‘लोकरंग’मधील (१६ फेब्रुवारी) गिरीश कुबेर यांच्या ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरातील लेख ‘रसिया आओ ना!’ हा लेख वाचला. महाराष्ट्र आणि बंगाल या दोन्ही राज्यांची सांस्कृतिक क्षेत्रातील प्रगती एकसमान पातळीवर असल्याचे जरी मान्य केले; तरी कलावंतांची कदर करण्यात बंगाल हे राज्य काकणभर सरस असल्याचे अमान्य करता येणार नाही, हेच खरे! याबाबत बंगाल राज्य महाराष्ट्राच्या किती तरी पुढे आहे, याचेच हे एक उदाहरण. साधारणपणे अडीच वर्षांपूर्वी जेव्हा कोलकात्यातील चतुरस्रा संगीत कलावंत सौमित्र चतर्जी यांचे निधन झाले तेव्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसह झाडून बहुसंख्य डावे- उजवे राजकारणी संपूर्ण अंत्ययात्रेत चालले. याउलट किशोरीताईंच्या अंत्यविधीसाठी उपस्थित नाममात्र राजकारणी नेते पाहता ही बाब प्रकर्षाने जाणवली. महाराष्ट्र याबाबतीत नक्कीच उदासीन आहे, एवढे मात्र खरे!

बेन्जामिन केदारकरविरार.

शिकाऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज

‘लोकरंग’ मधील (२३ फेब्रुवारी) राखी चव्हाण यांचा ‘वाघांवर पुन्हा संकट…’ हा लेख वाचला. या लेखात योग्य त्या उपाययोजना करण्यात कुठे चूक होते, कुठे व कसे दुर्लक्ष होते याचा ऊहापोह करून, सुनियोजित मार्गाचा अवलंब करण्यात सरकारी यंत्रणा कमी पडत असल्यामुळे वाघांचे मृत्यू झाले असे म्हटले आहे, पण यावर वन विभाग सुस्त का आहे हा प्रश्न पडतो. केवळ शिकारीच नव्हे तर मानवी वसाहतीत होणारा वाघांचा धुडगूस, रस्ते अपघात, विष प्रयोग, विद्याुत करंट लागूनही वाघ मरण पावतात. यामुळे शासनापुढे हे एक आव्हानच आहे. वाढलेल्या संख्येची दखल घेणे अथवा त्यांची योग्य ती देखभाल करण्यात सरकारी यंत्रणा कुचराई करीत आहेत. शिकाऱ्यांना आळा घालण्यासाठी साम-दाम-दंड-भेद नीतीचा उपयोग करण्यात शासकीय यंत्रणा निष्क्रिय ठरते आहे.

डॉ. नूतनकुमार पाटणीऔरंगाबाद.

बुलडोझर संस्कृती कशाचं प्रतीक?

‘लोकरंग’मधील (१६ फेब्रुवारी) विजय तांबे यांचा ‘हरती लढाई लढण्याची प्रेरणा येते कुठून?’ आणि लोकेश शेवडे यांचा ‘निषेध- निदर्शन- निवडणुका’ हे दोन्ही लेख वाचले. सामान्यांची अन्याय्य, असहाय भावना बळावत असताना आशेचे अनेक अंकुर नवाल्नीच्या रूपात आपल्या सभोवती मूळ धरत असतात आणि त्याहून अधिक वेगाने, शक्तीनिशी अनेक पुतिनरूपी कीड अशांस खुडण्यास सरसावलेली असते.

आपल्याकडील तुरुंगात खटल्याविना खितपत पडलेला उमरखलिद असो की वाराणसींतून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या ‘रंगीला’नामक तरुणांस आलेले अनुभव (नकारात्मक)असो. किंवा गुजरातमधील प्रसिद्ध गोध्रा-हत्याकांडात एकटं पडलेल्या सत्याची बाजू घेणारे आयपीएस अधिकारी संजीव व त्यांच्या कुटुंबांस भोगाव्या लागणाऱ्या अडचणींचा सामना असो… अशा अनेक घटना… त्यात काही समोर आलेल्या तर काही अडगळीत गेलेल्या… तितक्याच (नवाल्नी इतक्या) मन पिळवटणाऱ्या नसल्या तरी त्याच वाटेने जाणाऱ्या जरूर आहेत. आपल्याकडे उदयास आलेली ‘बुलडोझर वा वॉशिंग मशीन’ अशी रूपके कशाचं प्रतिनिधित्व करतात? नवाल्नी यांची लेक दाशा म्हणते, ‘‘तुम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य हे सहज मिळालेलं नाही. जोपर्यंत माझे राष्ट्र खऱ्या अर्थानं स्वतंत्र होत नाही; तोपर्यंत मी सत्य सांगण्यास अजिबात कचरणार नाही.’’ आणि आपण?

विजय भोसले

लोकशाहीच्या प्रेमासाठी हुतात्मा

‘लोकरंग’मधील (१६ फेब्रुवारी) विजय तांबे यांचा ‘हरती लढाई लढण्याची प्रेरणा येते कुठून?’ आणि लोकेश शेवडे यांचा ‘निषेध- निदर्शन- निवडणुका’ हे दोन्ही लेख वाचले. समोर मृत्यू दिसत असतानाही माणसात असलेली सदसद्विवेकबुद्धी अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देते. विष प्रयोग झालेले नवाल्नी रशियात परत आले. क्रूर सत्ताधीशांनी सैबेरियातील तुरुंगात त्यांचा अंत घडवून आणला. नवाल्नी गेले, पण जगातील लाखो लोकांना प्रेरणा देऊन गेले. त्यांच्या मागण्या जगातील सर्वच मानवाला हव्या असणाऱ्या आहेत. भ्रष्टाचाराला विरोध, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, न्याय मार्गाने निवडणुका, युद्धग्रस्तांना भरपाई, सर्व सामान्य जनतेच्या शिक्षण आणि आरोग्यावर खर्च सरकारने करावा. मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी लोकशाही आणण्यासाठी प्रयत्न केला, पण लोकशाही रुजली नाही. पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात लोकशाही प्रजासत्ताक आणले. ते ७५ वर्षे टिकले.– युगानंद गुलाबराव साळवे, पुणे.

Story img Loader