‘लोकरंग’मधील (१९ जानेवारी) ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरातील गिरीश कुबेर यांच्या ‘नकोसा नैतिक!’ या लेखावरील निवडक प्रतिक्रिया…
कस्टम अधिकारी दयाशंकर यांच्या कसोटीच्या काळात त्यांच्याबरोबर काम करण्याचे भाग्य आणि त्यांचा विश्वास संपादन करण्याची संधी मला मिळाली, त्यामुळे लेख वाचताना त्यांच्या आठवणींनी मन हळवं झालं आणि अभिमानानं भरूनही आलं. दयाशंकर हे नाव कस्टम्स खात्यात दंतकथा बनून राहिलं आहे. जेथे जेथे त्यांनी काम केलं त्या प्रत्येक ठिकाणी त्यांच्या कामाची मुद्रा उमटली आहे. मुंबई विमानतळ हा त्याकाळी आखाती देशांतून येणाऱ्या प्रवाशांमार्फत स्मगलिंग करण्याचा एक अड्डा होता. असं म्हटलं जातं की, जेव्हा दयाशंकर मुंबई विमानतळावर कर्तव्यावर असायचे त्या वेळी आखाती देशांतील विमानतळांवर नोटीस लावली जायची की, ‘दयाशंकर इज ऑन ड्युटी.’ संबंधित प्रवासी यातला नेमका अर्थ काय तो समजायचे. परंतु स्मगलरांचा कर्दनकाळ ठरलेला हा अधिकारी, काही सन्माननीय अपवाद वगळता त्यांच्याच खात्यातील उच्च पदस्थांनाही नकोसा झालेला होता.
गोव्याचे प्रकरण साधारण १९९१ च्या सुमारास घडले. त्यावेळी दयाशंकर मुंबईच्या सागरी कस्टम विभागात दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी म्हणून कार्यरत होते. पालघर ते श्रीवर्धनची किनारपट्टी हे या विभागाचे कार्यक्षेत्र. ही किनारपट्टी म्हणजे स्मगलरांचे नंदनवन. पण आता येथे हा कर्दनकाळ येऊन बसला होता आणि त्याचा लौकिक सर्वज्ञात होता. त्यामुळे स्मगलर आणि काही अधिकाऱ्यांच्या दृष्टीने दयाशंकर ‘गले कि हड्डी’ बनून राहिले होते.
दयाशंकर यांनी मुंबई सागरी कस्टम्स या मोक्याच्या जागेवर काही महिनेच काम केले. आमच्यासारखे कनिष्ठ अधिकारी याच काळात काही चमक दाखवू शकले. मी व्यक्तिश: स्मगलिंगची दोन रॅकेट्स उद्ध्वस्त केली, पण त्यास दयाशंकर यांचेच सहकार्य लाभले. त्यांच्या देखरेखीखाली फक्त सागरी कस्टम्सच नाही तर मुंबई पोर्ट आणि विमानतळ कस्टम्सही दक्ष झाले होते. त्यामुळे आताच रुजू झालेल्या दयाशंकर यांना कसे हटवायचे हा उच्च पदस्थांसमोर प्रश्न पडला होता.
गोव्याचे प्रकरण नेमके याच काळात घडले आणि तो प्रश्न त्यांचा सन्मान करूनच सोडविण्यात आला असाही एक समज आहे. गोव्यात त्यांनी आपली कर्तव्यनिष्ठा चोख बजावली; परंतु त्यांच्या मुंबईतील बदलीने (जून-जुलै १९९१) पुढे कस्टम्स खाते आणि देशालाही मोठी किंमत मोजावी लागली. ते गोव्याला गेल्यानंतर त्यांच्याशी निष्ठा असणाऱ्या अधिकाऱ्यांनाही टेबलवर्क देऊन शांत बसवले. त्यांचा वरिष्ठ अधिकारी स्मगलर लोकांशी संगनमत करून होता. त्याच्याच कृपाछत्राखाली १९९२ च्या अखेरीस रायगडच्या समुद्रकिनारी आरडीएक्स उतरवले गेले आणि १९९३ चे भयानक बॉम्बस्फोट घडले. देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारे हे स्फोट मुंबई सागरी कस्टम्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याच मदतीने घडून आल्याचे निष्पन्न झाले. गोव्यात बसलेल्या दयाशंकर यांना हताश होऊन आपल्या खात्याची लक्तरे सार्वजनिकरीत्या वेशीवर टांगल्याचे विदारक दृश्य पाहावे लागले. वास्तविक आरडीएक्स आणण्यापूर्वी दयाशंकर यांनी मुंबईतील उच्चपदस्थांना काही तरी भयानक होणार असल्याचे सूचित केले होते. परंतु ‘दयाशंकर सब को हमेशा चोर ही समझता है’ असं सांगून त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आलं आणि त्याची किंमत तो उच्च अधिकारी आणि त्याच्या काही कनिष्ठ अधिकाऱ्यांनाही मोजावी लागली.
