चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या वयाला काल (१४ डिसेंबर) नव्वद वर्षं पूर्ण झाली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि दिग्दर्शक म्हणून कामाचा आढावा घेणारं ‘श्याम बेनेगल : एक व्यक्ती… एक दिग्दर्शक’ हे डॉ. सविता नायकमोहिते लिखित पुस्तक उद्या (१६ डिसेंबर) ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील ‘स्त्रीमनाचे कंगोरे उलगडणारा ‘भूमिका’’ या प्रकरणातील संपादित अंश…

अंकुर’, ‘निशांत’ आणि ‘मंथन’नंतर श्याम बेनेगल यांचा प्रदर्शित झालेला चित्रपट होता ‘भूमिका’- आधीच्या चित्रपटांपेक्षा वेगळ्या दिशेने जाणारा. हंसा वाडकर या मराठी अभिनेत्रीच्या ‘सांगत्ये ऐका’ या आत्मकथनपर पुस्तकावर आधारित हा चित्रपट त्यांच्या पुढील नायिकाप्रधान चित्रपटांची सुरुवात म्हणायला हरकत नाही. आत्तापर्यंत ग्रामीण भागातील कथानकाकडून प्रामुख्याने शहरी वातावरणात घडणारे हे कथानक आपल्याला फक्त एका अभिनेत्रीची कथा सांगत नाही; तर मानवी स्वभाव, त्यांचे परस्परसंबंध, वैयक्तिक आशा-अपेक्षा याबरोबरच १९३० ते १९५० या काळातील चित्रपटसृष्टीचे अंतरंगदेखील उलगडून दाखवते. श्याम बेनेगल सांगतात, ‘गाडीतून एकत्र प्रवास करत असताना माझे एक सहकारी गोविंद घाणेकर यांनी हंसा वाडकर यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाबद्दल माहिती दिली आणि मला मराठी येत नसल्यामुळे ते वाचून दाखवले. त्या कथेमध्ये मला माझ्या पुढच्या चित्रपटाचे बीज सापडले.’

ladies group dance on marathi song kakhet kalasa gavala valsa kashala marathi old song video goes viral
“काखेत कळसा गावाला वळसा कशाला?” जुन्या मराठी गाण्यावर महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “नाद पाहिजे फक्त”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…
marathi actress Ashwini Chavare bold photos
ओले केस अन् गळ्यात फक्त नेकलेस, मराठी अभिनेत्रीचे बोल्ड फोटो पाहिलेत का?
kangana ranaut makeup indira gandhi prosthetic make up
कंगना रणौत ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी; असं झालं ट्रान्सफॉर्मेशन, प्रोस्थेटिक मेकअपची कमाल; व्हायरल झाला व्हिडीओ
actress Megha Chakraborty sahil phull wedding in Jammu
सेलिब्रिटी जोडप्याची लगीनघाई! अभिनेत्याने १ जानेवारीला गोव्यात केलं प्रपोज, २१ तारखेला ‘या’ ठिकाणी करणार लग्न
when shakti kapoor offered help to archana puran singh buy flat
शक्ती कपूर यांनी ‘या’ अभिनेत्रीला घर घेण्यासाठी देऊ केलेली मदत; खुलासा करत म्हणाली, “त्या काळी ५० हजार रुपये…”

१९३०-१९५० या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री हंसा वाडकर यांनी व्ही. शांताराम, बाबूराव पेंटर, मा. विनायक, वसंत देसाई, राजा परांजपे, पु. ल. देशपांडे आदी दिग्गज कलाकारांबरोबर काम केले होते. ‘संत जनाबाई’, ‘लोकशाहीर राम जोशी’, ‘संत सखू’, ‘सांगत्ये ऐका’ हे त्यांचे काही नावाजलेले चित्रपट. हंसा वाडकर यांचे आत्मकथन अरुण साधू यांनी ‘माणूस’ या मासिकातून क्रमवार प्रसिद्ध केले. नंतर ते पुस्तकरूपात प्रसिद्ध झाले. मोठ्या प्रस्थापितांची नावे त्यात जोडली गेली असल्यामुळे ते बरेच चर्चेतही होते व थोड्या अवधीत अत्यंत लोकप्रियदेखील ठरले. त्यावर आधारित चित्रपट ‘भूमिका’ हा एका महिलेच्या आत्मकथनावर आधारित भारतातील पहिला चित्रपट होय.

