बसंती रॉय यांच्या ‘नवे शैक्षणिक धोरण : योग्य अंमलबजावणीतच फलनिष्पत्ती’ या लेखात नव्या शैक्षणिक धोरणाचा लेखाजोखा प्रभावीपणे मांडला आहे. ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मोठय़ा परिश्रमपूर्वक देशातील शिक्षण क्षेत्राला विश्वासात घेऊन अत्यंत दूरदर्शी धोरण ठेवून नवे शैक्षणिक धोरण- २०२० मांडले. उच्च आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातील आयआयटी, आयआयएम, आयसर, एम्स तसेच केंद्रीय विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे आणि खासगी विद्यापीठांत त्याची अंमलबजावणी करणे तुलनेने सुलभ आणि शक्य होईल. मात्र राज्यशासित विद्यापीठांत (मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ) मात्र या शैक्षणिक वर्षांत (२०२३-२४) या धोरणाची अंमलबजावणी केवळ संबंधित विद्यापीठांच्या आवारात असलेल्या विविध विभागांतच होईल. या विद्यापीठांना अनेक जिल्ह्यांत संलग्न असलेली महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांची संख्या काही हजारांच्या घरात असून, त्यात शिक्षण घेणारे विद्यार्थी काही लाखांच्या घरात आहेत. येथे धोरणाची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षांत (२०२४-२५) होईल असे चित्र आहे. राज्यशासित विद्यापीठांचे विभाजन जिल्हानिहाय करावे अशी राष्ट्रीय ज्ञान आयोगाने २००५ मध्ये सूचना केली होती, जेणेकरून संलग्न महाविद्यालये आणि विद्यार्थीसंख्या आटोक्यात आली असती. परंतु ही सूचना कागदावरच राहिली. त्यामुळे राज्यशासित विद्यापीठांत नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे हे खूप आव्हानात्मक काम असणार आहे. संख्या वाढली की दर्जा खालावतो. राज्यशासित विद्यापीठांचा ठकफा फंल्ल‘्रल्लॠ२ मधील प्रतिवर्षी घसरणारा दर्जा याची साक्ष देतो. तसेच राजकीय हस्तक्षेप, परवाना राज, लाल फीत, नोकरशाही, दिरंगाई, प्राध्यापक आणि कुलगुरूंच्या रखडलेल्या नेमणुका यांमुळेदेखील ही विद्यापीठे ग्रासली आहेत. नवीन शैक्षणिक धोरण गुणवत्तेची बेटे असलेली आयआयटी, आयआयएम, आयसर, एम्स तसेच केंद्रीय विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, खासगी विद्यापीठे कशी करतात यावर राज्यशासित विद्यापीठांतील नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची दशा आणि दिशा ठरेल.
– डॉ. विकास इनामदार, पुणे</strong>
प्रश्न अंमलबजावणीचा!
‘नवे शैक्षणिक धोरण : योग्य अंमलबजावणीतच फलनिष्पत्ती’ या बसंती रॉय यांचा लेख वाचला. २०२० पासून जाहीर झालेल्या शैक्षणिक धोरणाची २०३० पर्यंत अंमलबजावणी होणार आहे. २०२३ साल अर्धे संपत आले तरी या धोरणाच्या अंमलबजावणीबद्दल स्पष्टता का दिसून येत नाही? शैक्षणिक धोरण कितीही क्रांतिकारी, ऐतिहासिक असले तरी प्रश्न प्राधान्याने अंमलबजावणीचा आहे. या धोरणाची अंमलबजावणी काटेकोरपणे होत आहे की नाही हे पाहण्यासाठी यंत्रणा उभारण्याची नितांत आवश्यकता आहे.
– विवेक गुणवंतराव चव्हाण, शहापूर
दीदींनी साकारलेल्या सावित्रीबाई
‘लोकरंग’मधील (११ जून) सुलोचनाबाईंवरचा अरुणा अन्तरकर यांचा ‘सात्त्विक रूपसंपदा’ हा उत्तम लेख वाचला. सुलोचनाबाईंवर आतापर्यंत जे जे लिखाण प्रसिद्ध झाले आहे त्यात एका महत्त्वाच्या भूमिकेचा उल्लेख राहून गेला आहे- तो म्हणजे त्यांनी ‘महात्मा फुले’ या चित्रपटात साकारलेली सावित्रीमाईंची भूमिका! या चित्रपटाचे निर्माते होते प्रतिभावंत व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले आचार्य अत्रे. त्यांनी जोतिरावांचे तेजस्वी आणि सत्य जीवन या चित्रपटाद्वारे लोकांसमोर आणले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आजारी असतानाही ४ जानेवारी १९५४ रोजी फेमस पिक्चर्स कलागृहात या चित्रपटाच्या मुहूर्तसमारंभास उपस्थित होते. या चित्रपटाचा मुहूर्त त्यांच्या हस्ते झाला. निर्माते आचार्य अत्रे यांना यश चिंतून बाबासाहेब म्हणाले, ‘‘अत्रे यांच्या चित्रपटामुळे भारतातील समाजसुधारक जोतिराव फुले यांच्याविषयी स्मृती पुन्हा जागृत होईल.’’ हा चित्रपट पाहून डॉ. बाबासाहेबांनी आचार्य अत्रे यांचे उत्कृष्ट चित्रपट काढल्याबद्दल आभार मानले. विषयाची मांडणी आणि देखावे या दृष्टीने पाहता तो उत्कृष्ट आहे असा अभिप्राय त्यांनी आपल्या २० जानेवारी १९५५ च्या पत्रात व्यक्त केला.
– प्रा. एम. ए. पवार, कल्याण
दुय्यम भूमिका असूनही नायिकाच!
‘लोकरंग’मधील (११ जून) अरुणा अन्तरकर यांनी लिहिलेला ‘सात्त्विक रूपसंपदा’ हा नितांतसुंदर लेख वाचला. लेखिकेने सुलोचनाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू अचूकपणे टिपले आहेत. ज्या सोज्वळ चेहऱ्याने त्यांना दीर्घकाळ कामाची व्यस्तता मिळवून दिली, त्याच सोज्वळ चेहऱ्याने त्यांना कायम प्रौढ आणि चरित्र भूमिकांत बांधून ठेवले हे लेखिकेचे निरीक्षण योग्य असेलही; परंतु ज्या चित्रपटात त्या असायच्या त्या चित्रपटाची नायिका कोणीही असली तरी संपूर्ण सहानुभूती आणि प्रेक्षकांचे लक्ष दीदींवरच असायचे. उदा. ‘मोलकरीण’ हा चित्रपट घ्या. या चित्रपटाची नायिका जरी सीमा देव होत्या तरी दीदींच्या अभिनयापुढे त्या खलनायिका वाटत होत्या आणि नायिका दीदीच होत्या. माझी आई, आजी, मावशी यांनी कधी नव्हे तो एकत्रितपणे दोन वेळा हा चित्रपट पाहिला तो फक्त दीदींसाठी.
– अॅड. एम. आर. सबनीस, मुंबई</strong>
lokrang@expressindia.com