सेंट्रल एक्साईज हे कस्टम्स विभागाला जोडलेले अत्यंत महत्त्वाचे खाते. येथे कायदे आणि नियमांचा योग्य अर्थ लावण्याचं बुद्धीचातुर्याचं काम असतं. शिक्षा म्हणून त्यांची तिकडेही बदली झाली. परंतु थोड्याच अवधित त्यांनी तेथेही इतिहास रचला. आयात- निर्यात धोरणातील एक अनियमितता शोधून त्यांनी केंद्र सरकारला कोट्यवधी रुपयांचा कर मिळवून दिला. वस्तुत: देशातील शेकडो क्लासवन अधिकारी वर्षांनुवर्षे या धोरणाखाली काम करत होते, पण ही अनियमितता त्यांच्या लक्षात आली नाही. ती दयाशंकर यांनी काही महिन्यांत खात्याच्या निदर्शनास आणून दिली.
दयाशंकर यांच्याकडे कर्तव्यनिष्ठा, सचोटी आणि प्रामाणिकपणा होता. त्यांचे हे गुण तोलायचे झाले तर १०० क्लास वन अधिकाऱ्यांना एका पारड्यात ठेवले आणि दुसऱ्यात दयाशंकर तरीही दयाशंकर यांचे पारडे कणभराने जडच होईल. परंतु असा हा दबंग अधिकारी एरवी फारच सहृदयी आणि सौजन्यशील होता. आपल्या कनिष्ठांना समान पातळीवर वागणूक द्यायचा. वस्तुत: त्यांच्या कार्याचा केवढा रुबाब होता, पण वागण्यात अत्यंत साधेपणा. आपल्या हातातील पिशवी (ती झोळीच असायची) साध्या शिपायाच्या हातीही देत नसत. ऑफिसमध्ये ये-जा करताना लिफ्टजवळ आले तर शिपायांसह सर्वांना सोबत घेऊन जाणार. दुर्दैवानं देशासाठी कठोर निष्ठेनं कर्तव्य बजावणाऱ्या या अधिकाऱ्याला परदेशात मृत्यू यावा हा दैवदुर्विलास मानावा लागेल. लेखाचा शेवट वाचताना डोळ्यात अश्रू तरळून गेले.
– सुधाकर पाटील
दयाशंकर कायम स्मरणात राहतील
कस्टममध्ये माझ्या कारकीर्दीत मी मोठमोठ्या कॉर्पोरेट्स आयात आणि निर्यातीची प्रकरणे हाताळली आहेत; परंतु दयाशंकर यांच्यासारखे कणखर अधिकारी क्वचितच भेटले. CBIC अर्थात केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने न्यू कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट येथील सभागृहाला दयाशंकर यांचे नाव दिले आहे. तसेच वडाळ्याजवळ जिथे नवीन कस्टम कॉम्प्लेक्स बांधले जात आहे तिथल्या चौकालाही त्यांचे नाव दिले आहे.