फ्लॅशबॅक स्वरूपात चित्रित केलेला श्याम बेनेगल यांचा हा पहिला चित्रपट. हंसा वाडकरची व्यक्तिरेखा साकार केली आहे स्मिता पाटील (उषा, उर्वशी- चित्रपटातील नाव) यांनी. संपूर्ण कथा एका चैतन्याने सळसळणाऱ्या लहान मुलीचे अपघाताने किंवा परिस्थितीमुळे झालेले एका अभिनेत्रीतील रूपांतर, त्यासाठी करावे लागलेले समर्पण, तडजोडी आणि स्वत:च्या इच्छेप्रमाणे जगता येण्यासाठी केलेल्या संघर्षाची आहे.

एका कलाकाराचे- ‘स्त्री’ कलाकाराचे आयुष्य आणि त्यात तिने वारंवार घेतलेल्या भूमिका यावर हा चित्रपट भाष्य करतो. अभिनेत्रीबरोबर ती एक मुलगी, एक नात, एक पत्नी, एक आई आणि सरतेशेवटी एक माणूस, एक व्यक्ती म्हणून तिचा प्रवास उलगडत जातो. उर्वशीच्या रूपात स्मिता पाटीलने तो अतिशय ताकदीने वठवला आहे.

एक खेळकर, बंडखोर मुलगी ते एक यशस्वी अभिनेत्री, चढत्या यशाबरोबर येणारे पाश, स्वप्नांच्या मागे धावताना निसटणारे क्षण आणि आभासी जीवनाशी समझोता, भौतिक गोष्टींची मिळकत आणि भावनिक गरज यांतील संघर्ष हे अतिशय प्रभावीपणे या चित्रपटात जाणवत राहतात. घराची चौकट ओलांडून गेल्यानंतर घराबाहेर आणि घराच्या आतही तिला किती पातळ्यांवर तोंड द्यावे लागते, याचे समर्थ दर्शन आपल्याला होते. परिस्थितीमुळे इच्छेविरुद्ध, कुटुंबाची गरज भागवण्यासाठी तिला बाहेर पडावे लागते हे इथे लक्षात घेतले पाहिजे.

उषाला कलावंतिणीच्या घराचा वारसा आहे. तिची आजी- जी संगीतात निपुण आहे- तिच्याकडून गायनाचे धडे घेणारी आणि घरातील आई-वडिलांच्या भांडणाला कंटाळून निसर्गात रमणारी ती एक लहान मुलगी आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर अचानक निर्माण झालेला आर्थिक पेच सोडवण्यासाठी केशव (अमोल पालेकर) याच्या मदतीने उषा चित्रपटात नशीब आजमावण्यासाठी वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी मुंबईत येऊन पोहोचते. आणि गाण्यात निपुण असलेल्या उषाला ओघाने चित्रपटात काम करण्याची संधीदेखील मिळून तिचे ‘उर्वशी’त रूपांतर होते. येथे नावातील कल्पकतेकडेदेखील लक्ष वेधले जावे. उषा म्हणजे नवीन सुरुवात, पहाट… तिचे रूपांतर आता उर्वशीत- म्हणजे एका रिझवणाऱ्या अप्सरेत झालेले आहे.

