डॉ. शुभा थत्ते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सुनंदा अमरापूरकर यांनी लिहिलेले व मेहता प्रकाशन यांनी प्रकाशित केलेले ‘खुलभर दुधाची कहाणी’ हे पुस्तक हाती आले व अमरापूरकर कुटुंबाशी असलेल्या स्नेहामुळे लगेच वाचून काढले. अमरापूरकरांचे अनुवादातील कसब त्यांच्या अनेक पुस्तकांतून अनुभवले होते व हा त्यांचा ललित लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे. ललितलेखनही त्या तितक्याच कसदारपणे करतात हे या पुस्तकामधून जाणवले. जरी हे लेखन त्यांच्या जीवनानुभवावर बेतलेले असले तरी ते वाचकाला तितकेच रंजक व गुंतवून ठेवणारे आहे. त्या व त्यांचा जोडीदार सदाशिव अमरापूरकर यांच्या सहजीवनाचे त्यांनी दाखवलेले पैलू आजच्या तरुण जोडप्यांना खूप काही शिकवून जातील. पडद्यावरील सदाशिव अमरापूरकर यांची प्रतिमा व प्रत्यक्ष व्यक्ती (तात्या) म्हणून ते यातील जमीनअस्मानाचा फरक, त्यांची रंगभूमीबद्दलची तळमळ, सामाजिक भान व त्यासाठी कुठेही गाजावाजा न करता केलेले प्रयत्न वाचताना थक्क करतात. खास करून चित्रसृष्टीतील ‘बोटभर करून हातभर’ दाखवणाऱ्या जाहिरातबाजीच्या पार्श्वभूमीवर झळाळून उठतात. घरातील सांपत्तिक स्थिती उत्तम असूनही त्याचा आधार न घेता रंगभूमीवरील अपुऱ्या मिळकतीच्या. अतिशय कठीण परिस्थितीत आपल्या जिद्दीवर संसार उभा करायचे त्या दोघांचे प्रयत्न वाचताना डोळे ओलावतात. पण त्याबरोबरच त्यांच्या सासरच्या मंडळींचा लोभ व माया यामुळे तो काळ कसा सुसह्य झाला हे वारंवार व्यक्त करायला त्या विसरत नाहीत. त्या वाचकांना त्यांच्या लहानपणाच्या सुखवस्तू व सुबत्ता असलेल्या वातावरणात नगरच्या त्या कुटे वाड्यात घेऊन जातात. त्या वास्तूचे लोभस वर्णन आपल्याला त्यांची रुसून बसायची खिडकी, धंद्याचं कपाट, चैत्रगौरीची आरास या सर्वांची भेट घडवून आणते व त्याबरोबरच नगरच्या त्या काळातील समाज जीवनाचे दर्शनही घडवते. एखाद्या ट्रान्सफर सीनप्रमाणे वडिलांच्या मृत्यूनंतर अनुभवलेली सर्व गोष्टींची चणचण, भविष्यातील रंगवलेल्या स्वप्नांचा चक्काचूर झाल्याने आलेले वैफल्य हेही तेवढ्याच ताकदीने रंगवले आहे. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात भलीबुरी माणसं भेटतात आणि त्याही त्याला अपवाद नव्हत्या, पण त्यांच्या लिखाणात अशा व्यक्तींबद्दल कुठेही कटुता, नाराजी नाही. निर्मळ मनाने त्याचाही त्या स्वीकार करतात. मुंबईला आल्यानंतर जोडीदाराचा सहवास हा आनंदाचा भाग असला तरी तीन मुली व नोकरी सांभाळून केलेली तारेवरची कसरत, पण तिथेही आपली पुतणी नगरला एकटी पडली म्हणून आपल्या तिघीत तिचाही सहभाग करून घेणे हे हृद्या आहे. हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश करून मिळालेल्या कीर्ती व आर्थिक भरभराटीबरोबरच अमरापूरकरांच्या रंगभूमीवरील प्रेमामुळे त्यांची होणारी कुचंबणा व हिंदी सिनेसृष्टीतील दिखाऊपणाचा उबग खूप तरलपणे मांडला आहे. मुलींना वाढवताना आईची सशक्त व सजग भूमिका निभावताना त्यांचा कणखरपणा व माया जाणवते. त्या दोघांचे सहजीवन हा तर लिहायचा एक वेगळाच विषय होईल. लग्नाचा पाया हा परस्परांबद्दल आदर व विश्वास यामुळे भक्कम बनतो याचे हे जिवंत उदाहरण आहे. पुस्तकाच्या उत्तरार्धात लक्षात येते की ‘सदाशिवा’ बरोबरचा संसार म्हणजे उमेचं, पार्वतीचं व्रत व ते सुनंदाताईंनी हसतमुखाने कसे निभावले याचीच ही कहाणी आहे. त्यांच्या खुलभर दुधाने फक्त गाभाराच भरला नाही तर त्यांच्या घरातील वडिलधारेच नव्हे तर इष्टमित्र, मुली, जावई सर्वांच्या जीवनाला त्यांचा परीस स्पर्श झाला.

एका समृद्ध सहजीवनाचे प्रांजळ चित्रण असेच या पुस्तकाचे वर्णन करता येईल.

‘खुलभर दुधाची कहाणी’, – सुनंदा अमरापूरकर, मेहता पब्लिशिंग हाऊस, पाने-३९४, किंमत- ५९० रुपये.

thatteshubha@gmail.com