‘लोकरंग’मधील (१६ मार्च) सई हलदुले बोंवां यांचा ‘खासदाराचा सायकल प्रवास’ हा लेख वाचला. या लेखामुळे स्विझर्लंडमधल्या सामाजिक आणि राजकीय जीवनाची तोंडओळख झाली. इथे एक साधा नगरसेवकही हुजरे घेऊन फिरत असताना बघत आम्ही मोठं झाल्यामुळे, हा लेख वाचल्यानंतर स्वित्झर्लंडमधलं सामाजिक आणि राजकीय वास्तव खूपच वेगळं आणि वेगळ्या जगातलं वाटलं. आणि खरी लोकशाही म्हणजे काय आणि ती कशी असली पाहिजे हे खूप चांगल्या तऱ्हेनं कळलं.

भारतामध्ये वार्तांकन करणारी काही वृत्तपत्रं, वाहिन्या आणि समाजमाध्यमातील लेख यांमुळे युरोपमधील ग्रीन पार्टीज् आणि ग्रेटा यांच्याबद्दल काहीसा गैरसमज होता. लेख वाचल्यामुळे युरोपमधलं हवामान संकट म्हणजे काय हे समजलं आणि गैरसमज दूर झाला. स्विझर्लंडमधील आणि एकंदरच युरोपातील समाजजीवनाबद्दल आणि राजकारणाबद्दल वाचायला आवडेल.-माधव जोगदंडमुंबई.

या युगात तरी शक्य नाही!

‘लोकरंग’मधील (१६ मार्च) सई हलदुले बोंवां यांचा ‘खासदाराचा सायकल प्रवास’ या लेखामुळे तिथल्या राजकारण्यांच्या स्वत:च्या देशाबद्दल आणि एकूणच आपल्या जीवनाबद्दल असलेल्या आदर्शवादाबद्दल वाचून अतिशय प्रभावित झालो. सार्वजनिक वाहनातून किंवा सायकलींवरून फिरणारे राजकारणी तर माझा अतिशय कुतूहलाचा विषय झाला आहे. लेखिका खरंच नशीबवान आहेत की त्या अशा देशाच्या सून झाल्या आहेत. आपला भारत स्वित्झर्लंड होणं या युगात तरी शक्य नाही.गोरख यशवंतराव पाटीलठाणे.

विचार करायला लावणारा लेख

‘लोकरंग’मधील (१६ मार्च) सई हलदुले बोंवां यांचा ‘खासदाराचा सायकल प्रवास’ हा लेख वाचून जगातील लोक कसं जगतात आणि आपण भारतीय कसे जगतो याचा पुन्हा विचार करावासा वाटला. मतपेटीतून बदल घडतो हे आम्ही कधी शिकणार? जनतेला दिलेली आश्वासनं संसदेत निवडून आलेल्या सदस्यांनी पूर्ण करायची असतात, हे आम्हाला कोण शिकवणार? वातावरणात बदल घडत आहेत हे आम्हा भारतीयांच्या डोक्यात कोण घालणार? यांच्यासारखे जगणे आम्हा भारतीयांच्या नशिबी कधी येणार कोण जाणे.मारुती जाधवनवी मुंबई, खारघर.

आश्वासक विचार मिळाला

‘लोकरंग’मधील (१६ मार्च) सई हलदुले बोंवां यांचा ‘खासदाराचा सायकल प्रवास’ या लेखात अत्यंत सहज, ओघवत्या आणि साध्या शब्दांमध्ये घटना प्रसंग पेरून लेखिकेने खूप मोठा विचार सांगितला आहे.

राष्ट्र कितीही छोटं असलं किंवा कितीही मोठं असलं तरी त्याच्या बांधणीसाठी, काम करणाऱ्या माणसांच्या विचारांची बांधणी अत्यंत महत्त्वाची आहे. मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी तळमळीने उभे राहताना आपोआप नेतृत्व घडते, हेही त्यातून दिसून येते. वरवरचा बेगडीपणा न ठेवता आपल्या आचार-विचारातील साधेपणा जपता येतो. मानवी विचार आणि मूल्ये स्वत:मध्ये तसेच पुढील पिढ्यांमध्ये रुजवून आपण ते करू शकतो. या लेखातून खूप आश्वासक विचार मिळाला.आनंद वाघ

