शेखर हट्टंगडी
माझा जन्म ‘मॅक्झिमम सिटी’तला. कष्ट करण्याची तयारी असली तर रंकाचा राव बनविणाऱ्या मुंबईचा. १९६०-७० च्या दशकांत शहर ‘बॉम्बे’ नावाने ओळखले जाई. ‘मुंबई’ नंतर झाले. इथे जन्मलेल्या प्रत्येकाच्या धमन्यांतच क्रिकेट आणि हिंदी चित्रपटांचा दुहेरी विषाणूसंसर्ग उतरतो. माझ्या शाळेत म्हणजे सेंट झेवियर्स स्कूलमध्ये क्रिकेटसंस्कृती होती. सुनील गावसकर आणि मिलिंद रेगे येथूनच आलेले, त्यामुळे माझे पहिले स्वप्न क्रिकेटपटू बनण्याचे. ते माझ्या पालकांच्या मध्यमवर्गी विचारसरणीने पूर्णपणे तुडवले गेले. त्यांच्या (तेव्हाच्या) मते, वयाच्या तिशीत निवृत्त होणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे क्रिकेटपटू आयुष्यभर आर्थिकदृष्ट्या असुरक्षित राहतात. त्याकाळी क्रिकेटची अर्थदशा वेगळी होती. त्याकडे आपल्या मुलाचे ‘करिअर’ म्हणून पाहण्याची पालकांची दृष्टीदेखील. स्वप्नांच्या दिशेने आगेकूच करीत असताना पालकांमुळे आणि कदाचित खेळातील माझ्या कमी गुणांमुळे पुढल्या काळात बहुतांश भारतीयांप्रमाणे क्रिकेटचा दर्शक होणेच माझ्या वाट्याला आले.
आम्ही ग्रँट रोड-गिरगाव-ऑपेरा हाऊस परिसरात राहायचो. त्या दीड-दोन कि.मी. परिघात लहान-मोठी अशी किमान दोन डझन सिंगल-स्क्रीन सिनेमागृहे होती. क्रिकेटच्या सरावात किंवा क्रिकेटच्या सामन्यांत आख्खा दिवस निघून जाई. तेवढ्याच काळात एखाद्याला करमणूक करून देणारे दोन-तीन देमार चित्रपट पाहता येत. सिनेमागृहांची तिकिटे प्रचंड स्वस्त होती. बाकडा (स्टॉल २५ पैसे) आणि रॉयल (बाल्कनी एक रुपया फक्त). धार्मिक उत्सवांत रस्त्यावरच्या कोपऱ्यांत पडदे लावून चित्रपट दाखविले जात. त्यासाठी कुठेही पथारी टाकून बसावे लागे. त्याची तक्रार कुणाला नसे, कारण चित्रपटाचे हे खेळ पूर्णपणे विनामूल्य असत. माझ्या माहितीपटांना (‘संथारा’ आणि ‘तीन बेहने’) परदेशात पुरस्कार मिळाले तेव्हा मुलाखतकाराला माझ्या या ‘सिनेमा विद्यापीठां’ची माहिती आवर्जून दिली.
सेंट झेवियर्स कॉलेजमधून विज्ञानात पदवी घेतल्यानंतर मी पत्रकारितेची वाट धरली. कोरा आणि नवखा पत्रकार म्हणून ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये रूजू झालो. तेथे सिनेमाबाबत माझी आवड पाहून मला थेट चित्रपट रसास्वाद शिबिराकरीता दोन महिन्यांसाठी ‘एफटीआयआय’मध्ये धाडण्यात आले. जागतिक चित्रपटांचे दालन माझ्यासाठी इथेच खुले झाले. ‘सिनेमा’ या माध्यमाची खरी ताकद कळाली. ‘ट्रायम्फ ऑफ द विल’ (१९३५) या जर्मन डॉक्युमेण्ट्रीने संपूर्ण राष्ट्राला हिटलरच्या नाझीवादाचा स्वीकार करण्यास प्रवृत्त केले. नेत्रदीपक चित्रपटनिर्मिती अगदी अनैतिक राजकीय विचारधारेलाही पाठबळ देऊ शकते याचा हा ढळढळीत पुरावा. नाझी राजवटीचा सामान्य जर्मन नागरिकांवरील परिणामांबद्दल तुम्ही शेकडो पुस्तके वाचू शकता, पण या माध्यमाची जनमानसाला बदलण्याची शक्ती कितपत आहे, ते या डॉक्युमेण्ट्रीद्वारे कळते. या काळात पाहिलेल्या देशोदेशींच्या सिनेमा आणि माहितीपटांनी माझ्या मनात डॉक्युमेण्ट्री बनविण्याची बीजे पेरली गेली, पण तेव्हा सिनेमा बनविणे आजच्या तुलनेत फारच अवघड बाब होती. फॉर्म्युल्यात अडकलेले हिंदी चित्रपटसृष्टीचे आर्थिक गणित वेगळे होते. तर ‘डॉक्युमेण्ट्री’ बनविण्यासाठी लागणारी सगळीच तांत्रिक यंत्रणा