‘लोकरंग’मधील (२ मार्च) ‘स्नेहचित्रे : अन्यथा…’ सदरातील गिरीश कुबेर यांचा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि चिरतरुण व्यक्तिमत्त्वाचे राजकारणी विलासराव देशमुख यांच्याविषयीचा ‘आब, आदब, आदर’ हा लेख वाचला. राजकारणात आकंठ बुडालेले असूनही ज्यांनी आपल्या स्वभावातील प्रसन्नता कायम ठेवली होती. त्यांच्या नुसत्या आगमनाने सभेचे, बैठकीचे वातावरण बदलून जात असे. त्यांचे संबोधन हे प्रत्येक श्रोत्यांशी थेट संवाद साधल्यासारखे असे. काव्य शास्त्र विनोदात त्यांना उत्तम रुची असल्याने त्यांच्या भाषणात कविता, शायरी यांचा हळुवार शिडकावा असे. विनोदाच्या कोपरखळ्या असत. आपणच केलेल्या विनोदावर किंवा कोटींवर सर्वांगाने मिश्कीलपणे हसण्याची त्यांची एक खास लकब होती. त्यामुळे निवडणुकीच्या काळातील त्यांची सभा विलक्षण रंगत असे. त्यांना संगीतातही रुची होती.
बाभूळगावच्या त्यांच्या गढीत संगीताच्या मैफली होत असत. ते स्वत: उत्तम हार्मोनियम वाजवीत. या रसिकतेचा त्यांना राजकारणात खूप उपयोग झाला. बाभूळगावचे सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री/केंद्रीय मंत्री या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी अनेक माणसे जोडली आणि ते ऋणानुबंध मर्मबंधातील ठेवीप्रमाणे जपले. प्रमोद महाजन मृत्यूशी झुंज देत असताना त्यांची घेतलेली काळजी किंवा कविवर्य नारायणराव सुर्वे कोल्हापुरात रुग्णालयात असतानाच त्यांची अस्वस्थता मी जवळून पाहिली आहे. असा हा प्रसन्न स्वभावाचा राजकारणी… खरं तर त्यांनी फार लवकर आपल्याला अलविदा केले. आज राजकारणाची दशा व दिशा कमालीची बदलली आहे. मतभेदाची जागा मनभेदाने केव्हाच घेतली आहे. एकमेकांवर दोषारोपण करणे हा यांचा रोजचा उद्योग आहे. अशा वेळी विलासरावांसारख्या दिलदार नेत्याची उणीव प्रकर्षाने जाणवते. – अशोक आफळे, कोल्हापूर