सुहास सरदेशमुख

नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकण्यासाठीच स्वतंत्र सण साजरा होतो आपल्याकडे फार पूर्वीपासून… राग शांत होण्यासाठी शिव्या देण्याचा उपाय प्रत्येक जण कळतनकळत करीत असतो. पण होळीनिमित्ताने या शिव्यांचा उगम कुठून झाला आणि त्याचा विकास कसा झाला, त्यावर दृष्टिक्षेप…

Kavadi for lord importance of kavadi price of a kavadi
लोक-लौकिक : ‘कवडी’मोल!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Ajit Pawar on Walmik Karad
Ajit Pawar on Walmik Karad: वाल्मिक कराडवर मकोका दाखल होताच अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “दोषींना…”
Article about large religious conference in marathi
तर्कतीर्थ विचार :  वेदांचे पावित्र्य माझ्या हृदयात
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!
kids anger issues
तुमची मुलंही सतत रागावतात, चिडचिड करतात? मग ‘या’ सोप्या उपायांनी मिळवा नियंत्रण
thane fake baba marathi news
काळ्या जादूचा नाश करण्यासाठी बाबा आणणार होता मृतदेह, मृतदेह आणण्यासाठी बाबाने घेतले ८ लाख ८७ हजार रुपये
Loksatta chaturang padsad loksatta readers response letter
पडसाद : स्वार्थ आणि परमार्थ साधायचा असेल तर…

व्यक्त होण्याचं पहिलं साधन ध्वनी. ‘मूल रडलं नाही, तर आईसुद्धा पाजत नाही’ असं उगीच नाही म्हणत आपल्याकडे. आडव्या-उभ्या रेषाही सांगून जातात काहीबाही. भीमबेटकातील पूर्वजांनी मारलेल्या रेघोट्या किंवा संवादासाठी केलेले हावभाव व्यक्त होण्यासाठीच. एखादी आकृती आणि मग भाषा, अक्षर, अभिनय, गाणे, चित्र, नृत्य आणि मूर्ती अशी अभिव्यक्तीची नाना साधने. अनेक प्रकारच्या भावना व्यक्त करताना राग व्यक्त करायचं साधन कोणतं? तर एक सणसणीत शिवी हासडायची. घराबाहेर पाऊल टाकल्यानंतर सहज आपल्या कानावर पडते किंवा आपल्याच तोंडातून बाहेर पडते ती शिवी.

बऱ्याचदा ‘आईवरून शिवी द्यायची नाही’, असं म्हणत होणारी ‘हमरीतुमरी’, चौकात होणारी भांडणं, मारामाऱ्या तशा नेहमीच्या. पण आपण शिवी का देतो आणि शिवी म्हणजे नक्की काय? – प्रचलित समाजव्यवस्थेतील लैंगिक नैतिक चौकट ओलांडण्याची हिंमत ज्या शब्दातून व्यक्त होते तिथे जन्माला येते शिवी. भावनिक पातळीवर रागावरचं नियंत्रण निसटायला सुरू होतं आणि शिवी व्यक्त होते. वयात आलेल्या कोणाला शिवी माहीत नसेल? कारण शिवी दिली की रागाच्या भावनेचा निचरा होतो. असा निचरा न होण्याची कोंडी वेगवेगळ्या पातळ्यांवर असते आणि अभिव्यक्तीची कोंडी विकृतीकडे जाणारी असते. होळी आणि धुळवड हे सण एका अर्थाने कोंडी फोडणारे.

आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवत शिवी न देणारी माणसं मग विचित्रपणे राग व्यक्त करतात. नुसतीच चिडचिड होत असते त्यांची. आपल्या रागाचा निचरा करण्याचा शिवी हा एक उत्तम उपाय. अर्थात भावनिक नियंत्रणासाठी एकच एक साधन नसतेच. पण शिवी हे साधन नाही, असं मात्र म्हणता येणार नाही. आईवरून आणि बहिणीवरून दिली जाणारी शिवी लैंगिक व्यवहारातील अनीती दर्शवते आणि मानसिक पातळीवर ते सहन होत नाही म्हणून माणूस चिडतो. शिवी दिल्याच्या कारणातून जीव गमवावा लागल्याच्या नोंदी पोलीस ठाण्यातील अनेक फिर्यादींत दिसून येतात. शिवी म्हणजे अवमानना होईल असे शब्द. जेवढे शब्द तिखट तेवढी शिवी जहाल. इरसाल शिवी नैतिक चौकट ओलांडणारीच असते.

