? की आपणच आजवर झोपेत होतो?
दोषदिग्दर्शन केलं की ‘सिनिक, नकारात्मक’ आणि गुणदिग्दर्शन केलं की ‘सकारात्मक’ अशी ढोबळ वर्गवारी सहसा केली जाते. मनोवस्था सकारात्मक राहणं आवश्यक आहे यात शंकाच नाही; पण दोषदिग्दर्शनाअभावी काहीतरी चुकतंय हे कळणार तरी कसं? पुढे जाण्यासाठी सकारात्मक आणि नकारात्मक दोघांनी एकत्र येणं आवश्यक असतं. दोन ध्रुवांवर जाऊन एकमेकांना नावं ठेवण्यात हशील नसतो. आणि बहुधा आजच्या प्रजासत्ताकाची ही एक अडचण झाली आहे. निदान मला दिसलेलं प्रजासत्ताक तरी समावेशक होतं, दोषदिग्दर्शन चालवून घेणारं होतं. आज तसं खात्रीने म्हणता येत नाही; पण म्हणून विश्वास डळमळीत झाला आहे असंही नाही. कारण ‘वैविध्य’ जिथे सेंद्रिय पद्धतीनेच रुजलेलं असतं तिथे ‘ऐक्य’ आज ना उद्या पुन्हा उगवतंच!
utpalvb@gmail.com