‘लोकरंग’ मध्ये (५ नोव्हेंबर) ‘निवडू आणि वाचू आनंदे’ या अंतर्गत वाचनीय पुस्तकांची यादी प्रसिद्ध झाली. या यादीमुळे हे वर्ष सरत असताना नेमेचि येणारे आणि चोखंदळ वाचक, लेखक, सेलिब्रिटी यांच्या वाचनकक्षात डोकावण्याची संधी देणारे लेखन हौशी, होतकरू वाचकांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल. साक्षरतेचे, शिक्षितांचे प्रमाण वाढले तरी एकूण वाचक ही सर्वत्र ‘अल्पसंख्य’ जमातच असते. व्हॉट्सअ‍ॅपची लागण लागल्यापासून तर ती आणखीच आक्रसली आहे. त्यामुळे साहित्य संमेलनासारखे त्यांचे एकत्र येणे आवश्यक असते. ‘लोकसत्ता’ ही गरज काही अंशी या आढाव्याने भरून काढते हे खरोखरच स्तुत्य आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘माझिया जातीचे मज भेटो कोणी’ हे तुकाराम महाराजांसारख्यांनासुद्धा वाटले तर पुस्तके वाचणाऱ्याला वाटेल यात नवल नाही. लेखक, प्रकाशक किंवा पत्रकार (शिक्षक आणि प्राध्यापक यांचा समावेश यात करावा की नाही हे ठरत नाही!) यांना वाचावेच लागते. त्यांचे गरज म्हणून वाचणे आणि केवळ आनंदासाठी वाचणे वेगवेगळे असेल. या यादीत त्यांनी ‘स्वान्त:सुखाय’ काय वाचले त्याचा धांडोळा आपल्याला घेता येईल, हे विशेष उल्लेखनीय आहे. या यादीने मराठी पुस्तकांची निदान वाचनालयांनी तरी नोंद घ्यायलाच हवी.

मराठी पुस्तकांची निर्मिती तोळामासा आहे, त्यामुळे त्यांच्या किमती जरा जास्तच आणि वाचकांच्या ग्रंथप्रेमाची कसोटी पाहणाऱ्या असतात हे मान्य करायलाच लागेल. हिंदी सिनेमातला शब्द वापरायचा तर प्रकाशकांची ‘मजबुरी’ असते हेदेखील खरेच आहे. बहुसंख्य कुटुंबात कपडे, बेडशीट्स किंवा फर्निचर खरेदी करण्याबाबत जसे आणि जेवढे एकमत होते तेवढे पुस्तकांवर खर्च करण्याबाबत होत नाही हे हळूच कबूल करायला हवे. सारांश, वाचक या पूर्णपणे नाही, पण हळूहळू घटत चाललेल्या ‘प्रजाती’साठी हे लेखन प्रेरक ठरावे एवढेच !

-गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lorang nivdu aani vachu aanande readers are decreasing even an increase in the number of literate people dvr