‘शव’, ‘शिव’, ‘शिवी’ या शब्दांमध्ये ऊर्जा किंवा चैतन्य नसणारे मृत शरीर एका बाजूला. त्यातील चैतन्य म्हणजे शिव आणि शिवी ही नकारात्मक ऊर्जा. शिव म्हणजे मांगल्याचं प्रतीक. शैव आणि शाक्त पंथांचा उपमर्द, अवमान करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दसमूहात शिवी दडली आहे. जे अनिष्ट आहे, त्याज आहे कारण ते शैव आहे. भाषा जेवढी जुनी तेवढाच शिव्यांचा इतिहास जुना असायला हवा. कारण व्यक्त होणारी भावना रागाची आहे. नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकण्यासाठी एक स्वतंत्र सण साजरा होतो आपल्याकडे. कधीपासून? – हेमाद्रीच्या लिंगपुराणात होलिका पौर्णिमेला ‘फाल्गुनिका’ म्हटले आहे. ‘होलका’ असेही या सणाचे नाव. त्याचा उल्लेख जैमिनीच्या पूर्वमीमांसा सूत्रावरील भाष्यांमध्ये करण्यात आला. हा सण बंगालवगळता अन्य सर्व राज्यांत होता. अर्थात काळ वेगवेगळा असतो अशी नोंद पां. वा. काणे यांनी ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ या पुस्तकात केलेली आहे. हेमाद्रीचे ‘लिंगपुराण’, ‘वात्सायन’ आणि ‘कामसूत्र’ यांतील उल्लेख हा सण ख्रिास्तपूर्व शेकडो वर्षे जुना असावा असे सांगणारे आहेत. ‘राका होलाके’ असाही एक ऐतिहासिक संदर्भ असून, यामध्ये ‘होला’ हा स्त्रियांच्या सौभाग्याकरता करावयाचा एक विधी आहे. त्यातील राका म्हणजे पौर्णिमा ही देवता असते. कामसूत्रात निरनिराळ्या प्रांतांत प्रचलित असणाऱ्या खेळांची वर्णने आहेत. त्यातही ‘होलाका’चे वर्णन आहे. रंगीत पाणी उडविण्याचा सण असे त्यातील वर्णन. हेमाद्रीच्या भविष्योत्तर पुराणात कृष्ण- युधिष्ठिराच्या एका संवादात होळी सणाविषयीची गोष्ट सांगण्यात आली आहे. ती अशी- ढुंढा नावाची एक राक्षसीण रात्रंदिन त्रास देत असे. तिचा मानव किंवा देवतेपासून मृत्यू होणार नाही असा तिला आशीर्वाद असतो. मग तिच्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी आग पेटवून बसा, ती येण्याच्या वेळेला गाणी म्हणा, अगदी अपशब्द वापरा, मनगट अगदी तोंडावर आपटून निघणारा आवाज काढला तरी हरकत नाही, असा उपाय सुचविण्यात आला. आपल्याकडे चालीरीतींना जिवंत ठेवण्यासाठी अशा गोष्टी रचल्या जात असत.

होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख उधळून ज्या देवतेला पूजले जाते ती देवता आहे कामदेवता. त्यामुळे श्लील-अश्लील असा भेद न बाळगता शिवी दिली तरी चालते, अशी तजवीज करून ठेवण्यात आली आहे. त्याचे मूळ सूत्र अभिव्यक्तीची कोंडी फोडणे हेच आहे.

आपल्या संस्कृतीत थेट व्यक्त होण्याला प्रतिष्ठा होती. लपूनछपून असे काही नव्हतेच. अन्यथा लज्जागौरीच्या मूर्ती सर्वत्र कशा दिसल्या असत्या किंवा खजुराहोमधील कामशिल्पांना मान्यता कशी मिळाली असती? बुद्ध काळातही महायान काळात तंत्रविद्या होती. श्रीशैलमसारख्या ठिकाणी महिलांच्या राज्यात केवळ कामेच्छापूर्तीसाठी अनेकांना बंदीवान करण्यात आले होते. गोरक्षनाथांनी त्यांच्या गुरूची स्त्री राज्यातून सुटका करवून आणली होती. वज्रयान, सहजयान, शाक्त, कपालिक या वामाचारी पंथात मद्या, मत्स्य, मांस, मुद्रा आणि मैथून या तांत्रिक साधनांचा वापर होत होता. लिळाचरित्रात भांग सेवन करणारे नाथ जोगी होते. कानफाटे जोगी योनी पूजा आणि लिंग पूजाही करत. अनेक ग्रंथांत त्याचे दाखले आहेत. ‘स्वानुभवदिनकर’ हा ग्रंथ समर्थांचे शिष्य दिनकर यांनी लिहिला. या ग्रंथात त्यांनी विकृत साधनांचे चित्र रेखाटले आहे. त्यातील एक वर्णन पाहा-