सिनेमा बनविण्याइतकीच खर्चिक . ‘एनएफडीसी’ देखील (नॅशनल फिल्म डेव्हलपमेण्ट कॉर्पोरेशन) फिचरफिल्म बनवत होते. त्यांच्याकडून काही उत्तम निर्मिती झाली. पण त्यांच्या वितरणात त्यांना बिलकुल रस नसे. शिवाय फिल्म डिव्हिजनची माहितीपटांत मक्तेदारी होती. पण त्यांचा सिनेमा म्हणजे सरकारी धोरणांचे अगदीच रटाळ प्रचारक स्वरूप. मी या वातावरणात आरंभी सिनेपत्रकारितेचा पेशा स्वीकारला. त्यानिमित्ताने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या प्रेस शोज्ना उपस्थित राहण्याची संधी मिळू लागली. लवकरच ‘मिरर’ नावाने चालणाऱ्या एका इंग्रजी मासिकाच्या मुख्य संपादकपदाची जबाबदारी माझ्याकडे आली. पत्रकारितेतील माझी पार्श्वभूमी आणि अनुभव सिनेमाशी निगडित होता. या मासिकात त्याला वाव नव्हता. त्यापलीकडल्या जगाशी माझा संपर्क आला. समाजअभ्यासक, महात्मा गांधींवर संशोधन करणारे समीक्षक, भारतीय शास्त्रीय संगीताचा ऱ्हासकाळ विषद करणारे पंडित तसेच वैविध्यपूर्ण विषयांवर लिहिणाऱ्या लेखकांशी संपादक या नात्याने माझा संपर्क आला. ‘मिरर’मधून त्याकाळाशी संलग्न उत्तमोत्तम ‘कव्हरस्टोरी’ज आम्ही केल्या. मासिकाच्या या संपादनामुळे काही ठोस बाबी माझ्यात उतरल्या. पहिली म्हणजे कुठलाही विषय क्षुल्लक मानायचा नाही. विषय कितीही किचकट, अकादमीक असला तरी तो लेखातून मांडताना सर्वसामान्यांसाठी वाचकस्नेही बनविण्याची हातोटी दाखवायची. जनसंपर्काच्या कुठल्याही माध्यमासाठी हा नियम लागू होतो. तोच दृष्टिकोन नंतर माहितीपट बनवताना आणि तो प्रेक्षकस्नेही बनविण्याकरीता कामी आला.
पत्रकारितेत असतानाच मला अमेरिकेतल्या ओहायो विद्यापीठाची शीष्यवृत्ती मिळाली. विद्यापीठात विद्यार्थी प्रकल्पाचा भाग म्हणून मला फिल्म बनविण्याची संधी मिळाली. तिथल्या ‘मानवशास्त्र आणि चित्रपट’ या अभ्यासक्रमा अंतर्गत ‘ए डायलॉग विथ ड्रम्स’ नावाचा दहा मिनिटांचा माहितीपट हा माझा या माध्यमातील श्रीगणेशा.
प्रसिद्ध तबला शिक्षक पंढरीनाथ नागेशकर हे माझे तालवाद्यातील गुरू. काही वर्षे मी त्यांच्याकडून तालीम घेतली होती. विद्यापीठात माझे तबल्यावरील कौशल्य आणि विद्यापीठाच्या संगीत विभागातील तालवादक यांचे वादन मी ‘ए डायलॉग विथ ड्रम्स’मध्ये चित्रित केले. दादरा, केरवा ही तालवाद्या प्रणाली भारतीय आणि पाश्चिमात्य वाद्यांमधून वेगवेगळ्या प्रकारे कशी प्रगट होते, याची तुलना मी या पहिल्या माहितीपटातून केली. यानंतर हार्वर्ड विद्यापीठातून मला राज्यधोरण (पब्लिक पॉलिसी) या विषयात ‘केनेडी फेलोशीप’ मिळाली. आपल्याकडे संपूर्ण अभ्यासक्रमातून दुर्लक्षित राहिलेला हा विषय मला तेथे अभ्यासता आला. ही शीष्यवृत्ती पूर्ण झाल्यानंतर मी ‘मॅकग्रॉ हिल’ या प्रख्यात माध्यमसमूहात रूजू झालो. त्यांना विज्ञानावर लिहिणारा लेखक हवा होता. विज्ञानाचे नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या मुलाखतींची मालिका हा इथल्या नोकरीतील माझा सर्वांत मोठा आनंद. ज्या दिग्गजांच्या मुलाखती मी घेतल्या, त्यात आपल्या प्रचंड कामाचे तपशील आणि वर्णन त्यांनी शाळकरी मुलालाही समजतील अशा शब्दांत स्पष्ट केले. गुंतागुंतीचा विषय देखील सोप्या भाषेत कसा सांगावा, याचा वस्तूपाठ मला मिळाला. प्रत्येक डॉक्युमेण्ट्री बनविणाऱ्याने हे लक्षात घेणे महत्त्वाचे!
