‘लोकरंग’ मधील (२ फेब्रुवारी) कौस्तुभ आमटे यांचा ‘वंचितांच्या सेवेची पंचाहत्तरी’ लेख वाचला. कुष्ठरोग झालेल्या व्यक्तींना समाजाकडून झिडकारल्यासारखी, वाळीत टाकल्यासारखी वागणूक दिली जाते याचे कारण आपण त्याच्याजवळ गेल्यास, आपल्यालासुद्धा तो रोग होईल की काय अशी निरर्थक भीती समाजमनात असते. अशा उपेक्षित आणि वैफल्यग्रस्त जीवन जगणाऱ्यांच्या आयुष्यात देवदूत बनून आले ते बाबा आमटे आणि साधनाताई. या दोघांनीही वंचितांना व पीडितांना मानसिक आधार दिला. त्यांच्यावर योग्य ते औषधोपचार करून त्यांना बरे केले व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. तसेच जगण्याची नवी उमेद दिली. आज त्यांच्या सेवेला पंचाहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत. हे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे. थोडक्यात, जे सरकारला जमणार नाही. ते त्यांनी करून दाखवले आहे. कुष्ठरोग्यांसाठी बाबा आणि साधना ताईंनी जे असीधरा व्रत घेतले आहे. त्याची धुरा पुढे यशस्वीपणे चालवण्यासाठी त्यांची पुढची पिढी तसेच समाजातील इतर अनेक माणसे पुढे सरसावत आहेत ही अभिमानाची गोष्ट. शेवटी आमट्यांचे हे महान व आभाळाएवढे कार्य पाहून, असे म्हणावेसे वाटते की, ‘इवलेसे रोप लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी’

– गुरुनाथ वसंत मराठे

स्वयंसेवी संस्थांनाही आचारसंहिता आवश्यक !

‘लोकरंग’ मधील ( २ फेब्रुवारी) ‘संस्थांची संस्थाने होताना!’ हा देवेंद्र गावंडे यांचा लेख वाचला. वैयक्तिक स्वार्थापलीकडे जाऊन व्यापक समाज हिताच्या भूमिकेतून समाजातील सर्वांत तळाच्या वर्गाला उपयोगी पडणारे काम करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असणारे बाबा आमटे यांच्यासारखे लोक समाजात दुर्मिळाने सापडतात. सेवाकार्य, समाजकार्य, रचनात्मक व विधायक काम या नावाने ओळखले जाणाऱ्या या कामाला अनेक शतकांचा इतिहास लाभला असला तरी गेल्या दोन दशकांत अनेक स्वयंसेवी संस्था आपल्या उद्दिष्टापासून भरकटलेल्या दिसतात ही समाजाच्या दृष्टीने चिंतेची बाब प्रकर्षाने जाणवते. अलीकडच्या काळात गरजेतून म्हणा अथवा संकुचित दृष्टिकोनातून म्हणा स्थापन केलेल्या, झालेल्या स्वयंसेवी संस्था पाहिल्या तर वर्तमानकाळात असमान आणि शोषणावर आधारित असलेली व्यवस्थाच यातून अधिक बळकट होण्याचा धोका संभवतो आहे.

लेखात म्हटल्याप्रमाणे, स्वयंसेवी संस्था संस्थाने होतानाच्या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण देशपातळीवर विविध स्वयंसेवी संस्थांच्या रूपाने सामाजिक क्षेत्र प्रचंड विस्तारले असले तरी या क्षेत्राचे नियमन करणारी कोणतीही सक्षम यंत्रणा आपल्याकडे अस्तित्वात नाही. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना आपले प्रत्येक सरकार मोफत सवलती, मोफत सुविधा आणि प्रत्येकाला आरक्षण या सर्वांवर अमाप खर्च करते आणि तो करूनही आपल्याला या स्वयंसेवी संस्थांची गरज का भासते? याचा साधा विचारही आपले राज्यकर्ते करताना दिसत नाहीत. विविध पक्षांची सरकारे येतात आणि जातात मात्र मूळ प्रश्न कायम राहतात.