भग पूजामिसे परदारा भोगिती,

कवळमिसे भ्रष्टाचार करिती

परिस्त्रीहाती स्वलिंग पूजा करविती,

नाना विषयभोगार्थ

(यातील भग म्हणजे कवटी आणि कवळ म्हणजे घास)पण पडदा न ठेवता बोलणे वेगळे आणि अपशब्द किंवा शिवी देणे वेगळे. अपमान करण्याच्या उद्देशाने, हीनपणाची वागणूक देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दांचे कोणी समर्थन करणार नाही. शिवी वाईटच असेही ठरवता येणार नाही. त्यामुळेच होळीच्या शिव्या हा संस्कृतीचा भाग होऊन बसतात. पण कामदेवाची पूजा बांधण्याच्या अनेक विधी आपल्याकडे आहेत. अगदी राधा-कृष्णाची रासलीला हा खेळही लक्षात घेतला, तरी बरेच काही समजून येईल. कदंबाच्या झाडावर कामेच्छा लपलेली असते आणि खाली चैतन्य असते. कृष्ण गोपिकांचे कपडे लपवून ठेवतो. तरीही कृष्णाची तक्रार लडिवाळपणे होते. कारण त्याच्या वर्तणुकीत बोच नसते. अशी सल किंवा बोच नसेल तर शिवीसुद्धा अश्लील राहत नाही. भाषिक अर्थाने एकच अश्लील शब्द वारंवार वापरला गेला तर त्याची अश्लीलता गळून पडते. ‘आयला’, ‘च्या मायला’ असं वाक्यांमध्ये सरधोपटपणे वापरणाऱ्यांचे उद्दिष्ट शिवी देण्याचा असतेच असे नाही. कधी कधी स्वत:च्याच मूर्खपणावर व्यक्त केलेल्या भावना बाहेर पडत असतात. खरे तर होळी हा सण इजिप्त किंवा ग्रीस देशातून आपल्याकडे आला असावा, असेही काही तज्ज्ञांचे मत होते. पण भारतीय मानसिकतेचा विचार करता त्यात तथ्य नसल्याचेच अनेक तज्ज्ञांनी लिहून ठेवले आहे. व्यक्त होण्याची परंपरा आणि शिवी अशी सांगड घालून होळी या सणाकडे पाहिले पाहिजे.

हीन ठरविण्यासाठी वर्तन बदलातून निर्माण होणारे अपशब्द सोज्वळ स्वरूपात मूर्ख, बावळट किंवा हलकट स्वरुपात व्यक्त होतात. शिवी सदरात व्यक्त करणारे सोज्वळ रूप आणि स्त्री- पुरुष संबंधांची कल्पना करून दिली जाणारी इरसाल शिवी यात आता नवनव्या भाषांची, नव्या बिनधास्त संस्कृतीची भर पडत आहे. पण होळीच्या शिव्या देणारे त्या शिव्या एका पिढीतून पुढच्या पिढीकडे देणारी मंडळी आहेत. धुळवड साजरी करताना अनेक चालीरीती आहेत. गावात येणाऱ्या जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची प्रथा मराठवाड्यात आहे. या सर्व प्रकारात शिवीतून आपण व्यक्त होत असतो. आपल्यातील अभद्रपणा बाहेर पडतो. पुन्हा नव्या दिवसाला सामोरे जाताना शिवी तोंडात येऊ द्यायची नसेल, तर एकदा मोठ्यांदा सगळे अश्लील बाहेर काढायला हवे. कामेच्छेचे नियमन हा भारतीय संस्कृतीत नियमनाचा फार मोठा भाग आहे. हिंदूंमधील नाथ पंथी, बौद्ध, जैन संप्रदायात योगक्रियेतील मनाचे नियमन तयार करताना निर्माण केलेल्या नैतिक चौकटी एका बाजूला आणि त्याच वेळी व्यक्त होण्यातून भावनांचा निचरा करण्याची शिवीची परंपरा ही आवश्यकच होती आणि आहे. आता ज्याला आपण शिवी म्हणून उच्चारतो असे अनेक शब्द संत साहित्यात विपुल प्रमाणात आहेत. त्याचा उद्देश संदेश पोहोचविण्याच्या चपखल शब्द असाच घ्यायला हवा. कसे वागू नये असे सांगताना संत तुकाराम महाराज अभंगात म्हणतात-