शेजारी म्हणून घरकामात मदत करणारा केशव आणि उषा यांच्यातील जवळिकीवर आई नाराज आहे. उषाची आई आणि केशव यांचे संबंध फक्त शेजारधर्माचे नसून, त्यापेक्षा अंमळ जास्त जवळिकीचे आहेत हे अप्रत्यक्षरीत्या त्यांच्या होणाऱ्या नजरभेटीतून जाणवून दिले जाते. ती आता उषावर संशय घेत आहे. या संशयाला सत्यात उतरवण्याच्या अट्टहासामुळे उषा केशवच्या अधिक जवळ येते. त्याच्याशी शेवटी वयाच्या चौदाव्या वर्षी लग्न लावण्यात त्याची परिणती होते. कारण ती आता गरोदर आहे. मुलीला जन्म दिल्यानंतर फक्त कौटुंबिक सौख्याचे आयुष्य जगण्याची तिची इच्छा आहे. पण तीदेखील पूर्ण होऊ शकत नाही, कारण आईच्या बंधनातून सुटलेली उषा आता नवऱ्याच्या बंधनात अडकलेली आहे. आर्थिक स्थैर्यासाठी इच्छेविरुद्ध काम करण्यापासून तिला सुटका नाही. घरात असुरक्षिततेने व संशयाने पेटलेला, मारहाण करणारा नवरा आणि मानसिक व भावनिक आधारासाठी धडपडणारी उषा! घरी आल्यानंतरदेखील हे तिचे सुरक्षित, आश्वस्त होण्याचे ठिकाण राहत नाही. तिचे उशिरा घरी परत येणे, चित्रपटाच्या नायकाने तिला घरी पोहोचवणे हे केशवला मान्य नाही. ती असुरक्षिततेची, न्यूनगंडाची, पुरुषी अहंकाराला धक्का पोहोचवणारी बाब ठरते. विकोपाला गेलेले वाद चित्रित करत असताना एकाच फ्रेममध्ये उर्वशी, केशव आणि त्यांची लहान मुलगी दिसते- जी आता तिच्या आजीजवळ सुरक्षितता, भावनिक आधार शोधत आहे. हा सीन उषा/ उर्वशीच्या लहानपणी तिच्या स्वत:च्या अवस्थेची आठवण करून देतो. अर्थातच, हा मानसिक व भावनिक आधार घराबाहेर शोधताना ती राजनला विचारते आहे, ‘आपल्याच घरात आपला दम घुसमटणे हे बरोबर नाही. घरातील स्त्रीचीदेखील काही किंमत असायला हवी ना? मला खऱ्या अर्थाने घरगृहस्थी सांभाळणारी स्त्री म्हणून राहायचं आहे.’ पण ही तिची इच्छा पूर्ण होणे आता शक्य नाही. केशवचा आर्थिक गैरव्यवहार, अत्याचार व संशय चालूच आहे. त्यामुळे राजन (अनंत नाग), सुनील वर्मा (नसिरुद्दीन शाह) व विनायक काळे (ओम पुरी) यांच्यामध्ये आपली भावनिक गरज, त्याची पूर्तता याच्या ती शोधात आहे.

वैफल्यग्रस्त व मानसिक नैराश्याने ग्रासलेली उर्वशी अपघाताने विनायक काळेला भेटते. एक गृहिणी म्हणून राहण्याची इतक्या वर्षांपासूनची आपली इच्छा ती काळेच्या घरी मुक्कामाला येऊन पूर्ण करते. काळे या जमीनदाराच्या घरात मिळालेल्या कौटुंबिक अनुभवाने ती आता सुखावली आहे. घरात त्याची आई, आजारी पत्नी व मुलगा यांच्याशीदेखील तिचे सख्य जमते. पण कालांतराने या सर्वांत आपले स्वातंत्र्य आपण गमावले आहे याची तिला जाणीव होते. घराची सर्व जबाबदारी कुशलतेने सांभाळली तरी घराचे कुंपण ओलांडून गावात यात्रेला जाण्याचे स्वातंत्र्य मात्र तिला नाही. ते या घराच्या परंपरेत बसत नाही, ही जाणीव अर्थातच तिला अस्वस्थ करते. आपण आता या घराच्या तुरुंगात बंदिस्त आहोत, ही अवस्था मुक्त, चैतन्यमय आयुष्याची अपेक्षा ठेवणाऱ्या उर्वशीला सहन होणारी नाही. त्यासाठी ती काय मार्ग शोधते, ज्या स्वातंत्र्य आणि स्वत्त्वासाठी ती आयुष्यभर झगडली ते तिला मिळाले का? या सर्वांची उत्तरे प्रेक्षकांनी स्वत: मिळवून आपापल्यापरीने त्याचे विश्लेषण करावे, हे उत्तम.

