‘लोकरंग’मधील ‘विशी.. तिशी.. चाळीशी..’ या डॉ. आशुतोष जावडेकर यांच्या सदरातील ‘सेल्फी-बिंब’ (१७ फेब्रुवारी) हा लेख वाचला. यात ‘सेल्फी’ या प्रकाराचा ज्ञानेश्वर माऊलींशी संबंध जोडून, त्याला आध्यात्मिक पातळीवर नेऊन सेल्फी काढण्याच्या चाळ्याचे अवास्तव उदात्तीकरण केले आहे असे वाटते. विशी-तिशी-चाळीशीतल्यांचा हा प्राणप्रिय असा मुक्तछंद असला, तरी आज या बाळलीलांना आलेले सुगीचे दिवस पाहता पन्नाशीच्या मागच्या-पुढच्यांना हा पोरखेळच वाटतो. यात आम्हाला आमच्या तरुण वयात ही संधी मिळाली नाही याबद्दलची असूया तिळमात्र नाही, हे स्पष्ट करतो.
छायाचित्रण ही एक अभिजात कला होती आणि आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ती अधिक समृद्ध होते. पण त्याचवेळी त्याचे ‘साइड इफेक्ट्स’ टाळणे हे निर्भेळ अभिव्यक्तीसाठी आवश्यक असते. कॅमेरा-लेन्सच्या अगदी जवळून काढलेल्या छायाचित्रांत येणारे डिस्टॉर्शन टाळण्यासाठी क्लोजअप लेन्सेस वापरावी लागतात. अन्यथा अशी व्यक्ती या दोषामुळे विनोदी स्वरूपात चित्रीत होते. (उंच इमारतीसुद्धा तिरक्या दिसतात.) सेल्फीचित्रणात आढळणारी ही विसंगती कमी करण्यासाठी ‘सेल्फी स्टीक’चा वापर केला जातो. पण तो पुरेसा नसतो. परिणामी मिळणारे छायाचित्र हे प्रमाणबद्धतेच्या प्राथमिक निकषांवरच बेढब आणि विरूप असतं. परंतु आजच्या अभिरुचीशून्य, चंगळवादी, बाजारशरण वातावरणात असा कमअस्सल मालही हातोहात खपतो. कलात्मक नजर आणि चोखंदळपणाचा अभाव असलेल्या बहुसंख्य ग्राहकांचा फायदा घेऊन उत्पादक आपली उत्पादने खपवतात आणि यात दर्जाकडे होणारे दुर्लक्ष चालवून घेतले जाते.
एकटय़ाचे सेल्फी छायाचित्र हे केवळ आणि केवळ समाजमाध्यमांवर डकवून स्वत:ची दृश्य ‘इमेज’ (व्यक्तिमत्त्व नव्हे) प्रदर्शित करण्यासाठीच असते आणि प्रसिद्ध व्यक्तींबरोबर काढलेले सेल्फीज् हे आपले मैत्र-वर्तुळ किती समृद्ध आहे, याचे प्रदर्शन करण्यासाठी असतात. पूर्वी काही छांदिष्टांना थोरामोठय़ांच्या स्वाक्षरी (लिखित संदेशासह) जमवण्याचा छंद असे. त्यांच्या या अतिरेकी हौसेला कंटाळून काही सेलिब्रिटीज्नी (उदा. वैज्ञानिक जयंत नारळीकर) या प्रकाराला कार्यक्रमाच्या संयोजकांकडे कटाक्षाने नकार देण्यास सुरुवात केली होती. (पुढे मुलाबाळांत सेल्फी काढण्यात रमणारे आधुनिक चाचा नेहरू आपल्याला पंतप्रधान म्हणूनच लाभले!) स्वत:च्या अशा सवंग लोकप्रियतेच्या अनुभवाकडे पाठ फिरवणारे व्यक्तिमत्त्व हेच खरे वलयांकित व्यक्तिमत्त्व ठरते. स्वप्रतिमेच्या अतिरेकी प्रेमात बुडालेल्यांना आणि ज्यांच्याकडे इतरांना दाखवण्यासाठी इतर कोणताही विशेष गुणधर्म नाही त्यांच्यासाठी सेल्फी-बिंब फारच उपयोगी ठरते. काश्मीरला / परदेशात गेल्यावर तिथल्या निसर्गाचा, समाजजीवनाचा अनुभव घेण्यापेक्षा विमानतळावर पोचल्यापासून समाजमाध्यमांवर सेल्फीज् टाकण्याचा सपाटा लावणाऱ्या आणि याचाच (पैसा वसूल) आनंद उपभोगणाऱ्या तरुणाईला माझा मनोमन सलाम!
– प्रमोद तावडे, ठाणे</strong>
मग विसंगती असणारच!
‘लोकरंग’मधील ‘टपालकी’ या सदरातील ‘च.. चारित्र्याचा!’ (१७ फेब्रुवारी) हा सॅबी परेरा यांचा लेख वाचताना उपरोधिक विनोदाऐवजी परिस्थितीचे गांभीर्य जास्त जाणवले. डान्स बार असो की इतर गोष्टी, त्यातील अटी कधी पाळल्या जातील का? सुविचार आता फक्त शाळेतील फळ्यावर आणि व्हाट्सअॅप-फेसबुकवरच असतात. तेही प्रत्यक्षात आणायचे नसतात, ही समजूत सर्वत्र पसरली असल्याने त्याला फक्त ‘लाइक’ केले जाते. त्यामुळे सार्वजनिक जीवनात जे काही दिसते ते विसंगतच असणार. एकंदरीत जे काही चालले आहे त्यात सुधारणा होणार की बिघाड, ते येणारा काळच ठरवेल.
– प्रफल्लचंद्र काळे, नाशिक