–डॉ. प्रमोद संत
अशाच अधिकाऱ्यांची गरज
दयाशंकर यांच्यासारखे मोठ्या मनाचे, सच्चे अधिकारी मिळणे हे फार भाग्याचे आहे. दयाशंकर हे मोठ्या धडाडीचे, कर्तबगार अधिकारी होते. विश्वनाथ प्रताप सिंग यांनी तस्करीला आळा घालण्यासाठी पकडलेल्या मालाच्या किमतीचा काही भाग पकडणाऱ्या कस्टम अधिकाऱ्याला द्यावा अशी योजना आणली, योजनेचा हेतू चांगला असला तरी अशी योजना आणणे म्हणजे त्या अधिकाऱ्याला या योजनेत सामील करून घेणे, ज्याचा परिणाम प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर होऊ शकतो, अशी योजना आणण्याऐवजी कायद्यात राहून अशा कार्यक्षम आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पगारात वाढ केली असती तर दयाशंकर यांच्यासारख्या प्रामाणिक, नैतिकतेवर ठाम राहणाऱ्या अधिकाऱ्यांना अधिक पाठबळ मिळाले असते, पण प्रशासनाला हे नको असतेे. कारण अशी माणसे अडचणीची ठरतात आणि हेतू सफल होत नाही. उलटपक्षी प्रशासनाशी जुळवून घेणारे अधिकारीच अधिक प्रिय ठरतात हेच यातून सूचित होत आहे. दयाशंकर यांनी रीतसर रजा घेतली याचाच अर्थ ती रजा भरपगारी असणार. मग त्यांच्याकडून रजेच्या काळातील पगाराच्या वसुलीची नोटीस कशी काय बजावली जाते, हे एक कोडेच आहे. दयाशंकर यांच्यासारख्या प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, सत्याची बाजू लावून अधिकाऱ्यांवर अशी कारवाई म्हणजे त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न हे उघड आहे. दयाशंकर यांच्यासारख्या अधिकाऱ्यांचा आदर्श ठेवा हे सांगणे सोपे आहे, पण अशा अधिकाऱ्यांना तेवढाच पाठिंबा देणे हे प्रशासनाचे कर्तव्य ठरत नाही का? प्रशासन अधिक कार्यक्षमपणे चालविण्यासाठी अशा अधिकाऱ्यांची गरज आहे हे विसरून चालणार नाही.
–राजन मनोहर बुटाला, डोंबिवली
दयाशंकर अधिक कळले
मी सध्या बीएमसीमध्ये कार्यकारी अभियंता म्हणून काम करत आहे, जेव्हा माझी २०१८-२१ दरम्यान बीएमसी वडाळा (पूर्व) कार्यालयात साहाय्यक अभियंता म्हणून नियुक्ती झाली होती तेव्हा मी ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून प्रवास करत असे. तेव्हा ईस्टर्न एक्स्प्रेस वेच्या खाली एक चौक पाहून मला आश्चर्य वाटायचे. त्याचे नाव ‘दयाशंकर चौक’ असे आहे. हा संपूर्ण परिसर कस्टम विभागाच्या अखत्यारीत येतो. आणि दयाशंकर हे मोठे माजी कस्टम अधिकारी होते असे मला कळले. या लेखामुळे त्यांच्या कार्याविषयी अधिक माहिती मिळाली.
– आभास सुहास बागायतकर
नाही तर येणारा काळ कठीण!
निखळ नैतिकता बाजारू लोकांस कुठल्याही काळात कधीच झेपणारी नसते! ‘नैतिक’ नकोसाच असतो हेच खरे. आजच्या लोकशाहीत मनापासून सलाम करावा असे तुरळक म्हणवणारे ‘अधिकारी’ नामशेष होत असताना अलीकडे तर अधिकारी म्हणजे नि:संकोच लाचखोर, वाट्टेल तेवढे हितसंबंध जोपासणारे, आमदार-खासदारांचे खास जावई वगैरे किंवा आपणच कसे श्रेष्ठ किंवा लाल दिवा लावून स्वत:चाच बडेजाव करणारे. तत्त्व, लोकशाही, बांधिलकी, कर्तव्य विसरून नीतिमत्ता वेशीला टांगणारे, मंत्र्यांची चापलूसी करून त्यांचेच खास होण्याची स्पर्धा करणारे, आपले नातेसंबंध अथवा मुलांच्या भविष्याची सोय करून ठेवणारे, आपल्याच जाती-धर्माचे विशेष काळजीवाहू अथवा प्रशिक्षणादरम्यानच अधिकारीपणाची दबंगगिरी दाखवणारे इत्यादी इत्यादी म्हणजे काय तर अधिकारी? आजकाल अधिकाऱ्यांना हीच बिरूदे लागू होत असल्याचा हा काळ. अजून सेवेतही रुजू झाले नाहीत, परीक्षांची तयारी करताना अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणारे तरुण आजकाल पॉवर, पैसा आणि प्रसिद्धी याच एकमेव उद्देशाने सरकारी नोकर होऊ पाहत असतील तर ही बाब गंभीरातील गंभीर आहे. सरकारी नोकरीत प्रामाणिकपणाला इतकी कठोर बक्षिसे असतात की काहींना या नैतिकतेपायी जीवही गमवावा लागतो. बाकी बदली होणे, वाळीत टाकणे, वरिष्ठाचा दबाव, राजकीय अथवा सामाजिक दबाव, शारीरिक हल्ले, ही सगळी छोटी छोटी बक्षिसे. शेवटी दयाशंकर यांचे काय झाले हे याच लेखात कळले. दुसरीकडे मात्र जगभराची पापे करू पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना पायघड्या आणि जो सच्चा प्रामाणिक, नीतितत्त्वे बाळगणारा, कर्तव्यदक्ष त्याची मात्र हेळसांड! ही परिस्थिती बदलणार कधी आणि कशी? हाही एक नीतिप्रश्नच! संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील ‘नीतिशास्त्राच्या’ पेपरात पहिल्या क्रमांकाचे गुण मिळवणारे अधिकारी जेव्हा लाच घेताना पकडले जातात तेव्हा गुणांचा संबंध नैतिकतेशी जोडलाच जाऊ शकत नाही. म्हणून नैतिकता ही आत असावी लागते. ती दयाशंकर यांच्यासारख्या एखाद्याच अवलियाकडे असते. म्हणूनच ते आदराने लक्षात राहतात. आणि समाजाने त्यांना लक्षात ठेवणे ही समाजाची नैतिक जबाबदारीच आहे. नैतिकता रुजवण्याचे- वाढवण्याचे काम समाजाचे आहे. ‘नैतिकता नकोशी’ होते असण्याच्या काळात ती जपणे वाढवणे आवश्यक आहे. नाही तर येणारा काळ कठीण!
– करणकुमार गीता जयवंत पोले, हिंगोली
दयाशंकर यांच्या धाडसी कहाण्या
दयाशंकर यांच्यावरील लेख अगदी समरसून वाचला. कारण याच रेव्हेन्यू खात्यात मीही तरुणपणापासून काम केले आहे. या काळात दयाशंकर यांचे नाव नेहमीच ऐकून होते. त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळू शकली नाही; परंतु त्यांच्या सुरस धाडसी कथा ऐकायला मिळत. गोव्यातील कॉस्ताव हा खेळाडू असल्याचे माहीत होते आणि त्यामुळे हे सर्व प्रकरण ऐकून होते. हा लेख वाचून या प्रकरणामागच्या कथेचा उलगडा झाला. दयाशंकर यांच्याबद्दल मनात आदर होताच; तो द्विगुणित झाला. त्या वेळी आमच्या या खात्यात काही ग्रेट अधिकारी होते, त्यामुळे काम करताना आनंद वाटायचा.
– रेखा जोशी, पुणे
पुन्हा दयाशंकर…
‘लोकरंग’(१२ जानेवारी)मधील ‘नकोसा नैतिक’ या दयाशंकर यांच्यावरील लेखास मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व… आणि आशादायीही ठरतो. त्यांच्या काही अनेक आजी/ माजी सहकाऱ्यांनी त्यांच्या आठवणी जागवल्या तर काहींना ‘हे दयाशंकर खेरोखरच होऊन गेले का?’ असा प्रश्न पडला. काहींनी मुंबईतील दयाशंकर चौकवाले ‘दयाशंकर कोण’ हे आता कळलं असं कळवलं. त्यातील काही प्रतिक्रिया येथे प्रसिद्ध करत आहोत. या सगळ्यांत सर्वात हृद्या होता तो किरण दयाशंकर यांचा फोन. त्या दयाशंकर यांच्या अर्धांगिनी. ऑस्ट्रेलियात असतात. तेथून त्यांनी लेख आवडला हे कळवण्यासाठी आवर्जून फोन केला. आणि पतीच्या ‘प्रतिमे’विषयी जागरूक पत्नी या नात्याने लेखासमवेतच्या रेखाचित्राविषयी नापसंती व्यक्त केली. दयाशंकर यांच्या विषयी लिहिण्यासारखं अजून बरंच काही आहे. त्यांना माझा फोन नंबर कसा मिळाला वगैरे तपशील त्या लेखात असेल. त्या आगामी लेखासाठी दयाशंकर यांचं छायाचित्र देते म्हणाल्या. असो. दयाशंकर यांची आठवण अनेकांना प्रेरणादायी ठरली ही बाब आशा जागवणारी ठरते… त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि ‘लोकसत्ता’साठीही!– गिरीश कुबेर