‘मॅकग्रॉ हिल’ भारतातील १९९० नंतरच्या उदारीकरणाच्या पर्वात अधिक विस्तारली. याच कंपनीच्या ‘बिझनेस विक’साठी मी दक्षिण आशियाचा आर्थिक-राजकीय वार्ताहर म्हणून निवडला गेलो, हे पुन्हा भारतात येण्याचे निमित्त ठरले आणि माझ्या चित्रपटध्यासाला पूर्ण करण्याचेदेखील. बातमीदारीसह मी चित्रपटाच्या पटकथा देखील लिहिण्यास सुरुवात केली. अनेक निर्मात्यांना भेटू लागलो. आशुतोष गोवारीकर याच काळात ‘लगान’च्या यशामुळे झळाळून निघाला होता. त्याला पटकथा दाखविली. त्याला ती आवडली. एका मराठी लघुकथेचे हक्क त्याने नुकतेच घेतले होते. त्याच्या पटकथेवर मी काम करावे अशी त्याची इच्छा होती. मात्र तो प्रकल्प पुढे सरकला नाही. त्यानंतर कुंदन शहा यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. माझ्या पटकथा वाचून कुंदनने मला मुख्य सहयोगी दिग्दर्शक (असोसिएट डायरेक्टर) म्हणून त्याच्या गंभीर विषयावरील प्रकल्पात सामील केले. ‘थ्री सिस्टर्स’ (तीन बहने) हा तो चित्रपट. कानपूरमधील एका सत्यघटनेवर तो आधारित होता. हुंडाप्रथेमुळे पिचलेल्या पालकांना वाचविण्यासाठी तीन बहिणींनी आत्महत्या केली. त्या घटनेचे सूत्र कथेमध्ये रचून आम्ही तो बनवला. त्यात अमृता सुभाष आणि कादंबरी कदम या गुणी अभिनेत्री होत्या. प्रत्यक्ष घटनेतील भीषण प्रकार हा की घरातील लोक एका विवाह समारंभाला गेलेले असतानाच्या कालावधीत या मुलींनी आपले आयुष्य संपविले होते. या आत्महत्येच्या आधीच्या काही तासांत त्यांच्या मनाची घालमेल आम्ही चित्रपटात मांडली होती. अमेरिकेतील एका महोत्सवात ‘तीन बहने’ हा ‘फीचरफिल्म’ऐवजी चुकून माहितीपट (डॉक्युड्रामा) विभागात दाखविला गेला. आयोजकांकडून जरी अनवधानाने हा प्रकार झाला असला, तरी लेखक-संशोधक तसेच सहयोगी दिग्दर्शक म्हणून मी त्यात जे जग उभारले, त्याला ही पसंतीची पावतीच होती. आपण केलेल्या कामाला मिळालेली दाद पाहून नंतरचा प्रकल्प हा डॉक्युमेण्ट्रीच असावा, हे माझ्या मनात पक्के झाले.
