‘लोकरंग’ मधील ‘बालमैफल’ सदरातील (२५ जून) ‘वारसाफेरी!’ हा अदिती देवधर यांचा लेख महत्त्वाचा आहे. प्रत्येक गावात, शहरात वैशिष्टयपूर्ण ठिकाणे असतात- ज्यांना पौराणिक, सामाजिक संदर्भ असतो. अशी ठिकाणे केवळ पर्यटन म्हणून पाहण्यापेक्षा त्यांचा इतिहास, संदर्भ यांची माहिती घेऊन पाहावीत व मुलामुलींना दाखवून त्यांच्यात अशा स्थळांचा वारसा जपण्यासाठी विचार द्यावेत. दिवसेंदिवस शहरात तर मोठी बांधकामे वाढत असून जुनी ठिकाणे, कलाकुसर असणारी घरे, वारसास्थळे पाहणे आवश्यक आहे. हा वारसा जपण्याची गरज असून, भावी पिढीला ही जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.
– सीमंतिनी काळे
संवाद होणे आवश्यक
‘शहरांच्या सामाजिक वारशाचं खच्चीकरण!’ या लेखात राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांतील पूर्वीची व आजची स्थिती पाहता सामंजस्य, सद्भावना कुठे गायब झाले आहेत हा प्रश्न निर्माण होतो. दंगली, भावना दुखावणे यांतून होणारे दंगेधोपे पाहता अशी परिस्थिती कशामुळे झाली? सोशल मीडियावर येणारे मेसेज धार्मिकतेढ निर्माण करणारे असल्याने भडका उडतो. त्यातून राजकीय वादविवाद होतात. टीव्ही चॅनल्सना ब्रेकिंग न्यूज मिळतात. सामाजिक वातावरणात निर्माण होणारी ही अशांतता त्रासदायक आहे. हे थांबविण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्रित येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. पण सद्य:स्थितीत असे होईल का? यंत्रणांनी सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवणे आवश्यक असून, यासंदर्भात नियमावली असावी. तसेच तातडीने कारवाई व्हावी तरच अप्रिय घटना टळतील. पूर्वीचे सलोख्याचे वातावरण पुन्हा यावे यासाठी वादविवाद, मतभेद टाळून संवाद व्हावा ही अपेक्षा.
पी. एम. काळे, नाशिक.
बाणेदारपणाचे कौतुक
‘लोकरंग’मधील हिराबाई बडोदेकर यांच्यावरील पुस्तकातील ‘ज्वाला आणि फुले’ हा लेख वाचला. हिराबाईंनी उभे राहून ‘अदा के साथ’ गाण्यास निजामास नकार दिला व नजराणाही स्वीकारला नाही. एका भारतीय गायिकेचे दाखवलेल्या बाणेदारपणाचे किती कौतुक करावे? आज स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्यावर उत्तम पगार व अन्य सोयी-सवलती मिळूनही लोक किती लाचारपणे वागतात याचे आश्चर्य वाटते. आपण स्वातंत्र्य कशासाठी मिळवले असा प्रश्न पडतो.
– अ. वा. कोकजे, गिरगाव, मुंबई</strong>