‘चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे’ हे पुस्तक वाचल्यावर मला दोन गोष्टींचा अभिमान वाटला. एक म्हणजे, मी मराठी नाटक करतो आणि दुसरं मी नाटकात आतडं गुंतलेल्या चंद्रकांत कुलकर्णींना ओळखतो. गालावर हात, खुर्चीवर थाट, भविष्याकडे नजर आणि आपण केंद्रबिंदू असल्याच्या थाटात फोटो असलेली असंख्य चरित्रं, नोंदी, आत्मस्तुतीपर पुस्तकं आपण पाहतो, पण नवख्या माणसाची हुरहुर डोळ्यात घेऊन स्टेजवर चक्क खाली बसलेला स्वत:चा फोटो मुखपृष्ठावर लावायची कल्पना आणि धाडस त्यांनी केलं याबद्दल त्यांचं अभिनंदन!
या पुस्तकाचे प्रामुख्याने तीन टप्पे आहेत. एका तरुण धडपड्या रंगकर्मीला, त्याच्या आंतरिक ऊर्जेला रंगभूमीची दिशा मिळण्याचा टप्पा, दुसरा, नाटक माध्यमावर हुकमत मिळवताना नवनवीन शक्यता शोधण्याचा आणि त्या झपाटल्यासारख्या अमलात आणायचा टप्पा, आणि तिसरा हे सगळं करत असताना आपल्यासारख्या इतर अनेकांना काम आणि प्रेरणा देण्याचा टप्पा. आज महाराष्ट्रातले आणि विशेषत: पुण्यामुंबईच्या बाहेरचे असंख्य रंगकर्मी या तीनपैकी एका टप्प्यामध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या हातात हे पुस्तक लवकरात लवकर पडो अशी इच्छा आहे. कारण त्यातून त्यांना खूप प्रश्नांची उत्तरं मिळतील. हे पुस्तक जुन्या रंगकर्मीसाठी ‘डॉक्युमेंट’ असलं तरी नव्यांसाठी ‘हँडबुक’ आहे म्हणून त्याचं स्वागत होणं गरजेचं आहे.
या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे पुस्तक जेवढं एका दिग्दर्शकाचं आहे तेवढंच सबंध नाट्यसृष्टीचं आहे. ते लेखकांचं, अभिनेत्याचं, निर्मात्यांचंही आहे आणि बॅकस्टेजवाल्यांचंसुद्धा तितकंच आहे. ऐंशी आणि नव्वदीच्या वेगानं बदलणाऱ्या दशकांमध्ये सिनेमा आणि टीव्ही यांची आक्रमणं परतून लावून मराठी रंगभूमी जिवंत ठेवणारे जे महत्त्वाचे शिलेदार आहेत ते सगळे तुम्हाला या पुस्तकात दिसतील. फक्त चंद्रकांत कुलकर्णीच नाही तर अनेक संस्था, निर्माते, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, अभिनेते हेही त्यांच्या बरोबर आहेत. ज्यांनी स्वतंत्रपणेसुद्धा कठीण काळात रंगभूमीची पताका खाली पडू दिली नाही.
याशिवाय वसंत कानेटकर ते स्वरा मोकाशी, मोहन वाघ ते दिलीप जाधव, भक्ती बर्वे ते मुक्ता बर्वे, अनंत अमेंबल ते प्रदीप मुळ्ये अशा सगळ्यांबरोबरच्या गेल्या चार दशकांच्या अर्थपूर्ण, नाट्यमय आणि महत्त्वाच्या नाट्यनोंदी या पुस्तकात आहेत. पण त्याआधी एक महत्त्वाची नोंद, ती म्हणजे हे पुस्तक जेवढं त्यांचं आहे तेवढंच अजून एका माणसाचं आहे, ते म्हणजे लेखक प्रशांत दळवी यांचं. कारण हे सबंध पुस्तक ‘इंडिविज्युअल’ नाही तर ‘कोलॅब्रेटिव्ह स्पिरिट’मध्ये लिहिलेलं आहे. हा दिग्दर्शकीय प्रवास सुरू होण्यामागे, झेप घेण्यामागे आणि संस्मरणीय होण्यामागे महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांची मैत्री आणि त्या मैत्रीत असणारी ‘सिक्युरिटी’ तुम्हाला पदोपदी जाणवते. यशात वाटेकरी असतातच, पण जे कष्टात वाटेकरी असतात ते कायम लक्षात राहतात. प्रशांत दळवी मला त्यापैकी वाटतात. आपला दिग्दर्शक मित्र आपल्याला सोडून नाटक किंवा सिनेमा करतो तेव्हा कसं वाटतं? याचा अनुभव लेखक म्हणून मीही घेतलेला आहे, त्यामुळे ‘ध्यानीमनी’, ‘चारचौघी’, ‘चाहूल’ अशी ‘आयकॉनिक’ नाटकं लिहीत असतानासुद्धा मित्राला आपल्याच कल्पनांच्या दावणीला बांधून न ठेवता काम करायला मोकळीक देणं आणि या सबंध प्रवासात त्यांचा सदसद्विवेक बनून राहणं ही अत्यंत अवघड आणि महत्त्वाची कामगिरी त्यांनी केली आहे. त्याचं मोल मला पुस्तक वाचल्यानंतर खूप मोठं वाटतं.
अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पुस्तक स्थलांतराबद्दल आहे. आपल्या कक्षा रुंदावण्याबद्दल आहे, भवताल बदलण्याबद्दल आहे; आणि फक्त आपल्यापुरतंच नाही तर आपल्यासोबत एका संपूर्ण समूहाला घेऊन इतक्या मोठ्या मायानगरीत स्थिरस्थावर होण्याबद्दलही आहे. ज्या शहरात जागा मिळवणं हेसुद्धा युद्ध आहे, तिथे स्थान निर्माण करण्याबद्दल हे पुस्तक आहे. आणि जेव्हा घर, परिवार, शहर हे वारशात मिळालेलं नसतं तेव्हासुद्धा दीर्घकाळ चांगलं काम करता येतं याबद्दल आहे. हे मला महत्त्वाचं वाटतं.
सहज सोप्पं आणि एका विलक्षण आवेगात लिहिलेल्या या पुस्तकातल्या सरांच्या व्यक्तिमत्त्वाइतकंच इतर वल्लींनीही मला ‘फॅसिनेट’ केलं. रुईया नाक्यावरचे ‘एकांकिकेचा रिपोर्ट सॉलिड आहे!’ म्हणणारे रुबाबदार महेश मांजरेकर, नाटकातली भिंत न तोडता चेंजिंग करायला वेळ घेणारे निरागस शिवाजी साटम, लांबी न पाहता कस्तुरबा साकारणाऱ्या करारी भक्ती बर्वे, वीस मिनिटांचा फोन कॉल रंगभूमीवर घणाणत ठेवणाऱ्या वंदना गुप्ते, पुलंना त्यांच्याच घरी जाऊन ‘तुम्हीच मेन रोल करा’ म्हणणारे सुधीर भट, ‘पुढच्या ३१ डिसेंबरचं नाटक तू बसवणार’ म्हणणारे ‘ओजी’ मोहन वाघ आणि अत्यंत मोक्याच्या क्षणी ‘वाडा चिरेबंदी’ करायला परवानगी देणारे धीरगंभीर महेश एलकुंचवार. अशा किती तरी माणसांच्या लोभस छटा या पुस्तकात आहेत.
‘चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे’- चंद्रकांत कुलकर्णी, राजहंस प्रकाशन, पाने- २६०, किंमत- ८०० रुपये.
lokrang@expressindia.com