पुढे भारतातील पत्रकारितेच्या बदलत्या परिघात माझे मन रमेना. कुठल्याही प्रकारच्या अन्यायासाठी बातमीद्वारे लढण्याचा माझा पवित्रा. तो कायम ठेवलाच, पण त्यासह कायद्याच्या अभ्यासाकडे वळलो. मुंबई विद्यापीठातून सुवर्णपदक मिळवून उत्तीर्ण झालो. नंतर कायदेविषयक सल्लागार म्हणून आणि मुंबईत विधि महाविद्यालयात घटनात्मक कायदा शिकवू लागलो. तिथे लगेचच मला लक्षांत आले की आपली राज्यघटना म्हणजे सैद्धांतिक आणि अमूर्त दस्तावेज असल्याचा गैरसमज बहुतांश विद्यार्थांमध्ये पसरलेला आहे. तो बदलण्यासाठी आणि घटनात्मक तरतूदींचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी मी वर्गात काही न्यायालयीन वादांच्या बातम्या चर्चेसाठी घेऊ लागलो. त्यांतील एक बातमी होती ‘संथारा’ या प्रथेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांची. जैन धर्मीयांच्या या प्रथेनुसार व्यक्ती उतारवयात अन्न-पाणी त्याग करून मृत्यूला सामोरी जाते. ही पद्धत त्या धर्मात आस्थेचा विषय आहे. पण मानवतावादी दृष्टिकोनातून ते आत्महत्येचे एक रूप असल्याचे सांगत प्रथेला विरोध झाला होता. प्रकरण राजस्थान न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात गेले. तिथेही हा प्रश्न सुटला नाही, तर अडकून राहिला.
या बातमीवर वर्गात चर्चा करून झाल्यानंतर मी बराच विचार केला. उत्सुकतेपोटी मी या संपूर्ण प्रकरणाचा स्वत:हून शोध घेण्याचे काम हाती घेतले. त्यांत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या लोकांना भेटण्यासाठी राजस्थानमध्ये अनेक दौरे केले. संशोधन आणि मुलाखतींद्वारे अनेक लेख प्रकाशित केले. त्यातून ‘संथारा : भारतीय सेक्युलरिझमपुढील आव्हान ?’(संथारा ए चॅलेंज टू इंडियन सेक्युलरिझम?) या माझ्या डॉक्युमेण्ट्रीची रूपरेषा तयार झाली. माझ्या डॉक्युमेण्ट्रीसाठी मी स्वत:च पैसे ओतले, कारण मला कुणाच्या बंधनात राहून ही फिल्म बनवायची नव्हती. मला या विषयावर चर्चा होणे आत्यंतिक महत्त्वाचे वाटत असल्याने माझ्या प्रकल्पाला पूर्ण करण्यावर मी लक्ष दिले. या विषयाला पूरक भरपूर माहिती आणि अनेकांच्या मुलाखती या डॉक्युमेण्ट्रीमध्ये एकत्रित केल्या. ही प्रथा पाळणाऱ्यांच्या दृष्टीने हा त्यांचा मूलभूत अधिकार होता, तर तिला विरोध करणाऱ्यांच्या मते हा केवळ आत्महत्येचा प्रकार होता- जो कायद्याने पूर्णपणे गुन्हा आहे. दोन्ही बाजूंचा विचार करून कायदा काय सांगतो, हे बिंबवत सजग दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न मी माझ्या डॉक्युमेण्ट्रीतून केला. या प्रकरणाकडे पाहताना देशातील आजच्या सामाजिक वास्तवाच्या संदर्भात कायदा-विरुद्ध-धर्म या प्रश्नाचे हे सर्वांत नाट्यपूर्ण उदाहरण म्हणून माझ्या समोर आले. भारतातील महत्त्वाच्या शहरांसह अमेरिका, कॅनडा, युरोप आणि न्यूझीलंडमधील ‘माहितीपट महोत्सवां’मध्ये संथाराचे प्रदर्शन झाले. या विषयावर व्यक्त होण्यासाठी आणखी निमंत्रणे येत आहेत. पुढे काय, ते माझ्या येणाऱ्या ‘माहितीपटां’तूनच दिसू शकेल.
‘संथारा’च्या यशाने मला बालदीक्षा तसेच देशातील इतर कायदा-धर्म वादांवर डॉक्युमेण्ट्रीच्या अंगाने संशोधन करण्यास प्रोत्साहित केले. यानिमित्ताने आणखी काही प्रश्नही समोर आले. उदा. देशात अल्पसंख्यांच्या धार्मिक आचरणाचा हक्क, ब्रिटिश काळापासून देशावर लादलेले त्याबाबतचे कायदे आणि त्यातून तयार झालेले गुंते.
कायदा आणि त्या अनुषंगाने निर्माण झालेला धर्मसंघर्ष कसामिटणार, हा माझा सर्वात महत्त्वाचा प्रश्न. त्याला उत्तर या विषयावरील निकोप चर्चेतून मिळू शकते. समाजाने विकासाची-आधुनिकतेची कास धरताना मागे जायचे का पुढे हे ठरवायची आज गरज आहे. त्या बाबत एक पाऊल म्हणून मी डॉक्युमेण्ट्रीचा पर्याय निवडलाय. इतर कुठल्याही माध्यमांपेक्षा तिची ताकद परमोच्च आहे म्हणून!
shekharh6401@yahoo.com