चित्रपटात नेहमीच्या फळीतील कलाकारांची- म्हणजे नसिरुद्दीन शाह, ओम पुरी यांची कामे तर उत्तम आहेतच; पण अमोल पालेकर हे सातत्याने मध्यमवर्गीय रोमँटिक हिरो म्हणून तीन सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर पहिल्यांदाच एका नकारात्मक भूमिकेत दिसले आणि त्यात खरे उतरले. स्मिता पाटील यांचा स्क्रीन परफॉर्मन्स आणि अभिनय सर्वांकडूनच नावाजला गेला.

चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान परदेशी मालाच्या आयातीवर बंदी आल्यामुळे शूटिंगसाठी रंगीत रिळांचा अगदी मर्यादित पुरवठा होत असे. ‘या अडचणीचे आम्ही संधीत रूपांतर केले. कृष्ण-धवल रीळ वापरून आम्ही जुना काळ चित्रित केला. मधल्या कालावधीसाठी मोनोक्रोमॅटिक आणि आधुनिक काळासाठी रंगीत फिल्म वापरून चित्रपटाला जास्तीत जास्त वास्तवाच्या जवळ नेण्यात, अनुभव निर्माण करण्यात आम्ही यशस्वी झालो.’

उषा/ उर्वशीचे भावविश्व उलगडण्यात गोविंद निहलानी यांचा कॅमेरा उत्तम कामगिरी बजावतो. कॅमेराचा वापर आणि पार्श्वसंगीत यामुळे चित्रपटाचे कलात्मक मूल्य वाढलेले जाणवतेच. विशेषत: केशवशी लग्न करून आल्यानंतर आजीजवळ जाऊन बसलेली उषा, तिच्यापासून दूर जाणारी आई आणि आजीच्या संगीताचे सूर हे त्यांच्या नात्यातील वीण स्पष्ट करतात. उषाचे क्लोजअप आणि मिड्शॉटमध्ये तिची भावनिक आंदोलने अप्रतिमरीत्या स्पष्ट होतात.

इथे बेनेगल घराची पायरी ओलांडून बाहेरील जगात अर्थार्जनासाठी धडपडणारी स्त्री, तिचा अंतर्गत आणि बाह्य जगातील संघर्ष, कलह आणि झगडा अतिशय प्रभावीपणे मांडतात. त्यात प्रायव्हेट व पब्लिक- म्हणजे वैयक्तिक व सामाजिक व्यवस्थेतील तडजोडी, त्यामुळे होणारी घालमेल ही तर उलगडत जातेच, पण त्यापलीकडे जाऊन यांत्रिकीकरणानंतर निर्माण झालेल्या आधुनिक आणि त्यापूर्वी सवयीची असलेली पारंपरिक आणि सनातनी मानसिकतेची दोलायमान अवस्थादेखील प्रभावीपणे मांडतात.

बेनेगलांच्या ‘चरणदास चोर’ या चित्रपटातून स्मिता पाटील यांचे सिनेसृष्टीत पदार्पण झाले. त्यानंतर त्या सातत्याने श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांतून दिसल्या व प्रत्येक भूमिका त्यांनी अतिशय समर्थपणे वठवली. ओघाने त्यांनी व्यावसायिक चित्रपटांतूनदेखील बरेच यश मिळवले. ‘कोणत्याही चित्रपटात काम करण्याची स्मिता पाटील यांची अजिबात मानसिक तयारी नव्हती… एका मित्राने सुचवल्यामुळे मी जेव्हा त्यांना एक वृत्तनिवेदक म्हणून प्रथम पाहिले तेव्हा त्यांच्या स्क्रीन प्रेझेन्सने प्रभावित झालो. पण शेवटी स्मिताला चित्रपटात काम करण्यासाठी तयार करण्यात मला त्यांच्या आईची मदत घ्यावी लागली. ‘भूमिका’ चित्रपटासाठी घोड्यावर बसणे, तलवारबाजी याचे चित्रपटात चित्रीकरण असल्यामुळे त्याची परिणामकारकता पडद्यावर दिसण्यासाठी स्मिताला या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यासाठी मी रोज सकाळी फोन करून स्मिता ट्रेनिंगला गेली की नाही याची चौकशी करत असे. ती विचलित तर होत नाही ना, याची खात्री करण्यासाठी तिला गुंतवून ठेवणे गरजेचे होते.’

