‘‘लोकरंग’ (१५ सप्टेंबर) मधील ‘इरू’ समजून घेण्यासाठी…’ हा प्रियदर्शनी कर्वे यांचा लेख वाचला. डॉ. इरावती कर्वे यांना ‘द ग्रेट हिंदू’ असेच म्हणावे लागेल. त्यांची संशोधकवृत्तीने लिहिलेली पुस्तके आपली संस्कृती कळण्यास उपयोगी आहेत. सध्याच्या काळात टवाळखोर हिंदूंची संख्या वाढत असताना डॉ. इरावती कर्वे यांचे संशोधन सर्व हिंदूंना नक्कीच मार्गदर्शक असे आहे. डॉ. इरावती कर्वे आणि डॉ. दिनकरराव कर्वे यांचा आदर्श पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल आणि त्यापासून भावी पिढ्या प्रेरणा घेतील.

युगानंद गुलाबराव साळवेपुणे

समृद्ध ठेवा

‘लोकरंग’ (१५ सप्टेंबर) मधील ‘‘इरू’ समजून घेण्यासाठी…’ हा दस्तुरखुद्द इरावती कर्वे यांची नात प्रियदर्शिनी कर्वे यांचा उद्बोधक लेख वाचला. ‘इरु द रिमार्केबल लाइफ ऑफ इरावती कर्वे’ या त्यांच्या २६० पानी इंग्रजी ग्रंथात नव्याने स्वतंत्र झालेल्या भारतात शैक्षणिक आणि संशोधकीय जडणघडणीत मोलाचे योगदान अधोरेखित केले आहे. या ग्रंथात स्त्रीवाद, धर्म, महाराष्ट्राची प्रादेशिकता अशा महाराष्ट्राच्या सध्याच्या विखारी वास्तव्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची नवी ऊर्मी बहाल करताना दिसते. या ग्रंथाचा मराठीत अनुवाद केल्यास वाचकप्रेमींना तो प्रेरणादायी ठरेल आणि तो सर्जनशील साहित्याचा समृद्ध ठेवा होईल, यात शंका नाही.– अरविंद बेलवलकर, मुंबई