– डॉ. बी. बी. घुगे, बीड

पण समाधानकारक उत्तर मिळत नाही

‘लोकरंग’ मधील (२ फेब्रुवारी) ‘संस्थांची संस्थाने होताना!’ हा देवेंद्र गावंडे यांचा लेख वाचला. काही सामाजिक संस्था अनेक वर्षे विविध क्षेत्रात कार्य उपक्रम करीत आहेत, पण तरीही समस्या सुटलेल्या दिसत नाहीत. काही संस्थांचे कार्य खरोखरच चांगले आहे, पण त्यांची संख्या कमी आहे. समाजकार्याचा आधार घेऊन अनेक कार्यकर्त्यांनी राजकारणात जाऊन मोठी पदे मिळवली. पण संस्था ज्या उद्देशाने स्थापन केली त्यांचे काय झाले? हा प्रश्न विचारण्यात अर्थ नसतो, कारण त्याचे समाधानकारक उत्तर मिळणार नाही.

– प्र. मु. काळे, नाशिक

विज्ञान सदरासाठी कौतुक

‘लोकरंग’ (१९ जानेवारी) मधील ‘बालमैफल’मध्ये ‘ते असं असतं?’ या सदराअंतर्गत ‘विज्ञानाची रंजक सफर हा लेख वाचला. जीवनात प्रत्येक गोष्ट ही विज्ञानच आहे. या सर्व घटना व घडामोडी यामागील विज्ञान काय आहे हे सोप्या भाषेत समजावून देणे आवश्यक आहे, पण तसे व्यासपीठ नाही. परिणामी विज्ञानाची माहिती जिज्ञासा असूनही मुलांना ती मिळत नाही. सोप्या पद्धतीने आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्टीचे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून विश्लेषण मुलांना व मोठ्यांपर्यंत पोहोचवणारी यंत्रणाच नाही. त्यामुळे ‘बालमैफल’मध्ये अशा प्रकारचे सदर सुरू केले याबद्दल कौतुक. मुलांमध्ये विज्ञानाधिष्ठित गोष्टी बालपणापासून रुजविण्याचे काम यशस्वी होवो.

– अशोक सब्बन

ती उंची गाठणे कठीण

‘लोकरंग’मधील (९ फेब्रुवारी) लता दाभोळकर यांचा जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलवरील ‘टाचा उंच करण्याची गरज’ हा लेख वाचला. मराठी साहित्य संमेलनाने भविष्यात जयपूर साहित्य महोत्सवाची उंची गाठणे शक्य नाही. कारण मराठीतला साहित्यव्यवहार अगदी प्रकाशन, प्रसिद्धीपासून पुस्तक विक्री-खरेदीपर्यंत गटबाजी, अनेकांचे हितसंबंध गुंतलेले असतात तसेच राजकारणही असते. राजकारण, प्रामाणिकता आणि व्यावसायिकतेचा संपूर्ण अभाव यांतून निर्माण झालेल्या अनेक अनिष्ट प्रथा येथे रुजल्या आहेत. प्रत्येक जण ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ या पद्धतीने वागल्यावर दुसरे काय होणार?

– माणिक खेर, पुणे</strong>

मराठी साहित्यही समृद्ध व्हावे

‘लोकरंग’मधील (९ फेब्रुवारी) लता दाभोळकर यांचा जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलवरील ‘टाचा उंच करण्याची गरज’ हा लेख वाचला. या लेखातून या महोत्सवाची परिपूर्ण माहिती मिळाली. जगभरातून आलेल्या साहित्यिकांचा मेळा किती सुंदर भरतो याचे यथार्थ दर्शन झाले. दर्जेदार चर्चासत्रे, नेटके आयोजन यातून शिकण्यासारखे आहे. जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलच्या उंचीची मराठी साहित्य संमेलने व्हायला हवीत. केवळ उत्सव म्हणून नको. मराठी साहित्य सातासमुद्रापार जायला हवे. मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, समृद्धी व अभिवृद्धी होण्यासाठी दर्जेदार संमेलने व्हायला हवीत. मराठी भाषेच्या समृद्धीसाठी कृती कार्यक्रम राबवायला हवा. या लेखाच्या निमित्ताने आपल्या आजूबाजूला साहित्य क्षेत्रात काय घडतंय हे समजायला मदत झाली.

