श्रीनिवास बाळकृष्ण
प्रिय मित्रा,
तुझ्या नोटा मिळाल्या. त्या वापरून मी तीन-चार देशांत फिर फिर फिरलो. प्रवासात मला डुलकी लागली. अर्धवट झोपेत दिसलं की, विमानाच्या खिडकीतून चित्रविचित्र चेहऱ्याचे पक्षी झापझूम उडताहेत. मी दचकून उठलो. नीट पाहिल्यावर लक्षात आलं की ते विचित्र पक्षी नसून, अमुक आणि तमुक देशांतले पतंग आहेत. पूर्वी लोक युद्धात संदेश द्यायला, शत्रूपासूनचे अंतर मोजायला पतंग वापरत. त्या वेळेचे ड्रोनच ते! मग उत्सवात शोभेसाठीपतंग उडवू लागले. आपल्याकडे पोहोचले ते खेळ.
.. तर चित्रास कारण की, इतर वेळी खालून पाहताना मला ते कधीच स्पष्ट दिसलं नव्हतं, पण विमानाच्या खिडकीतून आज सूस्पष्ट दिसत होतं. नेहमीच साधा चौरस आकारात दिसणारा पतंग इथं कायच्या काय भारी रंगाचा दिसतोय. त्यातला एक पतंग तर गुल्ल झाला, तो मी तर विमानाच्या खिडकीतून हात बाहेर काढून पकडला. त्याचा फोटो पाठवत आहे. बाकीच्या पतंगांचे आकार सुंदर, अनोखे आणि काही भीतीदायक आकार पाहा. हे पतंग पक्ष्यांना आणि मला घाबरवायला उडवतात का? असो. तू काही तरी वेगळं कर.
मला हसायला येईल अशा चेहऱ्याचे पतंग तू बनवून पाठवशील का? आकार, रंग कुठलेही असू दे. म्हणजे विमानात बसून मला घाबरू घाबरू वाटणार नाही.
तुझाच, श्रीबा
shriba29@gmail.com