‘अब तो हवा भी बिकने लगी है’ हा रवींद्र लाखे यांचा लेख वाचला. ‘प्रदूषण’ हा सध्याचा काळजीचा विषय तर आहेच, पण हे माहीत असूनही आपण त्याकडे समजून उमजून दुर्लक्ष करीत आहोत. या पार्श्वभूमीवर हा लेख डोळ्यात अंजन घालणारा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लेख अगदी सर्वसामान्य वाचकालाही कळावा याची दक्षता लेखकाने घेतली आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण घातक अशा प्लास्टिकच्या वस्तू कशा वापरतो, ध्वनी प्रदूषण कसे पसरवतो, पर्यावरणासंबंधात वरवरच्या दिखाऊ कारवाया कशा करतो, हे दाखवून लोकांना सावध करण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. दृष्टान्तकथेने तर हा विषय ‘माणसे’( वयाचे बंधन नाही.) किती सहज घेतात आणि पुढल्या पिढीला कोणता धडा घालून देतात, हे दाखवून दिले आहे.
– धनंजय तडवळकर, पुणे
समर्पक लेख
‘लोकरंग’मधील (३ ऑक्टोबर) ‘अब तो हवा भी बिकने लगी है’ हा रवींद्र लाखे यांचा लेख वाचला. लेख वाचून खूप आनंद झाला आणि दु:खही झाले. अतिशय समर्पक भाषेत आजच्या जगाचे चित्रण त्यात केलेले आहे. या विषयावर चर्चा करणे किंवा या विषयावर बोलणे खूप गरजेचे आहे. सर्व स्तरांतून या विषयावर बोलून त्यावर योग्य त्या उपाययोजना व्हायला हव्यात; अन्यथा याचे खूप वाईट दुष्परिणाम आपणास भोगावे लागू शकतात.
– डॉ. नागनाथ माने
सद्य:स्थितीचे मार्मिक चित्रण
‘अब तो हवा भी बिकने लगी है’ या लेखात रवींद्र लाखे यांनी अतिशय विचारपूर्वक, प्रगल्भपणे, मार्मिकतेने महत्त्वाच्या विषयावर नेमके बोट ठेवले आहे. हा लेख समाजाचे वास्तव आपल्यासमोर ठेवतो व म्हणूनच मनाचा थरकाप होतो. आपल्या भावी पिढीची काळजी वाटावी अशी परिस्थिती आज समाजात बघायला मिळते आहे. लेखकाने सध्याच्या नेमक्या परिस्थितीवर योग्य प्रकारे बोट ठेवलेले आहे. लेखात सुसंस्कृतपणाची केलेली व्याख्या अतिशय समर्पक आहे. सुसंस्कृत म्हणजे कोण, हे फारच उद्बोधकपणे सांगितले आहे. फक्त यांत्रिकीकरण, पैसा, चैन, मौजमजा, भौतिक वस्तूंचा अवास्तव उपभोग, परदेशातील नोकरी, समाजात असणारे मोठे स्थान यांनी समाज घडणार नाही. समाज घडण्यासाठी सुसंस्कृतपणा हृदयावर कोरला गेला पाहिजे आणि तो बालपणापासूनच मनात, हृदयात रुंजी घालायला हवा. हा लेख हृदयाला भिडणारा असाच आहे. वास्तव स्वीकारून समाजमनाने बदलाची तयारी ठेवायला हवी.
– नीतिन राऊत
समाजाची भोगवादाकडे वाटचाल
‘अब तो हवा भी बिकने लगी है’ या लेखात रवींद्र लाखे यांनी सत्य परिस्थिती मांडली आहे. समाजाची घडणच अशी होत चालली आहे की फक्त भोगवादालाच अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. निर्मिती, व्यवस्थापन व शिस्तीचे पालन या गोष्टींकडे सर्वजण काणाडोळा करत आहेत.
– वासुदेव हर्डीकर