भारतात राजकारण्यांचे बेलगाम वागणे

‘लोकरंग’मधील (१६ मार्च) सई हलदुले बोंवां यांचा ‘खासदाराचा सायकल प्रवास’ व विजया जांगळे यांचा हा ‘हेही याच जगातले नेते!’ हे दोन्ही लेख वाचले. हे लेख लोकशाही, साधेपणा अधोरेखित करून सत्तेच्या गैरवापरावर तीव्र प्रहार करतात. युरोपातील राजकारण्यांच्या साधेपणाच्या आणि जनसामान्यांशी असलेल्या सौहार्दपूर्ण नात्याच्या तुलनेत भारतीय लोकशाहीला सरंजामशाहीचा विळखा बसल्याचे दिसते. सत्ता उपभोगणारे लोक जनतेच्या कष्टाच्या पैशांचा विलासी जीवनशैलीसाठी सर्रास गैरवापर करत आहेत. बंगल्यांवर होणारा कोट्यवधींचा खर्च, गाड्यांचे ताफे, रोजच्या हजारोंच्या उधळपट्टीसाठी सरकारी निधीचा वापर, हे केवळ आर्थिक अन्याय नाही तर लोकशाहीच्या तत्त्वांच्या विरोधातील कृती आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात कुपोषणामुळे बालमृत्यू होत असताना, मंत्र्यांना दुधाने स्नान घालणे ही समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी क्रूर गोष्ट आहे. ज्या भागात नागरिक पाण्यासाठी रात्रभर टँकरची वाट पाहतात, तिथे मंत्र्यांच्या बंगल्यांवर गवताला पाणी देण्यासाठी, कुत्र्यांना अंघोळ घालण्यासाठी हजारो लिटर पाणी खर्च होते ही सत्तेच्या हिंसाचाराचीच एक अप्रत्यक्ष आणि निर्दयी बाजू आहे. स्वत:ला गांधींचा वारसदार मानणाऱ्या राजकीय नेत्यांनाही त्यांच्या साधेपणाचा विसर पडला आहे, तर काही उद्याोगपती आणि धनाढ्य लोक आपल्या संपत्तीचे भांडवल करून तिचे प्रदर्शन करण्यात मग्न आहेत.

अर्थात, याला काही अपवादही आहेत. बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर, त्रिपुरातील डाव्या विचारांचे मुख्यमंत्री आणि लार्सन अँड टुब्रोचे अनिल मणिभाई नाईक यांसारखे व्यक्तिमत्त्वं साधेपणा आणि प्रामाणिकपणाची मूर्तिमंत उदाहरणे आहेत. कर्पूरी ठाकूर यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीतही कोणतीही खासगी संपत्ती निर्माण केली नाही, नातेवाईकांना लाभ दिला नाही. त्रिपुरात तर एक डाव्या विचारसरणीचा मुख्यमंत्रीही स्वत:चे कपडे धूत असे आणि राज्याचे मुख्य सचिवही त्यांच्या बंगल्यात राहत; आणि दोघेही एकत्र मंत्रालयात जात असत. त्रिपुरामध्ये एका मार्क्सवादी मुख्यमंत्र्याची पत्नी तिच्या सरकारी नोकरीसाठी ऑटो रिक्षाने प्रवास करत असे. दिल्लीतील डाव्या खासदारांच्या घरात पक्षाच्या कार्यालयासाठी जागा राखीव ठेवली जाते आणि त्यांचे संपूर्ण वेतन पक्षाच्या तिजोरीत जमा केले जाते. आयआयटी मुंबईचे प्रा. चेतनसिंग सोलंकी यांनी फाटलेल्या मोज्यांसह घेतलेले छायाचित्र हे फाजील ऐषआरामावर कठोर टीका करणारे ठरले. ‘‘मी नवीन मोजे घेऊ शकतो, पण निसर्ग नव्या गोष्टी निर्माण करत राहू शकत नाही,’’ असे म्हणत त्यांनी भौतिक वस्तूंच्या मर्यादित वापरावर भर दिला.

गांधीजींच्या विचारसरणीशी फारकत घेणारे डावे नेते आज त्यांच्या साधेपणा आणि काटकसर धोरणाचे अनुकरण करत आहेत. दुसरीकडे, गांधींचे वंशज असल्याचा दावा करणारे किंवा कठोर शिस्तीचा उद्घोष करणारे नेते मात्र यापासून कोसो दूर आहेत. लोकशाहीत साधेपणा हा केवळ आदर्श नसून आवश्यक मूल्य असायला हवे. लाल दिव्यांचे ताफे आणि सायरनच्या आवाजाने जनतेच्या मनात फक्त असंतोषच वाढतो. कदाचित आज जनतेला हे सहन करावे लागत आहे, पण उद्या हाच फाजील खर्च आणि अहंकार यामुळे यांना राजकीय पराभवाचा सामना करावा लागेल. त्यामुळे लोकशाहीचे खरे स्वरूप जपण्यासाठी सार्वजनिक पैशांचा आदर करणे, अनावश्यक खर्च टाळणे आणि सत्तेतील जबाबदारीचा योग्य उपयोग करणे हाच योग्य मार्ग आहे.तुषार निशा अशोक रहाटगावकरडोंबिवली, पूर्व.

