प्रशांत कुलकर्णी
जीवनात नेहमीची, सोपी वाटणारी, रुळलेली वाट सोडून अचानक काही जण वेगळ्या वाटेनं जाणं पसंत करतात. ते स्वत: तर त्या वाटेवरून यशस्वीपणे, आत्मविश्वासाने चालत जातातच, पण महत्त्वाचं म्हणजे ते इतरांसाठीही मार्गदर्शक ठरतात. अशा काही व्यक्तिमत्त्वांचा परिचय ‘वेगळ्या वाटेने’ या छोटेखानी पुस्तकात शकुंतला फडणीस यांनी करून दिला आहे.
प्रख्यात व्यंगचित्रकार आणि शकुंतलाबाईंचे पती शि. द. फडणीस, प्रसिद्ध लेखक आणि शेजारी द. मा. मिरासदार, कविवर्य सुरेश भट, संशोधक डॉ. शोभना गोखले, पहिल्या महिला पोलीस अधिकारी कुसुम देव, व्यंगचित्रकार वसंत सरवटे आणि हरिश्चंद्र लचके इत्यादींच्या आयुष्याच्या प्रवासावरील लेख या पुस्तकात आहेत. ओघवती भाषा आणि नेमके संदर्भ यामुळे हे पुस्तक वाचनीय झाले आहे.
अनेक हालअपेष्टा सोसून, रोजच्या जीवनाशी संघर्ष करून, अनपेक्षित संकटांशी सामना करून विशिष्ट ध्येयाने भारावून गेलेली ही व्यक्तिमत्त्वं आहेत. त्या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी विशेष आहे आणि ते ‘विशेष’ सर्वसामान्य लोकांना नक्कीच आकर्षित करेल असे आहे. हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांनी हास्यचित्रांच्या कॉपीराइट कायद्याबद्दल निर्माण केलेली जागरूकता, सरकारकडून कायद्यात बदल करवून चित्रांच्या प्रदर्शनावरचा माफ करवून घेतलेला कर, गणिताच्या पुस्तकातील रेखाटनांबद्दलची निर्मितीप्रक्रिया हे सर्व वर्णन उद्बोधक आणि खुसखुशीत आहे. सुप्रसिद्ध विनोदी लेखक द . मा. मिरासदार यांचा रोजच्या जीवनातील विलक्षण साधेपणा दर्शविणारा लेखही वाचकांच्या लक्षात राहतो.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून येऊन मराठी साहित्यात हास्यचित्रकलेचे स्वतंत्र स्थान निर्माण करणारे हरिश्चंद्र लचके यांचा प्रवास वाचतानाही आपण आश्चर्यचकित होतो. तीच गोष्ट पहिल्या महिला पोलीस अधिकारी कुसुम देव यांच्याबाबतीतही. त्यांना नोकरीत आलेले अनुभव विलक्षण आहेत. उन्हातान्हात, दऱ्याखोऱ्यांत इतिहास संशोधनासाठी भटकंती करणाऱ्या डॉ. शोभना गोखले यांचे जीवन हे आश्चर्यकारक म्हणावे असेच आहे. व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांच्या व्यंगचित्रांचे आस्वादक रसग्रहण करताना त्यांचं व्यक्तिमत्त्वही शकुंतला फडणीस यांनी उत्तमरीत्या उलगडून दाखवले आहे. असे हे वाचनीय पुस्तक आपल्याला वेगळ्या वाटेने जीवनप्रवास करण्याविषयी निव्वळ माहिती देत नाही, तर प्रेरणाही देते. शि. द. फडणीस यांचे मुखपृष्ठही नेहमीप्रमाणे अद्भुतरम्य आणि चेहऱ्यावर हास्य उमटवणारे आहे.
‘वेगळ्या वाटेने’- शकुंतला फडणीस, उत्कर्ष प्रकाशन, पुणे.
पृष्ठे : ८०, मूल्य : १०० रुपये. ६