– समाधान शिकेतोड, धाराशिव

या महोत्सवास जाण्याची इच्छा

‘लोकरंग’मधील (९ फेब्रुवारी) लता दाभोळकर यांचा ‘टाचा उंच करण्याची गरज’ हा जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलची माहिती देणारा सुुंदर लेख वाचला. दरवर्षी या फेस्टिव्हलची माहिती बातमी स्वरूपात त्रोटकपणे वाचनात आली. परंतु यंदा विस्तृत रूपाने या फेस्टिव्हलमध्ये नेमके काय असते याचा उलगडा या लेखाने झाला. या लेखामुळे या फेस्टिव्हलला जाण्याची इच्छा झाली आहे. खरं तर मी सहा वर्षे (१९९९ पर्यंत) जयपूरला होतो. तेव्हा अशी संधी उपलब्ध झाली नाही.

– निशिकांत मुपीड

वैविध्यामुळेच तरुणाईची गर्दी

‘लोकरंग’मधील (९ फेब्रुवारी) लता दाभोळकर यांचा ‘टाचा उंच करण्याची गरज’ हा जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलची माहिती देणारा लेख वाचला. हा लेख वाचताना आपण या फेस्टिव्हलचा भाग झालो असतो तर किती आनंद झाला असता असेच वाटून गेले. रस्त्यावरील गर्दीची उत्सुकता वाटते तेव्हा आपण टाचा उंच करून पाहतो ही अतिशय समर्पक उपमा आहे. आपल्याकडे सर्वत्र होणारी साहित्य संमेलने ही साहित्यिक मेळावा न होता राजकीय व्यासपीठ होऊन जातात. तरुणाई सतत मोबाइल आणि इतर गॅझेट्समध्ये डोकं घालून असते, त्यांचा आणि साहित्याचा काहीही संबंध नाही हे म्हणणे या फेस्टिव्हलने चुकीचे ठरविले. जगभरातील तरुणाई त्यांच्या मित्रमैत्रिणींना घेऊन त्यांची साहित्यिक भूक भागविण्यासाठी या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होते हे या फेस्टिव्हलचे यशच म्हटले पाहिजे. मग इतकी उत्साहाने भरलेली साहित्य संमेलने आपल्या राज्यात का होत नाहीत, असा प्रश्न पडतो. याला मुख्य कारण म्हणजे व्यासपीठावरील नको तेवढा राजकीय वावर. वेळेचे नियोजन, शिस्तीचे पालन, मत मांडण्याचे वैविध्यपूर्ण विषय, जगभरचे विविध भाषक लेखक या कारणांमुळे या फेस्टिव्हलला अर्थ प्राप्त होतो. आपल्याकडील संमेलनांमध्ये तोचतोचपणा येऊ लागल्याने मरगळ येऊ लागली आहे.

– नीता शेरे

मराठीचे भविष्य आश्वासक

‘लोकरंग’ (२ फेब्रुवारी) मधील ‘बालमैफल’ सदरात ‘अद्भुत निसर्ग’ हा केदार गोखले या आठवीच्या विद्यार्थ्याचा व अंजनी म्हात्रे या नववीच्या विद्यार्थिनीचा ‘काश्मीरची संस्मरणीय सहल’ ही प्रवासवर्णने वाचली. आपल्या लेखणीतून या दोघांनी तो परिसर अक्षरश: डोळ्यापुढे उभा केला आहे. सध्याच्या काळात इतके चांगले मराठी लिहिणारे विद्यार्थी असतील तर निश्चितच मराठीचे भविष्य आश्वासक आहे यात तिळमात्र शंका नाही. ‘लोकसत्ता’ने मराठीत लिहिण्यासाठी मुलांना असेच उत्तेजन द्यावे.

– विवेक गुणवंतराव चव्हाण, शहापूर

कला इतिहास शिकण्याचा वर्गपाठ

‘लोकरंग’मधील (९ फेब्रुवारी) अभिजीत ताम्हणे यांच्या ‘दर्शिका’ या सदरातील ‘अजिंठ्याला जाऊनही बायकाच पाहायच्या?’ हा लेख वाचला. सदर लेख उत्कृष्ट कला इतिहास शिकण्याचा वर्गपाठ… दृक्साक्षरता व नंतर कम्युनिकेशन हे आपल्या कला शिक्षणात नाही. ते काम या उत्तम लेखाने केले आहे. रटाळ थिअरीची पारायणे करून विद्यार्थ्यांना जे दिसत नाही ते या लेखाने चित्रवाचन करून दाखवलं. आपल्यातील चित्रातील बारकावे व निरीक्षणं नीट समजून घेतली जात नाहीत. – रंजन र. इं. जोशी, ठाणे</p>

Story img Loader