व्हीआयपी संस्कृती बदलवूया

‘लोकरंग’मधील (१६ मार्च) सई हलदुले बोंवां यांचा ‘खासदाराचा सायकल प्रवास’ हा लेख वाचून स्वित्झर्लंडमधील लोकांचा साधेपणा पाहून मला खरोखरच आश्चर्य वाटले. आम्ही नेहमीच भारतीय संस्कृती आणि भारतीय परंपरा किती चांगल्या आहेत हे सांगत असतो. परंतु या लेखाने मला पश्चिमेकडे पाहण्याची आणि त्यांच्याकडून आपण काय चांगले घेऊ शकतो हे समजून घेण्याची प्रेरणा दिली आहे. मी प्राध्यापक असून एका संस्थेत एमबीएच्या विद्यार्थ्यांना शिकवतो. आपण शाळेपासूनच व्हीआयपी संस्कृती राबवतो. त्यानंतर कॉलेज, नोकरीतही हीच प्रथा रूढ आहे. हा लेख माझ्यासाठी खूप मार्गदर्शक ठरला आहे. हा लेख वाचून मी सर्वांना समान वागणूक मिळावी यासाठी प्रयत्न करेन आणि माझ्या विद्यार्थ्यांमध्येही व्हीआयपी संस्कृती पासून दूर संस्कार रुजवेन.प्रथमेश तावडे

भारतीयांसाठी स्वप्नवतच!

‘लोकरंग’ मधील (१६ मार्च) सई हलदुले बोंवां यांचा ‘खासदाराचा सायकल प्रवास’ व विजया जांगळे यांचा हा ‘हेही याच जगातले नेते!’ हे दोन्ही लेख वाचून खूप वेगळी माहिती मिळाली. एकूणच व्हिन्सेंट आणि समस्त स्विस राजकीय नेत्यांची साधी राहणी हे आम्हा भारतीयांना स्वप्नवतच वाटावी अशी. स्वातंत्र्य मिळाल्यावर सुरुवातीच्या काळातील अनेक नेते ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ या तत्त्वांशी एकनिष्ठ होते. मधू लिमये, मधू दंडवते यांसारखे अनेक नेते सत्तेत असतानाही साधेच होते. स्वत: पंडित नेहरूंच्या काटकसरीचे वर्णन त्यांचे स्वीय रक्षक के. एफ. रुस्तमजी यांनी त्यांच्या ‘नेहरूंची सावली’ या पुस्तकात केले आहे.आल्हाद धनेश्वर

साधेपणाची एक आठवण!

‘लोकरंग’मधील (१६ मार्च) विजया जांगळे यांचा ‘हेही याच जगातले नेते!’ हा युरोपमधल्या लोकप्रतिनिधींच्या साधेपणाबद्दलचा लेख वाचला. तो वाचून दत्तात्रय वांद्रेकर (बाबुराव) काकांची आठवण आली. ते १९५२-५७मध्ये मुंबई राज्याच्या मंत्रिमंडळात होते. मोरारजी देसाई तेव्हा मुख्यमंत्री होते. मंत्री झाले तरी काका खारला दहाव्या रस्त्यावर स्वत:च्या घरात राहायचे. सरकारी बंगला किंवा गाडी वापरायचे नाहीत. सचिवालयात जाण्यासाठी खार स्टेशनला रोज चालत जायचे. खारहून लोकल पकडून चर्चगेट आणि पुढे ओव्हल मैदानाला वळसा मारून चालत सचिवालयात जायचे. तेव्हा मंत्रालय नव्हते. हे सचिवालय ( old Secretaria )- जेथे आता दिवाणी न्यायालय आहे ती इमारत येथे होते. स्टेशनपासून एक कि.मी.पेक्षा जास्त अंतरावर आहे. बरोबर पोलीस किंवा अंगरक्षक नसायचा. परत येतानाही लोकलच पकडायचे. वांद्रे पोलीस ठाण्यातून सिक्युरिटी म्हणून आलेल्या पोलिसाला त्यांनी परत पाठविले होते. त्यांच्या राहत्या घरी पोलीस कधीच नव्हते ना दारवान. सर्वांना मुक्त प्रवेश होता. १९५७मध्ये पुन्हा निवडणुकीस उभे राहण्यास त्यांनी नकार दिला. बी. डी. जत्ती- जे पुढे राष्ट्रपती झाले आणि मधुकरराव चौधरी- जे पुढे महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री झाले ते त्यांना गुरू मानत. हा लेख वाचून त्यांची प्रकर्षाने आठवण झाली.प्रदीप वांद्रेकर

अजूनही आपण गुलामच!

‘लोकरंग’ मधील (१६ मार्च) विजया जांगळे यांचा ‘हेही याच जगातले नेते!’ वाचला. या लेखात त्यांनी परखड वास्तव मांडलं आहे. आपल्या देशात ‘यथा प्रजा तथा राजा’ अशीच आवस्था आहे. आपल्या जनतेला मुळात लोकशाहीच कळलेली नाही. शेकडो वर्षं गुलामगिरीमध्ये गेले. अजूनही आपण गुलामच आहोत. तेही राजकीय गुलाम. गुलामांनी निवडून दिलेले राजे हे अकलेनेही गुलामच असणार. खरं तर उन्मत्त नेत्यांना दोष देऊन काही उपयोग नाही. कारण त्यांना निवडून देणारं कोण? तर आपणच. राजकीय व्यवस्था ही समाजाचा आरसा असते, असं म्हणतात. आपण वर्णन केलेल्या देशांसारखी प्रगल्भ लोकशाही जगणे हे आपल्या देशासाठी सध्यातरी दिवास्वप्नच आहे.श्याम खंडाळीकरमुंबई.