मुकुंद वझे

प्रा. विजय तापस यांच्या सदरातील नाटककार गद्रे यांच्यावरील लेख वाचला. त्यांचा नऊ नाटिकांचा संग्रह ‘नाटिका नवरत्नहार’ १ जानेवारी १९३२ रोजी प्रकाशित झाला. स्वत: गद्रे यांनीच तो प्रकाशित केला होता. त्यातील नाटिकांची नावे अशी- ‘प्रेमदेवता’, ‘पूर्ण स्वातंत्र्य’, ‘मधुसंगीत घटस्फोट’, ‘कुमारी १९३१’, ‘आई’, ‘तरुण पिढी’, ‘प्रीतिविवाह’, ‘मुलींचे कॉलेज’, ‘पुणेरी जोडा’! या संग्रहातील एकांकिकांचे प्रयोग त्याकाळी सातत्याने होत असत. मोठय़ा संख्येने झालेल्या या प्रयोगांमुळे आपल्याला महाराष्ट्र नाटय़संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले असे गद्रे यांनी स्वत:च या संग्रहाला लिहिलेल्या प्रस्तावनेत म्हटले आहे. ‘कुमारी १९३१’ या नाटिकेचे मुंबईत सलग १०१ प्रयोग एकाच नाटय़गृहात झाले. काही नाटिकांची भाषांतरे गुजरातीतही झाली. ‘प्रेमदेवता’ या नाटिकेत ११ पदे तसेच ‘कुमारी १९३१’मध्ये दहा पदे होती. या पदांवर संदेश-गीत, निर्धार-गीत, स्नेह-गीत अशी प्रकारदर्शक शीर्षके आहेत.

नेमकं उत्तर देशील मला?
‘नेमकं उत्तर हवंय मला
तपशील कशाला..
मग आपणहून करेन कबूल
सावलीमागे धावले म्हणून’

रजनी परुळेकरच्या या काव्यपंक्ती ती गेल्याची बातमी वाचल्यापासून मनात रुंजी घालत होत्या. मन कोळ्याच्या जाळ्यात अडकत अडकत भूतकाळात पोहोचलं होतं आणि ‘लोकरंग’मधील (१५ मे) कवयित्री नीरजांचा लेख वाचून ते व्यक्त करण्याचा मोह आवरता आला नाही.रजनी कला शाखेला असली तरी भाषातज्ज्ञ सुहास लिमयेंमुळे विज्ञानलेखक लक्ष्मण लोंढे यांच्याशी तिची खूप जवळची मैत्री होती. आमच्या लग्नानंतर ती अख्ख्या कुटुंबाचीच सख्खी मैत्रीण झाली. आम्हा दोघींमधलं सख्य तिच्या मला ‘शशी’ या माहेरच्या नावानेच हाक मारण्यामुळे वाढत गेलं. पण लोंढेंच्या मुलांना गोड आवडतं म्हणून आमच्या घरी येताना आठवणीने काहीतरी गोड खाऊ आणणारी ती मुलांचीही रजनी मावशी झाली. पण इतकी जवळची मैत्रीण असूनही ती सुहास लिमये आणि लोंढेंना ‘लिमये’, ‘लोंढे’ असं एकेरी, पण आडनावानेच संबोधायची. त्याबद्दल एकदा मी तिला विचारलंसुद्धा. आणि तिनं ‘शशी, मैत्री होताना ती होत जाते, तिला भाषा कुठे असते?’अशा आशयाचं उत्तर दिलेलं आठवतंय.

निसर्गाशी अगदी मनापासून, अंतर्मनातून संवाद साधणाऱ्या, प्रसंगी मिळेल त्या चिठोऱ्यावर- म्हणजे बसच्या तिकिटावर, वाणसामानाच्या यादीच्या मागच्या कोऱ्या जागेत हायकूतून व्यक्त होणाऱ्या माझ्या भावना जेव्हा ‘त्रिवेणी’ या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायच्या संवेदना प्रकाशनाने ठरवलं तेव्हा मी त्यांना म्हटलं, ‘रजनीनं माझ्या पुस्तकाला प्रस्तावना म्हणून नाही, पण माझ्या हायकूंबद्दल ‘स्वागत’पर चार शब्द लिहिले तर मला खूप भारी वाटेल..’ आणि मी तिला तसं विचारलं आणि तिनं मनापासून माझ्या या पहिल्यावहिल्या हायकू संग्रहाचं ‘स्वागत’ केलं. त्यात मी म्हणते, ‘अखेर कवीनं तीन ओळी लिहिल्या काय आणि तीस ओळी लिहिल्या काय, वाचकांना सांगण्यासारखा काही जीवनानुभव आहे का, हे महत्त्वाचं..’ आज रजनी आपल्यात नसूनसुद्धा मला विचारावंसं वाटतं..

‘नेमकं उत्तर देशील मला?
एकटेपणाला केविलवाणं म्हणत
का गुंतवलंस त्यात स्वत:ला?’

स्वाती लोंढे, प्रभादेवी

Story img Loader