‘ज्योती स्टुडिओमध्ये भूतकाळ दाखवण्याचे चित्रीकरण केले तो एक भावनिकदृष्ट्या हेलावून टाकणारा अनुभव होता. ‘आलमआरा’ आपल्या देशातील पहिली फिल्म जिथे चित्रित झाली, तेथील सेट वापरून आम्ही चित्रीकरण करत होतो. तो एक विलक्षण अनुभव होता.’ अर्थात, स्टुडिओमध्ये उपस्थित असलेली सामग्री व सेट वापरून काळाची पुनर्निर्मिती करणेदेखील सहजसाध्य झाल्याचे ते नमूद करतात. त्यात गुरुदत्त यांच्या ‘कागज के फूल’ चित्रपटातील सेट आणि कॉस्च्यूमचादेखील वापर केला गेला.

पितृसत्ताक व्यवस्थेला विचारलेला जाब

चित्रपट निर्माण होत होता तेव्हाचा आणीबाणीचा काळ आणि स्त्रीमुक्तीचे वारे यांचा वाढणारा प्रभाव चित्रपटात वेळोवेळी जाणवतो. शेवटी ही फक्त उषाची कहाणी न राहता भारतीय समाजातील प्रत्येक स्त्रीची हकिकत म्हणून आपल्यासमोर येते. उषाची कौटुंबिक आणि सामाजिक बंधने तिची एकटीची राहत नाहीत. कितीही खंबीर असली तरी पितृसत्ताक पद्धतीचे जोखड त्यापेक्षाही जास्त बळकट आहेत हे अप्रत्यक्षरीत्या आपल्या लक्षात आणून दिले जाते.

चित्रपट माध्यमाचे जसे काही सामर्थ्य आहे, तशाच काही कमतरतादेखील आहेत. विशेषत: एखादा चित्रपट जेव्हा साहित्यावर आधारित असतो तेव्हा ही तुलना अपरिहार्य ठरते. चित्रपटात उषाची भावनिक आंदोलने, तिची स्वातंत्र्यासाठीची धडपड जरी आपल्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचत असली तरी त्यामागची तिची कारणमीमांसा मात्र स्पष्ट होताना दिसत नाही. तरीही एक व्यक्ती म्हणून त्यांची ‘भूमिका’ मात्र उलगडत जाते आणि त्यांच्याविषयी सहानुभूतीची भावना निर्माण होते.

उषा विनायक काळेचे घर सोडून निघून जाण्याच्या गडबडीत असताना अंथरुणावर खिळून पडलेली त्याची पत्नी शेवटी उषाला अंतिम कटू सत्याची जाणीव करून देते. ती म्हणते, ‘घर बदलता येईल, शय्या बदलता येईल; पुरुषी मानसिकता नाही.’

अनुज कुमार म्हणतात, ‘ In the 70’ s when the Bollywood was running on testosterons, Shyam Benegal was busy making sence of estrogens!’ सत्तरीच्या दशकात जेव्हा व्यावसायिक सिनेमा पुरुषवादाची ताकद दाखवण्यामध्ये मश्गूल होता, तेव्हा बेनेगल स्त्रीत्वाची ताकद समजून घेण्याचा प्रयत्न करत होते.

चित्रपट माध्यमाच्या सर्व बाजूंनी- म्हणजेच पटकथा, संगीत, कॅमेरावर्क, लाइट इफेक्ट्स, कलाकारांची अदाकारी या बाबतीत ‘भूमिका’ चित्रपट सरस ठरतोच; पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो जाणीव करून देतो की, पितृसत्ताक पद्धतीमध्ये पुरुषाच्या कर्तृत्वाचे मोजमाप हे त्याच्या कामावरून ठरवले जाते. त्याविरुद्ध एका स्त्रीचे मोजमाप मात्र तिच्या नातेसंबंधांवरून, वैयक्तिक जीवनातील घडामोडींची फुटपट्टी लावून तिच्या आयुष्याची यशस्विता ठरवली जाते.

Story img Loader