काय नपुंसका पद्मिाणीचे सोहळे,

वांझेसी डोहाळे कैंचे होती

अंधापुढे दीप खरारी चंदन,

सर्पा दुधपान करूं नये

अनेक अभंगात शिंदळी म्हणजे वाईट चालीची स्त्री, रांगा, टेरी यासह अनेकदा गुप्तांगाच्या शब्दांचा सढळ वापर दिसून येतो.

बोलावें ते धर्मा मिळे

बरे डोळे उघडुनी

कशासाठी शेण खावे

जणे जन थुंके ते

दुजे ऐसे कोणी

जे या जाळी अग्नीसी

तुका म्हणे शुर क्षणी

गांढे मनी बुरबरी

आपण जे बोलणार ते विचारपूर्वक अभ्यासपूर्ण असावे. आपण जे बोलतो आहोत ते खरे आहे की नाही याचा पडताळा करून बोलावे, सांगोवांगीच्या गोष्टीवर अंधविश्वास ठेवून बोलू नये. तसे केल्यास तथ्यहीन बोलणाऱ्याच्या तोंडावर लोक थुंकू लागतात. पण निर्लज्ज लोक खोटं बोल पण रेटून बोल असं चालूच ठेवतात. त्यांचा दांभिकपणा एक दिवस उघडकीस येतोच. समाजाच्या क्रोधापुढे, अग्नीपुढे खोटं बोलणारे ते भस्मसात होऊन जातील. शूरवीर रणांगणात आपला पराक्रम दाखवतात. पण काही गांढाळे घरात बसून कुरबुर करत राहतात. अपशब्द हे भाषेत येणारच.

कामी श्वानापरी जागे

भोग स्त्रियेसि देता लाजे

वस्त्र दासी घैऊन निजे

तुका म्हणजे जाण

नर गाढवाहूनि हीन

असे अनेक अभंग आहेत ज्यातील चपखल शब्द नेमकपणाने वैगुण्यावर बोट ठेवण्यासाठी वापरले आहेत. पण शिवी, अपशब्द नेमकेपणाने व्यंग दूर करण्यासाठी वापरले आहेत, की तेच शब्द अवमान, उपमर्द करण्यासाठी वापरले जाणार असतील तर शिवी ठरतात. भाषेचा वापर कोणत्या कारणासाठी होतोय त्यावरही त्याचे अर्थ ठरतात. रागावरच्या नियंत्रणाची भावना व्यक्त करण्यासाठी फक्त शब्द एवढेच साधन नव्हते. यादव आणि चालुक्य कालखंडात मंदिराला दिलेल्या दानधर्मात गद्धेगळ नावाचे शिव्याशिल्पही असे. यात शिवीचे सचित्र शिल्प केलेले असे. असे शिल्पात ज्याला शिवी द्यायची आहे त्याच्या घरातील स्त्रीबरोबर गाढव किंवा घोड्याबरोबरचे संभोग चित्रही असे. असे चित्र तुळजापुरी देवी मंदिराच्या समोरच्या बाजूला असलेल्या मारुती मंदिरात आहे. शिव्याबरोबर शाप असाही शब्द आपण वापरतो. असे अनेक शाप लहानपणी अनेकांनी गोष्टींमध्ये, पुराणकथांमध्ये ऐकले आहेत. पण शिवी द्वेष, राग, मनातील खोलवर दडून बसलेली अश्लील भावना व्यक्त करणारी असते. शिवी काही प्रसंगी नक्की चांगली असते. पण तो प्रसंग आणि परिस्थिती डोलारा त्यावेळी शब्दांना सांभाळता आला पाहिजे. तेव्हा शिवी चांगलीच असते.

suhas.sardeshmukh@expressindia.com

Story img Loader